२२ सप्टेंबर २०१९ : फॉल्स चर्च,व्हर्जिनिया ते मौमी, ओहायो
‘हे घेऊ का ते घेऊ की दोन्हीही घ्यावं? थंडीसाठी घेतलेले कपडे पुरेसे होतील का? दोघांचे लॅपटॉप तर हवेतच.’ वगैरे अनंत प्रश्न सोडवण्यात आणि सामानाची भराभरी -उचकाउचकी करण्यात रात्री झोपायला उशीर झाला. पण तरीही लवकर उठून ठरलेल्या वेळेच्या किंचीतच उशीराने आम्ही घर सोडलं.
सामानाचा डोंगर कारमधे नीट रचला. विमान प्रवासात जसं चेक-इन-लगेज आणि कॅबिन लगेजची वर्गवारी करतो, तशीच कारच्या डिकीमध्ये ठेवायचं सामान, मागच्या सीटवर ठेवायचं सामान, गाडी चालू असतानाही हात मागे करून घेता येईल असं खाली ठेवलेलं सामान आणि जवळ हवीच अशी पर्स असं वर्गीकरण केलं होतं. ही काही पहिली रोडट्रीप नव्हती, त्यामुळे कधी काय सामान लागतं आणि कुठे काय सामान असलं की सोयीस्कर पडतं हे सरावाचं झालेलं होतं. सामान आणायला मदत म्हणून मुलगा खाली पार्किंगमध्ये आला होता. खरं म्हणजे तो आम्ही नक्की जातोय ना, ह्याची खात्री करायला येत असावा, अशी शंका घ्यायला भरपूर वाव होता! आता पुढचे वीस-पंचवीस दिवस आई-बाबा नाहीत, सगळं घर आपल्या ताब्यात ह्याचा आनंद लपवणं त्याला जरा जडच जात होतं.
तर अशा पद्धतीने सामान रचणे, पेट्रोल भरणे इत्यादी सगळं आटपून आम्ही रस्त्याला लागलो. इतकी मोठी ट्रीप करत होतो, खूप काही बघायचं होतं. कुठे गच्च जंगल, कुठे वाळवंट, उत्तुंग इमारतींचं उच्च्भ्रू सौन्दर्य, कुठे मैलोनमैल पसरलेली सोनेरी शेतं, कुठे लाल रंगांचे खडकाळ डोंगर तर कुठे बर्फ़ाच्छादीत पर्वत. हेमंत ऋतूच वैशिष्ट्य असलेली रंगांची उधळण बघायला मिळणार होती. इतक्या सगळ्या सौन्दर्याला चालत्या गाडीतून मोबाईलवर टिपणं अशक्यच. हा प्रश्न सोडवण्यासाठी एका व्हिडीओ कॅमेऱ्याची खरेदी केली होती. रिअर व्ह्यू मिररजवळ त्याची प्रतिष्ठापना केली. असा सगळा लवाजमा घेऊन आम्ही मार्गाला लागलो. बरेच दिवस ह्या ट्रीपचं प्लॅनिंग, चर्चा, माहिती मिळवणं, सामानाची तयारी करणं चालू होतं. विचारांचा झोका ‘कधी एकदा निघतोय’ इथपासून ‘कधी एकदा परत घर दिसेल’ इथपर्यन्त झोके घेत होता. निघेपर्यंत होणारी जीवाची ही उलघाल, एकदा मार्गाला लागल्यावर मात्र हळूहळू शांत झाली आणि मी निवांत बसून बाहेर बघायला लागले.
हळूहळू ओळखीचा परिसर, परिचयाचे रस्ते मागे पडले आणि आमची ट्रीप खऱ्या अर्थाने सुरु झाली. इतके तास सलग ड्रायव्हिंग करताना महेशच्या शारीरिक क्षमतेचा आणि एकाग्रतेचा कस लागत होता. त्यामानाने मी रिकामी होते. स्पीडोमीटरचा काटा निर्धारित वेगाच्या फार पुढे जात नाही ना, इकडे लक्ष देणे, गप्पा मारणे, डी.जे.गिरी करून आवडीची गाणी लावणं, अगदीच कंटाळवाणं झालं की खाऊपिऊची सोय करणे अशी कामं करायचे. ह्या सगळ्याबरोबर मी अजून एक काम करते ते म्हणजे विणकाम करते. मला विणकाम करायला अगदी मनापासून आवडतं. एका लयीत चाललेल्या गाडीत मी व्यवस्थित विणूही शकते. ह्या लांबलचक ट्रीपसाठी मी विणायच्या सुया, लोकर, पॅटर्न अशी जय्यत तयारी केली होती. जंगलं, डोंगरदऱ्या किंवा सुंदर अशी शहरं-गावं असतील तर काचेला नाक लावून बाहेर बघायचं. तसं गमतीदार काही नसेल तर आपला ‘काही सुलट, काही उलट’ चा कार्यक्रम राबवायचा असं करत राहिले.
अशा लांबच्या ट्रीपमध्ये साधारणपणे एकदा जेवणाच्या आधी, जेवायला आणि जेवणानंतर दोनेक तासांनी ब्रेक घेतला जातो. असं थांबताना कॉफी प्यायची असेल, खायचं असेल तर तसं थांबायचो. नाहीतर राज्यांच्या सीमारेषेवर ‘आपले ___ राज्यात सहर्ष स्वागत आहे’ प्रकारची स्वागत केंद्रे असतात तिथे किंवा थोड्या थोड्या अंतरावर प्रवासी-मदत-थांबे असतात तिथे थांबायचो. आपली आवश्यक कामं उरकायची, गाडीत पेट्रोल भरायचं, थोडं काही तोंडात टाकायचं. जरा थांबून पाय मोकळे केले, बसून-बसून कंटाळा येतो तो झटकला की पुन्हा रस्त्याला लागायचो. प्रत्येक राज्यात अशा थांब्यांची संख्या किती आहे, त्यावरून त्या-त्या राज्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज करणे हा आमचा एक आवडता उद्योग होता!
अमेरिकेतले रस्ते किती चांगले असतात, ह्यावर इतक्या थोर मंडळींनी इतक्या विविध प्रकारे लिहिलं आहे, की त्यात मी भर घालायचं काही काम नाही! पण एक मात्र आहे की अमेरिकेतल्या रस्त्यांचं जाळं प्रचंड आहे. त्या चक्रव्यूहातून मार्ग काढणे म्हणजे सोपं काम नाही. थोडी गडबड झाली, तर ‘जाना था जापान, पोहोच गये चीन’ अशी अवस्था होऊ शकते.
आता बहुतेक गाड्यांमध्ये रस्त्याची माहिती द्यायला नॅव्हिगेटर टूलची सोय असते. आमच्या ह्या नॅव्हिगेटर काकू म्हणजे एकदम हुशार बाई. एकतर त्यांना जगातल्या सगळ्या रस्त्यांची खडानखडा माहिती आहे आणि स्वभाव इतका शांत की विचारायला नको. कितीही चुकीची वळणे घ्या, भलत्याच रस्त्यांना लागा, काकू शांतपणे आपल्याला पुन्हा मार्गावर येण्यासाठी मदत करतात. अगदीच शक्य नसेल, तर ‘If possibel, make a legal U turn’ ह्या वाक्याचा जप करत राहतात. पण कुठल्याही परिस्थितीत संतापून ‘मघापासून ओरडते आहे. ओरडून घसा कोरडा पडला माझा. पण नाही वळलात. आता शोधा रस्ता तुम्हीच’ असं म्हणत नाहीत. मग त्याहून जहाल अपशब्द वापरायची बातच नको!! आमची ही ट्रीप सुख-शांतीत आणि यशस्वी होण्यात ह्या नॅव्हिगेटर काकूंचा फार मोठा वाटा आहे.
आज घरून निघून पहिल्या मुक्कामाला माऊमी ह्या ओहायो राज्यातल्या गावी पोचणे एवढाच कार्यक्रम होता. काही बघण्यासाठी थांबायचं वगैरे नव्हतं. ठरल्याप्रमाणे व्हर्जिनिया राज्यातून निघून मेरीलँड, पेनसिल्व्हेनिया राज्य पार करून आम्ही ओहायो राज्यात पोचलो.
२३ सप्टेंबर २०१९ : मौमी, ओहायो ते मिलवाकी विस्कॉन्सिन
विस्कॉन्सिन राज्यातल्या मिलवाकी गावात हार्डले डेव्हिडसन मोटारसायकल्सचं म्युझियम आहे. आमच्या आजच्या प्रवासाचा आकर्षणबिंदू तो होता. लग्नाआधी मी कल्याणला राहात होते. तेव्हा तिथे दुचाकी गाड्यांचा सुळसुळाट झालेला नव्हता. लोकल ट्रेन हेच वाहतुकीचं मुख्य साधन होतं. त्यामुळे गर्दीने खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये शिरता येणे, हे कौशल्य गरजेचं होतं. दुचाकी चालवता येणं हा जरा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय होता. लग्नानंतर पुण्यात आले तेव्हा सगळीकडे दुचाक्यांचं साम्राज्य बघून थोडी भीती, थोडं आश्चर्य वाटलं होतं. आता मीही पक्की पुणेकर झाले. ‘दुचाकीबिना जीवन सुना’ अश्या पायरीला पोचले आहे. त्यामुळे आजच्या ह्या भारी-भारी मोटारसायकल बघायची खूप उत्सुकता होती.
शिवाय आज अजून एक विशेष म्हणजे आधी कधी आलो नव्हतो, अशा विस्कॉन्सिन राज्यात प्रवेश करायचा होता. आत्तापर्यंत ज्या राज्यातून प्रवास केला, म्हणजे मेरीलँड, पेनसिल्वेनिया, ओहायो, इंडियाना आणि इलिनॉय ह्या राज्यांमध्ये आधीच्या रोडट्रीपमध्ये येऊन गेलो होतो. तशा अर्थाने आज ट्रीपची खरी सुरवात होणार होती.
साधारणपणे म्युझियम बघायचं म्हणजे जरा जीवावर येतं. एका शेजारी एक अशा असंख्य गोष्टी बघायच्या, शेजारी असलेल्या बोर्डवर असलेली बरीच लांबलचक माहिती वाचल्यासारखं करून, चेहऱ्यावर ज्ञानात भर पडते आहे असे भाव आणून पुढे सरकायचं. शेवटी तर ह्या चालण्या-थांबण्याच्या खेळात पायांचे तुकडे पडतात. पण ह्या म्युझियमची रचना चांगली होती. ज्याला वाहनक्षेत्राबद्दल माहिती आहे अशांनाही आवडेल आणि वाहन म्हणजे एका जागेपासून दुसऱ्या जागी जाण्याचे साधन असे विचार आहेत, अशांनाही रस वाटेल ह्याची काळजी घेतलेली होती.
अगदी जुन्या वाफेवर चालणाऱ्या मोटारसायकलपासून ते आत्ताच्या आधुनिक बाईकपर्यंतची प्रगती बघता आली. लोकांनी हौसेने कलाकुसर करून नटवलेल्या बाईक्स होत्या. लेगोचे ब्लॉक्स वापरून तयार केलेली नेहमीच्या आकाराची बाईक होती. अगदी शेवटी काही बाईक्सवर बसून फोटो काढायची सोय होती, त्याचा आम्ही दोघांनीही फायदा घेतला! एरवी हार्ले डेव्हिडसनच्या बाईक चालवायची संधी मिळायची शक्यता कमीच.
लेगो ब्लॉक्सची बाईक
म्युझियमपासून मुक्कामाची जागा जवळच होती त्यामुळे संध्याकाळच्या गच्च रस्त्यांवर फार वेळ अडकावं लागलं नाही.
२४ सप्टेंबर २०१९ : मिलवाकी,विस्कॉन्सिन ते मिनियापोलीस, मिनेसोटा
आज साधारण पाच तासांचं अंतर कापायचं होतं. त्यामुळे सकाळी निवांत निघालो तरी चालण्यासारखं होतं. मेडिसन ह्या विस्कॉन्सिन राज्याच्या राजधानीपर्यंत पहिला टप्पा होता. तिथली कॅपिटॉल बिल्डीन्ग बघायची होती. आम्ही अमेरिकेच्या राजधानीपासून म्हणजे वॉशिंग्टन डी.सी.पासून अगदी जवळ राहतो. अमेरिकेत आल्याआल्या ज्या जागा बघायच्या होत्या, त्या यादीत व्हाइट हाऊस आणि कॅपिटॉल हिल सुरवातीच्या नंबरवर होते. तेव्हा अगदी खास वेळ काढून अमेरिकेचा राज्यकारभार जिथून केला जातो, ते कॅपिटॉल हिल बघून आलो होतो. त्याची भव्यता बघून प्रभावित झालो होतो.
आज बघायची होती, ती एका राज्याची कॅपिटॉल इमारत. भारताशी तुलना करायची, तर नवी दिल्लीतील संसद भवन अक्षरशः जाता येता बघत होतो. आज मुंबईमधील विधानभवन बघायचं होतं. वॉशिंग्टन डी.सी. मधल्या कॅपिटॉल हिलजवळ कार पार्क करायला मिळणं सामान्य माणसासाठी जवळपास अशक्यच. तिथे नेहमीच सुरक्षा कर्मचाऱ्यांची, पर्यटकांची भरपूर वर्दळ असते. इथेही तसंच असेल, लांब कुठेतरी कार पार्क करून चालत यावं लागेल, अशी खात्रीच होती. पण चमत्कार म्हणजे कॅपिटॉल बिल्डीन्गच्या अगदी जवळच जागा मिळाली. सगळं पार्किंग रिकामं होतं. आमच्या सावध स्वभावाला जागून आम्ही पुढेमागे जाऊन आपण ‘नो पार्किंग’ झोनमध्ये गाडी लावली नाहीये ना, असं पुन्हापुन्हा तपासलं. असं हवं तिथे पार्किंग मिळतंय म्हणजे काहीतरी गडबड आहे, अशी खात्रीच वाटत होती. पण तसं काही नव्हतं. बहुधा तिथलं अधिवेशन चालू नसल्यामुळे इतका शुकशुकाट असावा.
कॅपिटॉल बिल्डीन्गचं डिझाईन अगदी डी.सी.तल्या सारखंच होतं. इमारतीला प्रदक्षिणा घालत असताना मोनोना लेकची दिशा दाखवणाऱ्या पाट्या दिसल्या. अमेरिकेतलं हे ‘लेक किंवा तळं’ प्रकरण जरा वेगळंच असतं. आम्हाला कल्याणला ‘काळा तलाव’ अगदी लहानपणापासून माहिती होता. मग ठाण्याला जायला लागल्यावर ‘तलावपाळी’ माहिती झाली. त्यामुळे तळ्याचं डोळ्यासमोरचं मॉडेल साधारण ह्याच आकाराचं होतं. अमेरिकेतली तळी म्हणजे अफाटच मोठी! इथेही विस्तीर्ण जलाशय, शेजारी चालायला-बसायला-सायकलला जागा होती. पाणी असलेली जागा कधी निराश करत नाही. तिथे छानच वाटतं. थोडावेळ बसून परत गाडीच्या दिशेने निघालो.
पुढे मिनियापोलीस राज्यात प्रवेश केला आणि त्या राज्याची राजधानी सेंट पॉल इथली स्टेट कॅपिटॉल बिल्डीन्ग बघितली. पुन्हा मेडिसनसारखाच प्रकार होता. रिकाम्या पार्किंगच्या जागा आणि एकंदरीत शुकशुकाट. बिल्डीन्गचं डिझाईन पुन्हा एकदा डी.सी.च्या कॅपिटॉल बिल्डीन्गसारखंच.
आधीच आम्हाला प्रेक्षणीय जागा बघायचा आळस आणि त्यातून ह्या एकसारख्या इमारती. जरा निराश होऊन आम्ही जवळपास अजून काही पाहण्यासारखं आहे का? ते शोधायला गुगलबाबांना साकडं घातलं. १५ मिनिटांच्या अंतरावर मीनेहाहा पार्क आहे अशी खूषखबर कळल्यावर तातडीने त्या दिशेला गाडी वळवली.
दोन्ही स्टेट कॅपिटॉल बिल्डिंगजवळ फुकट आणि सोयीस्कर पार्किंग मिळालं होतं, त्याचं इथे पूर्ण उट्ट निघालं. एकतर त्या भल्यामोठ्या पार्कमध्ये नक्की कुठे थांबावं हेच कळेना. शेवटी एका ठिकाणी कार पार्क केली आणि नकाशाच्या मदतीने मीनेहाहा धबधबा शोधला. पार्क नेहमीप्रमाणे सुबक, स्वच्छ आणि सुंदर होतं. दिवसभर गाडीत बसून बसून पाय आखडले होते. चालताना बरं वाटत होतं. आरामात चालत त्या धबधब्यापर्यंत गेलो. फोटो काढले आणि पुन्हा गाडीत बसून मुक्कामाची जागा गाठली.
२५ सप्टेंबर २०१९ : मिनियापोलीस, मिनेसोटा ते लिंकन, नेब्रास्का
आजचा कार्यक्रम बराचसा कालच्यासारखाच होता. मिनासोटा राज्यातून निघायचं. आयोवा राज्य पार करून नेब्रास्का राज्यात मुक्काम करायचा होता. दोन कॅपिटॉल बिल्डीन्ग (हरे राम!) आणि एक शिल्प प्रदर्शन बघायचं होतं.
अमेरिकेत एकूणच लोकवस्ती विरळ. त्यातून आमच्या आताच्या रस्त्यात थोडी मोठी शहरं पार करत होतो तरी बराचसा रस्ता भलीमोठी शेतं किंवा गवताळ कुरणं असलेल्या भागातून जात होता. इतकी भलीमोठी शेती कशी करत असतील? असं कुतूहल वाटायचं. पण ते प्रश्न शेवटपर्यंत आमच्याच जवळ राहिले. काही मंडळींना कुठेतरी कोणीतरी मराठी बोलणारे, गेला बाजार भारताबद्दल विलक्षण आकर्षण असलेले स्थानिक लोकं भेटतात. आग्रह करकरून घरी राहायला-जेवायला बोलावतात. आमच्या बाबतीत तशातला काही चिमित्कार झाला नाही. तिथल्या लोकांच्या आयुष्याबद्दल जे कुतूहल वाटत होतं त्याचा एकमात्र उपयोग असा झाला की इतके दिवस इतके तास गाडीत बसून एकमेकांशी काय बोलायचं? हा एक गहन प्रश्न असतो. ‘अमेरिकेतील शेतीव्यवसाय व शेतकऱ्यांचे जीवन’ ही चर्चा स्फोटक होत नाही. असे बरेच सुरक्षित विषय आम्ही ह्या ट्रीपमध्ये चर्चेला घेत होतो!
तर नेहमीप्रमाणे निघून आम्ही नेहमीप्रमाणे आयोवा राज्याची राजधानी दी मॉइन इथे पोचलो. नेहमीप्रमाणे कॅपिटॉल इमारतीला एक प्रदक्षिणा घातली. जेवायची वेळ झाली होती. रोजचा ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये व्हायचा आणि रात्री घरचं वरण/ भाजी / पिठलं भात किंवा उपमा जेवायचो. दुपारी जेवताना जरा चॉईस असायचा. इथे कॅपिटॉल इमारतीजवळ फूडट्र्क दिसल्यावर आशा पल्लवीत झाल्या. फास्ट फूड व्यतिरिक्त काहीतरी खाऊ, अशा विचाराने तिथे गेलो. पण खाण्याचे फार काही आकर्षक पर्याय दिसले नाहीत. त्यामुळे ‘पुढे मिळेल काहीतरी’ असा विचार करून पुढे निघालो.
तिथेच जवळ एका बागेत एक कायमस्वरूपी शिल्पप्रदर्शन होतं. तिथे चक्कर मारली. हवा चांगली होती. छान उबदार, सोनेरी ऊन पडलं होतं. ऑफिसेस मधून जेवायला बाहेर पडलेली मंडळी उन्हात फिरत होती. त्यातच काही देशबांधव व भगिनी दिसल्या. ह्या लोकांची देशातून ‘अमरीकामे किधर रहता है?’ ह्या प्रश्नाचं उत्तर देताना किती तारांबळ होत असेल, ह्या विचाराने मला त्यांची जरा दया आली! कारण ह्या गावाचं नाव लिहिताना ‘Des Moines’ आणि उच्चारी ‘दी मॉइन’ आहे.
आम्ही जेवणाचा प्रश्न लांबणीवर टाकून पुढे निघालो. इतकं राजधानीचं गाव, मॅक डी नाहीतर के एफ सी असेलच पुढे, ह्या खात्रीने निघालो खरे, पण लगेचच शेतं आणि पवनचक्क्यांचा भाग सुरु झाला. तिथले थोडे फोटो काढले पण रिकाम्या पोटी त्यातही मजा येईना. कितीतरी अंतर गेलो तरी गावं नाहीतच. आता आज बिस्किटं आणि चिप्स खाऊन वेळ भागवावी लागणार, असं वाटत असताना एक सबवे सॅन्डविच आलं. पोटात अन्न गेल्यावर आम्ही माणसात आलो आणि पुन्हा कृषीविषयक चर्चा करायला लागलो!
नेब्रास्का राज्याची राजधानी लिंकन. तिथल्या कॅपिटॉल बिल्डीन्गला भेट देणे हाआजचा शेवटचा कार्यक्रम होता. एव्हाना बऱ्याच कॅपिटॉल बिल्डीन्ग बघितल्या होत्या त्यामुळे त्याबाबतीतला उत्साह ओसरला होता. इथे चटकन एक चक्कर मारायची, की हॉटेलमध्ये पोचून आराम करायचा अशी स्वप्नं मी बघत होते. डावीकडे लांब क्षितिजावर कॅपिटॉलचा घुमट दिसत दिसत होता. डावीकडे मान करून त्या घुमटाकडे बघताना पुढे लांबवर धुराचे लोट दिसत होते, तिकडे आधी लक्षच गेलं नाही. लक्ष गेलं तेव्हा कुठेतरी वणवा असेल किंवा कारखान्याचा धूर असेल असं वाटलं. पण इतका वेळ एका लयीत धावणाऱ्या गाड्या अचानक थांबलेल्या दिसल्या, तेव्हा पुढे रस्त्यावरच काहीतरी अपघात झाला आहे, हे लक्षात आलं. एव्हाना दोन्हीकडची वाहतूक पूर्णपणे थांबली होती. घरातून निघाल्यापासून अगदी ठरवल्यासारखा प्रवास होत होता. अडकायला असं झालं नव्हतं. आता इथे मात्र सगळं ठप्प झालं.
अर्धा तास झाला, तरी आमच्या बाजूची परिस्थिती जैसे थे होती. दुसऱ्या बाजूने मात्र काही वाहने येताना दिसत होती. रस्त्याच्या दोन्ही भागांमध्ये मोठा खड्डा होता. थांबायचा कंटाळा येऊन काही जण यू टर्न मारून तो खड्डा पार करून विरुद्ध बाजूला सामील होत होते. आमची काही ते धाडस करायची हिम्मत झाली नाही. एक भलामोठा ट्रेलर-ट्रक कारसारखा यू-टर्न मारायला गेला आणि खड्ड्यात अडकला! त्याला आता पुढेही जाता येईना आणि मागेही येता येईना. इतका वेळ बसून सगळ्यांनाच कंटाळा आला होता, त्यांच्या करमणुकीची जबाबदारी त्या ट्रकवाल्याने आपणहून स्वीकारली होती. त्याची गंमत बघताना थोडा वेळ बरा गेला. असा तास-दीड तास गेल्यावर मुंगीच्या वेगाने आमच्या पुढच्या गाड्या हलायला लागल्या. तीन लेनची एक लेन झाली होती, त्यामुळे अगदी सावकाश जात जात आम्ही अपघाताच्या जागी आलो. दोन ट्रकची जोरदार टक्कर होऊन आग लागली होती. ट्रक आणि त्यातल्या सामानाचा अक्षरशः कोळसा झाला होता. नंतर बातम्यांमध्ये ऐकलं की इतका मोठा अपघात होऊनही जीवितहानी झाली नव्हती. ते कळल्यावर जरा बरं वाटलं. ह्या सगळ्या भानगडीत इतका उशीर झाला, की आम्ही कॅपिटॉलला जायचा बेत रद्द करून थेट हॉटेल गाठलं.
उद्याच्या टप्प्यात साऊथ डाकोटा राज्यातल्या माउंट रशमोर ह्या जागेला भेट द्यायची होती. जसं भारत म्हटलं की परदेशी लोकांच्या डोळ्यासमोर ताजमहाल, वाराणसीचे घाट येत असतील, तसं माझ्या डोळ्यासमोर अमेरिका म्हटल्यावर येणाऱ्या चित्रातलं एक चित्र माउंट रशमोरच्या पुतळ्याचं होतं. पण तिथे पोचण्यासाठी आत्तापर्यंत रोज जेवढं अंतर कापत होतो, त्यापेक्षा बरंच जास्त अंतर पार करायचं होतं. वेळेच्या गणितात सगळं बसेल ना? असे विचार करत आजचा दिवस संपला.
रोजचा दिवस असे काहीतरी वेगवेगळे रंग दाखवत होता. आजची सुरवात ऐटबाज कॅपिटॉल बिल्डिंग बघून झाली. त्यानंतर भुकेले तास. संध्याकाळी बरेच तास रस्त्यात अडकल्यामुळे ठरवलेला कार्यक्रम बदलावा लागला. पण दिवसाच्या शेवटी फार उशीर न होता मुक्कामाच्या जागी सुरक्षित पोचणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. कुठलाही प्रवास असो, ‘कुछ खोना, कुछ पाना’ हेच आलंच की..
भाग पहिला कल्पना, संशोधन, तयारी आणि खूप काही!
भाग दुसरा व्हर्जिनिया ते नेब्रास्का
माझं बाकीचं लिखाण वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या