जसजसे आपल्याकडे पण कोरोनाची लागण झालेले पेशनट्स मिळायला लागले तसेतसे हळूहळू ती संख्या वाढत पण गेली आणि अचानक आपल्या आयुष्यात आलं लॉकडाऊन.आपल धावतं,घड्याळ्याचा काट्याशी शर्यत करणार वेगवान आयुष्य एकदम संथ झाल.सुरवातीला वाटलं महिन्याभरात सगळं पूर्वपदावर येईल पण ना कोरोनाच्या पेशनट्सची संख्या कमी होत होती ना आपल्या मागे लागलेलं लॉकडाऊन संपत होत.कोरोनाची भीती,कधी संपणार हे सगळं ह्याची अनिश्चितता ह्याने एक उदासी मन वेढून टाकू लागली .
त्याचवेळेस बाहेर निसर्ग मात्र सुखावला होता कारण कमी झालेल प्रदूषण,जवळजवळ थांबलेला मनुष्य हस्तक्षेप.ह्या सगळ्या मनाच्या उदासीवर हळुवार फुंकर घालून मनाला ताजतवान करण्याचं काम निसर्ग मात्र ह्याकाळात नेटाने करत राहिला.नुकताच शिशिर संपून वसंताच आगमन झालेलं होत आणि झाडांनी रंगीत फुलांच्या पायघड्या घालून वसंताचे स्वागत केले होते.बहाव्याच्या सोनसळी झुंबरांनी,कळमच्या सोनेरी गेंदांनी,तामणच्या कळ्यांनी आणि गुलबट जांभळ्या फुलांनी आपलं काम चोख बजावलं होत आणि शेकड्यांनी लाल,जांभळी,निळी,पिवळी,पोपटी,आकाशी फुलपाखरं फुलांवर भिरभिर करायला लागली आणि त्यांना बघून मनातही रंगीबेरंगी फुलपाखरं भिरभिरायला लागली.त्या शेकडो फुलपाखरांनी त्यांचे गोड रंग उधळत उन्हाच्या काहिलीतही मन रंगीबेरंगी करून टाकली.कुठे रंगबिरंगी फुलपाखरं,तर कुठे नुकतीच फुटू लागलेली गुलाबी-जांभळी,पोपटी पालवी तर कुठे शिंपी,वटवट्या,धनेश,भारद्वाज,बुलबुल(लालबुड्या, शिपाई),पोपट,शिंजिर,फुलटोच्या,खंड्या,चिमण्या,कावळे,कोकीळ,मैना,मुनिया,भोरड्या आणि इतरही बरेच पक्षी ह्यांच्या रूपात विधात्याने एक अगदी रंगीबेरंगी असा रंगमंचच जणू उभा केला होता.आपल्याला गरज आहे ती फक्त आपला भवताल बघण्याची आणि निसर्गाच्या ह्या कलाकारीत रमण्याची कारण निसर्गासारखा दुसरा कोणताही हिलर नाहीये.
आंब्यावर दिसामाजी कैऱ्या मोठ्या व्हायला लागल्या,चैत्र स्थिरावू लागला, उन्ह कडक होऊ लागली.
हे दिवस बऱ्याच पक्ष्यांचा विणीचा हंगाम.लॉकडाऊनमुळे घरात अडकल्याने माझा हाताशी असलेला जास्तीत जास्त वेळ आवारातली झाड-पान-फुल,पक्षीवैभव आणि रोजचा सूर्यास्त बघण्यात जाऊ लागला.निरनिराळ्या झाडांची घराभोवती दाटी असल्याने आसपास भरपूर पक्षीवैभव अनायासे दिसत होतं.घरासमोरच्या पालिकेच्या छोट्याश्या उद्यानात देशी वृक्षांची मांदियाळी असल्याने तो भाग म्हणजे ऐन शहरात असलेलं एक मिनी जंगलच झालंय.रोजची सकाळ दयाळ,सुभग, नाचण,कोकीळ,वटवट्या,शिंपी ह्यांच्या सुरेल ताना ऐकत होते. आवारातल्या गेटजवळच्या आंब्यावर दरवर्षी घरटं बांधणाऱ्या नाचणचे मेटिंग कॉल्स ऐकू येऊ लागले आणि मी ओळखलं की आता यंदा नाचऱ्याच घरटं बांधण,पिल्लांना वाढवण आपल्याला नीट बघायला मिळणार आणि मी एकदम खूष झाले कारण दरवर्षी जातायेता त्यांची प्रगती मी बघू शकत होते,पण ह्यावेळेस वेळच वेळ असल्याने नीट निरीक्षण करता येणार होत.
नाचण हा चिमणीपेक्षा थोडा मोठा पक्षी लक्ष वेधून घेतो ते त्याच्या जपानी पंख्यासारख्या शेपटीने आणि मंजुळ आवाजाने.विणीच्या हंगामात प्रियाराधन करणारा नर मंजुळ आवाजात ताना घेत असतो आणि मादीला रिझवायचा प्रयत्न करत असतो.
नाचणची नाचरा, फॅनटेल फ्लायकॅचर ही नाव त्याला अगदी शोभतात कारण आपली जपानी पंख्यासारखी शेपटी फुलवत सतत इथून तिथे नाचत असतो हा पक्षी. एकाजागी स्थिर असा फारसा थांबतच नाही नाचण आणि सतत किडे,अळ्या शोधून मटकावत असतो.एकदा जोडी जमली की दोघे मिळून घरटं बांधायच्या कामाला जुंपून घेतात.
तर 10 एप्रिलला त्यांच्या गेली चार वर्षे ज्या आंब्यावर,ज्या फांदीवर ते घरटं बांधतात तिथेच यंदाही घरटं बांधायचं हे नक्की झालं आणि त्यांच्या तिथे अविरत फेऱ्या सुरू झाल्या. जमिनीपासून १2-13 फुटावर असलेली जमिनीला समांतर गेलेली फांदी ही नाचणीची घरटं बांधायची आवडती जागा,अगदी मला लिविंग रूमच्या खिडकीत बसूनही घरटं आरामात दिसू शकेल अश्या बेचक्यात त्यांचं बांधकाम सुरू झालं. दरवेळी चोचीतुन गवताची पाती,कापूस,अगदी बारीक काटक्या अस कायकाय घरट्याच्या निश्चित केलेल्या जागी नेऊन रचून ठेवायची धडपड सुरू झाली.घरटं बांधायला गवत,पालापाचोळा,कापूस, बारीक काटक्या ह्यांचा वापर करून वाटीसारखं गोल- खोलगट घरटं बांधून झालं आणि बाहेरच्या बाजूने कोळ्यांची जाळी लावून बांधकाम पक्क केल गेलं.नर -मादी दोघे मिळून घरटं बांधत होते,अंदाजे आठ-दहा दिवसांत अविरत कष्ट घेऊन मिळून घरट्याच बांधकाम पूर्ण केलं.नाचण मादी एकावेळी तीन अंडी घालते,अंड्यांचा आकार वाटण्या इतका असतो आणि रंग सफेद असून अंड्याच्या मध्यावर लालसर टिपके असतात.दहा दिवसांनी धावपळ जरा कमी झाली,नीट बघितल्यावर लक्षात आलं की अंडी घालून ते उबवण्याचं काम सुरू झालय.नाचण नर-मादी दोघे मिळून अंडी उबवण्याच काम करतात.मला अजून नर आणि मादीमधला फरक ओळखता येत नाही पण अंडी उबवताना बॉडी language मधल्या फरकावरून त्यावेळेस कोण अंडी उबवतय हे बरोबर समजतं होत.नर बसतो घरट्यात अंडी उबवायला तेव्हा स त त चुळबुळ करत रहातो :haahaa2: मादी मात्र शांतपणे आपलं काम करते.
घडाळ्याच्या काट्यावर मोजून दहा मिनिट प्रत्येकजण आलटून पालटून अंडी उबवायच काम करत होते.बाहेर गेलेला नाचण पहिले बिल्डिंगच्या गेटवर येऊन बसायचा,मग घरट्याच्या जवळच्या एका सुक्या फांदीवर जायचा,घरट्यातला जोडीदार पक्षी तेव्हा सुळकन उडून जायचा आणि मग ज्याचा टर्न आहे तो दोन तीन फांद्या बदलत बदलत घरट्यात जायचा.घरट्यात बसले की दोघेही शीळ घालतात दोनेक मिनिटं,बहुदा मी बसलोय घरट्यात हे उडून गेलेल्या आपल्या साथीदाराला सांगत असावे.
अंडी उबवताना दोघेही अतिशय दक्ष असतात,आसपास कोणताच पक्षी गेलेला त्यांना खपत नाहीत.अगदी त्या फांदीवर खारुताईला यायला पण ते परवानगी देत नाहीत.आलीच तर हुसकावून लावतात तिला हल्ला करून.
एका संध्याकाळी साडेपाच पावणेसहाच्या आसपास अचानक नाचण जोडी एका कावळ्याच्या मागे लागलेली दिसली.आपला शहरी कावळा नव्हता तो तर डोम कावळा होता.त्याला नाचणच्या घरट्याचा आणि अंड्यांच्या सुगावा लागला असावा.तर दोघेही नाचणी अगदी त्वेषाने शेपटीचा पंखा पूर्ण फुलवून आपला आकार मोठा भासवायचा प्रयत्न करत त्या डोम कावळ्याला चोचीने टोचून टोचून हुसकावून लावायचा प्रयत्न करत होते.तो डोम कावळा पण जस्ट मोठं होत असेलल पिल्लू असावं, adult कावळा नव्हता तो.नाचण जोडी त्याला त्याच्या अंगावर हल्ला करून तिथून हुसकावून लावायचे आणि घरट्यात न जाता आसपास बसत होते,खूप अस्वस्थ होते दोघेही.क्षणभर मला वाटलं देखील की जाऊन हाकलवाव त्या डोमकावळ्याला कारण त्या नाचणच्या जोडीबद्दल मनात एक ऋणानुबंध तयार झालेले आणि म्हणूनच माझं मन हळव होत होत.पण जीवो जीवस्य जीवनम आणि survival of fittest ही निसर्गतत्व आठवून मी घरातच बसून नाचणच्या अंड्यांच्या सुरक्षेसाठी देवाकडे प्रार्थना केली.परत परत दहा पंधरा मिनिटांनी तो कावळा येत राहिला आमच्या गेटवर आणि नाच परत परत त्याच्यावर चोचीनी हल्ला करत होते.जवळजवळ दीडतासभर हा खेळ चालला आणि मग तो कावळा परत आला नाही.हे सगळं सुरू असताना शहरी कावळा जो बाजूच्या तामनवर घरटं बांधत आहे तो मात्र बघ्याची भूमिका निभावत होता,मान वाकडी करून करून हे सगळं पूर्ण वेळ फक्त बघत होता.
मला रात्रभर भीती होती की उद्या सकाळी परत येतो का तो डोमकावळा पण नाही आला कारण सकाळ पासून नाचण मादी घरट्यात बसलेली दिसली.नाचण जोडी क्षणभरही घरटं रिकाम सोडून जात नव्हते आणि कोणत्याच पक्ष्याला घरट्याच्या आसपासही येऊन देत नव्हते त्यामुळे कावळा,भारद्वाज,मांजर अश्या शिकाऱयांची वर्दळ असूनही जवळजवळ 18 ते 20 दिवसांनी अंड्यातून पिल्लं बाहेर आली.
पिल्लं अंड्यातून बाहेर आल्यावर आईबाबांची लगबग फार वाढली.सतत आळीपाळीने दोघेही प्रथिनयुक्त अळ्या,कीटकांचा खाऊ आपल्या पिल्लांसाठी घेऊन येत आणि त्यांना भरवत होते.घरट्यात जाताना दोघेही कधीच डायरेक्ट घरट्यापाशी जात नव्हते तर आधी आसपासच्या फांद्यांवर बसून,टेहळणी करून मगच घरट्यात जायचे.घरट्यातून बाहेर मात्र सुळकन उडून जायचे.पहिले पिल्लं लहान होती तेव्हा खालून बघितल तर आईबाबा नसताना घरटं रिकाम आहे असेच वाटायच पण नंतर पिल्लं मोठी होऊ लागली तशी त्यांच्या चोची घरट्याच्या बाहेर डोकावू लागल्या.
त्यांना बघत बसणे हा माझा सुखाचा परमावधी होता.नाचण पक्ष्याला घरट्याच्या जवळपासच भरपूर खाद्य उपलब्ध होत,खुद्द आंब्याच्या खोडावर आणि आसपासच्या झाडांवर असलेले किडे, मुंगळे, आसपासच्या झाडांच्या फुलांवर येणारे कीटक इतकंच नाही तर कंपाऊंड वॉलवरच्या सुकलेल्या शेवाळातून पण ते किडे शोधून मटकावत होते. एकदा तर बाजूच्या आवारात नारळाची झावळी पडलेली तर ह्या नाचण जोडीला मेजवानीच मिळालेली,दोनचार दिवस फक्त त्या झावळीवरूनच खाद्य आणत होते दोघेही.
पिल्लं अंड्यातून बाहेर आल्यापासून 15 दिवसांत नाचऱ्याच्या पिल्लान्नी घरटं सोडलं.त्या दिवशी चार साडेचारला एकेक करत तिन्ही पिल्लं घाबरत घाबरत घरट्याच्याबाहेर पडली,जवळच्या फांदीवर विसावली.आईबाबा जरा लांबच्या फांदीवरून सूचना देऊन त्यांच मनोबल वाढवत होते.मग त्या पिल्लांनी अजून हिम्मत करून तिथून अजून एका जवळच्या फांदीवर उडी मारली,मग जरा लांबच्या फांदीवर उडून बसले. फांदीवर बसताना तोल सावरताना पिल्लं अगदी तारेवरची कसरत करत होते पण सरतेशेवटी ते तंत्र जमवलच त्यांनी.
मग आईबाबा सारखे सांगत होते म्हणून तिघांमधल्या एका पिल्लाने आणि त्याच्यामागे बाकीच्या दोघांनाही व्यवस्थित सूर मारून, पंख पसरवून डायरेक्ट बिल्डिंगच्या कंपाऊंड वॉलपर्यंत झेप घेतली.तिथे 10 मिनिटं खूप बडबड करून- चिक- चिर असा आवाज करत आपापसांत पकडापकडी खेळली.नंतर परत आसपासच्या आंब्याच्या फांद्यांवर उडून बघितल कारण आईबाबा सारखे तेच सांगत होते.घरटं सोडल्यानंतर तासाभरात रूप पालटून उडायला पण लागले तिघेही.पिल्लांच्या पंखांत बळ येऊन ते उडायला लागल्यानंतर परत काही फिरून पिल्लं किंवा नाचणी जोडी घरट्याकडे आले नाहीत.दुसऱ्या दिवशी सकाळपासून नाचणी जोडी त्या आंब्यावर येत होती अधूनमधून पण तेही फक्त खाद्य शोधायला,तिथला निवारा सोडला त्यांनी.नंतर परत पिल्लं मात्र दिसली नाहीत मला.आपल्याला वाटत पक्षी घरट्यात रहातात पण तो साफ चुकीचा समज आहे कारण घरटं ते फक्त अंडी घालून पिल्ल वाढवण्याकरताच वापरतात.एरवी पक्षी आपल्या ठरलेल्या रातथाऱ्याच्या झाडावर झोपतात.
सृजनाचा हा सोहळा बघायला मिळाल्याने माझ्या अनुभवाच्या गाठोड्याला वेगळाच आयाम मिळाला हे मात्र नक्की आणि हा अनुभव मला दिल्याबद्दल सृष्टी निर्मात्यासमोर नतमस्तक होत मी त्याचे आभार मानले.
हा फोटो एका मित्राने काढलाय, बाकीचे फोटो मीच काढलेत मोबाईलवर त्यामुळे फार खास नाहीयेत ते.