बरिटो बाऊल

अमेरिकेत चिपोटले नावाचे एक सो कॉल्ड "मेक्सिकन" रेस्टॉरंट आहे. तिथला बरिटो बाऊल आणि कसेडिया खायला आम्ही कधी मधी जात असतो. एकतर इतका सारा ल्येटुस आणि टोमॅटो वगैरे बघितले की जरा हेल्थी खाल्ल्याचे फीलींग येते. मग जरा जिवाला बरे पण वाटते. तर हा बाऊल घरी करायला तसा सोपा आहे, थोडी तयारी लागते पण घरी नीट जमतो. तर मी असा करते -

ल्येटुसची मोठी ५- ६ पाने (मी रोमेन प्रकारची वापरते)
१ कप शिववलेला भात, शक्यतो शिळा
१ कप शिजवलेले ब्लॅक बीन किंवा राजमा (खाली कृती देते आहे)
१०-१२ काड्या कोथींबीर
२ टोमॅटो
१ मोठा कांदा
१ हिरची मिरची
१/२ वाटी घट्ट दही
१ अव्होकॅडो
१/२ लिंबू
२ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे
काळी मिरी पावडर चवीप्रमाणे
१ झुकीनी
१ ढब्बू मिरची

कृती -

  1. १/२ कप राजमा किंवा ब्लॅक बीन्स आदले दिवशी भिजत घालावेत. ते मीठ, थोडी जिरे पूड आणि एखादी सुकी लाल मिर्ची घालून शिजवावेत. थोडे गार व्हायला हवेत.
  2. कोथिंबीर धुवुन बारीक चिरुन घ्यावी. एका लहान कढईत तेल तापवून घ्यावे त्यात निम्मी कोथिंबीर घालावी. एका मिनीटात भात घालावा, परतताना त्यात मीठ काळी मिरी घालावी. परतून सगळे नीट मिसळले गेले की बाजुला काढून ठेवावे.
  3. झुकीनी, ढब्बू आणि १/२ कांदा एकसारखा मध्यम आकारात चिरुन घ्यावा. कढईत तेल तापवून त्यात कांदा परतून घ्यावा. त्यात ढब्बू परतावा शेवटी झुकीनी घालुन नीट परतावे. त्यात मीठ आणि काळी मिरी घालून नीट परतावे, अती शिजवू नये.
  4. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ आणि कोथींबीर बारीक चिरुन कोशिंबीरीसारखे करून घ्यावे. पिको दी गायो असे म्हणातत त्याला.
  5. ल्येटुस बारिक चिरुन घ्यावा.
  6. अव्होकॅडो मधोमध कापून, गर काढून मीठ, लिंबू रस घालून एकत्र करावे.
  7. आता असेम्ब्ली -
  8. एका खोलगट बाऊलमधे चिरलेला ल्येट्युस, त्यावर थोडासा भात, थोडा राजमा (थोडे निथळून), वर झुकीनी-ढब्बूची भाजी, त्यावर टोमॅटो-कांदा, त्यावर थोडे दही आणि वर अव्होकॅडो असे घालून सर्व करावे.

वरच्या साहित्यात साधारण ३ लोकांना पुरेसे जेवण होते.

(फोटो उद्या टाकेन)

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle