आमच्या इथे ..म्हणजे आमिर सुलतान इस्टेट मध्ये दिवाळी जोरात असते .. फराळ पण जोरात .. रितू भाबी चकली करणार म्हणाल्या .. (एकदम PHD लेवल नको ) कांचन करणार डेसिकेटेड कोकोनट चे लाडू (ह्या.. हे फारच सोपे ) ..कौसल्याभाबी फरसाण (शप्पथ .. ते पण घरी करता येत का ).. आज हजारवेळा आई आठवली .. कसं असतं ना .. आपण option ला टाकलेलं नेमकं पेपरला येतं तसंच झालं माझं.. दिवाळी फराळ कधी सिरिअसली घेतलाच नाही .. इकडे बोका आस लावून बसलेला काहीतरी दिवाळीचं मिळेल म्हणून .. आईला फोन केला तर ती आधी फिसकन हसली .. अस्सा राग आला ना .. आपुनकाभी स्वाभिमान हय .. हम्म. नको करू मदत .. गुगल आहे सोबत ..
इकडे बोक्याला ऑफिसला पिटाळलं आणि तयारी करायला सुरुवात केली ..
डाळीचं पीठ २ वाट्या ,
बारीक रवा २ tbsp
खवा १ वाटी ,
पिठीसाखर २ वाट्या ,
दूध १ tbsp ,
तूप १ वाटी
वेलची पावडर
सजावटीसाठी काजू आणि बदामाचे तुकडे
१. खवा मोकळा करून जाड बुडाच्या भांड्यात २, ३ मिनिटे परतून घ्या . आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्या
२. आता त्याच जाड बुडाच्या भांड्यात डाळीचं पीठ, रवा आणि तूप परतायला घ्या मस्त वास सुटेपर्यंत .. मिश्रण पातळ हवं. डोस्याच्या पिठासारखं .. तसं वाटत नसेल तर थोडं तूप घाला .
३.आता गॅस बंद करा आणि एक चमचा दूध मिश्रणात घाला . बुडबुडे विरेपर्यंत मिश्रण हलवत रहा.
४. मिश्रण कोमट झालं कि त्यात परतून घेतलेला खवा घाला आणि नीट मिक्स करा . गुठळ्या रहायला नको .
५. आता मिश्रणात पिठीसाखर, वेलची पावडर , काजूबदाम चे तुकडे घाला ,आणि मिक्स करा.. या स्टेपला मिश्रण कोरडं व्हायला लागेल .
६.तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण घाला आणि हाताने दाबून सेट करा .
७. सुरीने वड्या पाडून घ्या ...
सोप्या आहेत ना .. करून बघाच..