मला एक समजलंय की एखादयाशी मैत्री करणं आपल्या हातात असतं पण एखाद्याचा शत्रू बनणं हे मात्र सर्वस्वी हालात पे डिपेंड करता है.
मैत्री करण्यासाठी साधारण समवयस्कता हा निकष ढोबळमानाने मानला जातो.
म्हणजे बघा … समोरची कल्पना तिचा मुलगा CA करतोय. अर्चनाची मुलगी बाळंतपणासाठी आलीय. सुलभा दोन वर्षात रिटायर होईल. कांचनच्या मुलाचं लग्न ठरलं. भजनक्लासात पेटी वाजवणाऱ्या सीमाताई सहा महिन्यासाठी मुलीकडे अमेरिकेत गेल्या. म्हणजे कसं ५५-६०-६५ असा वयोगट.
पण मुळात शत्रूची निवडच आपल्या हातात नाही तिथे किती वयाचे शत्रू निवडावेत हे कसं ठरवणार ?
मीट माय फ्रेंड असं म्हणून आपल्या फ्रेंडची दुसऱ्याशी ओळख करून देणं असा एक रिवाज असतो. तोच रिवाज इथेही पाळायला हवा.
तर मी आता तुमची माझ्या शत्रुपक्षाशी ओळख करून देते.
शौर्य अवस्थी ,सेवेंथ ग्रेड, निम्मा वेळ हाच बॅटिंग करतो. ओजस इयत्ता तिसरी बराचसा बुजरा हातानी सारखी हाफपॅण्ट वर खेचणारा, लिंबूटिम्बू, नेहमी बाउंड्री लाईन पाशी, नवीन रेडियन्ट येल्लो स्टम्प्स आहेत त्याच्याकडे तर त्याला खेळायला घ्यावच लागतं.
आर्यन, इंटर नॅशनल स्कूलात, देखणा, कधी लहान मुलांच्यात तर कधी नाक्यावरच्या शिट्टी ग्रुपमधे, शौर्य आणि आर्यन म्हणजे दादालोक.
अथर्व, पुण्याचा नेटिव्ह असावा. बघावं तेव्हा जमेल तशा हिंदीत वाद घालून बॅटिंग मिळवणारा. वरदला नवीन स्पोर्ट्स ग्लव्ज आणलेत 95 प्लस मिळाले म्हणून … सो सध्यातरी रोज तोच विकेटकीपर.
इतक्या आतल्या बातम्या मला कशा माहीत ? अहो माझ्या खोलीच्या खिडकीत आणि यांच्या पिचमधे जेमतेम १५ फूट अंतर आहे.
आलोकच्या नागपूरच्या मावशीनी बर्थडे गिफ्ट म्हणून त्याला १० क्रिकेट बॉलचा सेट दिलाय. तो त्यानी बावळटासारखा सगळ्यांना दाखवला. आता आलोक हाच सगळ्यांचा क्लोज फ्रेंड आहे. आलोकचे डॅडी फार स्ट्रिkt आहेत म्हणे. रोज दहा बॉल त्यांना मोजून दाखवावेच लागतात.
काहीतरी ढाका लावतो झालं ! असे डॅडी हल्ली म्यूजियममधे तरी बघायला मिळतात का ? पण सगळ्या टीमला त्यानी कन्व्हिन्स केलंय तर जाऊदे आता ….
अहो जाऊ दे कसं ?
रोज सकाळी आठ नाही वाजले तर एकेक गडी लिफ्टमधून खाली उतरतो. प्रग्येश, आर्यन, संकेत अशा आरोळ्या ठोकून सगळा परिसर दणाणून सोडतात. जमलेले प्लेअर्स तोपर्यंत वॉल प्रॅक्टिस चालू करतात. थोड्याच वेळात स्टम्प ठोकून खेळ चालू होतो. बोलर्स पावलं मोजून विटकरीच्या तुकड्यांनी आपली धावपट्टी ठरवतात
दोन ओव्हर्स होत नाहीत तोवर नो बॉल च्या डिसिजन वर भांडण रंगात येतं. तिसऱ्या ओवरचा पहिलाच बॉल शौर्य असा टोलवतो की आमच्या उघड्या खिडकीतून थेट घरात. मग मोजून दोन मिनिटं शांतता. आणि आंटी आंटी हाका मारायला सुरुवात.
‘पुन्हा कंपाउंडच्या आत जरी आला बॉल तरी देणार नाही’ या धमकीसह मी बॉल परत देते.
आता मी बागेतल्या झाडांना पाणी देत त्यांचा गेम बघत उभी आहे तर पुन्हा एकदा बॉल माझ्या पायाशी !
आंटी हमारा बॉल दे दो ना . प्लीज प्लीज
हे बघा खेळताना तुम्ही खूप आवाज करता, शिवाय बॉल जर सारखा सारखा आमच्या हद्दीत आला तर आम्हाला त्रास होतो.
एक हिंदी भाषक तेवढ्यात मित्राला हद्दीतचा अर्थ विचारतो.
दुसरं असं की तुम्ही सगळे कुठल्या शहरात राहताय
पूना …. आंटी
पूना नाही, पुणे म्हणायचं……. काय समजलं … तर पुण्यात क्रिकेटचा बॉल परत द्यायची पद्धत नसते.
‘तरीही मी फार काईन्ड आंटी आहे.’
‘असं करा तुमचे सगळे स्टम्प्स पलीकडच्या बाजूला हलवा आणि फक्त एक जण इकडे येऊन माझ्याकडून बॉल घेऊन जा. ‘
‘दे दो ना, आंटी, अब हम सब घरही जानेवाले हैं’
‘किती जणांना मराठी येतं ?’ दहा पैकी सहा जण हात वर करतात.’ मग हिंदी का बोलता रे ‘.
मराठी येणारे सगळे मागे जा. हिंदीवाले पुढे या.
माझ्याशी मराठीत बोलायचं .. काय समजलं ?
हां आंटी मराठीत बोलेंगे …पण हमारा चेंडू दे दो ना.
आता चेंडू चार वाजता मिळेल.
दुपारी दोन नाही वाजले तर दोन मुलं कंपाउंड पलीकडे आणि …आंटी आंटी घोष सुरू
‘आंटी बॉल दे दो ना. बॉल मेरा है और मै उनके साथ नहीं खेल रहा ‘.
‘अरे मराठी बोल ना ..आंटी गुस्सा करेगी और बॉल नहीं देगी ‘ एक मित्रसल्ला
‘चार वाजता या मग देते’
‘आंटी हम आत्ता बाहेर जा रहे हैं . ‘
‘मग बाहेर जाऊन परत आलात की देते’
‘नहीं आंटी . हम अभी हमारे होम टाऊन जबलपूर वापस जा रहे हैं’
दोन तासात पळून जायचं ठरलं काय रे चोरा ? असं मनात म्हणून मी हसते आणि त्या निरागस ड्याम्बिसपणाला दाद देत बॉल परत देते.
चार नाही वाजत तोवर परत एकदा शत्रूपक्ष हाका मारत उभा. आधी आंटी आंटी आणि मग काकू काकू करत.
तुमचा मित्र आला होता आणि बॉल घेऊन गेला.
वो रेड टी शर्ट वाला ?
उसको नहीं देना था ना बॉल आंटी …. उसने हमसे झगडा किया और आपने जो बॉल वापीस किया वो उसका नहीं हमारा था …
आता तेवढंच राहिलंय रे बाबांनो ..तुमची अंतर्गत भांडणं. बॉलचे मालक, गुस्सावाले डॅडी, १० मधले किती बॉल कुठे कुठे गेले . यल्लो कुणाचा आणि रेड कुणाचा याचाही अभ्यास सुरू करते आता .
पुढच्या दोन तासात तीन बॉल आमच्या इकडे येऊन पडतात. मग आंटी काकू असा परत एकदा जयघोष.
मी खिडकीचे पडदे लावून घेते आणि स्वतःच्याच घरात मांजराच्या पावलाने फिरते. मधूनच दोन पडद्याच्या फटीतून शत्रूच्या हालचालीचा अंदाज घेते
बघते तर रणांगणावर सामसूम शांतता ! हुश्श !
जरा खुर्चीत टेकून बसते न बसते तोवर घराच्या फ्रंट गेटची बेल वाजते. सहा शत्रू, त्यातले दोन सायकलवर, बापरे आता युद्ध अगदी दाराशी पोचलंय.
मी दहा मिनिटं दादच देत नाही. तर शत्रूपक्ष जणू तंबू टाकायच्या तयारीत !
घराचं गेट सताड उघडं असून आणि लांबवर झाडाच्या बुंध्याशी चेंडू दिसत असून सुद्धा ते घ्यायला एकही जण आत मात्र येत नाही. एकदम नेक धर्मयुद्ध !
मग बाल्कनीत येऊन मी दर्शन देते. शत्रूगणाचा एक सरदार तहाची बोलणी करायला पुढे !
आंटी , अब हम धिस साईड नहीं खेलेंगे . प्लीज बॉल दे दो ना ! त्या सैतानांच्या नजरेतली अजीजी बघून आता माझंच मन फितूर होतंय की काय याची मलाच भीती वाटते!
अर्जुनाला जिथे युद्ध चुकलं नाही तिथे माझी काय कथा ?
नको तिथे गीता आठवून माझी गोची होते.
आता एकच शेवटचे ब्रह्मास्त्र म्हणून मी मोबाईल समोर धरते आणि फोटो काढायचा बहाणा करते.
मागच्या फळीत हालचाल होते आणि गडी दोन दोन पावलं मागे सरकू लागतात . अतिशय उदास भाव चढवून एकेक जण परतीच्या मार्गाला लागतो.
एकमेकांशी काहीच न बोलता माना खाली घालून चालणाऱ्या त्या मूक सैन्याकडे मला बघवत नाही.
आत येऊन मी ह्यांना म्हणते, उद्या सकाळी सगळे चेंडू देऊन टाकूयात हो.
दुसऱ्या दिवशी सकाळी वॉक ला निघताना मी कोरोनाभीतीग्रस्त असा पोशाख करते . चेहऱ्यावरून ओढणीचा पटका असा फिरवला आहे की आरशात मीच मला ओळखत नाही. चालायला जायचा रस्ता शत्रूपक्षाच्या गेट समोरूनच आहे. मी गेटसमोरून पुढे जाते तोवर मागून आंटी आंटी करत चार मुलं मागे मागे येतात . यांचे नजरबाज बहिर्जीचे वंशज आहेत की काय ? . इतका चिवट शत्रू मी आजपर्यंत पाहिलेला नाही.
सांगितलं ना एकदा नाही देणार चेंडू…….. पण तुम्ही मला ओळखलं कसं ?
आंटी, आपके गुस्सा वाले आँखोंको देखकर… बाय गुस्सावाले ही मीन्स रागीट ….एक स्वयंसेवक पुढे येतो
म्हसोबा, बरं झालं सांगितलंस, आता मराठीची शिकवणी लावते तुझ्याकडे
मला हसणं आवरत नाही . जाओ …. अब अंकल अंकल पुकारों , तुम्हारे चेंडू मिल जाएंगे.
हुर्रे करत आनंदानी सगळी टोळी धावत सुटते.
माय स्वीट लिटिल एनीमीज !!