"हे बघ" त्रिशाने Sway चं पँफ्लेट मीनाक्षीच्या मांडीवर टाकलं.
"हे काय? हे Sway आपल्या इथलंच का?" मीनाक्षी वाचत म्हणाली.
"यप्स! मी जॉईन केलं, साल्सा बॅच ला!" त्रिशा उत्साहात म्हणाली.
"खरंच? अचानक कसं काय?
" काल रात्रीच ठरवून टाकलं होतं, नो मोर टाळाटाळ!
"मस्त! सकाळच्या एक्सरसाईझ कमी पडल्या ना तुला म्हणून हेही जॉईन केलं!"
"एक्सरसाईझ गरज, हा किडा! मीने, तू पण चल ना, मजा येईल. हॉट दिसशील तू तर साल्सा करताना"
" प्लिज नको!! मला कष्टांच्या कामाची ऍलर्जी आहे माहितेय तुला, बँकेत दिवसभर असते तेच भरपूर आहे माझ्यासाठी. तू घरी आलीस ना की मला दाखवत जा काय काय शिकलीस ते"
"आळशी! बरं चल, काकांना कॉल करू.
काकांना कॉल करून त्रिशाने तिचा फोन स्पीकरवर टाकला. नशिबाने ते सगळे घरीच सापडले. सामानाची लावलाव झाली होती, कामवाल्या बायका, रोजचा दुधाचा रतीब या सगळ्या गरजेच्या गोष्टींची व्यवस्था झाली होती. त्या सगळ्यांची या दोघींना किती आठवण येतेय, घरी आलं की किती चुकल्यासारखं वाटतं, नवे शेजारी या आणि इतर भरपूर गप्पा साधारण अर्धा तास चालल्या. एकीकडे दिशाने या दोघींनी गिफ्ट केलेलं घड्याळ भिंतीवर लावल्याचा फोटो त्या तिघींच्या 'मी दि त्रि' व्हाट्सएप ग्रुपवर पाठवला.
गप्पा संपल्या. त्यांच्याशी बोलून दोघींना खूप बरं वाटलं.
तेवढ्यात ग्रुपवर दिशाचा पिंग आला.
"एक येणार होता ते माहीत होतं, हे दुसऱ्याचं काय प्रकरण आहे?"
मीनाक्षी आणि त्रिशाने हसताना डोळ्यातून पाणी निघणाऱ्या स्माईली टाकल्या.
मी: "अगं दोन्ही हँडसम प्रकरण्स् आहेत, आय बेट, आधारकार्ड वर पण ते असेच दिसत असणार! दिशा मुली तू हवी होतीस इथे"
दिशाने अश्रुंचे पाट वाहणाऱ्या स्माईली टाकल्या.
त्रि: एक बायको, एक गर्लफ्रेंड, लेडीज.. अँड लेडीजच" (पळून जाणारी स्माईली)
दिशा आणि मीनाक्षीने लाल तोंडाच्या स्माईली टाकल्या.
दि: "मीने हाण तिला आधी"
मीनाक्षीने खरंच त्रिशाला धपाटा टाकला.
मी:" डन! "
त्रि: "अरे सगळ्यात वॉर्म वेलकम तर मी केलंय त्यांचं! त्यातल्या एकाशी जोरदार टक्कर घेतलेय मी, साधी सुधी नाही, एकदम ब्लडी" (बॉक्सिंग चा ग्लव्ह घातलेला हात)
आणि कालच ती तह करण्याचा विचार करत होती!
दि: " हे काय आता नवीन?"
मी :" दोनदा? दुसरी कधी झाली?"
दोघींनी एकदमच मेसेज टाकले.
त्रिशाने चष्मा घातलेल्या स्माईली टाकल्या
दि: एवढं रामायण झालं आणि दोघींपैकी एकीने तोंड उघडलं नाही!" (पिवळं रागीट तोंड)
त्रि: "महाभारत म्हण, दुसरा नकुल आहे" (दात आणि अश्रू)
मी : बघितलं? बेडरूम शेअर करतो आम्ही आणि तरी मला माहीत नसतं" (लाल तोंड)
दि: मीनू... तू झोपली असशील नक्की तेव्हा ( zzz स्माईली)
त्रि: Ahahahahah
अशाच गप्पा चालू असताना दारावर 'टक टक टक' झाली.
"बेल असताना नॉक कोण करतंय यार" म्हणत मीनाक्षी दार उघडायला उठली. त्रिशालाही उत्सुकता वाटली.
मीनाक्षी ने दार उघडलं तर नकुल त्याच्या घरासमोर शूज काढत उभा होता. तिने डावीकडं उजवीकडं बघितलं.
"ह्हा, कोणीच नाही! नकुल, तू पाहिलंस् का आमचं दार कोणी वाजवलं ते?"
" मीच तो " नकुल मागे वळत म्हणाला.
"ओह, मला वाटलं दार वाजवून कोणी लहान पात्र पळून बिळून गेलं की काय, कधीतरी मध्येच हुक्की येते त्यांना असं करण्याची"
नेमकं काय चाललंय ते बघायला त्रिशाही बाहेर आली.
"नोप, मी आलोय हे सांगायला नॉक केलं. " "मी आलोय" हे तो फिल्मी स्टाईल ने खर्जातल्या आवाजात म्हणाला. " माझा प्रेझेन्स कळायला नको तुम्हाला?!"
अँड ही इज बॅक! त्रिशाने मनाशी म्हणाली.
मीनाक्षीने हसून आधी त्रिशा कडे आणि मग नकुल कडे पाहत स्वतःच्या गळ्यावर बोट फिरवले.
"तुझा प्रेझेन्स कळायला तू काय पंतप्रधान आहेस?" त्रिशा चेहरा सरळ ठेवत म्हणाली.
"पंतप्रधान असे दार वाजवत फिरतात का? " नकुलची तलवार ही नेहमीप्रमाणे परजलेली होतीच
" कोणताही सेन माणूस कारण नसताना दुसऱ्यांचे दार ठोठावत फिरत नाही"
"सेन/ इनसेन हे रिलेटिव्ह असतं ! आता लोकांना कदाचित काही व्यक्ती सेन..
तो पुढे काय बोलणार आहे आणि त्याचा कमबॅक आपल्याकडे नाहीये हे ओळखून त्रिशा शांततेत आत निघून गेली.
नकुल तिकडे बघून बारीकसं हसला.
"हुश्श! झालं तुमचं?" मीनाक्षी म्हणाली.
नकुल त्यावर काहीच म्हणाला नाही.
"मग, तो ब्रूडींग बॉय आला की नाही अजून घरी?"ती म्हणाली
"हेय, तू तर माझाच शब्द चोरला" नकुल एकदम म्हणाला.
काय ढवळ्याला पवळ्या मिळालाय! त्रिशा आतून ऐकत होती. फार ओळख नसताना असं चटकन मिसळू शकणाऱ्या लोकांचं तिला फार कौतुक वाटत असायचं.
बाहेर त्यांची बडबड ऐकून आशिष बाहेर आला.
"उप्स" मीनाक्षीने जीभ चावली.
"डोन्ट वरी, आता ते मिडल नेम झालंय माझं"
आशिषचा आवाज ऐकून त्रिशा सहज बाहेर आली. ती आलेली पाहून नकुल अजिबात तसं न दाखवता आत निघून गेला. त्रिशाला अर्थात ते कळलं.
"तुम्ही दोघी इथेच दिसलात म्हणून लगेच सांगून ठेवतो. उद्या माझा वाढदिवस आहे आणि नवीन घरात पण राहायला आलोय तर साधी घरगुती पार्टी ठेवलेय. आमचे तीन चार जवळचे मित्र मैत्रिणी असतील फक्त. तर तुम्ही दोघींनी जरुर यायचंय" आशिष म्हणाला.
"खायला असणार आहे ना तिथे? मग डन" मीनाक्षी ताबडतोब म्हणाली.
" चालेल, थँक्स" मीनाक्षीचं बोलणं ऐकून त्रिशा मान हलवत म्हणाली.
क्रमशः