मातीवर चढणे एक नवा थर अंती

डिसेंबरमधली एक टळटळीत दुपार. उत्तर कर्नाटकातल्या भीमाकाठच्या एका गावंढ्या खेड्यात मी दुपारच्या विश्रांतीसाठी जरा टेकले आहे. हेमाडपंती देवळाच्या ओसरीत माझ्याशिवाय कुणीच नाही. गावाकडे जवळजवळ पाठ करून नदीसन्मुख निवांत देऊळ. नदीपासून वरती वीसपंचवीस फूट काठ, त्यावर चौथरा बांधून देऊळ. देवळासमोर, नदीच्या काठावर, पायर्‍या उतरताना सुरुवातीलाच एक सिमेंटचा कट्टा करून आसपास मिळालेली शिल्पे ओळीने मांडून ठेवली आहेत. बैजवार हळदीकुंकू वगैरे वाहून. सकाळपासून बाहेरच्या उन्हात तापून आता इथला थंडावा अंगात भिनवत मी डोळे मिटून बसले आहे. माझ्या भटकंतीचा आणि कामाचा मनातल्या मनात हिशोब लावत.

तुफान मेलसारखी धावणारी कर्नाटकची सरकारी एस्टी राष्ट्रीय महामार्गावर मला रोज सकाळी उतरवते. तिथून डावीकडे पूर्वेला एक फाटा फुटतो त्यावरून आत अर्धा किलोमीटरवर गाव आहे. तो रस्ता तसाच पुढे वळून आणखी दोन तीन गावांकडे जातो. गावाजवळून नदी वाहते. अर्धदुष्काळी रुक्ष दख्खनमध्ये ज्या काही मोजक्या बारमाही नद्या आहेत, त्यातली एक. एरवी वळणंवाकणं घेणारी नदी इथे अगदी सरळ उत्तर दक्षिण वाहते. नदीच्या अल्याड पश्चिमेला कर्नाटक आणि पल्याड पूर्वेला महाराष्ट्र. तीच अधिकृत सीमा. पण कानडी भाषेची सीमा मात्र दक्षिण महाराष्ट्रातच सुरू झालेली असल्याने इथे मराठी येणारे लोक अगदी नाममात्र. सगळाच अगम्य कन्नडी कारभार.

दख्खनच्या आद्य शेतकर्‍यांच्या वसाहतींच्या शोधातला हा माझा एक महत्वाचा थांबा आहे. एरवी इतर चार खेड्यांसारखंच हे पण एक गाव, पण आम्हा दख्खनच्या पुरातत्वशास्त्रज्ञांसाठी गेली पन्नासहून अधिक वर्षे एक प्रसिद्ध 'साईट'. साडेतीनचार हजार वर्षांपूर्वीचं एक आद्य शेतकर्‍यांचं गाव इथे होतं त्याचे अवशेष १९५७-५८ मध्ये प्रथम नोंदले गेले.

ही माझी इथली पहिली भेट नाही. माझ्या शोधमोहिमेच्या आरंभीच्या टप्प्यात इथे मी पहिल्यांदा आले. अगदीच नवखी असताना, माझ्या विषयातली नोंद झालेली पुरातत्वीय संस्थळे आता कशी आहेत हे तपासायच्या कामासाठी मी सोबतीला एक मैत्रिण घेऊन आले होते. कर्नाटकातल्या जवळच्या एका मोठ्या शहरात रीतसर हॉटेलमध्ये मुक्काम करून सरकारी खात्याची मदत आणि गाडी घेऊन इथे आल्याची आठवण अगदी ताजी आहे --

माझ्याकडे उपलब्ध असलेल्या नोंदींनुसार या गावात/गावाशेजारी एक मोठ्ठं राखेचं टेकाड आहे आणि त्यात ताम्रपाषाणयुगीन खापरे व इतर अवशेष सापडतात. या नोंदी केल्या आहे दिग्गज दख्खनी पुरातत्वज्ञांनी. ए. सुंदर, के. पद्दय्या आणि म. के. ढवळीकर. बाप माणसं. त्यांच्यावरती बोलायचं कामच नाही! हे असे राखेचे ढिगारे कर्नाटक व आंध्र प्रदेशात चिकार सापडतात. इथल्या आद्य नवाश्मयुगीन शेतकर्‍यांच्या वसाहतींशी निगडित, सुमारे तीन हजार वर्षे जुने, असे हे अवशेष आहेत. निओलिथिक अ‍ॅशमाउण्ड्स. मात्र ज्यात दख्खनच्या ताम्रपाषाणयुगाचे अवशेष मिळाले आहेत असं हे एकमेव ज्ञात राखेचं टेकाड. त्यामुळे प्रथम भेटीत फारच उत्सुकता होती. गावाच्या दक्षिणेला, रस्त्यावरून गावात शिरताना लगेचच एक छोटंसं बारापंधरा फूट उंचीचं आणि सुमारे तीसचाळीस फूट परिघाचं हे टेकाड आहे. त्यावर सगळीकडे वाळकं कुसळी काटेरी गवत उगवलं आहे आणि वरती शंकराची पिंड, सतीचा हात वगैरे जुने अवशेष ठेवून त्याचं शंकराचं पवित्र ठाण केलेलं आहे. कारण अगदी सरळ आहे. गावकर्‍यांच्या मते लोकपरंपरा असं सांगते की दक्षयज्ञ झाला हीच ती जागा. आणि सतीने ज्या यज्ञकुंडात जीव दिला तेच हे ठिकाण. त्यानंतर शंकराने रागाने सगळं यज्ञस्थळ भस्मसात् केलं. म्हणून तर एवढी राख इथे सापडते. गावाचं नावच मुळी या राखेवरून आलंय. धूळखेड. इथे धूळ म्हणजे राख. राखेचं गाव.
अजूनही या टेकाडावर जरा मातीत हात घातला की खापरं, हाडं, दगडाची सूक्ष्मास्त्रं असं कायकाय मिळतं. वरती चप्पल काढून जायला लागतं. तर पहिल्यांदा आलेले असताना चढून वरती निरिक्षण करणं अत्यावश्यकच होतं. आपले सपाता, शूज अशाला सरावलेले शहरी नाजुकसाजुक तळपाय. पहिलं पाऊल टाकल्यावरच ब्रह्मांड आठवलं होतं इतके काटे रुपले होते. पण या टेकाडावर येऊन मी आणि माझी सखी उभी राहिलो आणि चौफेर नजर फिरवली तर काय! अहो आश्चर्यम्! टेकाडापासून केवळ पन्नास साठ पावलं उत्तरेला असलेलं गाव एका मोठ्ठ्या पांढरीच्या टेकाडावर वसलेलं होतं. किमान पंधरा फूट उंच. या पांढरीविषयी कुणीच आधी काही उल्लेख केलेला नाही. जवळ जाऊन बघितलं तर सलग चारसाडेचार हजार वर्षांचा इतिहास पुस्तकात आखलेल्या सेक्शनसारखा डोळ्यासमोर उभा होता. विविध काळातील जमिनी, दफनं, भिंती, खापरं, दगडी हत्यारं, आणखी कायकाय सगळंच्या सगळं त्या अर्धवट खणलेल्या पांढरीच्या टेकाडात सलग खालपासून वरपर्यंत दिसत होतं. याचा उल्लेख नोंदींमध्ये नाही म्हणजे आधीच्या दिग्गजांपैकी कधीच कुणाच्या हे लक्षात आलं नाही की गावाखालीही पांढर आहे. मी प्रत्यक्ष विचारूनही घेतलं त्या तिघांना तर आम्हाला दिसलं/कळलं नाही असं प्रामाणिक उत्तर मिळालं. असंही होतं तर कधी कधी... शेवटी दाने दाने पर लिखा है| हेच खरं.

माझ्या संशोधनाचे बरेचसे आडाखे या पांढरीच्या टेकाडाच्या शोधाने एकदम एका झटक्यात बदलले! तेव्हाच ठरवलं होतं की या गावासाठी वेगळा वेळ देऊन आणखी खोलात इथे सर्वेक्षण करायचं.

त्याप्रमाणेच मी गेले काही दिवस सातत्याने इथे संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण केले आहे, आणि आता बहुतेक सगळ्या उठून दुसरीकडे गेलेल्या ओसाड वस्तीमधला एक टेकाडाचा उरलासुरला भाग निवडून त्यात एका उभ्या कडेची तासणी करते आहे. इथल्या वसाहतींचे स्तर कसे आणि काय प्रकारचे आहेत हे बघणे, विशेषतः ताम्रपाषाणयुग आणि आद्य ऐतिहासिक काळ (सातवाहन काळ) यांचे अवशेष हे माझ्या अभ्यासाचे केंद्रबिंदू आहेत. तासणी करताना दिसलं की फक्त राखेच्या टेकाडातच राख मिळत नाही तर पूर्ण गावातच राखेचे दोन मोठे थर जमिनीखाली आहेत. तासणी करत करत जमिनीखाली तीनेक फूट गेल्यावर दगडासारखा घट्ट झालेला राखेचा थर लागला. मलाच काय पण मजुरांनाही कुदळीने तो पटकन फुटत नव्हता. याच्या वरती सातवाहन काळातील खापरे व पुरावशेष होते. या थराखाली एक मातीचा थर की परत आणखी एक तेवढाच घट्ट झालेला राखेचा थर. या सगळ्यांमध्ये ताम्रपाषाणयुगीन खापरे, हाडे, दगडाची सूक्ष्मास्त्रे. जळलेली, न जळलेली. बाकी मी पहिल्या भेटीत जी मोठ्ठी पांढर बघितली होती ती आता जवळजवळ संपली आहे. गाव उठून दुसरीकडे गेलं आहे. फक्त यादवकाळात निर्माण झालेल्या आणि मराठा काळात जीर्णोद्धार झालेल्या मोठ्या भीमाशंकरलिंग देवळाच्या आसपास पांढर आहे. पण तिथे तासणं हे कदाचित देवळाच्या पायासाठी धोकादायक ठरू शकतं. म्हणून तो भाग सोडून एक त्यातल्यात्यात धडका उभा तास (सेक्शन) निवडला आहे. तेव्हा खूप तपशीलात काही पुरावशेष मिळणार नाहीत हे माहितच आहे. जे आहे त्याची काळजीपूर्वक नोंदणी करणे हे महत्वाचे. ते करते आहे.

गावासभोवती सर्वेक्षण करताना लक्षात आलं की नदीच्या पल्याडच्या गावातही सातवाहन काळापासून आजपर्यंत सलग पुरावे मिळत आहेत. एवढंच नव्हे तर या गावाच्या उत्तरेला एका ठिकाणी शेताडामध्ये मध्ययुगीन खापरेही मिळत आहेत. तिथेच म्हसादेवीचं ठाण आहे. इथे आणखी एखादं छोटं पांढरीचं टेकाड असलं तरी आता त्याचा मागमूसही नांगरलेल्या, उभ्या पिकाखाली असलेल्या मातीत नाही. धोधो वाहणारी नदी सगळ्या इतिहासाला साक्षी, पण आपल्यासाठी तीही कामाची नाही. तेव्हा खापरं, माती, राख, हत्यारं, औजारं, हाडं हेच आपले मदतनीस. त्यांच्या तुकड्यांतुकड्यातून अर्थ जुळवत गावाची पाळंमुळं शोधत इथल्या माणसांची आणि देवाची गोष्ट लिहायची.

पण यावेळेस आणखी एक पुराव्याचा माग सापडला आहे. भीमामाहात्म्य. आपल्याकडे वेगवेगळ्या नद्यांची, तीर्थक्षेत्रांची माहात्म्ये रचलेली आढळतात. त्यातलाच एक अप्रकाशित संस्कृत ग्रंथ. त्याची एक संक्षिप्त मराठी आवृत्ती पूर्वी कधीतरी प्रसिद्ध झाली आहे. पण एकुणातच एखाददोन संशोधक सोडून या ग्रंथाची दखलही अभ्यासक्षेत्रात कुणी घेतलेली नाही. पहिल्यांदा याचा उल्लेख केला तो दामोदर धर्मानंद कोसंबींनी. त्यांचाच हात धरून मी या हस्तलिखितांपर्यंत पोचले आहे. भीमेच्या काठी असलेल्या विविध तीर्थक्षेत्रांची माहिती असे त्याचे स्वरूप आहे. एकूण ज्या तीर्थक्षेत्रांची माहिती आहे ती बघता माझ्यामते मध्ययुगाच्या थोड्या आधी हा ग्रंथ रचला गेला असणार. कारण त्याकाळची प्रसिद्ध क्षेत्रे आणि आजची प्रसिद्ध क्षेत्रे यांचा ताळमेळ पूर्णपणे बसत नाहीये. यादीत फरक आहे. आजचं अनाम अप्रसिद्ध धूळखेड मात्र आख्ख्या एका अध्यायाची रचना व्हावी इतकं तेव्हा महत्वाचं होतं.

या ग्रंथातही क्षेत्रमाहात्म्यात दक्षयज्ञ आणि सतीचीच कथा येते. म्हणजे इथली लोकपरंपरा काय आहे हे ग्रंथकाराला माहित होतं. या ग्रंथाच्या विश्लेषणातून अतिशय रंजक तथ्यांचा, ऐतिहासिक सांस्कृतिक प्रक्रियांचा मला मागोवा घेता आला, पण तो भाग इथे अलाहिदा आहे. आपल्याला मतलब फक्त धूळखेडशी.

पुरातत्वीय पुरावे, ऐतिहासिक कागदपत्रांतील उल्लेख/अनुल्लेख, ग्रंथांमधील माहात्म्यकथा, मौखिक इतिहास आणि प्रत्यक्ष गावाचे अवलोकन अशा विविध प्रकारचे पुरावे एकत्र तपासून बघितले की या गावाच्या आयुष्याचा एक विस्तीर्ण पट आपल्या डोळ्यासमोर उलगडतो. तो पट पूर्ण नाही, त्यातले अधलेमधले महत्वाचे टप्पे आपल्याला निश्चितपणे ठाऊक आहेत. पण बाकी तपशील बरेचदा अनुमानानेच भरावे लागतात. अर्थात त्याने जीवनपट समजून घ्यायला फार अडथळा येत नाही.

गावाची जन्मकहाणी सुरू होते ती जवळजवळ साडेचार हजार वर्षांपूर्वी. दख्खनच्या भूमीत नुकतंच शेतीतंत्रज्ञान नव्याने आलं होतं. इतकी लाखो वर्षे भटक्या अवस्थेत शिकार, फळं-कंदमुळं यावर गुजराण करणार्‍या माणसांच्या टोळ्या आता धान्याची लागवड करून, प्राण्यांना माणसाळवून एका ठिकाणी वस्ती करून राहायला शिकत होत्या. पूर्ण पश्चिम दख्खन, आंध्र, दक्षिण कर्नाटक असे प्रांत कवेत घेऊन ही नवी जीवनशैली वेगाने पसरत होती. पश्चिम दख्खनच्या गावसमूहांना तांबं गाळायचं तंत्रज्ञान अवगत झालं होतं. पण आंध्र कर्नाटकमधले गावसमूह याबाबतीत अज्ञानी होते. हे त्यात्या प्रदेशातील आद्य शेतकरी समूह असले तरी त्यांच्या जीवनशैलीत फरक होता. पश्चिम दख्खनचे शेतकरी शेतीवर भर देत असत तर कर्नाटक-आंध्रातील समूह मूलतः पशुपालनावर भर देत. शेती करत असले तरी मोठीमोठी खिल्लारे बाळगत. त्या खिल्लारांना एकत्र सामुदायिकरीत्या गावाशेजारीच बांधून ठेवले जाई व त्यांचे शेण एकत्र करून थोड्याथोड्या काळाने ढीग करून जाळले जाई. वारंवार एकाच ठिकाणी जाळून सगळी राख दगडासारखी घट्ट होई. हेच ते आपल्यापर्यंत पोचलेले नवाश्मयुगीन राखेचे ढिगारे. दख्खनचे आद्य शेतकरी मात्र असे काही करत असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत.

तर धूळखेडची कहाणी सुरू होते साधारण चारेक हजार वर्षांपूर्वी. त्यावेळच्या माणसांनी बारमाही वाहणार्‍या नदीच्या या उंच काठाची निवड कायमच्या मुक्कामासाठी केलेली दिसते. नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक. गाळाची माती तर होतीच पण करंद काळी मातीही मुबलक प्रमाणात. उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध, चराऊ कुरणांची कमतरता नाही आणि पूर आला तरी उंच काठ गावाचं रक्षण करण्यास सहसा पुरेसे पडणारे. तेव्हा या उजव्या काठावर थोड्या थोड्या अंतराने तीनचार ठिकाणी गावं वसवलेली दिसतात. धूळखेड त्यातलंच एक. या शेतकर्‍यांनी काठापासून थोडं आतच एक छोटं गाव वसवलं आणि दक्षिणेकडच्या शेजार्‍यांसारखी खिल्लारे बाळगून त्यांचं शेण एकत्ररीत्या जाळण्याचा परिपाठ सुरू केला. अर्थातच त्या काळी गावाचं नाव काय होतं आपल्याला माहित नाही. त्यांची भाषाच जिथे जाणून घ्यायचा कुठला मार्ग नाही तिथे हे सगळे तपशील आपल्यासाठी हरवूनच गेलेत. आपण यालाही धूळखेडच म्हणूयात.

तर साधारण हजारेक वर्षं हे गाव इथे सुखासमाधानाने नांदत असलेले दिसते. मात्र इ स पू १००० च्या सुमारास दख्खनमधल्या पावसाच्या वार्षिक चक्रात बिघाड होण्यास सुरुवात झाली. अवर्षणाचा फेरा वारंवार होऊ लागला, दुष्काळी परिस्थिती वाढू लागली आणि नागरी प्रशासकीय यंत्रणांचा आधार अस्तित्वातच नसल्याने शेतीवर गुजराण करणं अवघड झालं. हळूहळू कमी पावसावर तगून राहणार्‍या पिकांवर, गोमांसाऐवजी काळविटाच्या मांसावर उपजीविका चालवण्यावरचा भर वाढत गेला. आणि शेवटी हेही पुरेनासे झाल्यावर गावंच्या गावं जगायला बाहेर पडली. स्थिर जीवन सोडून परत एकदा पायाला भटकंतीचं चाक लावून. पुढच्या सहासातशे वर्षांसाठी. इतर गावांबरोबरच इथलेही लोक जगायला बाहेर
पडलेले आपल्याला दिसतात. परत कधी त्यांचे वंशज इथे आले की नाही कळायला काहीच मार्ग नाही. पण मौर्यकाळानंतर, इ.स.पू. दुसर्‍या शतकानंतर परत एकदा दख्खन गावांनी फुलून उठला. सुधारलेल्या नियमित पाऊसमानाने आता बर्‍यापैकी सुबत्ता आली होती. दख्खनमधलं पहिलं राजकुल सातवाहन आता दिमाखात राज्यावर आलं होतं. अंतर्गत आणि परदेशी भूमध्यसमुद्रप्रदेशाशी असलेला व्यापार आता भरभराटीला आला होता. नाशिक, कोल्हापूर, तेर, कराड, बेळगाव, सन्नती अशी मोठीमोठी राजकीय-व्यापारी केंद्रे असलेली नगरे उदयाला आली होती. आणि यामधल्या प्रदेशांत पसरलेली असंख्य छोटीछोटी खेडेगावे.

धूळखेडमध्येही लोकांनी परत एकदा नव्याने डाव मांडला. एक छोटंसं गाव परत एकदा वसलेलं आपल्याला पुरावशेषांवरून कळतं. पण इतर चार खेड्यांसारखंच हेही एक असणार. पोटापुरतं पिकवून, गाईगुरं सुखात राहिली की झालं इतक्याच आर्थिक उलाढालीचं. ना इथे आसपास कुठलं मोठं नगर, ना कुठले धार्मिक स्थान. ना कुठला व्यापारीमार्ग जवळपासहून जात असल्याचे काही पुरावे! भीमा नदीही सातवाहन काळासाठी
सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची नसावी असे दिसते. इ.स. च्या सातव्या शतकाआधी, बदामी चालुक्य राजवटीआधी, भीमेचा कुठे म्हणजे कुठेच उल्लेख नाही. गोदा, कृष्णा, तापी, नर्मदा सगळ्या आहेत पण हिचा मागमूसही साहित्यात, शिलालेखात कुठे नाही.

परिस्थिती पालटते ती साधारण सहाव्या सातव्या शतकापासून. बदामी चालुक्य राजघराणे राज्यावर आल्यावर इथल्या आसपासच्या परिसराविषयी ताम्रपट, शिलालेखांतून माहिती मिळू लागते. पण या सगळ्या प्रदेशाचा खरा भरभराटीचा काळ म्हणजे साधारण दहावे शतक ते चौदाव्या शतकाचा पूर्वार्ध. ज्याला आपण सहसा यादवकाळ म्हणतो. फक्त देवगिरीचे यादवच नव्हेत, तर शिलाहार, मंगळवेढ्याचे कलचुरी, कल्याणीचे चालुक्य अशा विविध राजवटी आता या प्रदेशांमध्ये एकमेकांशी चुरस करून राज्ये चालवताना दिसतात. याच काळात ठिकठिकाणी देवळं, जैन बसदि बांधली गेली, त्याला राजांनी, त्यांच्या अधिकार्‍यांनी सढळ हस्ते दाने दिली. आणि याच काळाच्या शेवटच्या टप्प्यात भीमामाहात्म्याची रचना झाली असावी असा माझ्या संशोधनाचा निष्कर्ष आहे.

गावाच्या इतिहासातही आता एक नवा टप्पा आलेला दिसतो. आपल्याला पहिल्यांदा गावाचं नाव कळतं. धूळखेड. आपलं गाव इतरांपेक्षा वेगळं आहे, इथे इतर कुठे न सापडणारी राख गावभर जमिनीत खणलं की मिळते हे लोकांना माहित असणारच. पण त्या वेगळेपणाचं स्पष्टीकरण म्हणून आता त्याच्याशी दक्षयज्ञाची कथा जोडली गेलेली दिसते. निश्चितच याच्या आधी काही शतके ही घडामोड झालेली असणार. साधारण पाचव्यासहाव्या शतकापासून किंवा कदाचित त्याच्याही आधीपासून आसपासच्या जुन्या पुरावशेषांची नोंद दख्खनमधील गावं घेऊ लागली आहेत असं माझं प्राथमिक संशोधन मला सांगतं. या नोंदीची माहिती आपल्याला गावांच्या नावांवरून कळते. तर त्यातलंच एक धूळखेड. या राखेच्या ढिगार्‍यांवरून दंतकथा, मिथककथा रचल्या जाणं हे कर्नाटक, आंध्रप्रदेशांमध्ये सुद्धा दिसतं. गाणगापूरला प्रख्यात असणारा भस्माचा डोंगर असाच नवाश्मयुगीन राखेचा. पण गाणगापूरचं मध्ययुगातील दैवतीकरण सोडलं या सांस्कृतिक प्रक्रिया किती जुन्या आहेत हे आपल्याला इतके दिवस कळायचा मार्ग नव्हता. त्याचा पहिला माग आपल्याला भीमामाहात्म्याने दिला.
आणि याच काळात बांधलेले शंकराचे दगडी देऊळ, आसपास मिळणारी समकालीन शिल्पे आपल्याला हे गाव भीमामाहात्म्यात एक आख्खा अध्याय ज्यावर खर्ची पडला आहे इतक्या महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून महत्वास पावले आहे याचा भक्कम पुरावा देतात. मात्र असे असूनही याचा उल्लेख अन्यत्र कुठे शिलालेखात नाही, कुठल्या दानांच्या नोंदी नाहीत की याला कधी कुठला प्रशासकीय-राजकीय दर्जा मिळालेला दिसत नाही. फक्त आणि फक्त तीर्थक्षेत्र असेच याचे स्वरूप राहिलेले दिसते. या भागात असलेला लिंगायत प्रभाव इथेही दिसून येतो. जरी माहात्म्यात हे नुसते शैवक्षेत्र म्हणून उल्लेखित असले त्यानंतर ते लिंगायत पंथात सामिल झालेले दिसते. आजही आहे.

या महत्वाची चढती कमान मध्ययुगातही चालू राहिली असावी. कारण शेताडात मिळालेला खापरांचा पुरावा आपल्याला या वसाहतीचा वाढता विस्तार किंवा संलग्न वाडी-वस्ती असावी असे सांगतो. इतकंच काय पण ब्रिटिश काळातील गॅझेटीअर सुद्धा या गावाचा महत्वाच्या स्थळांत उल्लेख करून इथल्या राखेचा व दक्षयज्ञकथेचा उल्लेख करतात. अर्थातच हे मिथक जोडले गेलेले नवाश्मयुगीन राखेचे ढिगारे धूळखेड सोडून दख्खनमध्ये आणखीही काही ठिकाणी आहेतच, पण त्यांचा विशेष अभ्यास झालेला नाही.

धार्मिक महत्व सोडून इतर कुठलाही वेगळा दर्जा नसल्याने गावाची मार्गक्रमणा फार वेगळी ठरली नाही. सातवाहन काळापासून खेडं म्हणून अस्तित्वात असलेलं हे ठिकाण विसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत खेडंच राहिलं. शंकराच्या देवळाला, राखेच्या ढिगार्‍याला सांस्कृतिक केंद्रबिंदू करून जगणारं. बाकीचं जग झपाट्याने बदललं तसं याचं धार्मिक महत्वही स्थानिक पातळीवर संकुचित होऊन राहिलं.

मात्र १९९३ साली किल्लारीचा भूकंप झाला आणि गावाच्या आयुष्यात उलथापालथ करून गेला. पांढरीच्या टेकाडातच पाये घालून बांधलेली दगडी घरे धडाधडा कोसळली. त्यामुळे नाईलाजाने गावाने स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. गावाच्या पश्चिमेकडून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गापल्याड एक माळरान बघून गावाने तिकडे पक्क्या पायाची घरे बांधली. पूर्वीच्या काळच्या दळणवळणाचा मुख्य मार्ग असलेल्या नदीची जागा आता रस्त्याने
घेतली. इथून लागेल तशी पांढरीची माती खणून तिकडे नेली आणि घरबांधणीत वापरली. ज्या पांढरीमुळे गावाला महत्व मिळालं, नाव मिळालं त्या
पांढरीमुळेच गावाला दुसरीकडे स्थलांतर करणं भाग पडलं.

गावात अजूनही शंकर त्याच्या देवळात बसून आहे. तो अजून तरी नवा धूळखेड मध्ये राहायला गेला नाहीये. कसा जाईल? त्याचं आद्यस्थान - तो राखेचा ढिगारा - अजूनही तिथेच आहे. परवाच्या (२०१९च्या) महापुरात इतक्या उंचीवर बांधलेलं हे भीमाशंकरलिंगाचं देऊळही पूर्ण बुडलं होतं अशी उडतउडत बातमी वर्तमानपत्रात वाचली. आता पूर ओसरला असेल. गाळ साफ झाला असेल. पूजाही सुरू झाली असेल, कारण अजूनही गावातले लोक नियमाने देऊळ आणि ठाण या दोन्ही ठिकाणी पूजा करतात.

कदाचित आणखी काही दिवसांनी कुण्या थकल्याभागल्या म्हातार्‍याला/म्हातारीला स्वप्नात दृष्टांत मिळेल आणि त्याच्या सोयीसाठी शंकर येईलही जुनं देऊळ सोडून नवा धूळखेड मध्ये. कुणी सांगावं?

(हा लेख प्रथम माहेर दिवाळी अंक २०१९ येथे प्रसिद्ध झाला. तो इथे पुनर्प्रकाशित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल माहेरच्या संपादिका सुजाता देशमुख यांची मी ऋणी आहे.)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle