एका ठिकाणी प्रतिसादात लिहिता लिहिता मला ह्या लेखाची प्रेरणा मिळाली:
जर्मनीतील kindergarten
माझा मुलगा-नील इथे जर्मनीत kindergarten मध्ये जातो, तिथे आठवड्यातून एकदा एक सेवानिवृत्त असलेले आजोबा अगदी नियमितपणे तासभर गोष्टी सांगायला येतात. त्यांना ही मुलं 'लेसेओपा' म्हणजे 'वाचणारे आजोबा' असं म्हणतात. हे आजोबा वाचनासोबतच एक बॉक्स आणि सोबत एक नकाशाही अधूनमधून आणतात. वेगवेगळ्या ठिकाणी चॉकलेट्स लपवून गुप्त खजिन्याचा शोध अशी activity करण्यात मुलांना सामील करून घेतात. मी एका सिनियर केअर होममध्ये जॉब करते, तिथल्याही आज्जी फिट असतांना लेसेओमा (वाचणाऱ्या आज्जी) होत्या. यावरून समजले, हे त्यांच्या कल्चरचा एक भाग असावे.
इकडे kindergarten मध्ये (मुलं 3-6 वय वर्षे) असेपर्यंत त्यांना फक्त मनसोक्त खेळू, बागडू दिले जाते. Kindergarten म्हणजेच मुलांचे गार्डन. शब्दशः तसेच असते ते. त्यांना लिहायला वाचायला या काळात शिकवत नाहीत. स्वतःच्या हाताने खायला प्यायला, शी शू करायला, आणि स्वतः ती wipe करायला, हात नीट साबणाने धुवायला, ब्रश करायला, कपडे घालायला, जेवणाची ताटं, ग्लास dishwasher मध्ये लावायला, जेवणाचे टेबल पुसायला, खेळून झाल्यावर खेळणी आवरून ठेवायला- थोडक्यात स्वावलंबी व्हायला शिकवले जाते आणि त्यासाठी अतिशय प्रेमळपणे प्रोत्साहन दिले जाते. नैतिक धडे दिले जातात, मुक्तपणे पेंटिंग, drawing, पेपर कटिंग, चिटकवणे, वगैरे वाटेल ते करू दिले जाते. प्रत्येक kindergarten मध्ये गार्डन असते, त्यात मुले रोज 2 तास खेळतात. मग सहा वर्षाची झाल्यावर शाळेत सावकाश लिहायला वाचायला शिकवले जाते. कोणीही मुलांना शिकवण्यासाठी धडपडतांना दिसत नाही, उलट एकाचा लेक थोडा व्रात्य असल्याने त्याला अजून एक वर्ष kindergarten मध्ये ठेऊन mature झाला की शाळेत टाकेन, असे म्हणणारे एक पालक माझ्या लेकाच्या kindergarten मध्ये आहेत. खूप सूक्ष्म पण महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या, नाही का?
नील ज्या kindergarten मध्ये जातो, ते kindergarten-cum-day care आहे. त्याचे structure साधारणपणे असे आहे: सकाळी 8 ते 9 पर्यंत जमेल त्यावेळी मुलांना आणून सोडता येते. याहून उशीर होणार असल्यास, तसे कळवून उशिरा सोडायलाही हरकत नसते.
घरून थोडेफार खाऊन पिऊन आलेली असली, तरी मुलांना 9 वाजेपर्यंत भूक लागलेली असते, त्यामुळे डब्यात दिलेले खायला टेबल चेअर जवळ मुलं जमा होतात. त्यानंतर अर्ध्या तासांनी मॉर्गन क्राइस, म्हणजेच सकाळचे सर्कल. सर्व मुलं आणि केअर टेकर्स गोलाकार बसून गाणी, विनोद, खेळ, नाच, व्यायाम करतात. त्यानंतर 10 वाजता सगळे त्याच कॅम्पसमध्ये असलेल्या गार्डनमध्ये खेळायला जातात. मग 11.30 ला मुलांसाठी ऑर्डर केलेले गरमागरम जेवण घेऊन एक ट्रॉली येते. खेळून दमलेली, भुकेलेली मुलं हात स्वच्छ धुवून टेबल चेअर वर जेवायला बसतात. वेगवेगळ्या टेबल्सवर मोठ्या बाऊल्समध्ये नूडल्स, सॉस, सूप, भाज्या वगैरे वेगवेगळे पदार्थ असतात. मुलांच्या समोर रिकामी ताटं असतात. मुलं त्यांना हवं ते, हवं तेवढं स्वतः वाढून घेतात आणि खातात. खाऊन झालं की उरलेलं अन्न spatula चा वापर करून एका कटोरीत रिकामं करतात, ज्याचा नंतर कंपोस्ट खत म्हणून वापर केला जातो.
ती रिकामी ताटं, बाऊल्स, काचेचे ग्लास मुलं व्यवस्थित dishwasher मध्ये अरेंज करून ठेवतात. आपले जेवणाचे टेबल टर्न वाईज पुसतात.
मग ब्रशने दात स्वच्छ घासतात आणि 1 ते 2 या वेळात एका हॉलमध्ये गादीवर शांतपणे पडून राहतात. या काळात मंद म्युझिक लावलेले असते. प्रकाशही पडदे लावून मंद केला जातो. बरेचदा पुस्तक वाचन केले जाते.
मग 2 वाजता टी टाईम असतो. यावेळी पुन्हा घरून दिलेल्या डब्यातील स्नॅक्स मुलं खातात. पाणी पितात आणि 3 वाजेपर्यंत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात. 3 वाजता गार्डनमध्ये खेळायला जातात. तिथे झोके, घसरगुंडी, sand आणि sand toys, वेगवेगळ्या गाड्या, वर चढायला टॉवर, लाकडी घर, बेंचेस, पाण्याचे पाईप्स असे खेळायला लागणारे बरेचसे साहित्य असते.
5 पर्यंत केव्हांही आई वडील येऊन मुलांना घरी घेऊन जाईपर्यंत मुलं गार्डनमध्येच खेळतात.
वर्षातून एकदा मुलांच्या आज्जी आजोबांना घेऊन पिकनिक ठरवली जाते, तेंव्हा त्यांना ओल्ड एज होम्समध्ये घेऊन जाऊन तिथे गप्पा, खेळ, गाणी अशा ऍक्टिव्हिटीज असतात.
महिन्यातून एकदा फॉरेस्ट पिकनिक असते, ज्यात मुलं झाडावर चढतात, उतरतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे किड्यांचे निरीक्षण करायला, त्यांना हातात घ्यायला प्रवृत्त केले जाते, निसर्ग वाचायला शिकवले जाते.
गावातल्या गावात डायनो पार्क वगैरे ठिकाणीही ट्रिप्स नेल्या जातात.
वेगवेगळ्या kindergartens मध्ये थोड्या बहुत फरकाने साधारणपणे हेच structure असते.
~सकीना वागदरीकर-जयचंदर
25 सप्टेंबर 2020
-आज माझ्या जर्मनी वास्तव्याला बरोबर 16 वर्षं पूर्ण झाली.