मैत्रिणींनो सध्या सगळीकडे कोरोनामुळे वातावरण भीतीदायक आहे. अशात माझ्या सीए करणाऱ्या मुलाच्या सरांनी हजर व्हा न असं सांगितल्यामुळे नाईलाजाने त्याला पुण्याला पाठवावं लागलं. सध्या बाहेर मेसमध्ये फक्त पार्सलसेवा ती सुद्धा सात वाजेपर्यंत सुरू आहे त्यामुळे शक्यतो घरगुती डबा असलेला बरा म्हणून तो इथून जाण्यापूर्वी दोन्हीवेळा डबा लावला. नाश्त्याला भरपूर सुका खाऊ दिला. चहा, कॉफी वरण भात घरी करता येईल एवढी राईसकुकर वगैरे तयारी दिली.
त्याच्या सोबत त्याच्याच ऑफिसला असणारी एक इथली मुलगी पण आहे, तिचा डबाही याच काकूंकडे लावला. पण झालं काय तो इथून गेल्याच्या दुसऱ्याच आठवड्यात एक दिवस रात्री मला त्याचा फोन आला, आई आज आम्हाला दोघांना डबा मिळणार नाहीय, काकूंच्या बिल्डिंग मध्ये पॉझिटिव्ह सापडलाय. मी इथून के करू शकणार, तरी म्हटलं जवळपास कुठे पोळी मिळतेय का बघ आणि घरून दिलेल्या मुरंब्यासोबत खा. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधल्या मुलींनी या दोघांना डबा दिला.
मुलं घाबरली होती, संध्याकाळी काय म्हणून पराठे पॅकेट घेऊन ठेवली होती. तेव्हाच काकूंचा फोन आला की बिल्डिंग सील केलीय पण मी बाहेर आणून डबा देईन पण मुलांना डबा घ्यायला भीती वाटत होती म्हणून ती म्हणाली आम्ही आठ दिवस बाहेर घेतो, सील निघालं की घेऊ तुमच्याकडे!
झालं...काकूंना वाटलं आपलं गिऱ्हाईक गेलं म्हणून मुलांना मेसेज केले तुमच्यामुळे माझी भाजी फुकट गेली.माझे पैसे वाया गेले. याची मैत्रीण काकूंच्या आईकडे पीजी म्हणून राहते. त्यामुळे त्यानी धमकी दिली जर डबा नको असेल तर तिला आजच्या आज जागा सोडावी लागेल. तिने बाहेरून अन्न आणलं आणि माझ्या आईला त्रास झाला तर मी ते सहन करणार नाही.
आत्ता लॉक डाऊन मध्ये पास शिवाय आम्ही आईवडील कोणीच रत्नागिरीतून पुण्यात जाऊ शकत नाही, बरं... मुलं उपाशी कशी राहणार? बाहेरून आणायला तर हवं. म्हणून मी शेवटी त्या काकूंना फोन केला, म्हटलं तुमच्या बिल्डिंग मध्ये पॉझिटिव्ह सापडला त्यात या मुलांचा काय दोष? बरं आम्ही महिन्याचे पेमेंट केलेय ते काही परत मागत नाही मग तुम्ही मुलांना प्रेशर का देताय? ती लहान आहेत, अशाने घाबरलीत. आयत्यावेळी ती मुलगी कुठे जाईल रहायला? बरंच मी बडबडले, शेवटी राहुलचे बाबा म्हणजे माझे मिस्टर पास काढून पुण्यात गेले, त्या दोघांना गुळपोळ्या, पुऱ्या असं आम्ही करून दिलं.
शेवटी नाईलाजाने त्याच काकूंकडे आज डबा सुरू केला. तरीही भीती आहेच सध्या या मुलांना त्या बिल्डिंग मध्ये जायची परवानगी नाहीय त्या खाली डबा आणून देतात.
या मुलांची काहीही चूक नसताना त्याना फक्त गरज म्हणून या बाईंनी वेठीला धरून मानसिक त्रास दिला दोन तीन दिवस हे किती बरोबर वाटतं? आत्ता लगेच दुसरी व्यवस्था होऊ शकत नाही म्हणून शेवटी आम्हीच ऍडजस्ट केलं.फक्त आपलं गिऱ्हाईक महत्त्वाचं त्यापुढे त्यांच्या आरोग्याची काळजी करावी एवढी साधी माणुसकी सुद्धा त्यानी दाखवली नाही याचं वाईट वाटलं.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle