पुरणपोळी मोहीम हमखास यशस्वी होण्यासाठी टिप्स

पुरणपोळी मोहीम हमखास यशस्वी होण्यासाठी टिप्स...

साधारण एक महिना आधीपासून तयारी सुरू करावी. तुमचे काही लोकल वॉटसॅप गृप असतील तर तिथल्या चर्चांवर बारीक लक्ष ठेवावे. फेसबुक गृप असेल तर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा. नॉर्मली २०-२५ दिवस आधी ' आमच्या कडे परफेक्ट गोड, परफेक्ट गोल, मऊ , लुसलुशीत पुरण पोळ्या ऑर्डरवर करून मिळतील' अशी पोस्ट कोणी ताई टाकतेच. लगेच घाईघाईने ऑर्डर नोंदवायची नाही. मोहीम फसू शकते, आर्थिक नुकसान होऊ शकते.
अशा वेगवेगळ्या ५-६ तायांच्या पोस्टी आल्या की आपले काम अजूनच वाढते. कुठल्या ताईच्या पोळ्या खरंच चांगल्या ( आणि बजेटात बसणाऱ्या) असतात याचा सर्वे करायचा. त्यासाठी किमान पाच तरी बायकांनी त्या ताईंसाठी 'शाउटाउट' पोस्ट केलेला असला पाहिजे. मग एक - दोन ताई फायनल करायच्या. त्याना वॉटसॅप करून चौकशी करायची पण लगेच ऑर्डर द्यायची नाही. Will cum bk to u असा फर्रेदार इंग्रजीत मेसेज करायचा.
मग ५-६ दिवस उरले असताना अंदाज घ्यायचा. यात थोडी रिस्क आहे कारण ज्या ताई तुमच्या लिस्टीत १ल्या नंबरवर असतात त्या 'आता ऑर्डर घेणे बंद' असा बोर्ड लावू शकतात. पण धीर सोडायचा नाही.लगेच घाईघाईने ऑर्डर नोंदवायची नाही. मोहीम फसू शकते, आर्थिक नुकसान होऊ शकते.
काही वेळा कॉम्पिटिशनचा अंदाज घेऊन काही ताई रेटस् कमी करण्याची शक्यता असते. पण तसे झाले नाही तर चारच दिवस उरले असताना आपण अजून वाट बघायची नाही. लगेच एक ताई फायनल करून ऑर्डर द्यायची. आणि ऑनलाइन पेमेंट करून गरमगरम पुपोची स्वप्नं बघत ताणून द्यायचे.
मग आपण काहीच केले नाही असे नवऱ्याने म्हणू नये म्हणून एक दिवस आधी लोणी कढवून तूप तयार करायचे.
दुसरे दिवशी पोळीचे पार्सल हातात पडताच हावरटासारखे पॅकिंग उघडायचे. आत खुदकन् हसणाऱ्या पुपो पाहिल्या की जीव एकदम गार गार होतो. मग अजिबात वेळ दवडता पोळ्या मावेत गरम करायच्या आणि तुम्ही स्वतः कष्ट करून कढवलेलं ताजं साजूक तूप त्यावर ओतायचं आणि पोळी छान कुस्करून घास घ्यायचा. नवरा आणि लेक जास्त तूप घातलं म्हणून कुरकुर करतील तिकडे लक्ष द्यायचे नाही. 'गूळ गरम पडू नये, चणा डाळीमुळे गॅस होऊ नये, पोळी पचावी म्हणून तूप घ्यायचं' हे अशाच कुठल्या तरी गृपवर मिळालेलं ज्ञान त्यांच्या पुढे मांडायचं आणि आपण स्वतः कष्ट करून कढवलेल्या ताज्या साजूक तूपात भिजलेली पुपो हाणायची मस्त पैकी.
गेले महिनाभर केलेल्या कष्टांचं चीज ( की पुरण?) झालेलं असतं. परफेक्ट गोड, परफेक्ट गोल, मऊ, लुसलुशीत पुरण पोळी तुम्हांला खायला मिळालेली असते.
पण खरं सांगू का.. तिसरी पोळी संपता संपता जेव्हा लेक म्हणते ना,"आई, पोळ्या छानेत. पण तुझ्या पुपो जास्त चांगल्या असतात." तेव्हा जो आनंद होतो ना.. तो अनमोल असतो.

तळटीप - लेकीच्या अभिप्रायाने कितीही इमोशनल व्हायला झाले तरी लक्षात ठेवायचे.... आपण या जाळ्यात फसून घरी पोळ्यांचा घाट घालायचा नाही. लक्षात ठेवा... तुम्ही अशी सोपी कामं करायला जन्माला आला नाहीत. तुम्ही ' मोहीम पुपो' सारखी कष्टदायक कामंच करावीत अशी बाप्पाची इच्छा आहे.
Do something different.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle