ऐल पैल 20- ट्रस्ट इश्यूज

त्रिशा रात्री घरी पोहोचली आणि थेट झोपली. दुसऱ्या दिवशी आठवडाभरासाठी सेट केलेल्या साडे पाचच्या अलार्मनेच तिला जाग आली. तिला उठावसं तर वाटतंच नव्हतं उलट आज इमेल करून सिक लिव्ह टाकावी असं वाटत होतं. ती बेडवर उठून बसली , मोबाईलवर इमेल टाईप करायला लागली. पुन्हा थांबली. ऑफिसला दांडी मारून काय होणार आहे? मला या सगळ्या प्रकारात स्ट्रॉंग राहण्याची गरज आहे. त्यासाठी अशा बारीक बारीक वुलनरेबल क्षणांना हरवावं लागेल. मनाशी म्हणत तिने इमेल पुन्हा खोडून टाकला. कशालाच दांडी मारायची नाही, असा विचार करून अंगावरचं पांघरून झर्रकन बाजूला केलं. ब्रश करून टेरेस मध्ये एक्सरसाईझ करायला गेली. व्यायाम करताना तिच्या मधूनच मुव्ह्ज चुकत होत्या, बॅलन्स जात होता. दोन मिनिटे ब्रेक घेऊन तिने पुन्हा चालू केलं.
एक्सरसाईझ झाली, अंघोळ करून तिचा डबा करून घेतला. नेहमीप्रमाणे मीनक्षीला हलवून ती दाराबाहेर पडली.
नकुल दारात उभा असेल असं तिला अपेक्षित होतं, पण तो नव्हता. काल आपल्याला तो बरोबरही नको होता तरीही आपण त्याला इथे एक्सपेक्ट करतो आहोत! तिला स्वतःचाच राग आला. आधीपासूनच त्याच्या प्रभावाखाली न येता खरोखर सावकाश सगळ्या गोष्टी होऊ दिल्या असत्या तर ही वेळ आली नसती असं तिला वाटत होतं. कालच्या नकुलने सांगितलेल्या गोष्टींनंतर वेगळाच नकुल तिच्या पुढे उभा राहीला होता. पण ती त्याच्याशी अबोला धरणार नव्हती, तिला त्याच्याशी अजून बोलायचं होतं. ह्या गोष्टी एकट्याने एकाच बाजूने विचार करून सुटणाऱ्या नाहीत, हे तिला समजत होतं. काल रिक्षात बसून तिला एकटीला त्यावर विचार करायचा आहे असं जरी ती म्हणालेली असली तरी घरी येईपर्यंत ती अक्षरशः मंद होऊन बसली होती. कसलाही विचार तिने केला नाही. रिक्षात मुद्दाम दाराजवळ बसली, इंजिनच्या त्या ठराविक आवाजाशी सिंक होत, बाहेरून चेहऱ्याला, अंगाला लागणारं गार वारं घेत ती डोळे मिटून बसून राहिली होती. रिक्षा कधीच थांबू नये असं तिला वाटत होतं.

ती चालत स्टॉपपर्यंत पोहोचली, बस मधून ऑफिसला गेली. पूर्ण दिवस यांत्रिकपणे काम करून घालवला. अधून मधून सवयीने ती मोबाईल चेक करत होती. दिवसभरातून त्यांच्यात एखादं तरी युसलेस टेक्स्टिंग होत असे. काहीच नसेल तर ब्लॅंक टेक्स्टिंग तरी.
"हा ब्लॅंक टेक्स्टिंग चा काय प्रकार चालू केला आहेस तू?" एकदा तिने त्याला विचारलं होतं.
" ऍकच्युली, मी 'शोध' लावलाय त्याचा." तो त्याच्या नेहमीचे बढाई मारतानाचे एक्सप्रेशन्स देत म्हणाला.
"म्हणजे ,आता तुझ्याशी बोलण्यासारखं काही नाहीये, माझ्या डोक्यात फक्त तुझा विचार आला आहे, पण त्यातही सांगण्यासारखं काहीच नाहीये, त्याचा अर्थ हा ब्लॅंक टेक्स्ट."
आय मिस हिम! आय मिस हिम सो मच. त्याची स्माईल, त्याचं बोलणं, दिसणं सगळं मिस करतेय मी. कदाचित ही फक्त सवय असेल. मोडायला हवीये ती. पण नाही, एवढ्यात कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचायचं नाहीये. बोलल्याशिवाय नाही.
असे उलटसुलट विचार करत तिने दिवस ढकलला.

नकुलचा दिवस तिच्यापेक्षा वेगळा नव्हता. त्याचं एक ओझं कमी होऊन नवीन ओझं तयार झालं होतं. तो तिथे रहायला आल्यापासून त्रिशा आणि तो दिवसातून एकदाही भेटले नाहीत असं झालं नव्हतं. पण आता त्रिशाचं 'मला एकटीला रहायचंय' हे त्याने मनावर घेतलं होतं. काहीही झालं तरी कालच्या बाबत ती जो विचार करत असेल त्यात तिला राहू द्यावं. तिला जेव्हा स्वतः बोलायचं असेल तेव्हाच बोलायचं असं त्याने ठरवलं होतं. यावेळी थांब म्हणजे थांबच. काल क्लब मध्ये त्याने उलटे अर्थ ठरवलेले आठवून त्याला हसू आलं. आय होप, याचा लवकर निकाल लागावा, त्याने विचार केला. आय होप समदरिया आणि ती या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे तिला कळावं.

रात्री जेवण झाल्यावर त्रिशा खाली फिरायला गेली. तिने बोलून प्रश्न सोडवण्याचं ठरवलेलं होतंच, ती आता तयार होती. खालून वर आल्यानंतर तिने नकुलला ' वॉन्ट टू टॉक' असा मेसेज केला.
काही सेकंदानी नकुलने 'घरात ये' असा रिप्लाय केला.
ती दारातच होती, तिने बेल वाजवली. नकुलने दार उघडलं. तो दिसला तेव्हा एखाद्या लांबच्या एकट्या प्रवासानंतर आपल्या घरी आल्यावर वाटतं तसं तिला वाटलं. काही क्षण ती त्याच्याकडं तसंच बघत राहीली.
"आत ये." तो म्हणाला.
तिच्या मागे दार जरासं ढकलून देत ती आत गेली. सोफ्यावर एकेका हाताला टेकून एकमेकांकडे तोंड करून दोघे बसले.
"आशिष?' तिने विचारलं.
"तो जरा बाहेर गेलाय. म्हणूनच तुला इथे बोलावलं." नकुल म्हणाला. नकुलचा आवाज कालसारखाच डाऊन होता.
"खरंतर मी कालच्या बाबत कसलाच विचार केला नाहीये. मला थेट तुझ्याशिच बोलायचं होतं." ती म्हणाली.
"हम्म"
"तो प्रसंग ऐकून मला खूप वाईट वाटलं. खरंच, पायलची आई तुझ्या आईबरोबर जे काही वागली ते खूप चुकीचं होतं. तुझ्या फिलिंग्ज, राग ही मी समजू शकते."
ती पुढे म्हणाली.
"पण या सगळ्यात तू जिला तुझी चांगली, जुनी मैत्रीण मानतो त्या पायल चा काय दोष होता? पायल चा विषय निघालेला मला अजिबात आवडत नाही, लेट मी कन्फेस, आय ऍम जेलस ऑफ हर. जेव्हा तू तिच्याबद्दल बोलतो ते मला अजिबात सहन होत नाही. पण काल तू जे मला सांगितलं तेव्हापासून माझ्या डोक्यातुन ती जातच नाहीये. तू तिच्या भावनांचा वापर तुझ्या रिवेंज साठी कसाकाय करून घेऊ शकतो हे माझ्या अगदी डोक्याबाहेरचं आहे. तुला एकदाही आपण तिच्याबरोबर चुकीचं करतोय असं वाटलं नाही? आणि तुला तिच्यात इंटरेस्ट नसताना तू स्वतच्याही पूर्ण आयुष्याचं प्लॅनिंग करून बसला होतास? कसं करावं वाटलं तुला हे.?
नकुल तिचं सगळं बोलून झाल्यानंतर शांतपणे म्हणाला.
"फर्स्ट ऑफ ऑल, तुला जे वाईट वाटलं तू म्हणते आहेस हे म्हणजे एखादा दुःखी सिनेमा, डॉक्युमेंट्री, बातमी किंवा कोणा अनोळखी माणसाबरोबर काहीतरी वाईट घडलं की आपल्याला जसं वाटतं तसं आहे"
त्रिशाला हे पटलं नाही, त्याचं बोलणं तोडत ती काहीतरी म्हणणार, तेवढ्यात नकुल तिला थांबवत बोलायला लागला.
"नो, मला माहितीये हे तुला मान्य होणार नाही अँड आय गेट इट. ज्याच्यावर, ज्याच्या जवळच्या माणसावर परिस्थिती येते त्यालाच याची इंटेंसिटी जाणवते, त्यात बाकी लोकांचा दोष नाहीये. पायलचा मी युज करत होतो हे मी अमान्य करत नाहीये. पण मी तिच्याशी लग्न करून सेटल होणार असं ही म्हणालो. मला फक्त रिवेंज च घ्यायचा असता तर मी इतकी वर्षे तिने स्टँड घ्यावा म्हणून का थांबलो असतो? काही काळापुरता तिचा बॉयफ्रेंड होऊन, तिच्या घरच्यांना दाखवून माझा प्लॅन पूर्ण झाला की त्यातून मोकळा झालो असतो. पण मी इतका वाईट वागूच शकत नाही, ठरवूनसुद्धा. ती माझी मैत्रीण आहे त्याची जाण आहे मला. इन केस आमचं रिलेशन असतं तर मी तिचा वापर करून तिला अबँडन करणार नव्हतो. साउंडस् रिडीक्यूलस राईट? " तो त्रिशाचा चेहरा वाचत म्हणाला. "पण हे असं होतं. त्यासाठी मी मध्ये जेवढा वेळ जाईल, जाऊ देत होतो. मला तिचं आयुष्य मिजरेबल करायचं नव्हतं. राहीला माझा प्रश्न, लोकांची अरेंज मॅरेजेस होतात, तसं माझंही झालं असतं, दॅटस् ऑल. माझ्या आईचा झालेला अपमान माझ्यासाठी इतका महत्वाचा होता."
त्रिशाला ते पटलं नव्हतं.
"थोडक्यात पायलचा वापर करून वर तिच्यावर उपकार करणार होतास तू!" त्रिशा म्हणाली.
"तिला हे कधीच माहीत झालं नसतं. आयुष्यभर बर्डन मलाच राहीलं असतं."
"पायल चा वापर हा मुद्दा तरीही तसाच राहतो."
"ते मी अमान्य करत च नाहीये. कुठेतरी मनाविरुद्ध जाऊन वागावं लागणारच होतं, तरीही तिच्यासाठी जेवढं मला करता येईल तेवढं करायचं मी ठरवलं होतं"
"आणि माझ्याबद्दल? हे सांगण्याआधी क्लब मध्ये येण्यासाठी आग्रह करणं वगैरे, तू तुझ्या नावावर गुड पॉईंट्स वाढवत होतास?"
"ते मी फक्त तुझ्यासाठी केलं. हे सगळं तुला आधी कळालं असतं तर पुन्हा आली असतीस तू माझ्याबरोबर? त्रिशा, तू माझ्या हो ला हो कधीही करणार नाहीस हे मला माहित होतं, तरीही तुला मी सगळं आहे तसं सांगितलं. मला जर फक्त गुड पॉइंट्स वाढवायचे असते तर जे चाललं होतं, तेच चालू दिलं नसतं? "
"तुझा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे नकुल? तू एवढं सगळं करून स्वतःला जस्टीफाय करतो आहेस. तू सगळ्यांना सगळं सांगतो आहेस पण तुला स्वतःला त्याबद्दल जराही गिल्ट नाहीये. आणि याचाच मला त्रास होतोय. तुझ्या इतक्या प्रॅक्टिकली मी या गोष्टीकडे पाहू शकत नाही."
"मी गिल्टी का वाटून घ्यायला हवं? हे सगळं चालू त्यांनी केलं, त्यांनी मला असं वागायला भाग पाडलं."
" डोन्ट जस्ट ब्लेम देम. तू तुझ्या बुद्धीने हे सगळं ठरवत होतास. तुझ्यात आणि काकूंत फरक काय राहीला मग? पायलचे बाबा, आशिष या लोकांनी तुला सपोर्ट केला, त्यांचाही विचार तुझ्या डोक्यात आला नाही? "
"त्यांना मी कधीच विसरलो नाहीये. त्यांनी माझ्यासाठी जे केलं, त्याचं कर्ज चुकतं करूसुद्धा त्याची परतफेड झालेली नाहीये. पण मग तुला काय वाटतं मी काहीच करायला नको होतं? घरी जाऊन दोन तीन भांडी आदळलायला हवी होती, आईवर चिडायला हवं होतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जाऊन काहीच न घडल्यासारखं वागायला हवं होतं? यु नो, तू जशी इथे आली आहेस, तसं तुला फक्त पायल दिसतेय. त्या दिवशी लोकांसमोर एवढा मोठा प्रसंग घडला, पायलने गौतम काकांना हे का सांगितलं नाही? तिने नाही तर त्यांच्या घरात बाकी नोकर माणसं असतात, कुठून न कुठून हे त्यांच्यापर्यंत गेलं नसेल असं तुला वाटतं? तुला काय वाटतं, काकांनी हा विषय कधीच का काढला नसेल? मी त्यांच्या कर्जात होतो म्हणून माझी, माझ्या आईची किंमतच करायला नको?
प्रत्येकजण तिथे जर आपल्या माणसाला पाठीशी घालत होता तर मी माझ्या आईसाठी काही केलं म्हणून मीच गिल्टी वाटून घ्यायला का हवंय?"
त्रिशा यावर गप्प बसली. नकुलच्या या मुद्द्यात कुठेतरी तथ्य होतं. त्रिशाच्या मनात नकुलची एक प्रतिमा तयार झाली होती आणि तो एवढं टोकाचं प्लॉटिंग कसं करू शकतो इथेच ती अडकून बसली होती. त्याच्या दृष्टिकोनातूनही विचार करण्याइतकं तिचं मन व्यापक होत नव्हतं.
" पण आता काय? आता तुझ्यासाठी तुझ्या आईचा अपमान महत्वाचा नाही?"
"माझा नाईलाज झाला त्रिशा. सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. या निर्णयापर्यंत येणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. हे सगळं मी आपल्यासाठी, तुझ्यासाठी सोडून देण्याचं ठरवलं आहे. मला यातून, समदरिया फॅमिलीवरूनच मूव्ह ऑन व्हायचंय, तुझ्याबरोबर तेही."
नकुलच्या कुठल्याच स्पष्टीकरणाने त्रिशाचं सध्या तरी समाधान झालं नव्हतं. तो चुकीचं वागणार होता आणि ते त्याला कळायला हवंय असंच तिच्या मनात पक्कं झालं होतं. अखेर तिच्या मनातला तिला सगळ्यात सतावणारा प्रश्न तिने बोलून दाखवला,
"तू पायलबरोबर जे करायला जाणार होतास, कशावरून तू पुढे माझ्याशी असं वागणार नाहीस्?"
तिचं बोलणं ऐकून नकुल हर्ट झाला. तिचे प्रत्येक प्रश्न झेलून त्यावर आहे ती उत्तरं देण्याचं त्याने ठरवलं होतं. पण हे त्याला सहन झालं नाही. तो उठला तिच्यासमोर येऊन बसला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला,
"क्लिअरली, तुला आता माझ्याबद्दल ट्रस्ट इश्यूज तयार झाले आहेत. पण माझ्याकडेही आता सांगण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. मी जे काही करणार होतो, तो माझ्यातला एक पार्ट होता, त्यामागे काही कारणं होती. ज्या नकुलला तू ओळखतेस, तो ही मीच आहे. यापुढे तू ठरव कोणत्या नकुलला तुला महत्व द्यायचंय. मी त्यात ढवळाढवळ करणार नाही. कारण मी आता सतत तुझ्या समोर नसेनच. मी इथून निघून जाण्याचं ठरवलंय. एवढं सगळं झाल्यानंतर मला आता आशिषबरोबर राहणं जमणार नाही.त्याला कळेल तेव्हा तोच मला इथे राहू देणार नाही."
काहीही घडलं तरी नकुलच्या एकाएकी दूर जाण्याला ती अद्याप तयार नव्हती. हे ऐकून तिला धक्का बसला. तिला अजूनच राग आला. त्याच्या हातातून तिने हात काढून घेतला.
"वाह नकुल, सगळं करायचं, सगळं सांगून मोकळं व्हायचं आणि आता तुम्हीच काय ते ठरवा म्हणून दुसऱ्यांवर गोष्टी सोडून जायच्या. उद्या जर मी सगळं तोडून टाकलं तर तू म्हणायला मोकळा, निर्णय तुझाच होता. बरोबर?" तोडून टाकणं हा विचारही तिच्या मनात अजून आला नव्हता.
"माझ्या प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ घ्यायचा असं ठरवूनच आलीयेस तू आज." नकुलचे पेशन्स आता संपत आले होते." तुला काय वाटतं? या सगळ्याचा मला काहीही फरक पडत नाहीये? इथून निघून जाणं माझ्यासाठी खूप कठीण असणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तू काहीही ठरव, मी तुला कधीही ब्लेम करणार नाही."
"तुला हक्कच नाहीये तसा." त्रिशा त्याला सोडून द्यायला तयारच नव्हती."
"हो नाहीये हक्क. जे होईल त्याचा ब्लेम माझ्यावर असेल.आय जस्ट होप, तुझा निर्णय आपल्या बाजूने असावा. जे काही झालं, त्यातलं काही एक प्रत्यक्षात घडलं नाहीये एवढं लक्षात ठेव."
"हो, पण ती व्यक्ती तर तूच आहेस ना?"
नकुल त्यावर काहीच बोलला नाही.
"इतक्या सहज तुला यातून बाहेर पडता येणार नाही." त्रिशा उठत म्हणाली.
"मी फक्त जागा सोडतोय त्रिशा." तो म्हणाला.
इथून पुढे काहीच न बोलता त्रिशा तिथून तडक बाहेर पडली.
नकुलला आता आशिषला तोंड द्यायचं होतं.
क्रमशः

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle