गेल्या सोमवारी (17 जून 2019) भारतभर डाॅक्टरांचा चोवीस तास (आपत्कालीन सेवा सोडून) रुग्ण तपासणीचा संप होता. त्या निमित्ताने इथे काही लिहावंसं वाटलं. या संपाचं तत्कालिक कारण प. बंगाल मधे पंचाहत्तर वर्षाचा सीरियस पेशंट दगावल्यानंतर इंटर्न डाॅक्टरांवर जमावाने केलेला जीवघेणा हल्ला हे होतं. गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या अनेक बातम्या घडल्या आहेत. ही बाब खूपच खेद आणि चिंताजनक आहे. प्रत्याक्ष रित्या जरी ही घटना डाॅक्टरांना हानिकारक असली तरी अप्रत्यक्षपणे भविष्यात ही संपूर्ण समाजालाच घातक ठरणारी होऊ शकते, म्हणून आपण सर्वांनी याबद्दल विचार करणे गरजेचे आहे.
याप्रकारच्या घटनांना इतके सूक्ष्म आणि विविध पदर असतात की कुठलीही एक गोष्ट याला कारणीभूत आहे असं नाही म्हणू शकत. याची कारणमीमांसा समजून घ्यायचा प्रयत्न करूया.
बिघडणारं डाॅक्टर पेशंट नातं:
असं म्हणतात की पेशंटला डाॅक्टर शी बोलल्यानेच अर्ध दुखणं कमी होतं. यासाठी जो संवाद आवश्यक आहे तो कधीकधी ओवरबर्डन्ड डाॅक्टरला वेळे अभावी शक्य होत नाही. तर कधी वैद्यकीय कसब निष्णातपणे जाणणाऱ्या डाॅक्टरला संवादाची कला तितकीच अवगत असेलच असं नाही. वैद्यकीय शिक्षणामधे रोगाचं निदान कसं करावं, त्याचा इलाज कुठल्या औषधांनी/ शस्त्रक्रीयेनी करावा, त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम काय होऊ शकतात, याचं डिटेलवार शिक्षण दिलं जातं. पण पेशंटशी कसं बोलावं, पेशंट किंवा नातेवाईकांना एखादी वाईट बातमी कशी सांगावी याचं शिक्षण कधीच दिलं जात नाही. मग जरी एखादा डाॅक्टर आपलं काम चोख करत असला तरी संवादाच्या अभावी तो चूक ठरवला जाऊ शकतो.
काही डाॅक्टर खरेच चूक वागत असतील. डाॅक्टर हे समाजाचाच भाग आहेत. जसे काही राजकारणी, काही पोलीस, काही ऑफिस बाबू, काही शिक्षक, काही दुकानदार, काही पत्रकार, काही न्यायाधीश भ्रष्ट आहेत, तसेच काही डाॅक्टर सुद्धा भ्रष्ट आसतीलच. पण म्हणून प्रत्येक डाॅक्टरला त्याच चष्म्यातून बघायला लागलं तर एका प्रामिणिक डाॅक्टरचं काम करणं अवघडच होऊन बसतं. जसं सर्वसाधारण घरांतून 'दुसर्यांना त्रास होईल असं वागू नये, खोटेपणा करू नये' असं मुलांना शिकवलं जातं, त्यापैकीच एका घरातून डाॅक्टरवरही संस्कार झालेले असतात. 'माझा पेशंट मरून जावा' अशी तर भ्रष्टातल्या भ्रष्ट डाॅक्टरचीही इच्छा असू शकत नाही. डाॅक्टरांबद्दल इतका अविश्वास की लोक चक्क गूगलवर उपचार शोधून डाॅक्टर ला चूक ठरवण्यास पुढेमागे बघत नाहीत. आपल्यावर सतत अविश्वास दाखवणाऱ्या रोग्यावर उपचार करणे हे खूप ताण देणारे असते.
पेशंटची कल्पना असते की "वैद्य नारायणो हरि". पण प्रत्यक्षात तर डाॅक्टर एक हाडामासाचा माणूस आहे, ज्याने निदान आणि उपचार करण्याचं शिक्षण खूप कष्टाने घेतलय. तो/ती कितीही निष्णात असले तरी काही गोष्टी त्यांच्याही हाताबाहेर आहेत. कधीकधी योग्य ट्रीटमेंट देऊनसुद्धा त्याचा अपाय एखाद्या पेशंटला होणं शक्य आहे. कधीकधी सगळे शक्य ते प्रयत्न करूनही जीव वाचवण्यात असफलता येणे शक्य आहे. अशा परिस्थितीत आमचा पेशंट डाॅक्टर च्या निष्काळजीपणामुळे गेला हे किती सहजपणे सांगतात आणि मिडियावाले त्याला तिखटमीठ लाऊन मोठ्या प्रमाणात 'कातिलाना डाक्टर' वगैरे मथळ्याखाली सादर करतात. वास्तविक प्रयत्नांना अपयश येणे, चांगल्या उद्देशाने घेतलेला एखादा निर्णय चुकणे, या मानवीय गोष्टी नाहीत का? मग जर त्या एका प्रामाणिक, कष्टकरी डाॅक्टरच्या हातून झाल्या तर तो डायरेक्ट खूनीच??!! बर खरेच जर नातेवाइकांना डाॅक्टरच्या उपचार पद्धतीबद्दल शंका असेल तर त्यांनी त्याला खुशाल कोर्टात खेचावे. त्याला आपली बाजू मांडण्याची संधी देऊन योग्य तो निर्णय/ शिक्षा कोर्टाने द्यावा. आपणच कायदा हातात घेऊन डाॅक्टर ला मारहाण करणे फार गैर आहे.
यामधे अजून एक मुद्दा पैशांचा आहे. मुळात आपण करतो ते खर्च सुखद आणि दुःखद या दोन प्रकारांत मोडतात. सोनं चांदी घेणे, लग्नांत पाहुण्यांना भारी आहेर देणे, परदेशी सहलीला जाणे इत्यादी खर्च सुखद खर्च आहेत. याउलट वैद्यकीय खर्च हा दुखःद आणि बहुशः अनपेक्षित असा खर्च असतो. तरी पेशंटला हाॅस्पिटलात आणताना नातेवाईक सांगतात, "पैशाची काहीच चिंता करू नका, चांगल्यात चांगली ट्रीटमेंट महागातले महाग औषध द्या". जर पेशंटला आयसीयू, महाग इंजेक्शन देऊनही दुर्दैवाने मृत्यू आला तर हाॅस्पिटलचे बिल देणे नातेवाईकांना अतिशय जिवावर येते. अशावेळी डाॅक्टरने आमच्या पेशंटचा जीव घेतला असं म्हणत त्यांच्यावर हल्ला केला, तोडफोड केली की बिल न देता सहज जाता येतं, लोकांची सहानुभूती मिळते ती वेगळी!! यातही बरेचदा मारहाण, तोडफोड पेशंटचे जवळचे नातेवाईक नसून 'ओळखीचे' कुठल्याशा आमदार-खासदारांचे पिलांटू असतात. एखाद्याचा जीव वाचवण्यात अपयश आले तर अशा अपयशाच्या दुःखासोबत, मार आणि शिव्याशाप खाल्लेला आणि पैसे बुडवले गेलेला अपमानित, स्वसंरक्षणासाठीही असमर्थ असा डाॅक्टर जेंव्हा कायद्याला हाक मारतो, तेंव्हा पोलिस त्या आम/खासदारांच्या पिलांटूविरूद्ध गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नाहीत.
कोर्टापर्यंत हाक गेलीच तरी डाॅक्टरांची सिक्युरिटी हा मुद्दा अनावश्यक ठरवला जातो. राजकीय पक्षाला आपण दुर्दैवी मृत पेशंटच्या नातेवाईकांच्या मदतीला धाऊन कसे आलो त्याची स्टोरी आणि मतं मिळतात.. जिथे खुद्द राज्याच्या मुख्यमंत्री "पोलीस ड्यूटी करताना मरतात, तेंव्हा संपावर जातात का? मग डाॅक्टर जखमी झाले ड्यूटी करताना तर काय धाड भरली?" अशा अर्थाचं निर्बुद्ध आणि बेजबाबदार विधान करतात, तेंव्हा इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार? अनेक वेगवेगळ्या प्रसंगात डाॅक्टरांनी अशा हल्ल्यांमधे स्वतःचा जीव गमावलाय, कुणा सर्जनला अंधत्व येऊन करियरची वाट लागली आहे, स्त्री डाॅक्टरांना बलात्काराच्या भ्याड धमक्या मिळाल्या आहेत. हा दहशतवाद नाही तर दुसरं काय आहे??
या विषयावर डाॅक्टरांमधे खूप असंतोष पसरतोय, आपापसात खूप चर्चा चालते. पण अवैद्यकीय मित्रांमधे, सोशल मिडियावर याबद्दल अवाक्षरही बोलले जात नाही. पूर्ण दुर्लक्षित केलं जातं. असं का? याच्याशी आपलं काय घेणं देणं? आपल्याला काय फरक पडतो? इथपासून ते जाऊ दे बरंच झालं डाॅक्टर लोकांना असंच पाहिजे अशाप्रकारच्या भावना जनसामान्यांत आहेत.. ही केवळ डाॅक्टरांसाठीच नाही तर समाजासाठी चिंताजनक बाब आहे.
मागच्या पिढतले उत्तम टक्के मिळवणारे, खूप मेहनत करून डिग्री पोस्ट ग्रॅजुएशन करणारे, सण, लग्न समारंभ वय्यक्तिक आयुष्य एवढंच काय प्रसंगी स्वतःचं जेवण आणि झोपसुद्धा दुय्यम मानून आपलं काम करणाऱ्या सामाजिक घटकावर अशी वेळ का यावी? डाॅक्टर असल्यामुळे कोणी किराणा फुकट देत नाही, मुलांना शाळेत फुकट अॅडमिशन देत नाही, घर फुकट देत नाही, विजेचं बिल, हाॅस्पिटलचं भाडं, स्टाफचा पगार, अद्ययावत यंत्रणा हे डाॅक्टर/खाजगी हाॅस्पिटल स्वखर्चाने करतात. पण डाॅक्टरांकडून कमी पैशात काय फुकट उपचाराची अपेक्षा मात्र प्रत्येकजण करतो.
अशी परिस्थिती असताना आज कोणते आईवडिल आपल्या अपत्याने डाॅक्टर व्हावे असं स्वप्न बघतील?? मी तर नाही बघणार. माझ्या मुलांनी एवढे कष्ट उपसून, हजार उत्तम रिझल्ट दिल्यानंतर एका दुर्दैवी रिझल्टसाठी प्रक्षुब्ध जमावाकडून स्वतःच्याच दवाखान्यात स्वतःच्याच स्टाफ, पेशंटसमोर मार खाऊन घायाळ व्हावं, जीव किंवा अवयव गमवावा, आणि नाहीच गमवला तर अपमानित होऊन दुसऱ्या दिवशी त्याच तुटलेल्या खुर्चीत बसून आस्थेने काम करत रहावं, असं अमानुष स्वप्न मी नाही बघू शकत. आणि माझ्यासारखे अनेक प्रामाणिक डाॅक्टर आपल्या पुढच्या पिढीला, नातेवाइक, मित्रांना हीच चेतावनी देतील. अशी वेळ येईल की मेडिकल काॅलेजच्या सीट भरत नाहीयेत.. आधीच आपल्या देशात वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि पेशंटचा रेशो खूप कमी आणि असंतुलित आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर हा रेशो आणखी कमी होणे संभव आहे. तेंव्हा कदाचित जनसामान्यांना आज या हाणामारीचा प्रत्यक्षपणे काहीच फरक पडत नसला तरी त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांच्या आजारपणात त्यांना कुशल डाॅक्टर मिळणच अवघड होऊन बसेल..
तेंव्हा माझी तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे, की अशा घटनांचा जाहिरपणे निषेध व्यक्त करा, डाॅक्टरांची बाजू समजून घेऊन या आतंकी मनोवृत्तीविरूद्ध त्यांना सपोर्ट करा. डाॅक्टरांच्या विरुद्ध कोणी पत्रकार एकांगी भडक आणि भयानक माहिती देत असेल तर लगेच त्यावर विश्वास ठेऊ नका. आठवण ठेवा की कुठल्याही डाॅक्टरला आपला पेशंट बरा होऊ नये, त्याचं काहीतरी वाईट व्हावं असं कधीच वाटणं शक्य नाही. तुमच्या माझ्यासारखा तो/ती सुद्धा एक सामान्य माणूस आहे.
'झीरो टाॅलरन्स फाॅर व्हायलन्स अगेन्ट डाॅक्टर्स'चा नारा द्या आमच्या सोबत! हेल्प अस टू हेल्प यू..