आपण कमालीचे भावूक ते टोकाचे व्यवहारी असे विचार एकाच व्यक्ती बद्दल का करत असतो?
शीणतो जीव या उलघालीत.
बुधवारी आमची आजी ( आईची आई) धाकट्या मामाच्या घरी हैदराबादला पॅरलिसीसचा attack येऊन पडली. मग हॉस्पिटल वगैरे सोपस्कार होऊन गुरुवारी तिने कोणत्याही treatmentला respond करणं बंद केलं. मग ventilator लावणं आणि सर्वांच्या सोयीने मृत्युची वेळ जागा निश्चीत करणं असे फार टोकाचे हळवे तरी व्यवहारी निर्णय घेण्याचे फोनाफोनी सुरु.
तिचं आयुष्य ज्या गावी गेलं -अकोले तिथे हलवणं सर्वानुमते ठरलं.
मी या सगळ्या कोलाहलात क्षणात निर्लेप मनाची तर क्षणात भयंकर helpless वाटून अगदी निराशेच्या गर्तेत असे दोन प्रतलांवर हिंदोळे घेतेय.
आजीला समजत असेल का काय होतय नेमकं ते? पाच मुली - जावई, दोन मुलगे सुना, नातवंडं, पंतवंडं या सगळ्या गराड्यात ती नेमकी कुठल्या क्षणी एकटी पडली असणार?
मग सगळे आठ दिशांनी तिला शेवटचं भेटायला निघाले, आगे मागे पोहोचले. काल सगळा ताण एकवटला असेल आजोळी. Ventilator काढ़ायचा निर्णय कोणी घ्यायचा? कधी घ्यायचा?
मी इथे पुण्यातच बसून होते. थोरली तापली होती. मिठाच्या थंड पाण्याच्या पट्टया अनुष्काच्या कपाळवर कोमट होत असताना कधी तरी १२/१२.३० ला रात्री आईचा phone आला.
“आजी गेली. “
“हम्म!, काळजी घे”
“तुला जमलं असतं यायला तर बरं झालं असतं शेवटची भेट झाली असती. “
मी प्च! करुन मोठा श्वास घेतला आणि phone ठेवला.
झाली असती का भेट खरच? आजी कधी भेटली शेवटची? गेली काही वर्ष ती होती का खरच आमच्यात. दोन जावई, एक मुलगी, नवरा इतके मृत्यु पाहुन पचवून ती कितकशी शिल्लक होती? जी कोणी ती होती थोड़ी त्रासलेली जरा निराश चिडचीडी तिला किती जण भेटत होते? तिला किती ऐकू येत होतं बोलणं?
मृत्यु अपरिहार्य असतोच पण तो येई पर्यन्तच जगणं? गेली काही वर्ष तिला खरच हवं होतं का ते जगणं?
ती जाताना कोणतं समाधान घेऊन गेली? की हरवलीच होती कसल्याश्या चिंतेत?
ऊन्हाळ्याच्या सुटीत लावलेल्या आंब्याच्या आढ्या, सामुहीक रस करणे, रात्री नकला गाणी आजीचे उखाणे, कोडी , सिद्धेश्वराला चक्कर, कोरडी भेळ, प्रवरे वर कपडे धुणे- पोहणे, शेतावरुन फुलं गोळा करुन आणने, असले राजस कार्यक्रम लहानपण सरलं तसे मागे पडत गेले. मग लग्न कार्यातल्या किंवा सुतकातल्या भेटी गाठी.
एकत्र येणं , राहणं, आजोळ आठवणींच्या पेटीत अडगळीत पडलच कधी तरी.
एकएक स्थित्यंतरं सोसत थकलेली आजी नाही आठवते आत्ता या क्षणी. तिच्या लेकींपेक्षाही तरुण दिसणारी, चापून नौवार नेसणारी, ५ वाजता बाहेर जायचं असो नसो नेमाने गंध- पावडर करणारी चार्मिंग आजीच येते डोळ्यासमोर.
निरोप कसला देणार तिला?
फार सहवास नसला तरी काही ख़ास आम्हा दोघींच्याच आठवणी आहेत. त्या तिकडे तिला आठवतीलच कधीतरी मलाही इथे लेकींना कसलिशी गोष्ट सांगताना हटकून त्याच आठवणींची सय येईल . मग तो दोन निराळ्या dimensions मधला connecting क्षण खास असेल आम्हा दोघींचा.
कर्जतची आजी- बाबांची आई पण थकलीये. या सुट्टीत तिच्या कडे जाऊन राहीन मस्त दहा बारा दिवस. माणूस असताना होते ती भेट, नाही तर अंत्य दर्शन घेतलं काय नाही काय एकच!