पाऊस: आगळावेगळा-पण ओळखीचा !

पाऊस - कधी धो-धो पडणारा, तर कधी रिमझिम बरसणारा, कधी रौद्र रुपात तांडव करणारा तर कधी गायब होणारा ! अशी पावसाची विविध रुपे तर सर्वज्ञात आहेत. पण या नेहमीच्या पावसाव्यतिरिक्त आहे का असा एखादा पाऊस जो आपल्या सार्‍यांना चिरपरिचित आहे अगदी अनादि काळापासून?

अगदी तान्हे बाळ असतानाही आपल्या गरजा, हट्ट पूर्ण करुन घेण्यासाठी आपण 'या पावसाचा' उपयोग करुन घेत असतो. या पावसाचे थेंब पाहून भलेभले घायाळ होतात, अगदी शरणागतीही पत्करतात.

गॄहराज्यावरी गाजवी सत्ता राजा चिमणा एक
अन या 'चिमण्या राजाचं' हुकुमी अस्त्र असतं 'हा पाऊस' !

आलं ना लक्षात मी कोणता पाऊस म्हणतेय ते?

अगदी अश्रू ग्रंथींची वाढ अपूर्ण असल्यामुळे हा पाऊस जरी डोळ्यांवाटे बरसत नसला तरी 'टाहोरुपी' गडगडाटातुन, कडकडाटातुन आता केव्हाही पाऊस सुरु होईल याची वर्दी मिळतच असते !

आणि या वयापासून 'हा पाऊस' जो साथ करतो, तो अगदी कायमचा.

थोडं मोठं झाल्यावर दंगा, मस्ती, धडपडणे, खोड्या काढणे या सार्‍या नक्षत्रांना साथीला घेऊन 'हा पाऊस' कमी-अधिक फरकाने येतच रहातो. कधी आईच्या धपाट्याने झालेल्या वेदनेतून तो स्त्रवतो, माय आणि लेकरु दोघांच्याही डोळ्यांतून. कारण लेकराला मारले तरी त्याची वेदना ती माऊलीच सोसत असते नं !

नंतरचा टप्पा अडनिड्या वयातला. आपलं घरात कुणीच ऐकत नाही असं वाटून बंड पुकारण्याचा काळ. या काळातील नाजुक क्षणांत, हळव्या झालेल्या मनाला 'हा पाऊस' कायम साथ करतो. याच वयात समवयस्क भावंडांशी, मित्र/मैत्रिणींशी भावबंध जुळत असतात, जे कधी आयुष्यभर जुळलेलेच रहातात.

पुढे मग शिक्षण, करियर, व्यवसाय, नोकरी या व्यापात व्यस्त असतांना क्वचित उगवणारा, घरापासून दूर जावं लागलं तर home sick करणारा आणि पालकंना empty nest syndrom ची अनुभुती देतांना तो डोकावतो.

मग येते जीवनप्रवासातील एक गोंडस वळण, जोडीदाराचा जीवनातील प्रवेश....या वळणावर 'तो' हमखास भेट देतोच; वेगवेगळ्या स्तरांवर. मुलांचे दोनाचे चार हात करुन दिले म्हणजे प्रपंचातल्या ठळक जबाबदार्‍या पूर्ण झाल्या या जाणीवेतून आई-वडीलांच्या डोळ्यांतून पाझरणार्‍या 'समाधानाच्या' रुपाने; कधी होणारा लेकीचा विरह सोसत तो प्रकटतो. नववधूसाठी तर नवे घर, नवी जबाबदारी, माहेरच्या घराचा निरोप या संमिश्र भावनांना साथ करीत 'तो' हजेरी लावतो.

या टप्प्याबरोबरच येतात व्यावसायिक जगतातील जबाबदार्‍या, स्पर्धा, ताण-तणाव, कामाचा प्रचंड व्याप, प्रगती, कुरघोडी, मानसिक खच्चीकरण, झुगाड, कामाचे श्रेय लाटणे आणि असेच इतरही बरेच काही, जे आपण अनुभवतो, इतरांना भोगायला लावतो. या प्रत्येक वेळेस 'तो पाऊस' जरी डोळ्यांतून नाही स्त्रवला तरी हॄदय पोखरत असतोच. तर कधी कड्यावरून जशी नदी स्वतःला झोकून देते, तसा पापण्यांचा बांध सोडून 'हा पाऊस' एखादी आनंदी घटनाही सेलिब्रेट करत असतो आपल्या खास माणसांबरोबर, नाही का?

कधी येतात वाट्याला असेही अगतिक क्षण जेव्हा आपलं माणूस आपल्या डोळ्यांसमोर अंतरत असतं. आय. सी. यु. बाहेरची ती भयाण अस्वस्थता, आपल्या असहाय्यतेची हताश करणारी जाणीव वारंवार 'त्या पावसाचा' आधार शोधत असते. अशा वेळेस मात्र डोळ्यांबाहेर येऊ घातलेल्या 'त्याला' बळेच थोपवावे लागते, कधी चिमुकल्यांचा आधार बनण्यासाठी तर कधी मोठ्यांच्या सांत्वनासाठी....

हे आणि असे अनेक मानवी जीवनात घडत असलेले भावनिक प्रसंग, व्यक्ती, परिस्थिती, स्वभावानुरुप बदलत जाणारे असे कैक प्रसंग, ज्यांना किनार असते 'या पावसाची'.

कधीतरी मात्र असं काही घडावंही लागत नाही. पण तरीही आपली स्वतःचीच नजर चुकवून 'हा पाऊस' हजेरी लावतोच. कधी एखादी अभिजात कलाकृती पडद्यावर / रंगमंचावर बघत असताना, त्यतील एखाद्या व्यक्तीरेखेशी तादात्म्य पावून 'हा वेडा पाऊस' कधी टचकन प्रवेशतो आपले आपणासही कळत नाही. एखादे छानसे पुस्तक वाचत त्यात गुंग झाले असताना, एखादा हृदयाचा ठाव घेणारा सूर, ताल, ठेका ऐकताच 'तो' आलाच म्हणून समजायचं.

तर कधी निसर्गातला खराखुरा पाऊस बघत असतांना अवचित कुणाच्यातरी आठवणीने 'हाही' बरसू लागतो, कधी मनात आनंदाची पखरण करत तर कधी मनाला व्याकुळ करत...

अशाही एका खास प्रसंगी 'तो' येतो जेव्हा त्याचे येणे आपल्या ध्यानी-मनी-स्वप्नीही नसते. आपण उभे असतो आपल्या'आराध्यासमोर'. त्याचे सगुण-साकार रुप किंवा मूर्ती/प्रतिमा तर कधी त्याचे निर्गुण अस्तित्व जाणवताच 'हा' पाझरु लागतो नयन कमलांतुन, आपल्या आराध्याला अभिषेक करण्यासाठीच जणू!'अध्यात्मिक परिभाषेत या प्रसंगाचे वर्णन 'अष्ट सात्विक भावांची जागृती' असे केले जाते आणि त्यांतील पहिला सात्विक भाव म्हणजे 'हा पाऊस'...कोणत्याही कारणाशिवाय केवळ 'त्याला'पहाताच किंवा त्याचे अस्तित्व जाणवताच आनंदाश्रुरुपानी येणारा ! फार दुर्मिळ योग असतो म्हणे हा, क्वचित एखाद्याच्या वाट्याला येणारा, मात्र असं म्हणतात की एकदा का 'हा असा पाऊस' पाझरु लागला ना की वर वर्णन केलेले साsssरे प्रसंग त्यापुढे थिटे पडतात, सगळंच यःकश्चित भासू लागतं, उरतो तो फक्त एकच भाव...'तू माझा आणि मी फक्त तुझाच'...अन या भावाला साक्षी रहातो तो फक्त 'हा पाऊसच'!

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle