डीडीएलजे : अभ्यास पार्ट 2

डीडीएलजेतून भूगोलाचा अभ्यास करता करता आम्हाला इतरही अनेक विषयांचे ज्ञानाकण सापडले. ते मोती नंतर चमकताना दिसल्याने आम्ही ते भूगोलाच्या बाईंना न दाखवता एका स्वतंत्र वहीत लिहून ठेवले. कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही म्हणून ठेवलेल्या शेकडो गोष्टींपैकी ही पण वही आम्हाला कधीच उपयोगी पडली नाही. म्हणजे गरज असेल तेव्हा ही वही आठवत नाही, आठवली तरी सापडत नाही आणि जेव्हा सापडते तेव्हा गरजच नसते. तर असे बिन गरजेची महत्वाची माहिती खालीलप्रमाणे.

1.आपल्याला आपण कितीही सडपातळ वाटलो तरी पावसात उड्या मारत नाचू नये. पांढरे कपडे घालून उन्हात जावे, पावसात नाही.
1 अ. कबुतरांचा पण ड्रेस कोड असतो. त्यांच्या पार्टिला जायचे तर व्हाईट इज मस्ट. जर देशी कबुतरे असतील तर धोतर आणि झब्बा. कबुतरांना दाणे टाकायचे असतील तर इतकं तरी तुम्हाला यायलाच हवं.
2. आपले नाव आपल्या आणि समोरच्याच्या लक्षात राहत नाही असे दिसल्यास त्याला ते नीट अक्षरात लिहून द्यावे.
3.परदेशी गेलेल्या माणसांना फक्त त्याचे नातेवाईकच नाही तर संपूर्ण देशच परत बोलवत असतो. इथं येऊन काय काशी करायची ती करू म्हणत. देशातल्या लोकांना उद्योग काय आहेत दुसरे.
4. जनरली प्रवासात आपले कपडे नीट सॉर्ट करून ठेवावेत.मुलांना ऍक्सेस द्यायचा असेल बॅगेचा तर हाताला पहिली लागणारी वस्तू इनर्स नसावेत.
5.प्रवासात नीट शिवलेले दणकट आणि टिकाऊ कपडे न्यावेत. जरा हात लागला की फाटले अशा वाईट दर्जाचे नको.
6.करवा चौथ हा एक आवश्यक आणि महान सोहळा असतो. आपल्याकडे।उपासाच्या दिवशी बायका जरा शांत असतात, उपास सोडायला गरम वरण भात पोळी भाजी आणि जास्तीत जास्त चितळ्यांचे श्रीखंड एवढीच मजल जाते. पण करवा चौथ तोडताना 364 दिवस उपासातच काढले असल्यागत चितळे गुणिले हळदीराम रेजड टू मिठास प्लस कराची अशा प्रकारे पदार्थ तैनात असतात.
7. पंजाब हा मुळातच सधन आणि संपन्न देश असल्याने एक दिवस अन्न पाणी न घेताही स्त्रियांची ऊर्जा अफाट असते. त्या नाचू गाऊ शकतात आणि इतका दंगा करतात इतका दंगा करतात की शेवटी कोण कुणाचा उपास तोडतंय याच्याशी काही देणं घेणं नसतं. यालाच आपल्यात होऊ दे खर्च करवा चौथ आहे घरचं असं म्हणतात.
8. लग्नघरी काम केलं की आपलं लग्न लवकर होतं हे मिथ्या आहे हे त्रिवार सत्य आहे. अशाने ज्यांना लग्न करायचं नसतं ते सुटका करून घेतात आणि जे सरळमार्गी असतात ते कामाला जुंपले जातात. ही जगरहाटी आहे. शिवाय श्री श्री हिरोशिरोमणी सलमान खान यांनी फार पूर्वीच सांगून ठेवलाय की अपने बडे तो बडे चालूं निकले रे! तेव्हा सांभाळून!
9. प्रेमाची कबुली वगैरे द्यायची असेल तर ती लवकर नाही दिली तर लै लोचे होतात. कुठं देशोदेशी फिरावं लागतं ते सोडा पण बावजीने योग्य वेळी एन्ट्री घेतली नाही तर देशोधडीला पण लागावं लागतं हे लक्षात ठेवा.
10.बडे बडे देशो में छोटी छोटी बाते होती रहती है यासारखं दुसरं निरुपद्रवी वाक्य म्हणजे सत्यमेव जयते. एक आपल्या देशाचे ब्रीदवाक्य आहे आणि दुसरं ब्रीदलेस. कशामुळे इंम्प्रेस व्हायचं ते तुम्ही ठरवा.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle