बालकथा - झॅप आणि झूप

प्राणीकथा : झॅप आणि झूप

एक होत छोटस तळं. हिरव्यागार रंगाच्या पाण्याचं , चहूबाजूला गर्द झाडी असणारं. त्या तळ्यात होती इवलाली लाल कमळे. आणि पाण्यात खालीसुध्दा खूपखूप पाण वनस्पती होत्या.
अशाच एका पाण्यातल्या पानाला एक अगदी चिमुकलं अंड चिकटलं होतं, पारदर्शक आणि आणि आत एक चिमुकला केशरी ठिपका. आणि त्याच्या जवळच्या दुसऱ्या पानाला अजून एक अंड होतं, तेही पारदर्शक पण आतला ठिपका होता काळा. आता बऱ्याच वेळ एकमेकांच्या बाजूला राहिल्याने त्या अंड्याच्या आतल्या केशरी ठिपक्याने शेजाऱ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

"अरे तू कोण होणार आहेस रे अंड्यातून बाहेर आल्यावर?"
काळा ठिपका म्हणाला, "उम्म्म.. खरतर मला माहीतच नाहीये."

"मला वाटत तू पण माझ्या सारखा मासा होणार , काळा मासा. मी केशरी मासा तू काळा मासा आपण दोघ मिळून खूप खूप खेळू मग." केशरी ठिपक्याने सांगितलेली कल्पना काळ्या ठिपक्यालाही अगदी पटली.

"आपण एकमेकाला काय हाक मारुयात रे?" काळ्या ठिपक्याने विचारलं

"ह्म्म्म मी तुला झॅप म्हणू?" केशरी ठिपक्याने नाव सुचवले.

"बरं, मग मी तुला म्हणणार झूप." असं म्हणुन काळ्या ठिपक्याने लगेच कविता पण केली

"कमळाच्या तळ्यात,
झॅप आणि झूप.
गाऊ गाणी आणि
खेळू खूप खूप"

थोडे दिवसांनी या चिमुकल्या अंड्यातून इवले इवले शेपटीवाले जीव बाहेर आले.
केशरी रंगाचा झूप म्हणाला "बघ, आपल्या दोघांना शेपटी आहे ना? म्हणजे आपण मासेच. कित्ती छान दिसेल ना काळा मासा आणि केशरी मासा एकत्र पोहोताना?"
थोडे दिवस असेच मजेत गेले. झॅप आणि झूप दोघे कमळाच्या पानाखाली खेळत चिखलातले किडे खात आणि कमळाच्याच मुळात झोपी जात.

एक दिवस सकाळी उठल्या उठल्या झूप आला आपले नुकतेच फुटलेले केशरी नविन कल्ले दाखवायला. आणि बघतो तर काय झॅपला चक्क दोन पाय फुटलेले!
झॅपपण विचारात पडला होता. 'असं कसं काय झालं बरं?'
तेवढ्यात झूप म्हणाला "तू ना आता माणूस बनणार आहेस. बघ तुला कसे माणसासारखे पाय फुटलेत ते."
झॅप झूपच्या भोवती गोल गोल फिरत म्हणाला, "नाहीच मुळी! बघ मी कसा छान पोहोतोय ते. मी किनई पायवाला मासा होणारे."
झूपला ही ते पटलं आणि ते दोघे आपले नवीन पाय आणि कल्ले वापरून अजून जोरात पोहायला लागले.

परत काही दिवसांनी बघावं तर झूपचे केशरी कल्ले आणि पर मोठ्ठे छान होत आले होते. झॅपला मात्र चक्क दोन हात फुटले होते. झूपला खुपच वाईट वाटलं. तो झॅपला म्हणाला
"झॅप तू खरच माणूस होणार का रे? बघ ना आता तुला त्याच्यासारखे हातपण आले. तू माणूस झालास की मला पकडशील का? नको ना रे पकडूस. मला इथेच तळ्यात राहायचंय."

झॅपलाही जरा शंका यायला लागली होती. पण तसं काही न दाखवता झॅप परत एकदा जोरजोरात गोल गोल फिरला आणि म्हणाला "छे रे माणूस कित्ती मोठा असतो. मी बघ कित्ती चिमुकला. मी कसा एवढा मोठ्ठा होईन? आणि अजून मला शेपटी आहे, अजूनही मी पाण्यातच राहतो जमिनीवर जायला कुठे येणार आहे मला? मी आपला हातपायवाला मासा."
आपल्या हातांनी झूपच्या केशरी झुपकेदार पंखाना टाळी देऊन दोघं आपल्या किडे खायच्या उद्योगाला निघून गेले.

अजून काही दिवस गेले आणि झूप सुंदर केशरी,पांढरे पट्टेवाला, मोठे मोठे पंखवाला मासा झाला होता. आणि झॅपचा काळा रंग जाऊन तो चक्क ठिपकेदार हिरवा झाला होता. त्याच शेपूट सुध्दा गायब झालं होतं.

मग मात्र झूप म्हणाला "झॅप तू नक्कीच मासा नाहीयेस असं मला वाटत. तुला हात, पाय आहेत. खरंतर पाण्यात पोहायला हात पाय नसले तरी चालतं. म्हणजे तुला कदाचित जमिनीवरपण चालता येईल. बघतोस का प्रयत्न करून? अगदी तळ्याच्या काठावर कर म्हणजे नाहीच जमल, किंवा गुदमरलास तर तुला लग्गेच परत पाण्यात येता येईल."

झॅपला पण आता मोठ्ठी उडी मारायची इच्छा होत होती. झूपचं सांगणं ऐकून बघावं असं त्यानेही ठरवलं.
झालं! दुसऱ्या दिवशी दोघे तळ्याच्या काठाजवळ गेले. झॅपने जोर लावून उडी मारली आणि काय आश्चर्य झॅप चक्क जमिनीवर बसला होता. त्याला आजिबात गुदमरल्यासारख झालं नाही.स्वच्छ हवा , उबदार उन पाहून मजाच वाटली.
इथे झूप पाण्यातून पहात होताच. झॅप ठीक असल्याच पाहून झूपला पण बरं वाटलं.

तेवढ्यात तलावाजवळ दोन लहान मुलं आली आणि झॅपला बघून म्हणाली "अरे तो बघ पिल्लू बेडूक." त्यांच्या त्या आवाजाने झॅप दचकला आणि परत पाण्यात पळाला.
तिथे झूपचा पंख पकडून गोल गोल नाचत म्हणाला "अरे! मी बेडूक आहे. मासा नाही. आणि मला किनई पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे रहाता येतं."

मग तेव्हापासून झॅप कधी कधी जमिनीवर येतो, आणि परत पाण्यात जाऊन झूपला जमिनीवरच्या गमतीजमती सांगतो. आणि दोघे मिळून त्यांच गाणं सुद्धा गातात.

"कमळाच्या तळ्यात,
झॅप आणि झूप.
गाऊ गाणी आणि
खेळू खूप खूप"

Copyright : Swapnali Mathkar ,
प्रताधिकार : स्वप्नाली मठकर

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle