आपल्या स्वतःच्या गावाखेरीज इतर गावे, जिल्हे आपल्या मित्रमंडळी/नातेवाईकांच्या माध्यमातून इतर तीन चार गावं ओळखीची होत जातात. अशा गावाची, जिल्ह्याची ओळख आपल्या गप्पांमधून इतर मैत्रिणींना व्हावी म्हणून असा धागा चालू करण्याच्या अवनीच्या या अभिनव कल्पनेतला हा दुसरा जिल्हा - अकोला! (अक्षरानुक्रमाने जिल्ह्यांविषयी माहिती घेण्याची कल्पना आपल्या लीलावतीची!)
अकोल्याला मी माध्यमिक शाळेत असताना एकदा एका लग्नाच्या निमित्ताने गेले होते. खरं तर ते शहर पाहायची अजिबात संधी मिळाली नव्हती पण तिथल्या बंगल्या-बंगल्यांची कॉलनी, प्रत्येक बंगल्यातले कूलर्स आणि ऐन मे महिन्यातलं रणरणतं ऊन हे मात्र आठवतंय. अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे तिथला खास म्हणावा असा मराठीचा हेल! अजूनही तो हेल मी चटकन ओळखते, अर्थात आताशा ओळखीचे सगळे अकोलकर ते अकोल्यात असताना नेहमीचा हेल आणि अकोल्याबाहेर भेटले तर पुण्या-मुंबईचा हेल, असे बोलतात, तेव्हा हे ओळखणे थोडे कठीण होते. अर्थात हे सगळे अकोल्यापासून वाशीम वेगळा होण्याआधीचे सांगतेय.
महाराष्ट्राच्या नकाशात अकोला
अकोला जिल्हा नकाशा
अकोला दळणवळणाची साधने आणि इतर माहिती
तालुके - अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, पातूर
नद्या - उमा, काटेपूर्णा, शहानूर, मोरणा, मन, मास, उतावळी, विश्वामित्री, निर्गुणा, गांधारी, आस, वान ई.
किल्ले - नरनाळा (शहानूर) किल्ला, अकोला किल्ला, बाळापूर किल्ला
अभयारण्य - नरनाळा अभयारण्य, काटेपूर्णा अभयारण्य
बोलल्या जाणार्या भाषा - मराठी, उर्दू, हिंदी, सिंधी, गुजराती, कोर्कू
प्रमुख पिके - कापूस, ज्वारी, सोयाबिन, तेल आणि डाळी
हवामान - अकोल्याचा उन्हाळा अतिशय उष्ण तर हिवाळा अतिशय थंड असतो.
या वरच्या माहिती गोळा करताना लक्षात राहिलेल्या काही ठळक गोष्टी :
अकोल्याचं नाव अकोलसिंह नावाच्या राजाच्या नावावरून पडलेले आहे.
नद्यांची नावे किती वेगळी आहेत या जिल्ह्यातली? काही एकदम खास आणि काही "अरे? काहीही काय?" म्हणायला लावणारी... आता शहानूर, निर्गुणा, गांधारी, आस कसली अनवट नावं वाटतात. तेच उतावळी किंवा मन का ठेवलं असेल नाव? आपल्याकडे अकोल्याची सासरवाशीण, माहेरवाशीण किंवा स्थलांतरीत कुणी मैत्रीण याविषयी माहिती सांगू शकली तर किती मज्जा येईल. :fadfad:
भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे आर्किटेक्ट विजय भटकर अकोल्याचे आहेत.
अकोल्याचे आजवरचे सगळ्यात कमाल तापमान ४७ डिग्री सेल्सीयस आणि किमान तापमान २ डिग्री सेल्सीयस अशी नोंद आहे.
तब्बल ६ प्राथमिक भाषा असल्या तरी वर्हाडी आणि दख्खनी उर्दू या बोली भाषा तिथे अस्तित्वात आहेत.
चला तर. तुम्ही अकोला जिल्ह्याला कधीपासून ओळखता इथून लिहायला सुरुवात करूयात. जर अतिशय महत्वाची माहिती असेल तर इथे हेडरमध्ये वाढवत राहू. इतर गप्पा येतीलच ओघात...
नकाशे साभार :
https://www.mapsofindia.com/
https://en.wikipedia.org/wiki/Akola_district
https://www.jatland.com