आज फेसबुकवर ही रेसिपी लिहिली. इथल्या मैत्रिणींना पटकन सापडावी म्हणून इथे लिहून ठेवले.
काय लेकरांनो ! काय म्हणतं पाऊस पाणी ! फार दिसांनी भेटायला आले तर रिकाम्या हाती कशी येईन ? नेहमीच्या दशम्या धपाटे सोडून नवं काही आणावं म्हणलं :)
तर आज काय झालं सांगू का,आज अंबाबाईला गूळ फुटाणे ठेवायला गेले तर चारजणी भेटल्या म्हणून देवळात जराशिक टेकले. आजकाल जिभेचे चोचले ह्ये एवढले वाढवून ठेवलेले आणि त्यात श्रावण ! नेम मोडावा वाटत नाही आणिक कांदा लसूण वगळून केलेले जिन्नस काही जिभेवरून उतरत नाहीत. येशव्दा आमची अशीच बरं का ! एवढं वय झालं पण जीभ आवरत नाहीच! म्हणली अंबिकावयनी काहीतरी चवीचं सांगा बाई ! जिभेला शेवाळ आल्यावानी झालं बघा ! :straightface:
मागं एकदा तिच्याघरी गेलेव्हते तर ही खलबत्त्यात कोणत्यातरी वड्या कुटत बसली व्हती. म्हणलं अग काय ते ? तर म्हणे थोरल्यानं चितळी बाकरवडी आणली ती चावत नाही म्हणून कुटून खाते ! त्यातली एक वडी तोंडात टाकली डोळे बंद केले आणि त्या वडीत काय काय असल त्याचा फोटुच काढला !
आज म्हणलं तिला चल घरी तुला नवा जिन्नस खाऊ घालते !
तसंही पोरांसाठी खाऊ करायचाच होता!
सगळे जिन्नस गोळा केले अन ताटलीत मांडले. चमचाभर तीळ, 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं, चमचाभर बडीशेप, अर्धा चमचा ओवा,थोडी धने जिरे पूड, हिंग,तिखट, हळद, मीठ,साखर आणि चिंचेचा कोळ !
एका कढईत तेल तापवून त्यात जिरे घातले. मग हळद तिखट सोडून बाकी सगळं घातलं. चांगलं परतून घमघम झालं की उगीच थोडं चमचाभर डाळीचं पीठ घातलं. मग 3 वाट्या कणिक त्यातच घातली त्यावर हळद तिखट घातलं आणि तेल सगळीकडे लागूसतवर परतली. थोडी कोथिंबीर चारच काड्या बारीक चिरून दिली ढकलून. आता थोडा चिंचेचा कोळ घालायचा तो चांगला घट्ट बरं का ! आणि सूनबाईंनी गूळ पावडर आणून ठेवलीय ती थोडीशी. मीठ मिसळून थोडं जिभेला लावून पहायला येशव्दा होतीच ! चव घ्यायची म्हणलं की दम धरवत नाही तिला
आता कढई चुलीवरून बाजूला करून सगळं नीट गार होऊ द्यायचं. येशव्देला कपभर चहा करून द्यावा नाहीतर पोथी वाचून घ्यावी.येशव्दा बडबड करीत राहील तिला हं म्हणत रहावं! म्हणे एवढीच कोथिंबीर का? म्हणलं तुला बाकर वडी खायची की कोथिंबीर वडी
कणिक गार झाली की पाण्यातच नीट तिंबून घेतली. मग तवा नीट तापला की घडीच्या पोळ्या करतो तसे पराठे लाटून नीट तेल लावून भाजून घेतले. आच जरा कमी ठेवायची हो ! गूळ घातला न यात मोठ्या आचेने लगेच काळे डाग पडायचे नाहीतर !
झालंच की मग ! गरम गरम करून येशव्देच्या पानात वाढली त्याबरोबर नातीनं केलेली पुदिना चटणी होती पण हिला श्रावण आठवला! म्हणे लसूण नाही खाणार. मग शेंगाची चटणी आणि लोणी वाढलं.
घरभर घमघमाट सुटला होता तर नातवंडं आपोआपच कचोरी न बाकरवडी म्हणत जमा झाली की !
मला म्हातारीला तेवढंच गोपाळकाल्याचं समाधान !
आता करा बरं का तुम्ही पण !