मंजूताईंची गोमू संगतीने मधली गोळा भाताची रेसिपी आणि रश्मीची चिंचेच्या साराची रेसिपी बघून भयंकर नोस्टॅलजिक झाले वैदर्भीय पदार्थ आठवून, अग हा एक जुना लेख आठवला, म्हणून इथे आणला.
पूर्वप्रकाशित - अनाहिता रुची विशेषांक २०१५
नमस्कार लोकहो, काय म्हणताय? बरे आहात ना समदे? ठीक हाव ना? तर मी आता तुम्हास्नी जरा विदर्भाच्या खाण्यापिण्या बद्दल, तिथल्या लोकांच्या आवडी निवडी, सवयी याची जरा माहिती देतेय या लेखातून. त्याचं आसं झालं, की आम्ही अनाहितानी रुची विशेषांक काढायचे ठरिवले. मंग आता तेच्यात विदर्भाचा लेख पायजे म्हंजे पायजेच. विदर्भातले लोकांनी कावून मागे राहायचे? न्हायतर उपोषण हायेच ठरलेले मालकांकडे. पन तशी वेळ काही आमच्या अनाहितात कधी येत न्हाय. समद्यांनी मिळून ठरिवले की समस्त अनाहिता महिला मंडळाकडून विदर्भाची प्रतिनिधी म्हनून मी लेख लिहिणार. आता काय सांगू तुम्हाला, आम्ही लोक कुठेबी असलो ना, तरी जेवनाले विदर्भाची चव आल्याबिना घास काही घशाखाली धकेना बघा. त्यातून आमी परदेशात राहतो ना, तिकडच्या काही काही भाज्या इकडे भेटत न्हाईत, इकडच्या थंडीत तिथले प्रकार मानवत न्हाइत, मंग अजूनच आठवण येउन जाते या पदार्थांची. म्हंजे तसे समद्यांचेच होते म्हणा आपापल्या भागा विषयी. तर काये, या विदर्भाच्या पदार्थात लोकायले दिसते फकस्त तिखट सैपाक अन तेलाची तर्री, बाकी आपण सगळे लोक खातो तसेच. पण काये ना बाप्पा, ते समदे तर हायेच. तेल जरा ढिल्या हाताने असतंच, पर त्याच्या संगत आजून बी बरंच असतं इकडं सैपाकात. आता काय काय असतं ते वाचाच तुम्ही लेखात पुढं.
आता तशे वाचणारे सुज्ञ वाचक असतील अन त्यांना विदर्भ म्हंजी कुठे, किती जिल्हे हे माहीत असीन, पण तिकडे शहरातले, आपल्या महाराष्ट्रातलेच लोक असत्येय की ज्यांना विदर्भात उन्हाळा, शेतकरी आत्महत्या आणि संत्री एवढेच माहित राहते, गेलाबाजार शेगांव कचोरी. म्हणून हे बी एक्ष्ट्राचे सांगूनच टाकते. तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा ह्ये समदे जिल्हे म्हंजी विदर्भ. तसा रोजच्या जेवणात समद्या महाराष्ट्रात असतं तसंच जेवतात. वरण भात भाजी पोळी, सणावारी गोड. पण जो काय फरक हाये ना इकडे, तो होतो मेन म्हंजी इकडे शेतात काय पिकते त्यावरून. त्यात बी पूर्वीच्या काळी काय पिकायचे त्यावरून. आता तर इंटरनेटच्या जगात इकडची संत्री झटक्यान तिकडे आन तिकडचे पिझ्झे इकडे. पण पूर्वीच्या काळी ज्या पद्धती व्हत्या, त्या अंगात मुरलेल्या असतेत एकदम. मग त्येच घरात बनते अन तेच खाल्ले जाते. अन पिकाचे बघाल तर जमीन कशी, हवामान कशे, पाणी किती सगळ्या गोष्टी म्याटर करत्येत. पुन्हा ते खाल्लेलं झेपेल असं काम पण पायजे. म्हणून शेतकऱ्याचे जेवण वेगळे, साहेबाचे वेगळे. पुन्हा हर एक घरात, समाजात पद्धत वेगळी राहतेच न्हवं. नागपूर साईडले म्हणजे चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा ते उमरावती परेंत अन पुढे अकोला, वाशिम, बुलढाणा तिकडे बी छोटे मोठे बदल दिसून येतेत. तर हे जे मी लिहिणार ना, त्यात जेवढं शक्य हाये ते कव्हर करत्ये, अन अजून जर म्या काही विसरून गेली, तर मला आठवण करून द्या तुम्ही.
तर आपले मराठी लोकांचे जेवणात पहिले राह्यते पोळी आणि भात. तर विदर्भातले बहुतेक लोक हे भाताबिगर राहू शकतेत, पण पोळी नाहीतर भाकरी पायजेच. भात खातेत म्हणजे, न्हाई असे न्हाई, अगदी आवडीने बी खातेत, तुम्ही ऐकले असीन की नागपूर साईडला तर एकदम पहिला भात, मग पुन्हा शेवटचा भात अन त्योबी येकदम आवडीने खातेत लोक. पण पोळी पायजेच. आन हां, पुन्हा शब्दांचे गोंधळ नको. फुलके करा, न्हायतर तेल लावून घडीच्या पोळ्या करा, त्या सगळ्या आमच्या पोळ्याच. काही ठिकाणी चपाती पण म्हन्त्येत पण पोळीच जास्त करून म्हणतात लोक. ज्वारीची भाकर म्हणजे इकडचा लैच आवडणारा प्रकार. तुम्ही पावसाळ्यात कुठेबी जासाल ना फिरायला, शेतात ज्वारीची कणसं दिसलीच पायजे. ज्वारीच्या भाकरी खाऊन पण जीव कंटाळते ना बाप्पा. मंग त्यात उडीद मिसळून कळण्याची भाकर होते. आता भाकरीसोबत चटणी न खावून कसं चालीन? अन त्या चटणीत तेल न घालून तर विदर्भातले लोकायला जमेचना. काय म्हणता, ठेचा विसरला का? असं कसं म्हणता? भाकर आन वर्हाडी ठेचा. एकदम वर्ल्ड फ़ेमस. लाल मिरच्या, लसूण, अद्रक, लिंबाचा रस…बास मले लिवता लिवता डोळ्यासमोर धूर दिसू राह्यला. आणि वरतुन परत कच्चं तेल घ्या. त्ये काये ना, विदर्भात तेलाचा वापर लैच होतो. आता तो चूक की बरोबर, प्रकृतीला मानवते की नाही वगैरे चर्चा वेगळी, म्हणजे बघा पिठलं कोरडं असतं, घ्या वरून तेल. झुणका कोरडा, घ्या तेल. चटण्यात तेल. वडाभात खाते तवा तर त्यावर फोडणीचे तेल असतेच. तर पोळी अन भाकरीवरून तेलाकडे आलो बघा आपण. चटण्या आपल्या नेहमीच्याच हो, तीळाची, जवसाची, दाण्याची, कारळाची वैगरे, आणि अंबाडीची चटणी, करवंद आले की लोणचं, कवठाची चटणी अशे लई प्रकार भाकरी सोबत अन पोळीसोबत तोंडी लावायाले.
आता भाताचं कसय, नागपूरले बघाल तर बटाटे भात, वांगी भात, तोंडली भात, मसालेभात काय विचारू नका. वरण भात तर हायेच, पण खास नागपुरी गोळा भात, वडा भात ह्येबी लई फ़ेमस. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आमटी म्हनतेत, पण आमच्याकडे कुठ्ल्याबी डाळीचे वरण करू देत, सगळे वरणच. मग साधे वरण की फोडणीचे वरण हाच काय त्यो फरक. मग ती फोडणी लसणाची, की कांदा टमाट्याची, की आमसूल घातलेले वरण, चिंच गुळाचे वरण नाहीतर कैरीचे वरण. आमटी हा शब्द फक्त तेवढा न्हाय वापरला जात इकडे. अन त्यात पण तूर डाळीचेच वरण जास्ती करून. मुगाचे, मसुराचे, उडदाचे पण असत्ये, पण इकडे शेतात तूर म्हणजे शेतकऱ्याचे सगळ्यात मुख्य कडधान्य. शिजवलेलं घट्ट वरण अन वरून कच्चा कांदा, तिखट अन काळ्या मसाल्याची फोडणी ह्ये बी मस्त लागतं. खिचडीत बी तुरडाळ जास्त. त्यात पण बघा, जेव्हा शेतावर तूर येते ना हिरवीगार अन कोवळी, त्याचे दाणे सोलाचे, मस्त तेलावर परतायचे, वाटायचे अन नेहमीची फोडणी द्यायची. हिरवागार रंग येतो ना याला, अन तेच्यासोबत कांदा घ्या कच्चा, अन भाकर नाहीतर पोळी नाहीतर भात. समदं असं जमून येतं ना की ज्याचं नाव तिकडे. अन हिवाळ्यात हुरडा. शेतावर हुरडा पार्टी अन घरी पण हुरड्याचे पदार्थ.
आपल्या नेहमीच्या भाज्या तर होतातच, पण त्यात पण पेशल आयटम आहेत काय काय. लाल भोपळ्याची मसालेवाली भाजी, म्हणजेच बाकरभाजी. खोबरे, खसखस, अन खडा मसाला सगळ्याचे मिळून बनवतेत. सणावारी तर लई झ्याक. इकडे ओलं खोबरं कमी हाय तसं सैपाकात. जास्ती करून सुकंच. पालेभाज्या तशा भेटतेत सगळीकडेच. पण त्याची पातळभाजी नाहीतर डाळभाजी जास्त करत्येत लोक. हरभऱ्याची डाळ नायतर तुरडाळ घालून पातळभाजी आन त्याच्यावर बी फोडणी वालं तेल पायजेच, मस्त लसूण घालून. ढेमशाची भाजी पण खावी ती विदर्भातच. साधी फोडणीद्या, न्हायतर त्यात मस्त खोबरे खसखस वाटण करा, भरली करा, उन्हाळा ढेमशा बिगर जातच नाय. चिवळ नावाची एक पालेभाजी असत्ये, ती बी उन्हाळ्यात असत्येच. तब्येतीला एकदम थंड. ही निवडायला डेंजर एकदम, पण खायला एक नंबर लागते. अन तर्रीवाल्या भाज्यांचे काय सांगू, तेलच तेल पुन्हा. मसाल्यांच्या नावातही गोंधळ होऊ शकतो. जेवणात वापरला जातो तो काळा मसाला. आता यात बी घराघरात बदलते गोष्टी. काही ठिकाणी यात कांदा सुकवून त्याची पूड करून घालतात मसाल्यात आणि तो काळा मसाला. तर काहीजण नेहमीचाच गोडा मसाला जरा जास्त भाजून घेतेत म्हंजी रंग बदलतो. त्यामुळे विदर्भात गोडा मसाला म्हणून पटकन भेटत नाय कुठे. काळा मसालाच. आता उन्हाळा अतिशय खडतर. मग खाण्यात थंड आले पायजे ना बरंच. कांदा लई औषधी बघा या दिवसात, उन्हाळ्यात तर कुठेबी जा विदर्भात, घरोघरी कांदा असत्योच. कांद्याचा झुणका अन भाकर हे सांगायचे विसरलेच बघा मी. इतर भाज्यांमध्ये पण बेसन लावतात खुपदा. काकडीचे थालीपीठ पण करतात. पण अजून एक खास म्हणजे काकडीचा कोरोडा. काकडीचे पिठले म्हणू शकता तुम्ही बाप्पा. अन हे काय फकस्त व्हेज आयटम नाहीत बरं का विदर्भात. वऱ्हाडी चिकन, सावजी चिकन, मटण ह्येबी फ़ेमस सगळीकडे. तर्रीवाले वऱ्हाडी चिकन खाल्ले असेन तर समजेन की एवढी तेल तेल का करून राहिली मी अक्ख्या लेखात. वेड लागेल बघा तुम्हास्नी ते चिकन खाउन.
आता सणावारी गोड काय करायचं? ओल्या नारळाचे पदार्थ जास्त करून सणावारी. हल्ली होतात नेहमीच. नारळाच्या करंज्या, सगळ्या प्रकारच्या खिरी, न्हायतर मग श्रीखंड, बासुंदी, पुऱ्या सगळे नेहमीचेच गोड पदार्थ. हां आणि जसे तिखट खाण्यात इथल्ले लोक पुढे, तशेच गोड खाण्यात बी. फकस्त या गोडात गुळ कमी अन साखर जास्त. संक्रांतीला पण तिळगुळ म्हणून तीळ साखरच जास्त. अन पुरणपोळी तर तुम्ही एकदा खाऊनच बघा विदर्भात. सर्वात जास्त पुरण भरूनही एकदम पातळ सुंदर पोळ्या लाटण्यात विदर्भाचा नंबर पहिलाच. काही ठिकाणी तुरीच्या डाळीचे पण चालते पुरण. त्यातही पुरणात साखर जास्त, गूळ कमी. कुणी म्हनतेत की साखरेने जमत नाय, तर आम्ही सांगतो तुम्ही आधी खाउन बघा अन मंग बोला. बर ती पुरणाची पोळी खायची कशी. पहिले ते पोळी गोल पसरायची, चांगले चार पाच चमचे तुपाने तिला आंघोळ घालायची. मग एक घडी घालायची, पुन्हा तूप ओतायचे, मग पुन्हा घडी घालून ती चतकोर आकाराची होईल तेव्हा त्यावर परत तूप आणि मग वदनी कवळ घेता म्हणायचे, विदर्भातले लोक भारतभर कुठेही असले, तरीही पुरणपोळी वाढणार्याला हमखास सांगतील, बाई, आपल्या अस्सल वऱ्हाडी पद्धतीने तूप वाढ. बरेच जण तर तुपाची वाटीच घेतात पानात. पुरणपोळी तुपात बुडवून तिला आंघोळ घालून खायची. सणावाराला जेव्हा पुरणपोळी होते, तेव्हा तर सगळा नैवेद्याचा सैपाक. आता तोही प्रत्येक घरात, समाजात बदलतो. कुणाकडे आलं लसूण जास्त तर कुणाकडे नाई. अशा जेवणात विदर्भात मठ्ठा, मसालेभात, मोकळी डाळ, पालकाची पातळ भाजी, सुकी भाजी म्हणून बटाटा किंवा लाल भोपळ्याची भाजी. आणि एक, यातला मठ्ठा असेन की नाही याची जरी खात्री नसली, तरी कुळाचार असू द्या, नायतर कधीही पुरणपोळी किंवा काही सणाचा स्वयंपाक असू द्या, कढी असतेच. जणू नियमच. गोळाभात, वडा भात या सगळ्याच पदार्थांसोबत कढी हवीच. मग या जेवणाच्या शेवटी वडा भात किंवा भजी भात हवाच. त्यावर फोडणी हे काय सांगायला पायजे का आता? वेगवेगळ्या डाळी भाजून त्याचा भरडा करायचा अन त्याचे वडे तळायचे अन भातासोबत खायचे, झाला भरडा भात. महालक्ष्म्या तर अशा तृप्त होतेत ना हे जेवून. लई समाधान वाटते मग.
बर मला एक सांगा, तुम्ही शाळेत असाल तेव्हा बोरकूट खाल्लं असीन ना? तर त्ये बी तसा आमच्या इकडचा पदार्थ. एवढे कडक उन की काय सांगू. बोरं वाळवायची आणि मग त्याची पूड करायची. वर्ध्यातले केळकरांचे बोरकूट म्हाईत असते लोकायले. पाकातली बोरं बी अशीच. आता त्या विष्णुजी की रसोई मधी भेटतेत तर लोक मिटक्या मारू मारू खातेत म्हणे. उन्हाळ्यात वाळवण तर खूप होतेत. बटाट्याचे पापड, कुरड्या, बटाट्याचा कीस, साबुदाण्याच्या पापड्या, मुगोड्या नायतर मुगवड्या, खारोड्या किती प्रकार. आमरसाचे जेवण असले की हे सगळे पायजेच.
आजून एक, संध्याकाळच्या वेळी सगळ्यालेच भुका लागतेत. मग रोज रोज काय कराचे. तर नेहमीच्या आपल्या पदार्थासोबतच इकडचे काही पेस्शल आयटम सांगते. कच्चा चिवडा, पण कसा करायचा. असा आपापल्या घरापुरता होतच न्हाय हा. त्यासाठी शेजारपाजारच्या चार सहा बायकांनी एकत्र यायचे, कुणाच्यातरी अंगणात. रद्दी पेपर घ्यायचे आणि एक मोठ्ठ घमेलं घ्यायचं, गप्पा मारता मारता एकीने कांदा चिरायचा, एकीने टमाटा, तोवर कुणीतरी पातळ पोहे हलकेसे भाजून आणतं, मग त्यात चिरलेला कांदा टमाटा घालायचा, वेळ असल्यास डाळवा आणि शेंगदाणे फोडणीत घालायचे, थोडसं लिंबाचं किंवा कैरीचं लोणचं घालायचं, चवीला मीठ साखर घालायची आणि सगळं एकत्र मिसळून तयार झाला कच्चा चिवडा. उन्हाळ्यात अजून एक पोरासोरांना अन म्हातार्यांना आवडते ते म्हणजे सातूचे पीठ. सातूचे पीठ, साखर आणि दुध मिसळून खायचे आणि तिखट पायजे असेल तर त्यात बारीक चिरलेला कच्चा कांदा, टमाटा, ताजं लोणचं, मीठ, साखर घालायचे, यात वरून थोडे कच्चे तेल घ्यायचे की एकदम चटपटीत आयटम तय्यार. आणि काकडी घ्यायची, उभ्या फोडी चिरायच्या, त्या या पिठात घोळवा यच्या अन खायच्या. उकरपेंडी पण अशीच, उपम्याचीच बहीण, फक्त कणिक (गव्हाचे पीठ) वापरून केलेली. नेहमीची फोडणी करून तेलावर कांदा परतून घ्यायचा, शेंगदाणे घालायचे, मग कणिक परतून घ्यायची आणि व्यवस्थित भाजली गेली की यात हळूहळू पाणी घालायचे, एक मस्त वाफ आणायची आणि पुन्हा वरून बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून दह्यासोबत खायची. पुडाच्या वड्या हा बी एक अस्सल विदर्भातला प्रकार. आता पुडाच्या वड्या म्हणजेच सांभार वड्या. आता प्रश्न येईल सांभार म्हणजे काय? इडली सोबत असतो तो? तर विदर्भात कोथिंबिरीला सांभार म्हणतात आणि या पुडाच्या वड्या म्हणजे कोथिंबिरीच्या वड्या, पण खास विदर्भीय पद्धतीच्या. कोथिंबीर, सुके खोबरे, खसखस वापरून सारण करायचे, ते कणिक आणि बेसनाच्या पारीत भरून त्या तळायच्या आणि गरमागरम खायच्या. वेळखाऊ काम एकदम पण चवीला एकदम भारी.
अजून बरेचदा काय व्हते, शब्द वेगळे राहते विदर्भात. पदार्थ त्योच, पण नावामुळे गोंधळ होतो बघा. आता साबुदाण्याची उसळ म्हणतो आम्ही अन बाकीचे लोक खिचडी म्हनतेत. बरं अजून एक, विदर्भात उपासाले सांबार खात न्हाय कुणी, म्हणजे कोथिंबीर खात न्हाय अन काकडीबी काय काय जणच खात्येत. पिठ्ल्यालाच तिकडे बेसन पण म्हणतात. रावण पिठले म्हैतेय का. एकदम तिखट जाळ. लाल भोपळ्याला गंगाफळ पण म्हणतात, अन खरबुजाला डांगर बी. फोडणीच्या पोळीला कुस्करा म्हणतो आम्ही, पोळी कुस्करतो म्हणून कुस्करा. फ्लॉवरला फुलकोबी आन कोबीला पानकोबी. प्रत्येक भाषेची काहीतरी वेगळीच नावे, पण त्यातच मज्जा असत्ये ना बाप्पा.
आता तुम्हाला अजून सांगते, की तुम्ही विदर्भात कधीबी कुठेबी फिरायला गेलात तर काय खासान. आता तुम्ही जर वर्धेत जाल, तर तिकडे आलुबोंडा मिळतो. म्हणजे? बटाटेवडा. पण नुसता न्हाई, त्याच्या सोबतीला असतो एकदम तर्रीवाला रस्सा. आलुबोंडा म्हटले की तो रस्सा सोबत हवाच. आता ते सामोसा चाट वगैरे जे मिळते ना, तर किती वर्षांपासून बघा तिकडे वर्धेत दही सामोसा मिळतो. तोबी खाऊनच बघा. तिकडे वर्धेतच गोरस भांडार नावाचे दुकान आहे, पार महात्मा गांधीजी होत्ये तिकडे तेव्हा सुरु झालेले. तिथे गोरसपाक मिळतो, गायीच्या शुद्ध तुपात न्हालेली बिस्कीट. शेगांवला जवा येसान, तवा तर तुम्ही कचोरी खाल्या बगैर जाउच नगा. तिथे बी बदमाष लोक राह्यते. त्ये कुनीबी आमचीच खरी कचोरी म्हणून फशिवातात. पण तिथल्या रेल्वे स्टेशनासमोर एक दुकान हाये तिरथराम करमचंद शर्मांचे. तिथली खरी शेगाव कचोरी. अकोल्याले जी पाणीपुरी भेटते, तीबी खासच. अन तिथेच खस्ता मिळतो या पाणीपुरीच्या गाड्यांवर. मैद्यापासून बनवत्येत पापडी सारखा प्रकार अन त्याच्यावर दही, कांदा, टमाटा, शेव घेऊन खायचा हा खस्ता. एकदम तोंपासू बघा मिपाच्या भाषेत. नागपुरले जासान तर सावजी चिकन म्हणू नका, पुडाच्या वड्या म्हणू नका, नवीन झालेले ते हल्दीरामचे संत्रा बर्फी, सोनपापडी म्हणू नका. खाण्यापिण्याची काय चिंताच करू नका. तुम्ही बुलढाण्याले जर येसान, तर इथंबी मेजवानी हाय नुसती. मराठवाडा पण शेजारी अन खानदेश पण. तर समद्यांचा इफेक्ट दिसत्यो तिथे. मिरच्यांची भाजी…व्हय व्हय, आपल्या बारक्या हिरव्या मिरच्यांची असत्ये ही भाजी. आंबट चुका, मिरच्या, कांदा, सुकं खोब्र, दाण्याचा कुट अन डाळ असं घालतेत. पावसाळा सुरु झाला की गावागावात पार्ट्या असतेत मिरच्यांच्या भाजीच्या. भाकरी कुस्कारायाची, त्यात ही भाजी, वर कच्चं तेल आणि सोबतीला लिंबू, कांदा. मंदिराच्या आवारात, कुणाच्याही अंगणात, शेतात, आज काय बेत तर मिरच्यांची भाजी. अन शेतात पार्टीला दुसरे काय तर वांग्याची भाजी आणि बिट्ट्या. बिट्ट्या, बाफल्या, बाट्या समदे तशे एकाच प्रकारचे, थोडासा आकारात, पिठाच्या प्रमाणात फरक. बिट्ट्या चुलीवर भाजतेत, बाफल्या वाफवून तळून घेतेत. आन खामगावच्या एस टी स्टँडावर भेटणारा उसाचा रस एकदम एवन. अशा बऱ्याच गावात बऱ्याच गोष्टी हायेत. पण या जेवढ्या मले आठवल्या, तेवढ्या मी सांगितल्या. तुम्हास्नी म्हाईत असतील तर घाला भर तुमी अजून.
तसं अक्ख्या विदर्भाची एवढी खायची प्यायची माहिती आहे, की लिहावं तेवढं कमीच. प्रत्येकाच्या घरात विचारले तर नवीन गोष्टी कळतील मला पण. म्हणून आत्ता ह्ये एवढेच पुरे. तर आता विदर्भ वेगळा हवा की नको वगैरे चर्चा राहूद्यात बाजूला, अन करा यातलेच काहीतरी झणझणीत पदार्थ, सोबतीला गोडही करा आणि मग ताणून द्या. अक्खा विदर्भ येऊ द्या सपनात. काय म्हणताय, कधी येऊ खायला वैदर्भीय पाहुणचार?
कधीही या. वऱ्हाडी आग्रह कसा असतो हे ऐकले असेन तुम्ही, नसेल तर सांगते. चार पोळ्या खाणार असाल, तर २ खाऊनच थांबा. अजून ३ तरी आग्रहाच्या खाव्या लागतील हे ध्यानात असू द्या. बास, बाकी मी काय लिहू अजून, इकडचा दुष्काळ मिटू देत, आत्महत्त्या थांबू देत, काळ्या मातीत भरघोस पीक येऊ देत आणि हे सगळे पारंपारिक पदार्थ जगभर पोचू देत अशी इच्छा.
तळटीप:
अस्सल वैदर्भीय किंवा वऱ्हाडी बोलीभाषा मला येत नाही. तिथले अनेक शब्द वापरात आहेत परंतु संपूर्ण ग्रामीण किंवा बोलीभाषेची सर या लेखाला नाही. आजवर मी जी भाषा ऐकली आहे, त्यातून हा लेख ग्रामीण भाषेत लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. तो परिपूर्ण नाही याची जाणीव आहे.