डॉक्टरेट आजोबा आणि जर्मन लिटरेचरच्या लेक्चरर आज्जींची भलीमोठी गोष्ट आता कन्टीन्यू करते.
आजोबा भेटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत या आज्जींना भेटले. त्या चांगल्या मूडमध्येच होत्या. त्या दिवशी आज्जींच्या हातात एक जर्मन पुस्तक होते. मला बघून अतिशय गोड हसून त्या म्हणाल्या, "तुमचे खूप खूप आभार! आता मला अजिबात एकटं आणि ऑड वाटत नाहीये." मग हातातलं पुस्तक दाखवत म्हणाल्या, "हे माझ्या बहिणीने मला पाठवलं आहे. ती दुसऱ्या गावी राहते. माझ्या वाचनाच्या आवडीबाबत तिला कल्पना आहे. आता माझ्याजवळ वेळच वेळ असल्याने तिने माझ्यासाठी हे पुस्तक आणि सोबत पत्रही पाठवलं आहे..."
त्यानंतर मग आज्जींनी माझ्याशी थोडावेळ गप्पा मारल्या, ज्यात त्या दुसऱ्या आज्जीही अधूनमधून सहभागी होत होत्या, मात्र त्यांनी एकदाही त्यांच्या व्हीलचेअरची दिशा आमच्याकडे वळवली नाही. आपले आपले वाचन त्या करत राहिल्या.
त्यानंतर साधारणपणे एक आठवडा मी ह्या दोन्ही आज्जींना भेटायला गेले नव्हते. याचे कारण म्हणजे मी ऑलरेडी त्यांना पुरेसा वेळ देऊन झालेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आता पुरत्या सावरलेल्या होत्या. त्यामुळे आता इतरही आज्जी आजोबांना भेटून त्यांना वेळ द्यायला हवा, हा विचार करून मी त्यांना नंतर कधीतरी भेटायचे ठरवले.
त्यानंतर एक दिवस सर्व कर्मचाऱ्यांना माहितीसाठी म्हणून येते, तशी एक कॉमन इमेल आली की ह्या आज्जींना दोन दिवसांनी सगळ्यात वरच्या मजल्यावर सिंगलरूममध्ये हलवले जाणार आहे. डबल रूम ही त्यांची तात्पुरती सोय होती. सिंगल रूम उपलब्ध झाल्यावर लगेच त्यांना तिकडे शिफ्ट केले जाणार, असे आधीच ठरलेले होते, मात्र हे मला आधी माहिती नव्हते.
मग त्या दिवशी मी त्यांना भेटायला गेले. नेहमीप्रमाणेच ह्या आज्जी अजूनही बेड रिडन तर दुसऱ्या आज्जी त्यांना पाठमोऱ्या अशा खुर्चीवर आणि पेपर वाचत बसलेल्या, हे जणू आपण एखादं दृश्य फोटो काढून फ्रीज करून ठेवतो, तसंच दिसत होतं. कदाचित मी त्यांना भेटायला जाते ती वेळ योगायोगाने त्यांच्या ह्या अशा ऍक्टिवीटीजचीच असावी, असं मला वाटलं.
भेटल्यावर त्यांच्या रूम शिफ्टिंगविषयी कळल्याचे सांगितल्यावर आज्जी हसून "हो" म्हणाल्या आणि त्या दुसऱ्या पाठमोऱ्या आज्जी मात्र, "हो ना गं, आता ही जाईल सिंगल रूममध्ये. मी इथे आता एकटीच राहणार. आम्ही दोघी किती छान गप्पा मारायचो. आता मला फार बोअर होईल." म्हणाल्या. माझ्यासाठी हे अनपेक्षित होतं. ह्या दोन्ही आज्जी एकमेकांशी संवाद साधतांना मला या आधी दिसल्याच नव्हत्या.
मग मी त्या दुसऱ्या आज्जींना म्हणाले, "मला समजू शकतं, तुम्हाला कसं वाटतंय ते.. पण काळजी करू नका. आपण त्यांना भेटायला त्यांच्या रूममध्ये जात जाऊ. मी घेऊन जाईन तुम्हाला आणि त्या बऱ्या झाल्या, चालायला, फिरायला लागल्या, की त्यांनाही आणेन, त्या स्वतःहून येऊ शकेपर्यंत.. " शिवाय त्यांच्या बेडला लागून असलेले त लँडलाईन फोन इंटरकॉम फॅसिलिटी असलेले असून त्या दोघी एकमेकींशी गप्पा मारू शकतील, ही माहिती त्यांनी पुरवल्यावर त्यांना फार आनंद झाला.
त्यानंतर आज्जी सिंगल रूममध्ये चौथ्या मजल्यावर शिफ्ट झाल्याची इमेल आल्यावर मी त्यांना भेटायला गेले. त्यांच्या रूममध्ये गेले, तर मला एकदम साक्षात्कार झाल्यासारखे आठवले, अरे! ही तर एकेकाळी आजोबा जिथे क्वारंटाईन काळात चौदा दिवस राहिलेत, तीच रूम! आज्जींनाही ही माहिती पुरवल्यावर खूप आनंद झाला. काय एकेक योगायोग असतात ना? ह्या आज्जी आपल्या सिंगल रूममध्ये एकदम आनंदात दिसल्या. शिवाय ही रूम सगळ्यात वरच्या फ्लोअरवर असल्याने तिथे छताला असलेल्या दोन मोठ्या खिडक्यांमधून सुंदर, ब्राईट असा सूर्यप्रकाश येत होता. शिवाय समोरच्या खिडकीतून तिसऱ्या मजल्यावरून दिसत होता, तो जवळपास सेमच view इथूनही दिसत होता, कारण त्या सेमच दिशेच्या फक्त थोड्या अलीकडच्या मात्र एक मजला वरच्या रूममध्ये त्या आज्जी होत्या.
मग मी ह्या आज्जींशी जरावेळ बोलून त्यांच्या आधीच्या रुममेट असलेल्या आज्जींना त्या दिवशी पहिल्यांदा खास भेटायला गेले. त्या आज्जी नेहमीप्रमाणेच खुर्चीवर बसून टेबलवर पेपर ठेवून वाचत बसलेल्या होत्या. कसं काय वाटतंय, अशी चौकशी केल्यावर आज्जींनी मला रूममेट आज्जींशिवाय बोअर होतंय, पण आता मला हवं तेंव्हा आणि तेवढा वेळ कोणालाही डिस्टर्ब न करता टीव्ही बघता येईल, रेडिओ ऐकता येईल, शिवाय एकाकडे व्हिजिटर्स आले तर दुसऱ्याला उगाच झोपमोड वगैरेचा त्रास आता होणार नाही, अशी त्यातले वेगवेगळे पॉझिटिव्ह अँगल्स शोधून स्वतःच्याच मनाची समजूत करून घेऊ लागल्या.
ह्या आज्जीही गप्पा मारायला अतिशय इंटरेस्टिंग असल्याचं मला त्या दिवशी समजलं. इन्श्युरन्स कंपनीत ४० वर्षे नोकरी केलेल्या, ज्यांचा नवरा कस्टममध्ये जॉबला होता आणि आता जाऊन १० वर्षे झालेली असल्याने दुःखाचा डोंगर पचवला असलेल्या, स्वतःला एक हार्ट ऍटॅक येऊन गेलेल्या, दोन मुलं आणि एक मुलगी असलेल्या, जे तिघंही सरकारी नोकरीत सेटल्ड आहेत, त्यांना नातवंडंही आहेत, अशा या आज्जींना नियमितपणे मुलं, नातवंडं भेटायला येतात, फिरायला घेऊन जातात.
मी मागे ज्यांना मी भेटायला जाते, अशा आज्जी आजोबांची कॅटेगरी तयार केलेली होती, त्यात मला स्वतःला ज्या आज्जी आजोबांना भेटायची इच्छा होते, स्वतःलाच पॉझिटिव्हीटी मिळावी, यासाठी, त्या कॅटेगरीत ह्या नवीन आज्जी अचानकपणे जाऊन बसल्या. दिवसभर शांतपणे खुर्चीत बसून वाचन, सोबत रेडिओवरची गाणी आणि बातम्या आणि रात्री थोडावेळ टीव्ही बघत झोपणं, असा त्यांचा दिनक्रम असतो. त्यांना काहीश्या आजारामुळे स्वतःहून व्हीलचेअरवरून मदतीशिवाय हलताही येत नाही, एक हात सातत्याने दुखत असतो, पण काहीही तक्रार नाही की चिडचिड नाही.
त्यांना मी अधूनमधून त्यांच्या रूममेट आज्जींना भेटायला घेऊन जात असते. फक्त १५ मिनिटं जाऊयात बरंका, असं सांगून प्रत्यक्षात मात्र गप्पा मारत बसल्या आणि मी त्यांना तिकडे सोडून १५ मिनिटांनी घ्यायला गेले की एकमेकींना बाय बाय करून झाल्यावर परत थोडं थोडं बोलत पुढचे १० मिनिटं त्यांना रेंगाळतांना पाहतांना मला खूप मजा वाटते.
तर बॅक टु आपल्या इंग्लिश लिटरेचर वाल्या आज्जी. ह्या आज्जींशी इतके सुंदर सूर जुळलेत की त्यांच्यासोबतच्या गप्पा संपता संपत नाहीत. त्यांच्या लहानपणापासून तर लग्न, मुलं अशी संपूर्ण जीवनकथा त्या मला तुकड्या तुकड्याने सांगत असतात.
एकदा आज्जींनी सांगितलं, त्यांचं जीवन एका खेडेगावात गेलं. त्यांचे आजोबा शेतकरी होते. त्यांचं फार्मही होतं. त्यात वेगवेगळे प्राणी असत. वर्षातून एकदा सगळ्या मित्रमंडळींना त्यांच्या फार्ममधील प्राण्यांची फीस्ट दिली जात असे.
प्रचंड बर्फ पडण्याच्या दिवसात आजोबा घोड्याला जोडलेल्या स्लेमध्ये ७/८ जणांना एकावेळी बसवून गावभर फिरवून आणत, त्यात आज्जी आणि त्यांच्या २ बहिणीही असत. फार मजा यायची त्यात बसून फिरायला जायला..
एकदा त्यांच्या बहिणीची बाहुली हरवली. बहीण फारच अस्वस्थ झाली. आजोबा जरावेळाने येतो, म्हणून बाहेर गेले आणि अर्ध्या तासात परत आले, तर सोबत एक सुंदर बाहुली होती, जी त्यांनी कुठून मिळवली, हे सर्वांना कोडंच होतं म्हणे. कारण ते एका रिमोट व्हिलेजमध्ये राहत होते आणि जवळपास अशी दुकानं कुठेच नव्हती की अर्ध्या तासात जाऊन परत येता येईल.. आपले आजोबा जादूगार तर नाहीत? अशी त्यांना तेंव्हा शंका आलेली होती. बहीण अर्थातच अतिशय खुश झाली होती.
अशी आपल्या आजोबांची आठवण सांगतां सांगता आज्जी आपल्या आज्जीचीही आठवण सांगायला लागल्या. "माझी आज्जी गरमागरम असा काही सुंदर केक बेक करायची, त्या केकचा दरवळ अजून नाकात आणि त्या केकची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे..."
महायुद्धपूर्वीच्या काळात आपल्याकडे आहे तसंच कल्चर इकडेही होतं, असं इतरही काही आज्जींप्रमाणे यांनीही मला सांगितलं. तेंव्हा सगळं कुटुंब एकत्र राहत आहे. आज्जी आजोबा, आई वडील, नातवंडं, पतवंडं अशा सर्व पिढ्या. नंतर गोष्टी कशा बदलत गेल्या, ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही.
आपले डिमेन्शिया झालेल्या आजोबांमध्ये आणि आज्जींमध्ये एक साम्यस्थळ म्हणजे त्या दोघांचेही वडील दुसऱ्या महायुद्धात सहभागी होते. आज्जींचे वडील जखमी होऊन परत आले, मात्र आजोबांचे वडील तितके लकी नसल्याने ते युद्धाचे बळी ठरले. त्यामुळे ह्या आजोबांना भावंडं नाही... हे सांगतांना आज्जींच्या डोळ्यात पाणी आलं होतं.. "हा इव्हिल हिटलर.. याने आमचं आयुष्य नासवलं", म्हणाल्या..
भारताची लोकसंख्या किती जास्त आहे, त्या मानाने जर्मनीची लोकसंख्या किती कमी आहे, त्यामुळे आयुष्य सुटसुटीत आहे, असा एकदा आमचा विषय निघाला, तेंव्हा आज्जींना मी विचारलं होतं, जर्मनीने हे कसं काय साधलं असावं, असं तुम्हाला वाटतं, त्यावर , "साधलं कुठलं? या महायुद्धाने आमची माणसंच इतकी मारली की आपोआपच लोकसंख्या कमी झाली. कितीतरी बायकांना या युद्धाने विधवा बनवलं", म्हणाल्या.
मागच्या आठवड्यात आज्जींना मी त्यांचा आजोबांसोबत काढलेला फोटो देणार आहे, हे लिहिलं होतं, त्याप्रमाणे सोमवारी तो फोटो त्यांना दिला, तेंव्हा आज्जींना पुन्हा एकदा गहिवरुन आलं.. त्यांच्या डोळ्यातूनच घळाघळा पाणी वाहू लागलं. मला अनेकवेळा धन्यवाद देत आज्जी फोटोकडे एकटक पाहत राहिल्या.
आज्जींचा मूड बदलायला मी त्यांना त्यांची लव्हस्टोरी सांगायला सुचवलं, तर आज्जी एकदम उत्साहात सांगू लागल्या... १९५८ साली फुटबॉल टुर्नामेंटसाठी त्यांच्या गावी प्लेयर्सची टीम आलेली होती. त्यांची टांटं म्हणजे इंग्लिशमध्ये आंट.. मराठीतली आत्या (किंवा मावशी) त्या फुटबॉल सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळात होती. त्या मंडळाचे आपापसात ठरले होते, की मॅचेस संपल्यानंतर सर्वांनी आपापल्या घरी एकेका प्लेयरला जेवायला घेऊन जायचे आणि आत्याच्या घरी हे एकेकाळी तरुण असलेले आजोबा आले. आज्जींच्या आत्याने आज्जी आणि बाकीच्या नातेवाईकांनाही तेंव्हा घरी बोलावलेलं होतं. आजोबांना बघून आज्जी किचनमध्ये जाऊन आत्याला म्हणाल्या, "हे कोण येडं घरी जेवायला बोलावलं आहेस?" आणि मग पुढची गोष्ट सांगतांना आज्जी जोरजोरात हसायला लागल्या. म्हणाल्या, " आणि जेवण करता करता गप्पा मारतांना मी संध्याकाळपर्यंत त्या येड्याच्या प्रेमातच पडले.." रात्री आत्याकडे म्युझिक लावून आम्ही डान्स सुरू केला, तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरूच होता..तो दिवस इतका सुंदर होता की मी तो कधीच विसरू शकणार नाही..."
मग मॅचेस संपल्यावर आजोबा हॅनोवरला परत आले आणि आज्जी आपल्या गावीच राहिल्या. पण दोघेही संपर्कात होते. मात्र आज्जी तेंव्हा शिकत होत्या आणि आजोबा डॉक्टरल थेसिस लिहीत होते. दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसल्याने ह्याला काही भविष्य नाही, असा विचार करून ही लॉंग डिस्टन्स लव्हस्टोरी हळूहळू मावळत गेली आणि थांबली.
त्यानंतर तीन वर्षे त्यांचा एकमेकांशी काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. मग आज्जी शिक्षण संपवून कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागल्यावर एक दिवस त्यांना अचानक आठवण आली, की त्याचा लवकरच वाढदिवस असतो. मग त्या दिवशी त्यांनी फोन केल्यावर कळले, आजोबाही डॉक्टरेट झाले असून प्रॅक्टिस करत आहेत, मग त्यांची लव्हस्टोरी परत सुरू झाली. लग्न मात्र त्यांनी १९६७ साली, म्हणजेच पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंत एकूण नऊ वर्षांनी केलं.
"लग्न उशीरा झालेलं असलं तरी (किंबहुना त्यामुळेच) आम्हाला मुल लगेच हवं होतं, मात्र आमचं पहिलं मूल लग्नानंतर ६ वर्षांनी झालं. माझी बहिण माझ्याहून छोटी होती, तिने लग्नही माझ्यानंतर केलं, मात्र तिला माझ्याआधी मूल झाल्याने तर मला अजूनच त्रास झाला", हे त्यांनी सांगितल्यावर, मी मध्येच त्यांना तोडून म्हणाले, "ह्या बाबतीत तर आपलं सारखंच आहे की! माझ्याही छोट्या बहिणीचं माझ्यानंतर लग्न होऊन माझ्या आधी तिला नुसतं बाळंच नाही, तर जुळी मुलं झाली! निसर्गदेवता चेष्टाच करते ना आपली काहीवेळा.." यावर त्या मनापासून दाद देत हसल्या.
पहिल्या मुलानंतर मात्र लवकरच त्यांना दुसराही मुलगा झाला. आता दोघंही नोकरीत छान सेटल्ड आहेत.
मुलांवरून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे, आज्जी एकदा म्हणाल्या, "आज मला माझा जावई भेटायला आला होता. बराच वेळ बसला होता माझ्याशी गप्पा मारत. चांगला मुलगा आहे.." तेंव्हा मी गोंधळात पडून आज्जींना विचारलं होतं, "तुम्हाला तर दोन मुलं आहेत ना?" त्यावर त्या शांतपणे म्हणाल्या होत्या, "हो, माझा एक मुलगा गे आहे." मग मी त्यांना विचारलं होतं, "तुम्ही ही गोष्ट पटकन पचवलीत का?" त्यावर, "हो हो, त्यात काय? प्रेम म्हणजे प्रेम असतं, सर्वांचंच सेम असतं.." असं पटकन आणि सहजतेने म्हणाल्या होत्या. मग त्यांनी सांगितलं, "तुला काय सांगू? यांच्या लग्नात केवढी मजा आली होती.. त्या दोघांनीही लग्नानंतर छान डान्स केला होता. सर्व नातेवाईक आले होते लग्नाला.." मग म्हणाल्या, "माझ्या मोठ्या मुलाचं आणि सुनेचं मात्र एकत्र राहूनही विशेष पटत नाही. पण गे मुलाचा मात्र संसार अगदी सुरळीत सुरू आहे. दोघंही स्टेबल जॉब करत आहेत आणि एकदम compatible आहेत एकमेकांना.."
अशा ह्या आज्जींसोबत इतक्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होत असतात आणि दरवेळी मला नवीनच काहीतरी खजिना सापडल्यासारखं समजत असतं, उमगत असतं की मला वाटतं तिथेच गप्पा मारत थांबून राहावं आणि बाकी फ्लोअर्सवर आपले क्लोन्स बनवून माझ्या जॉबसाठी पाठवावेत.. अर्थातच हे मला अजूनही बऱ्याच आज्जी आजोबांबाबतीत वाटत असतं. 'रात्र थोडी आणि सोंगं फार', याचा सकारात्मक अनुभव देणारा हा माझा जॉब मला दिवसेंदिवस जास्तच आवडत चाललेला आहे...
~सकीना वागदरीकर जयचंदर
१५.०९.२०२०
आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com