करोनाचं हे वादळ आपल्याला खूप साक्षात्कारी धडे देते आहे, देणार आहे. आपण एका जागतिक पातळीवरच्या ऐतिहासिक वळणाचे साक्षीदार असणार आहोत हे नक्की. ही जी शांततेची, निवांतपणाची मुलायम साय अंथरलीये ना सगळीकडे... तिच्या पोटात खोलवर भविष्याची भिती दडलीये. ती धडका मारते आहे अधून मधून, पण नेमकं तेव्हाच.. आजवरच्या जगण्यातून, अनुभवांतून जे फायटींग स्पिरीट मिळालंय ना, तेही ठणकाऊन सांगतंय, सुचवतंय...आता धीर नाही सोडायचा. सज्ज व्हायचंय, समर्थ बनायचंय, आपण स्वतः खंबीर राहिलो तर आजूबाजुच्यांना आधार देऊ पण त्यासाठी आपले पाय बळकटपणानं रोवलेले असायला हवेत. एरवी समज आल्यापासूनच, काळाबरोबर वेगात पायाला चाकं लावून पळणारे आपण, पण आता आपण थांबून, थबकून, आपापल्या घराच्या खिडक्यांतून काळाला पळताना पहात आहोत. वेगळाच अनुभव आहे ना हा?
सगळ्याच गोष्टींवरचा मुलामा खरवडला जातोय. मनाचा तळ ढवळला जातोय. एकेक पदर सुटा व्हायला लागलाय. कुठल्याशा नशेत जगलो का आपण आजवर? आता कुठे ख-या आयुष्याशी, ख-या प्रश्नांशी ओळख होतेय. आपल्यासकट आपल्या मुलाबाळांनाही लिमिटेड रिसोर्सेसचं भान आलंय. स्वावलंबनाची, कष्टाची किंमत कळतिये. "कृतज्ञता", "देशभक्ती", "माणुसकी", 'राष्ट्रीय ऐक्य' हे घिसेपिटे झालेले शब्द...पण आज ह्यातल्या एकेका शब्दाच्या ख-या अर्थाचा आणि परिणामांचा विचार करताना घशाशी आवंढा येतोय. तशीच वेळ येईल तेव्हा आपण होऊ शकू का जिवावर उदार? बहुतेक हो...पण कदाचित.......??
माझ्या, आपल्या पिढीनं युद्धकाळ अनुभवला नाहीये पण आपल्या आधीच्या पिढीनं तो अनुभवलाय आणि सोसलाय. त्यामुळेच कदाचित एक सततची जागरुकता, दूरदृष्टी व सतर्कता त्यांच्यात कायम दिसली. घर म्हणून किमान काही गोष्टी "कायम" घरात असण्यासाठीचा त्यांचा कटाक्ष...आणि, "सगळं इथ्थं...इथ्थं कोप-यावर तर मिळतं...दोन मिनिटांत आणता येईल" म्हटलं....तरी.. "नको" तुला नाही कळणार...वेळ काही सांगून येत नाही म्हणणारे, वर्षभराच्या बेगमीचं सामान भरणारे, चटण्या लोणची मुरांबे करणारे, कधीतरी लागेल म्हणून जुन्या वस्तू बाळगणारे, किती वायफळ खर्च करता रे तुम्ही असं सतत सांगणारे, उगीचच काटकसर करून पैसे जोडत रहाणारे, वेळ पाळणारे, स्वावलंबनावर जोर असणारे, जगण्यासाठीच्या गरजा कमीत कमी ठेवणारे, व्यायाम करणारे, छंद जोपासणारे, भरपूर वाचन करणारे, संध्याकाळी देवासमोर निरांजन लावून स्तोत्रं, परवचा म्हणणारी ही पिढी, सुबत्ता आली तरी जुन्याच लोअर मिडीलक्लास जीवनशैलीला गच्च कवटाळून बसण्याच्या त्यांच्या वृत्तीची आपण कितीही टिंगलटवाळी केली तरी स्वतःचा हेका न सोडणारी ही घरोघरची माणसं. आता किंमत कळते आहे त्यांच्या प्रत्येक शब्दाची आणि अनुभवाचीही आणि फॅशन्स कितीही बदलल्या तरी कोअर व्हॅल्यूज कालातीत असतात ह्याचीही.
ही सतर्कता त्यांनी आजवर पाहिलेल्या आयुष्यातल्या क्षणभंगुरतेच्या अनुभवांमुळेच आली असावी. घर स्वच्छ सुंदर व अडगळ फ्री असावे असा आमचा हट्ट, तर, "राहिल्या चारदोन वस्तु माळ्यावर तर त्या काय खायला मागतात का रे तुम्हाला? रिकामेच ठेवायचे तर माळे बांधलेच कशाला मग?" हे त्यांचं ठरलेलं उत्तर. तारा, चुका, खिळे, दो-या, कुलपं-किल्ल्या, हत्यारं, सुट्टे पैसे, वर्षानुवर्षांच्या बिलांच्या फायली आणि दर दिनी अपडेट केल्या जाणा-या रोजनिश्यांनी सुसज्ज त्यांची पिढी, तर खाऊन पिऊन सुखात घालवलेलं आपलं बालपण, नंतर कमवायला लागल्यावर हळूहळू सुबत्तेकडे आणि मग अलगदपणे चंगळवादाकडे झुकलेली आपली पिढी... एकीकडे दहा रूपयांचा हिशोब चुकला तरी झोप न लागणारे ते आणि दुसरीकडे हजार रुपये गायब झाले तरी पत्ता नसणारे आपण. आणि आता ह्या अनपेक्षित आलेल्या वादळानं सगळीच समीकरणं नव्यानं मांडायला लागतायत्.
आता धान्य जपून वापरलं जातंय. घासाघासाला प्रत्येक दाण्याची, शेतक-याच्या कष्टाची, आईची, कामवाल्या बाईची किंमत समजते आहे. "पैशाहून श्रेष्ठ माणुसकी" हे वचन अचानक पुस्तकातून बाहेर पडून सत्यात उतरलेलं दिसतंय. जोडलेल्या माणसांवरून मनुष्याची श्रीमंती कळते आहे.
आता कुठेही मिरवायला जायचं नाहीये. आपणच आपल्याला जोखायचंय आणि मूल्यमापन करायचंय. दिवसाचं डिझाईन बदललंय. घरकाम, स्वैपाक, स्वच्छता, योगाभ्यास, देवपूजा, धार्मिक वाचन, व्यायाम हे आचरणात आणण्यासाठीचा वेळ आणि इच्छा निर्माण झालीये. छान वाटतंय की करायला. हे सगळं एरवी का नाही जमवत आपण? हे जमवायलाच पाहिजे ह्यापुढे.
केसातली चांदी दिसायला लागलिये. स्वतःपासूनही लपवली कित्येक वर्षे. छान दिसते की...कशाला लपवली आजवर? चांदीला लोखंडाचा मुलामा देण्याची ही कुठली फॅशन? वय ही लपवायची गोष्ट का वाटावी?
मी भारतीय आहे ह्याचा आज अभिमान वाटतोय. प्राचीन संस्कृती असलेला माझा देश, आहे गरीब. खूप त्रुटी आहेत त्यात पण ह्याच माझ्या मायभूमीकडे आज आख्खं जग कौतुकानं आणि आदरानं पहातंय आणि मग आताच्या ग्लोबलायझेशनच्या दिवसांत आठवतात "हे विश्वची माझे घर" म्हणणारे ज्ञानोबा आणि देवा मला दुःख दे म्हणजे मला तू सतत आठवत रहाशील म्हणणारे तुकोबासुद्धा.
जर जगणंच इतकं क्षणभंगूर असेल तर कशाला हवेत वादविवाद, हेवेदावे आणि मतभेद? जोवर आहोत तोवर फक्त प्रेमच असायला काय हरकत आहे. कशाला भांडायचं? दया, क्षमा, शांती... हेच तर सगळं तत्वज्ञान सांगतं. सतत स्वतःची रुपं बदलणा-या करोना नावाच्या मायावी राक्षसाला आपण कधीतरी नामोहरम करूच पण सद्ध्यातरी तो माझ्यासाठी बोधीवृक्ष झालाय.