त्रिशाने त्या दिवशीचं किल्ली प्रकरण अजूनही डोक्यात ठेवलंय असं नकुल ला वाटलं. हु केअर्स, एवढ्या बारीक सारीक गोष्टी एवढे दिवस ती लावून धरत असेल तर तो प्रॉब्लेम तिचा आहे. नकुलने आज त्याच्या पद्धतीने तिच्याबरोबर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता पण तिचा ललिता पवार मोड ऑफ तर होतच नव्हता उलट सुमंत कुटुंबांच्या जागेवर त्यांनी राहिलेलं तिला आवडत नाहीये हे ही तिने स्पष्टपणे सुचवलं होतं. हा सगळा विचार करत जिने चढत तो वर आला. घरात आल्यावर कशाचाच आवाज येईना म्हणून तो आशिष च्या रूममध्ये डोकावला.
आशिष बेडवर पाय पसरून, मांडीवर लॅपटॉप घेऊन नेटफ्लिक्स सर्फ करत होता.
"हेय"
" हम्म"
"तुला काय झालंय आता?या सोसायटीची हवाच खराब दिसतेय, ज्याच्या त्याच्या तोंडावर बारा वाजलेत" नकुल वैतागत म्हणाला
" म्हणजे अजून कोणाच्या?" लॅपटॉप मधून डोकं न काढताच तो म्हणाला.आशिष चा स्वर एकदम खालचा होता, नकुलला कष्टानेच ऐकायला आला.
"तू तुझं सांग"
"काही नाही, नेहमीचंच,मम्मी चा फोन होता"
साधना समदरिया. ही बाई! हिचीच उणीव होती आज. त्यांचा उल्लेख आलेला पाहून नकुल ने आशिष ला दिसणार नाही अशी काळजी घेऊन कपाळाला आठ्या पाडल्या.
"काय म्हणत होत्या?" नकुल बेडच्या एका कोपऱ्यावर बसत म्हणाला.
" तेच नेहमीचं गाणं. अजून दुसरीकडे नोकरी करण्याची हौस भागली नाही का, घरचा पप्पांचा आणि काकांचा एवढा मोठा बिजनेस असताना बाहेर दुसऱ्यांसाठी काम करण्याची काय गरज आहे, बिजनेसचा तूच एकटाच वारस आहेस, तू आता गंभीरपणे विचार करायला हवाएस वगैरे वगैरे" आशिष चा स्वर कायम होता.!!
"हे गौतम काकांना हवंय की त्यांना?"
" माहीत नाही, पप्पांनी सुरवातीला विरोध केला होता, तुला माहीतच आहे, पण नंतर कधीच काही म्हणाले नाहीत. मला वाटतं हे मम्मी चं स्वतःचच जास्त चाललंय, त्यांचा संबंध नसावा"
ह्याचेच चान्सेस जास्त आहे आहेत!
"तू काय म्हणालास मग?
"चिडून ठेऊन दिला फोन, काय करणार? तिच्यावर चिडायला मला आवडत नाही पण मला अजिबातच कंट्रोल झालं नाही"
"तुझी आई आहे ती,आयांचा राग फार टिकत नाही"
"तो प्रॉब्लेम नाहीये. तिचं बोलणं म्हणजे लिटरली इमोशनल ब्लॅकमेलिंग असतं! पपांचं वय झालंय, ते काही म्हणत नाहीत म्हणजे त्यांना हे नको आहे असं नाही, अशी सगळी हत्यारं वापरते ती. मागच्या वर्षी त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे. ही असं काही बोलायला लागली की जरा काळजी वाटते मला"
"हम्म"
"माझा कॉन्फिडन्स जातो, मी बरोबर करतोय की चुकीचं असं वाटत राहतं"
"हे बघ. तू घरचा बिझनेस सोडून तुला हवं त्यात करियर करतोयस म्हणजे घरच्यांबरोबर काही वाईट करत नाहीयेस. त्यांनी त्यांच्या वडिलांचा मार्ग निवडला म्हणून तुही तेच करावं असा नियम नाहीये. आयुष्यभर तिकडं गावात राहून सेल्स पर्चेस करत बसणं तुला जमणार आहे का?" नकुल त्याला समजावत म्हणाला
"माहीत नाही, आता या वेळेला तरी मी पूर्ण कन्फ्युज आहे"
साधना समदरिया इफेक्ट्, नकुल मनातल्या मनात म्हणाला.
"चिल, आजचा दिवस जाउदे, उद्या ऑफिसला जाशील तेव्हा सगळं नीट होईल"
"होप सो"
उठून त्याच्या खांद्यावर थाप मारत नकुलने आशिषला त्याच्या एकांतात बसू दिले.!!!!!!!!
त्रिशा घरी आली तेव्हा दार आतून बंद असलेलं तिला दिसलं. तिने बेल वाजवली. मीनाक्षीने दार उघडलं
" तू कधी आलीस आणि मला कशी दिसली नाहीस येताना? मी खालीच तर होते" त्रिशा आत येत म्हणाली
"काय माहित, मला पण वर आल्यावर कळलं तू नाहीयेस ते"
काही वेळाने दोघीही आपापल्या बेडवर पाय पसरून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसल्या.मीनाक्षीकडून बँकेतल्या कलीग च्या पार्टीबद्दल साग्रसंगीत, अथ ते इति माहिती ऐकल्यावर त्रिशाला बरं वाटलं. तिचा मूड एवढा खुलला होता की मीनक्षीला ती स्वतःहून आणखी खोलात जाऊन प्रश्न विचारत होती. मीनाक्षीला कुणकुण लागलीच.
"त्रिशा, आज चक्क तुला इंटरेस्ट येतोय माझ्या स्टोरीत"
"नेहमीच ऐकते हा तुझ्या गप्पा मी" त्रिशा उशीवर चापट्या मारत म्हणाली
"नोप, आज शंभर टक्के मन लावून ऐकतेयस"
"असं काही नाहीये गं. चल मी झोपतेय आता" त्रिशा बेडवर पसरत म्हणाली. पडल्या पडल्या साईड टेबल वरचं छोटं घड्याळ उचलून अलार्म सेट केला. मीनाक्षी तिच्याकडे अजूनही शंकेनेच बघत होती.
"विचित्र मुलगी आहे ही" म्हणत तिने उठून लाईट बंद केला, दार ओढून घेऊन बाहेर हॉलमध्ये जाऊन खुर्चीत बसली आणि ओम ला कॉल केला.
त्रिशाने दोन्ही हात डोक्याच्या खाली घेतले. थोड्यावेळापूर्वी नकुलशी झालेली तू तू मे मे तिला आठवली. त्याची इंटरॅक्ट होण्याची पद्धत चीड आणणारी असली तरी तो आज तिच्याशी तिची अजिबात चेष्टा न करता, अगदी साधं बोलण्याचा प्रयत्न करत होता हे तिच्या आता डोकं शांत असताना लक्षात येत होतं. अर्थात या सगळ्याला जबाबदार त्यांची पहिली भेट होती पण तरीही दोघे आपापल्या स्वभावानुसारच वागले होते. चेष्टा एकीकडे पण ते दोघे इथे राहताहेत हे तिला आवडत नाहीये असं अगदी स्पष्ट तोंडावर बोलून मोकळं होणं हे जरा जास्त टोकाचं झालं होतं. आपण जरा उद्धटच वागलो असं तिला वाटलं. त्याच्याशी मैत्री वगैरे होण्याची अपेक्षा नाहीच, पण किमान असं भांडण तरी राहायला नकोय. ती लेट इट गो प्रकारातली नव्हती आणि म्हणून दरवेळी समोरासमोर आलो की सतत डोक्यात असा राग खदखदत राहणं तिला तरी अजिबात परवडणारं नव्हतं. सो त्रिशा, आतापर्यंत जे झालं त्याबद्दल गिल्ट ठेवू नको, ही गॉट व्हॉट ही डीझर्वड! पण इथून पुढे जरा शांततेकडे पाऊल टाक, ती मनाशी म्हणाली.आता परत तो जर भेटला, तर हे सगळं बिघडलेलं ती दुरुस्त कसं करणार आहे असा प्रश्न तिला पडला आणि तरीही तिला स्वतःला पहिला प्रयत्न करण्याची इच्छा नव्हती. असो, म्हणत तिने मोठा उसासा टाकला.
अजून तिला झोप येत नव्हती. ती उठली आणि तिचा लॅपटॉप घेऊन बसली. दोन आठवड्यांपूर्वी तिने एका कंपनीसाठी टेस्ट दिली होती, त्यात ती पास ही झाली होती. पण त्या साईटवर तिच्या पुढच्या इंटरव्ह्यू पुढे तीने जेव्हा जेव्हा पाहीलं तेव्हा स्टेटस पेंडिंगच दिसत होतं. नंतर चार पाच दिवस ते बघायचं तिने मुद्दाम टाळलं होतं.. आता तिला त्याची आठवण झाली. तिने साईट उघडली, लॉगिन केलं, स्टेटस पाहीलं. अजूनही पेंडिंग च होतं. आधीचे काही दिवस रोज ऑफिसमधून आली की ती ते उत्सुकतेने चेक करायची आणि तिचा भ्रमनिरास होत असायचा. आता तिला तसंही वाटत नव्हतं. कदाचित आजच्या चांगल्या मूडचा तो परिणाम होता. लॅपटॉप बंद करून ती पुन्हा बेडवर पडली आणि तिला एकदम काहीतरी आठवलं.
गेल्या काही महिन्यांपासून तिच्या सोसायटी पासून जवळ एक वेस्टर्न डान्स स्टुडिओ सूरु झाला होता. त्यात तिने सालसा बॅचेस चं पोस्टर ही खूपदा पाहीलं होतं. ऑफिसातून येता जाता ती रोज ती त्याचं काचेचं दार आणि बाहेरच्या चपला बघून येत असे. आजवर स्वतःला खूप काही कारणं देऊन किंवा कधी फक्त कंटाळा म्हणून तिने तो विषय टाळला होता. पण आता यावेळी तिला जॉईन करण्याची जेवढी इच्छा झाली होती तेवढी कधीच झाली नव्हती. थोडावेळ तिने त्यावर विचार केला. उद्या त्याच्याबाबतीत निर्णय घेऊनच रहायचं असं मनाशी ठरवून झोप येईपर्यंत फिरत्या फॅनकडे पहात राहीली.
तिकडे नकुलने लॅपटॉपवर अनरियल टूर्नमेंट खेळताना आजवर पहिल्यांदाच पहिल्या 3 मिनिटांतच सगळे हेल्थ percentage गमावले होते.
क्रमशः