(थोडा जुना पाऊस आहे हा... पण इथल्या सगळ्या छान छान पोस्ट पाहून शेअर करावासा वाटला)
तू लांब गेल्यानंतरचा पहिलाच पाऊस हा! नाही.. नाही म्हणजे आभाळ भरुन आल्यावर माझं मन दाटुन वगैरे आलं नाही. किंवा पावसाचे थेंब आणि माझे अश्रु वगैरे असंही काही झालं नाही. अगदी खरं सांगु तर तुझी आठवणही आपणहुन आली नाही... आत्ता तासभर पागोळ्यांशी खेळत पडवीत बसले होते, पावलांवर पावसाचं पाणी झेलत..
माहित्ये? पहिला पाऊस.. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला पाऊस ह्याच पडवीतुन पाहिला होता. मला काय आठवणारे का? पण आई खूप कौतुकाने सांगते.. "८ महिन्यांची होतीस तू तेव्हा तेजू, धो धो पाऊस पडायला लागला.. आम्ही आपलं तुला थंडी वाजेल म्हणुन कपड्यांवर कपडे चढवत होतो. पण मग आप्पा आले आणि आज्जीला ओरडले. पाऊस पडतोय बाहेर आणि आत काय बांधुन ठेवताय तिला?... आप्पा मग तुला घेउन पडवीत येउन उभे राहिले.. तुला पाऊस दाखवत.. किती वेळ ते तसेच तुला कडेवर घेउन उभे होते. तुझ्या इवल्याश्या हातावर मग त्यांनी पावसाचा एक थेंब दिला आणि तुझ्या चेह-यावरचे गोंधळलेले भाव बघुन कितीतरी वेळ हसत बसले... "एका मुलीनी पाऊस काय असतो ते अजुन पाहिलंच नाहीये मुळी".."पाऊस आम्हाला माहितच नाही" असं कितीवेळ तुला सांगत बसले होते " .. पहिला पाऊस म्हंटलं ना की अजुनही मला माझे आजोबा छोट्या बाळाला कडेवर घेउन पडवीत उभे आहेत असं दिसतं..
आप्पाची मोठी काळी छत्री असायची आणि आज्जीची एक लाल-गुलाबी डिझाईनची छत्री.. अजुनही आहे ती कुठेतरी कपाटावर ठेवलेली. मला कायम छत्री हवी असायची पावसात, रेनकोट नाही आवडायचा मला.. बाबा आणि मी जायचो पावसाळा शॉपिंगसाठी! बालवर्गात असताना शाळेसाठी म्हणुन बाटाचे काळे पावसाळी बुट, चंदेरी रेनकोटवर हिरवे बेडुक वगैरे असं काहीसा रेनकोट आणि मग फक्त माझा हट्ट म्हणुन ती रेनबोची छत्री बाबांनी घेतली होती. बाबा तेव्हाच म्हणाले होते मला "छत्री हरवशील तेजू तू" .. बाबांना कसं खोटं पाडणार? तरी ४-५ दिवस टिकवली होती हां मी ती छत्री. अजुनही बाबांना खोटं पाड्त नाही मी कधी.. कायम बाबांबरोबर आमच्या येझदीवरुन जाताना जोरदार पाऊस यायचा. मग तोंडावर, हातांवर सणसणीत मारा होयचा थेंबांचा.. आम्ही थांबायचे मग आडोशाला कुठेतरी, बाबा मला रेनकोट घालायचे, स्वतःला रेनकोट चढवायचे आणि आम्ही परत निघालो की पाऊस थांबायचा. मग कोरड्या रेनकोटच्या आत भिजलेले आम्ही घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करायचो...आई खसाखसा डोकं पुसुन द्यायची.. आल्याचा गरमागरम चहा किंवा मग वाफाळलेलं हळद दुध... bliss!
पाऊस आणि गरम चहा, कांदा भजी cliche झालं का रे आता? एका पावसाळ्यात आई आजारी असताना मी आणि बाबांनी केली होती भजी... हल्ली मी आणि दिपीका करतो! बाकी मी दिपुकडे जास्त लक्ष नाही द्यायचे कधी पण मला ती पावसात भिजलेलं मुळीच आवडायचं नाही. मीही कधी भिजायचे नाही आणि तिला भिजु द्यायचे नाही! तिच्याकडे कायम छत्री आहे ना, ती रेनकोट घालते ना हे सगळं मी सतत बघत असायचे. शाळेतुन घरी येताना ते पिल्लु नेम धरुन रस्त्यावरच्या सगळ्या खड्ड्यांतुन छपाक्क छप्पाक चालत यायचं.. डोक्यावरच्या छत्रीच्या काहीच उपयोग नसायचा. मी पाऊस पडायला लागला की खेळायला गेलेल्या तिला शोधुन घरी आणायचे. आज सकाळी ती कॉलेजात निघाली तेव्हा मात्र छत्री सापडलीच नाही रे... मी शोधणार होते पण पहिला पाऊस ना.. आईची शिकवण.. लगेच देवांसमोर दिवा लावला.. पावसाला नमस्कार केला, त्याला ओवाळलं... काय धम्माल कल्पना असतात ना आपल्या...
पुण्यातुन सोमवारी सकाळी मुंबईला निघायचे ना मी कॉलेजसाठी तेव्हा मी मनापासुन प्रार्थना करायचे... "देवा प्लीज भरपुर पाऊस पडु दे..आणि मग आई म्हणु दे की नको जाउ मग आज".. पाऊस, ट्रेनची खिडकी आणि लोणावळा.. आह.. च्यायला पण एकदाही ट्रेनमधे समोरच्या सीटवर चांगला दिसणारा मुलगा नव्हता आमच्या नशिबात..
तसं आम्ही एक वर्ष कोकण रेल्वेने गेलो होतो जुनमधे रत्नागिरीला.. बाहेर खरं तर सगळं खूप सुंदर होतं पण तेव्हा त्या मनस्थितीमधे नव्हतो.. आज्जी गेली तेव्हा! आधी २ दिवस पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता.. आजीला नेलं तेव्हा ४-५ तास पाऊस थांबला होता अगदी सगळं कळत असल्यासारखा आणि परत सुरु झाला. आज्जीला किती काय काय गमती सांगायच्या होत्या अरे मला त्या पावसाआधीच्या सुट्टी्तल्या...
तुला सांगितलं होतं ना मी.. हिमालयातल्या पावसाबद्दल? दुपारचे ३-४ वाजले की ढग यायचे आणि मग पाऊस... मी आणि रेणुका एकदा अडकलो होतो पावसात.. नदीच्या काठा-काठाने आम्ही जात होतो. पाण्याचा गोड खळखळाट, पाईनचा वास, लख्ख सूर्यप्रकाश पण तरीही हवेत गारवा... वाट हळुहळु नदी पासुन दूर जायला लागली... खळखळाट कमी होत गेला... आम्ही वर वर चढत होतो, सूर्यप्रकाशही कमी होत गेला. धो-धो पाऊस सुरु झाला..इतका की समोरची वाटही नीट दिसेना... आम्ही मधल्या काही चहावाल्यांच्या तंबुत थांबलो. पाऊसाचा आवाज कमी झाला म्हणुन मी आणि रेणुका तंबुतुन बाहेर आलो. अवर्णनीय, अप्रतिम, सुरेख किंवा कदाचित एकच शब्द बरोबर असेल त्या क्षणासाठी.... "स्वर्गीय". ढग खाली उतरलेले... त्यांचा आडुन दिसणारा सूर्य..दुरवर चमकणारी बर्फ़ाची शिखरं... डोळ्यांत जितकं साठवता येईल तितकं साठवुन घ्यावं... सूर्यानेही त्या दिवशी घरी जाऊन आरश्यात पाहिलं असेल.. इतका सुंदर दिसत होता... मला कदाचित हे शब्दांत नाही सांगता येते ...मी आणि रेणुका शांतच होतो... ते अनुभवताना आम्ही काहीही बोललो नाही... पण तरीही आम्ही एकमेकींबरोबर होतो. ती moment spoil न केल्याबद्दल मी तिची आयुष्यभर ऋणी राहेन!
ए आपण कधी एकत्र पावसात भिजलोच नाही ना? CCDच्या काचेतुन एकदा पाऊस बघत बसलो होतो आपण.. कसले unromantic होतो यार आपण.. म्हणुन कदाचित नाही आठवलास लगेच... पण मला पहिला snowfall आठवतो आहे तू अमेरिकेत गेल्यावरचा... तू आयुष्यात पहिल्यांदाच बर्फ पडताना बघत होतास. माझ्या रात्रीचे २ वाजले होते, तू मला ऑनलाईन बोलावलंस. मी खूप चिडचिड करुन आले.. तू वेबकॅम ऑन केलास तेच बाहेरचा बर्फ दिसायला लागला.. आप्पांच्या कडेवर ८ महिन्यांचं बाळ पहिल्यांदा पाऊस बघताना कसं दिसत असेल ते तुला पाहुन तेव्हा कळलं मला...
चल.. खूप बोलले आता.. पाऊसही थांबला..जाऊन छत्री शोधायच्ये.. सापडणं अशक्य आहे, नवीनच घ्यावी लागणार... नवीन पावसाळा आहे नं ह्यावर्षी