जगावे कसे? – भारतीय वैदिक तत्वज्ञान – ईशावास्योपनिषद

मागे एका धाग्यावर या विषयावर लिहीन असं म्हणाले होते पण याविषयी लिहिण्याची माझी पात्रता आहे का? अशी रास्त शंका आणि मुख्य म्हणजे मला हवे असलेले पुस्तक उपलब्ध नसणे या दोन कारणांमुळे यावर लिहिणे मागे पडत गेले. आता माझ्याकडे आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेले “ईशावास्य- वृत्ती” हे पुस्तक आहे. जरी या विषयावर लिहिण्याची माझी पात्रता नसली तरी किमान माझा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवावा आणि त्यातून या अमृततुल्य पुस्तिकेची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने लिहीत आहे. लेखात जर काही चुका असल्या तर माझ्या लक्षात आणून द्या अशी विनंती!

संकटे एकट्याने येत नाहीत असे म्हणतात. प्रत्येकाच्याच आयुष्यातला काही काळ हा खडतर असतो. संकटे आणि दुःख यांची मालिका कधी संपेल का? असे वाटू लागते. काहीही नॉर्मल वाटत नाही. अशावेळी मानसिक आधाराची गरज भासते. मला सुदैवाने सर्व बाजूंनी भक्कम आधार मिळाला पण तरीही स्वतःचे खचलेले मनोधैर्य स्वतःलाच वर आणावे लागते. शिवाय ती उभारी कायम कशी राहील याकडेही स्वतःच लक्ष द्यावे लागते. या काळात मी मनाला शांतवण्यासाठी अनेक पुस्तके वाचली, व्हिडिओ पाहीले पण कशाने माझे समाधान होत नव्हते. आपल्या आप्तजनांचा मृत्यू कसा स्वीकारावा? आयुष्याची क्षणभंगुरता इतकी प्रकर्षाने समोर आल्यावर त्यात मनाला पुन्हा कसे गुंतवावे? असे प्रश्न माझ्या मनात उभे रहात होते. काळ हे सर्वात प्रभावी औषध आहे खरे पण त्याने फक्त एक तात्पुरता विस्मरणाचा पडदा तयार होतो. मूळ आयुष्याच्या प्रश्नांची उत्तरे काळ देत नाही. अशात माझ्या हाती विनोबा भावे यांचे ईशावास्य- वृत्ती हे पुस्तक आले. माझे बाबा विनोबांचे अनुयायी होते. त्यामुळे आमच्याकडे त्यांची पुस्तके होती. या पुस्तकाचा उल्लेख डॉ. अभय बंग यांच्या माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकात वाचला होता. साधारण 100 पानी पुस्तिका आहे. मी वाचायला सुरुवात केली तेव्हा आपण काहीतरी सोपे तरीही न कळणारे वाचतोय असं वाटू लागलं. त्याचवेळी एकाच वेळी माझ्या मनाचे आणि बुद्धीचे समाधान करण्याची क्षमता या पुस्तकात आहे हे पण जाणवले. आतापर्यंत या पुस्तकाची अनेक पारायणे झाली आहेत आणि तरीही यातील सारे काही समजले उमजले आहे असे वाटत नाही! ही पुस्तिका आता माझ्या आयुष्याच्या वाटेवरची न संपणारी शिदोरी झाली आहे. या पुस्तकाबरोबरचा माझा आत्तापर्यंतचा प्रवास मी थोडक्यात मांडणार आहे. यातील ज्ञान हे अथांग आहे. आणि या ज्ञानाचे आचरण करणे ही आयुष्यभराची साधना!

ईशावास्योपनिषद हे केवळ अठरा श्लोकांचे सर्वांत छोटे तरीही स्वतंत्र असे उपनिषद आहे. यातील प्रत्येक श्लोकाचे निरूपण विवेचन विनोबा या पुस्तिकेत करतात. माझ्याकडच्या पुस्तिकेत याला दोन परिशिष्ट जोडली आहेत ज्यात ईशावास्योपनिषदाविषयी विनोबांनी इतरत्र मांडलेले विचार आहेत. आजची सेल्फ-हेल्प प्रकारची नवनीत गाईड पुस्तके असतात तसे हे खरेखुरे वेदांत (वेदांचे सार असलेले) पुस्तक आहे. This is pure philosophy, so you have to follow a certain belief system. But this not a religious book. We all believe in some fictional reality. I believe that there is a country named India and I am a citizen of this country. This is pure fiction. Similarly, I believe that lying is a bad habit. However, these belief systems or theories make our life easier. To dive into a philosophy is an exercise of the brain. But you also need an inclination of the mind to believe in what your brain wants to play with. To me, ईशावास्योपनिषद is an easy to follow and hard to implement belief system/theory! Therefore, to read and understand this book is an immersive exercise for both mind and brain.

विनोबांची निरुपणाची भाषा इतकी सोपी आणि अर्थपूर्ण आहे की जणू कोणी आपल्याला समोर बसून समजावत आहे असे वाटते. या श्लोकांचा त्यांच्या अभ्यासातून आणि मनन चिंतानातून उलगडलेला अर्थ ते आपल्यासमोर मांडतात पण त्यात काही भेद असतील तर तेही मांडतात. अमुक शब्दाचा अर्थ असा का हेही सांगितले आहे. त्यामुळे संस्कृत न कळणाऱ्यांना देखील सहज अर्थबोध होतो.
या अठरा मंत्रांमध्ये नेमके काय सांगितले आहे हे मांडायचे तर संपूर्ण पुस्तिका उद्धृत करावी लागेल. शिवाय यातील काही मंत्र आपल्याला परिचित पण असतील.
उदा. अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते||
ही ओळ या उपनिषदातील अकराव्या श्लोकात आहे. जो पुढीलप्रमाणे आहे.

विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयँ सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥११॥

तेव्हा या लेखात मी मला जाणवलेल्या काही विशेष गोष्टी मांडेन. असे विचार जे मला क्रांतिकारी वाटतात किंवा नव्याने उमजले. आता वरील श्लोक पाहिला तर त्याचा अर्थ असा की जाणीव (विद्या) आणि नेणीव (अविद्या), या दोहोंसह, जे त्या आत्म-तत्वाला जाणतात, ते त्या आत्म-तत्वाच्या आधारे, नेणिवेने मृत्यू तरून, जाणिवेने अमृत गांठतात.

पण नवव्या श्लोकाच्या निरुपणात विनोबांनी काहीतरी भन्नाट मांडले आहे.

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः॥९॥

काही ठिकाणी अविद्या या शब्दाचा कर्म असा अर्थ लावलेला आहे. मात्र विनोबा म्हणतात अविद्या म्हणजे इष्ट अर्थाने एखाद्या विषयाचे अज्ञान (नेणीव) आणि विद्या म्हणजे इष्ट अर्थाने एखाद्या विषयाचे ज्ञान (जाणीव). या अर्थाने पाहिलं की या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे होतो.
जे नेणिवेत गढून गेले ते गाढ अंधारात शिरले. जे जाणिवेत रमले ते जणू त्याहून घोर अंधारात शिरले.
जगात कोणतेही दुसरे तत्वज्ञान नसेल ज्यात अज्ञानाचे फायदे सांगितले आहेत! माझ्यासाठी हा श्लोक eye-opener आहे. जे जाणिवेत रमले ते जणू त्याहून घोर अंधारात शिरले याचा नेमका अर्थ काय? जे केवळ विदयेत रममाण होतात आणि शिकत राहतात त्यांच्या चित्तात निर्णयशक्ती रहात नाही. शिवाय अहंकारही निर्माण होतो. अशावेळी विद्येचा केवळ भार होऊन राहतो. हे आपल्याला पण जाणवतंच की! आज माहिती तंत्रज्ञानाचा जो विस्फोट झाला आहे त्यातील माहितीने आपल्याला अधिक गोंधळात पडायला होते. अशावेळी अनावश्यक माहिती न ठेवणे हे हिताचे असते. अर्थात संपूर्ण नेणीव म्हणजे अविद्या देखील अंधाराकडे घेऊन जाते हेही म्हटले आहेच. मग काय करावे? तर ते दहाव्या आणि अकराव्या श्लोकात सांगितले आहे. जे मला फक्त theory मध्ये कळले आहे अजूनतरी!

असाच दुसरा एक भन्नाट श्लोक म्हणजे सहावा श्लोक.

यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति।
सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते॥६॥

विनोबांनी सांगितलेला अर्थ असा: जो निरंतर आत्म्यातच सगळीच भुते आणि सगळ्या भुतांत आत्मा पाहतो, मग तो कोणालाहि आणि कशालाहि कंटाळत नाही.

न विजुगुप्सते या धातुरूपाचा कंटाळा न येणे हा अर्थ फक्त विनोबाच लावू शकतात! त्यांनी पुढे म्हटलं आहे की कंटाळा या शब्दात तिरस्कार, निंदा, घृणा या भावना तर अंतर्भूत आहेतच शिवाय आडपडदा न राखणे हेही अभिप्रेत आहे. हे अद्वैतवादी तत्वज्ञान आपल्याला ऐकून माहिती असल्याने समजायला सोपं वाटतं पण तरीही कंटाळा या शब्दाने जणू जादू झाल्यासारखे सारे सोपे वाटते! पण हे आचरणात आणायला किती कठीण आहे! या श्लोकाच्या निरुपणात आत्मन् या शब्दाची व्युत्पत्ती फार सुंदर उलगडून सांगितली आहे. ती मुळातून वाचावी.

आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू ही वस्तुस्थिती पचवणे अवघड असते. यासाठी मला सातव्या आणि सतराव्या श्लोकाचा खूप उपयोग झाला. It did not take away my pain but it surely helped me come to terms with it in a much more positive way. आपणही एक दिवस मरण पावणार आहोत याची जाणीव ही दुःखद नसावी यासाठी देखील मला या श्लोकांची मदत झाली. अर्थात हे फार व्यक्तिनिष्ठ आहे त्यामुळे इथे शब्दात मांडणे थोडे अवघड वाटते आहे.

ईशावास्योपनिषद मला आयुष्याच्या अशा टप्प्यावर भेटले जिथे मला त्याची अत्यंत गरज होती. विनोबांनी म्हटल्याप्रमाणे ईशावास्योपनिषद हृदयाला अवर्णनीय समाधान देते. जर विनोबांनी ही छोटी पुस्तिका लिहिली नसती तर हे समाधान केवळ संस्कृत श्लोक वाचून आपल्याला लाभले नसते. ही पुस्तिका म्हणजे विनोबांच्या बुद्धीचा, ज्ञानाचा, आणि मनन-चिंतनाचा परिपाक आहे. ही पुस्तिका टिपण स्वरूपात लिहिण्याचा आग्रह गांधीजींनी धरला. तसे घडले नसते तर आपल्याला हे ज्ञान उपलब्ध झाले नसते!

जीवशास्त्रात प्रत्येक ओळख पटलेल्या प्रजातीला एक शास्त्रीय नाव दिले आहे. जसे आंब्याला Mangifera indica असे म्हणतात. तसे माणूस या प्रजातीचे शास्त्रीय नाव Homo sapiens sapiens असे आहे. यातील होमो म्हणजे घर करून राहणारा आणि sepian म्हणजे जाणीव असलेला. पण आपण केवळ Homo sapiens नाही तर Homo sapiens sapiens म्हणजे आपल्याला जाणीव आहे याची जाणीव असणारा प्राणी आहोत.
अशा जाणिवेच्या जाणिवेमुळे आपल्याला अनेक प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरे आपण fictional reality मध्ये शोधतो. ईशावास्योपनिषद आपल्याला एकप्रकारे या प्रश्नांची उत्तरे देतं. हजारो वर्षांपूर्वी कोणा ऋषींच्या चिंतनातून निर्माण झालेले हे तत्वज्ञान आजही तितकेच relevant आहे.
ज्यांना रस असेल त्यांनी ही छोटीशी पुस्तिका जरूर वाचावी. त्यातील विचारांवर मनन चिंतन करावे. त्यातून आपल्याला आजच्या जगण्यातील कठीण प्रश्नांची उत्तरे शोधायला मदत होईल असा स्वानुभव आहे.

(ईशावास्य- वृत्ती ही पुस्तिका परंधाम प्रकाशन, पवनार यांनी प्रकाशित केली आहे. ही बहुतेक अजून प्रताधिकारमुक्त नाही. आंतरजालावर मुंबई सर्वोदय मंडळाने प्रकाशकांच्या संमतीने काही भाग प्रकाशित केला आहे. लेखात त्याचा वापर केला आहे. बाकी सर्व विचार हे शब्दशः मांडलेले नाहीत. जेणेकरून प्रताधिकाराचा भंग होणार नाही.)
आंतरजालावर प्रकाशित भागाचा दुवा:
१. https://www.vinobabhave.org/index.php/books/group1-2/marathi
२. https://docs.google.com/file/d/0B-ZWGF0lkaCBb1IxaUFCNXZ3ZXM/edit (ईशावास्य- वृत्ती)

Title.jpg

Blurb.jpg

Keywords: 

वैचारिक: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle