क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
---
रॉबर्ट हेंडरसन, कॅनडातील 'नोवा स्कॉशिया' परगण्यातला एक धाडसी युवक. सहा फुट उंच, निळ्या डोळ्यांचा, निधड्या छातीचा. त्याचे वडील बिग आयलंडवरील दिपगृहाच्या देखभालीचं काम करीत. वडीलांच्या कामात काडीचाही रस नसलेल्या हेंडरसनला नेहमीच भूमिगत सोनं दडल्याची स्वप्न पडत असत, नव्हे तशी स्वप्न तो रंगवत बसलेला असायचा. तसा तो पोटापाण्यासाठी फुटकळ उद्योग करायचा पण मनात नेहमीच हे भूमिगत सोनं धुंडाळून काढायची सुप्त इच्छा दडलेली होती. शेवटी वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने रहातं घर सोडलं आणि सोन्याच्या शोधार्थ न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे अनेक प्रांत पालथे घातले.
हाताला काहीच न लागल्याने कंटाळून हेंडरसन १८७० साली घरी परतला आणि लग्न करून त्याने मासेमारीचा धंदा सुरू केला. सगळं काही स्थिरस्थावर होत असतांना त्याच्या मनातली सुप्त इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. यावेळी त्याचा उत्तरेची वाट धरायचा मनसुबा होता. १८९४ मध्ये आपल्या दोन साथीदारांसह त्याने पुन्हा प्रयत्न करायचं ठरवलं. समुद्रमार्गाने उत्तरेकडे साठ-एक मैल प्रवास केल्यानंतर त्याच्या दोन्ही साथीदारांनी कंटाळून परतायचा सल्ला दिला. हेंडरसनने अर्थातच तो फेटाळून लावला. मजल दरमजल करीत तो अलास्काला लागून असलेल्या कॅनडातल्या 'युकान' परगण्यात पोचला.
कॅलिफोर्निया गोल्ड रशनंतर अनेकदा सोनं सापडल्याच्या अफवा उठतच होत्या. हेंडरसनच्या आधीही अनेकजण युकानमध्ये सोनं मिळण्याच्या आशेने खोदकाम करीत होते. पण म्हणावं तसं यश कोणालाच आलं नव्हतं. जवळजवळ चार वर्ष खटपट केल्यानंतर १८९६ च्या उन्हाळ्यात हेंडरसनच्या हाताला एका खाडीत सुमारे आठ सेंट किमतीचं सोनं लागलं. या खाडीचं त्याने नामकरण केलं 'Gold Bottom'. तोवर एवढ्या किमतीचं सोनं कुणाच्याच हाती लागलं नव्हतं. उन्हाळ्याच्या मध्यापर्यंत हेंडरसन व इतरांना ७५० डॉलर्स किमतीचं सोनं सापडलं. त्याकाळी सामान्य माणसाचं वर्षभराचं उत्पन्नही या पेक्षा कमी होतं. याच दरम्यान, एक दिवस हेंडरसन दैनंदीन गरजेचं सामान घेण्यासाठी जवळच्याच 'Ogilvie' या गावात गेला. परततांना नेहमीची वाट घेण्याएवजी तो क्लोंडायक नदीच्या काठाने निघाला असता त्याची भेट घडली एका अमेरीकन युवकाशी. तो होता, जॉर्ज कारमॅक.
जॉर्ज कारमॅक मुळचा अमेरीकन. लहानपणीच अनाथ झालेल्या जॉर्जला आजोबांनी वाढवलं. काही काळ अमेरीकेत जहाजावर काम केल्यावर व्यापारासाठी त्याने १८८५ मध्ये अलास्काची वाट धरली आणि पुढे तिथल्याच स्थानिक टॅगिश जमातीतल्या मुलीशी लग्न केलं. जॉर्जला फक्त टॅगिश बोलीभाषा अवगत नव्ह्ती तर त्याने टॅगिश जीवनशैलीही चांगलीच आत्मसात केली होती. त्याचा टॅगिश जमातीत असलेल्या सततच्या वावरामुळे खाणमालक कुत्सितपणे त्याला 'Squa Man' म्हणत असत.
तर झालं असं, हेंडरसन परतत असतांना, जॉर्ज क्लोंडायक नदीच्या तीरावर आपली बायको, मेहुणा Skookum Jim आणि त्याचा भाचा Tagish Charlie यांच्यासोबत मासेमारी करायला आला होता. सोनं शोधण्यासाठी आलेल्या Prospectors चा एक अलिखीत नियम होता तो म्हणजे - एखाद्याला एका ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त सोनं मिळालं तर त्याने इतरांना ही बातमी सांगायची. हेंडरसननेही तेच केलं. त्याने कारमॅकला ही खबर सांगितली. सोनं सापडलेला काही भूभाग विकत घ्यायचाही सल्ला दिला. कारमॅकही लगेच तयार झाला आणि त्याने Skookum Jim(१) व Tagish Charlie सह इच्छित स्थळी पोचण्याचं आश्वासन दिलं.
हेंडरसन, कारमॅकशी व्यवहार करायला तयार होता पण त्याने Skookum Jim व Tagish Charlie यांच्याशी व्यवहार करायचे स्प्ष्टपणे नाकारले. त्याकाळी अनेक शोधकर्ते स्थानिक लोकांशी व्यवहार करायचे टाळत असत. त्यांच्या मते स्थानिक लोक Prospectors नव्हेत. कारमॅकला हा अपमान वाटला व त्याने हेंडरसनचा प्रस्ताव धुडकावून लावला. साधारण तीन आठवड्यांनी कारमॅक,Skookum Jim आणि Tagish Charlie पुन्हा एकदा हेंडरसनला भेटले. यावेळी त्याच्याजवळची अत्यल्प सामुग्री पाहून Skookum Jim आणि Tagish Charlie ने त्याला आवश्याक सामुग्री व तंबाकू देऊ केला. पण हेंडरसन बधला नाही. तिघांनी रिकाम्या हाताने परतीचा प्रवास सुरू केला.
परतत असतांना भुकेल्या पोटासाठी काहीतरी शिकार मिळवण्याच्या उद्देशाने Skookum Jim पुढे निघाला. त्याला वाटेत हरणाची शिकार मिळाली. बाकी दोघे मागून येईपर्यंत जेवण शिजवण्यासाठी पाणी आणायला तो क्लोंडायक नदीच्या पात्रात उतरला आणि आश्चर्य घडलं. संपूर्ण परगण्यात आजवर कोणालाही न मिळालेलं, कुणीही न पाहिलेलं इतकं सोनं त्याच्यासमोर होतं. पुढचे दोन दिवस अहोरात्र या तिघांनी क्लोंडायक नदीचं पात्र चाळून काढलं. एकट्या Rabbit Creek मध्ये सुमारे चार डॉलर किंमतीच सोनं होतं. कारमॅक या घटनेविषयी म्हणतो "We did a war dance around that pan: a combination Scottish horn-pipe, Indian fox trot, syncopated Irish jig and Siwash hula-hula. "
सोनं तर सापडलं होतं पण आता या शोधाचं श्रेय घ्यायचं कोणी हा मोठा प्रश्न होता. दावा नोंदवण्यामधेच खरी मेख लपलेली होती. खरंतर Skookum Jim ला सर्वात आधी ते सापडलं होतं. हा शोध ज्याच्या नावावर नोंदवला जाईल त्याला शोधकर्ता म्हणून श्रेय व हिस्सा मिळेलच पण अजून एक अतिरिक्त हिस्सा मिळणार होता तर इतरांना फक्त एक हिस्सा मिळणार होता. हा शोध कोणाच्या नावावर नोंदवायचा यावरून Skookum Jim व कारमॅकमध्ये मतभेद झाले. सरतेशेवटी, Skookum Jim हा स्थानिक रहिवासी असल्या कारणाने त्याला असा दावा मांडता येणार नाही असा युक्तिवाद कारमॅकने केला व १७ ऑगस्ट १८९६ साली जॉर्ज करमॅक हे नाव शोधकर्ता म्हणून नोंदवले गेलं. Skookum Jim आणि Tagish Charlie या दोघांबरोबर त्याने आपला हिस्सा वाटून घेतला. कारमॅकला ज्या ठिकाणी सोनं सापडलं त्या 'Rabbit Creek' चं नामकरण त्याने 'Bonanza Creek' असं केलं.
ही खबर वणव्यासारखी संपूर्ण युकान प्रांतात पसरली आणि अनेकांनी क्लोंडायक नदीच्या आसपास खोदकाम सुरू केलं. या शोधाने युकान खोऱ्याचा चेहरामोहरा पालटला. सुरवातीच्या काळात अनेक खाणमालकांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं, पण त्याचवेळी अनेकजण आतातयीपणामुळे राजाचे रंकही झाले. सप्टेंबर १८९६ पर्यंत खोदकामासाठी जवळजवळ दोनशे दावे नोंदवण्यात आले होते तर जवळपास दीडशे दावे प्रक्रियेत होते. एखाद्या भागाचा दावा नोंदवणे म्हणजेच सार्वजनिक भागाचा खाणकामासाठी परवानगी मिळवणे. त्याकाळी या भागात दावा नोंदवण्यासाठी पहिल्या वर्षी १५ डॉलर शुल्क होता. पुढील प्रत्येक वर्षासाठी तो वाढवून १०० डॉलर एवढा आकारला जाई.
जॉर्ज कारमॅकच्या शोधानंतर युकान भागत सोनं सापडल्याच्या अनेक कथा पसरत होत्या. त्यातलीच थॉमस यिप्पीची. थॉमस यिप्पी सिअॅट्ल YMCA मधली नोकरी सोडून सोनं मिळण्याच्या आशेवर युकानमधे बायकोसोबत आलेला. त्याने 'एल दोरादो'च्या खाडीत ३६ क्रमांकावर बोली लावली होती. एल दोरादो (El Dorado) या स्पॅनिश शब्दाचा अर्थचं मुळी सोनं. या जागेत प्रचंड प्रमाणात सोनं होतं. पण थॉमसच्या बायकोला हवी होती स्वतंत्र खोली. नाईलाजाने थॉमसने ३६ क्रमांकाची बोली सोडून १६ नंबरवर बोली लावली, जी आधीच काही लोकांनी सोडून दिली होती. ही बोली लावयचं कारणही एकच त्याला खोली बांधायला लाकूडफाटा उपलब्ध होता आणि थोड्याच दिवसात थॉमसचं नशीब पालटलं. १६ क्रमांकामधून त्याने कमवले तब्बल १५३०००० डॉलर्स !
दारुच्या नशेत चार्ली अँडरसनने २९ क्रमांकावर बोली लावण्यासाठी ८०० डॉलर दिले. सकाळी जेव्हा शुद्ध आल्यावर त्याला जेव्हा आपली चूक उमगली तेव्हा पैसे परत मागायला गेला. अर्थातच पैसे काही परत मिळणार नव्हते. चार्ली आपल्या कर्माला दोष देत असतांनाच त्या जागेत जवळजवळ १२५०००० डॉलर्स किंमतीचं सोनं निघालं.
कारमॅकला ज्या डोंगराच्या पायथ्याशी सोनं गवसलं त्याच डोंगराच्या उलट्या बाजूला हेंडरसन काम करत होता पण आपल्या हाताला एवढं मोठं घबाड लागल्याचा मागमूस ही कारमॅकने त्याला लागू दिला नाही आणि जेव्हा त्याला ही खबर लागली तोवर फार उशीर झाला होता. बरेचसे हक्क विकले गेले होते. या गोष्टीसाठी हेंडरसनने कारमॅकला कधीही माफ केलं नाही. हेंडरसनला नशिबाने फारशी साथ दिली नाही. पुढे कंटाळून हेंडरसनने आपला 'Gold Bottom' चा भाग तीन हजार डॉलर्सला विकून टाकला. पुढे त्याच जमिनीतून ६५०००० डॉलर्सचं सोनं निघालं.
अत्यल्प प्रसामाध्यामांच्या त्या काळात कारमॅकच्या शोधाची बातमी अलास्का व युकानाच्या बाहेर पोचण्यासाठी बराच काळ जावा लागला. पण जेव्हा ही बातमी बाहेर पडली तेव्हा बेकारी, गरीबीने पिचलेल्या अमेरिकन जनतेला एक आशेचा किरण सापडला होता. त्यातल्या अनेकांना युकान, अलास्काच काय, क्लोंडायक नक्की कुठे आहे याचीही साधी कल्पनाही नव्हती.
युकान होता कॅनडाचा भाग.
अलास्का व युकानला क्लोंडायक नदीचा वेढा होता आणि
अलास्का जरी अमेरीकेच्या ताब्यात आलं असलं तरी कॅनडा व अमेरिकेमधल्या त्याच्या सीमारेषा अजून धूसरच होत्या.
पण या सर्वाची पर्वा होती कोणाला? सोन्याच्या सट्ट्यावर आपलं आयुष्य, घरदार अक्षरश: पणाला लावलेली सिअॅट्ल बंदरातली गर्दी आवरणं आता कुणालाच शक्य नव्हतं.
क्रमशः
(१) Skookum Jim
(२) सोनं चाळणरा कारमॅक :
(३) खाणीतून सोनं मिश्रित माती काढतांना कामगार :
(४) सोनं चाळतांना कामगार :
संदर्भ :
१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)
पुरवणी -
या भागात लिहिल्याप्रमाणे, Skookum Jim नदीच्या पात्रात उतरला आणि त्याला सोनं दिसलं, सोनं असं सहजासहजी सापडतं का यावर लिहीलेलं उत्तर -
वर लिहील्याप्रमाणे नदीपात्रातला गाळ, वाळू चाळून सोन्याचे कण मिळत. याबद्दल थोडं सविस्तर. वैज्ञानिक असं मानतात, पृथ्वीच्या केंद्राजवळ अनेकानेक खनिजं दडलेली आहेत. सोनंही त्यापैकी एक. असं म्हटलं जातं, आज जे सोनं आपलाल्या भूतलावर सापडतं ते कैक वर्ष आधी पृथ्वीच्या केंद्रापाशी द्रवरूपात होतं. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा उद्रेकाबरोबर बाहेर येणार्या वाफेसोबत ही खनिजं उडून भूतलावर पसरतात. कमी घनता असलेली खनिजं बरेचदा पाण्याबरोबर वाहत जातात. पण सोन्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असल्याने जागा मिळेल तिथे सोनं साचत रहातं. बरेचदा नदी ज्या ठिकाणी वळते अशा ठिकाणच्या खाचखळग्यात सोनं जागा पटकावतं. काहीवेळा गुरुत्वाकर्षण, पूर अशा कारणांमुळे अधिकाधिक सोनं वर्षानुवर्ष साचत रहातं. नदी किंवा खाडीच्या तळाशी अशा प्रकारे साचलेल्या सोन्याच्या कणांना/गोळ्याला (Nugget) Alluvial gold म्हणतात. ही प्रक्रीया पूर्णपणे निसर्ग, एखाद्या ठिकाणची भौगोलिक रचना इत्यादी बाबींवर अवलंबून असते. त्यामुळे "नदीत उतरला, त्याला सोनं मिळालं" हे कठीण असलं तरी नशिब बलवत्तर असेल तर अशक्य नक्कीच नव्हतं.
हे झालं सर्वसाधारण नदीपात्रात मिळणार्या सोन्याविषयी. क्लोंडायबद्द्ल बोलायचं झालं तर, याभागात सोनं आहे हे स्थानिक लोकांना ज्ञात होतं पण त्याची बाहेरच्या जगतली किंमत ठावून नव्हती. अलास्का जेव्हा रशियाच्या ताब्यात होतं तेव्हाही रशियाने हडसन बे कंपनीच्या सहाय्याने सोन्याचा शोध घेतला होता. पण कातड्यांचा व्यापार हा लवकरात लवकर आणि बक्कळ पैसे मिळवून देणारा असल्याने रशियाने या भागात मिळणार्या सोन्याकडे थोडं दुर्लक्षच केलं. Skookum Jim स्थनिक टॅगिश जमातीचा असल्याने त्याने जेव्हा नदीपात्रात सोनं पहीलं तेव्हा ते सोनं असल्याचं तर ओळखलं पण त्याची बाहेरच्या जगातली खरी पत जॉर्ज कारमॅकला माहीत होती.
(विज्ञानाचा आणि माझा काडीचा संबंध नाहीये. फक्त या विषयाची आवड म्हणून ही माहीती जमवली आणि लेखाच्या स्वरुपात मांडलीय. या लिखाणात चुका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथल्या मैत्रीणी या विषयात तज्ज्ञ असतील तर नक्की यात भर घाला.)