अपरिग्रह मनाचा !

Screen-Shot-2019-10-10-at-9.32.01-PM.png
अपरिग्रह मनाचा !
मला लहानपणापासून आयुष्याविषयी फार प्रश्न पडतात , त्यात नैराश्य नाही (मी एक आनंदी मुलगी आहे) तर केवळ निखळ जिज्ञासा असते. आई कोरोनाने गेल्यापासून मला मृत्यु विषयी सुद्धा प्रश्न पडायला लागले. एकदम अदृश्य झाली ती , मला काही सांगायचं बोलायचं असेल तिला , निरोपसुद्धा नाही घेतला. मी सातासमुद्रापार , काही अर्थ नाही कशाला. काही तरी आयुष्याशी नातं होतं त्यातून स्वतंत्र वाटायला लागला, म्हटलं तर निर्मूळ म्हटलं तर मुक्तं. नेमक्या कुठल्यातरी भावना आपण पकडून ठेवतो व त्याला आयुष्यं समजतो, समजा एकेदिवशी त्या भावनाचं अदृष्य झाल्यानंतर जे उरते ते काय असते ??! म्हणजे जी आधी होते ती मी होते की ही उर्वरीत मीच खरी मी आहे.

माणूस म्हणजे भावनांच्या संचयाने ओतप्रोत असलेला मातीचा गोळा आहे. मृण्मयं आहे , मगं या मृण्मयातलं चिन्मयं कुठे आहे?! सारखं काही नं काही गोळा करायचं आणि त्यामुळे होणाऱ्या परिग्रहाच्या व्याप्तीवरून आयुष्याचं सामृद्ध्यं जोखायचं. दृश्य-अदृश्य ओझं जपायला जीवाचं रान करायचं , जणू हीच आपली ओळख आहे. ठराविक आकाराची माती, ठराविक आवडीनावडी, ठराविक सुखदुःख, भावना , आनंद, राग, लोभ हा पसारा म्हणजे आपली अस्मिता. आयरनी ! झालं एवढंच??

अष्टांगयोगातले अपरिग्रह कसं जमायचं मगं, कारण त्याग नेहमी बाहेरचं पाहिलायं. भौतिक गोष्टींचा त्याग करून किंवा कमी संग्रह करून या नियमाचे पालन करणे हीच या शब्दाची ढोबळ व्याख्या आहे पण ती अपूर्ण-अर्धवट आहे . मनातल्या भावभावनांच्या संग्रहाचं काय , त्याचही आयुष्यात ओझंच होतं. यातला समतोल साधताना फेफे उडते, काय ठेऊ काय नको होते. फक्त भौतिक गोष्टींचा अपरिग्रह नसतो तर सूक्ष्म भावनांचा अपरिग्रह सुद्धा असतो. जेव्हा तुम्ही भावनांचा संचय कमी करता तेव्हा तुमच्या विचारातही स्पष्टता येते.

9dccd00bdd0d8883ef61ecee1ee0bcdb.jpg
सध्या बाहेरच्या जगात जे काही चाललयं त्याचे आपल्या मनावर दूरगामी परिणाम होत आहेत. कदाचित आपली पिढी हे आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या दृष्टीने हे समुद्रमंथन आहे. मनाचं ,समाजाचं, सगळ्याच चांगल्यावाईटाचं. हलाहल पिणे क्रमप्राप्तच आहे. जे तरीही यातून आत्मविश्वासाने बाहेर पडतील ते अमृतासम राहतील. कितीही प्रयत्न केला तरी याच्यापासून दूर रहाणं अशक्य आहे. कितीही सकारात्मकता बाळगली तरी ती पोकळ ठरू शकते. कारण बाहेर काहीही सकारात्मक नाही. अशी टेकू दिलेली सकारात्मकता मला अर्थहीन वाटते. कारण चांगले झाले पाहिजे आणि मला चांगले दिसले पाहिजे मगं माझ्या मनात चांगले सकारात्मक विचार येतील. बापरे ,किती त्या अटी. बाहेरचे सगळे टेकू काढले तर दोन दिवसात नैराश्य येईल, हे मला अजिबात पटत नाही. जितक्या अटी तितके आपण बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. ज्या क्षणी अटी संपतील त्या क्षणी तुम्हाला खरी सकारात्मकता , जीवाचे तेज पहायला मिळेल. हे तेज सगळ्यांसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण सतत दूर लोटले गेलेले आहे. भावनिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं हा खरा अपरिग्रह.

एक जीव म्हणून स्वतःच स्वतःला वचन द्यायचं , कितीही चिता जळताना पहाव्या लागल्या तरी मी यातून बाहेर पडेनच , मी माझं उत्तम करेनच कुणाला कळले नाही तरी चालेल , कशीही परिस्थिती असो , कुठलीही व्यक्ती असो मी manipulate होणार नाही. You don't know how strong you are until being strong is your only option. भावनांचं निरिक्षण करायचं आणि त्यांना जाऊ द्यायचं. साठवायचं नाही , जितके रिक्त असू आयुष्याचा प्रवास तितका सहज होतो. It is very hard to be something, but it is way too harder to be nothing.

मन अग्नी सारखे अन्ध असते , त्याला भक्ष्य आणि अभक्ष्य यातला फरक कळत नाही. असं कोपिंग मेकेनिजम बनवायचं की कमीतकमी दाह जाणवावा. मनातही कमीतकमी पसारा ठेवायचा, सुखातही फार रमायचं नाही कारण मगं मन दुःखाचे चटके जास्त बसवते. सुखाला चटावलेले असते ते , आपल्याला सहज सळोकीपळो करते. मन जितकं रिक्त तितका आयुष्याचा प्रवास सोपा , हलका. प्रत्येक आनंदाची, दुःखाची, रागाची, अपेक्षाभंगाची गोष्ट यज्ञातल्या घृतासारखा त्याचा उष्मा वाढवते. त्याची शक्तीच काढून घ्यायची. निर्विचार असणं अशक्य आहे पण कमीतकमी भावना मनामध्ये राहू देणं कठीण नाही. 'अनुगच्छन्तु प्रवाहं' म्हणत पुढे पुढे जात रहायचं. मनाचा अपरिग्रह जमवत , सगळे 'आतले' पिंजरे तोडत ... शाश्वत सुख म्हणजे शुन्यातून शुन्याकडे !!

धन्यवाद 
©अस्मिता

चित्रं आंतरजालाहून आभार.
Internalyoga magazine.com
वेमा अनुमती नसेल तर कळवणे , काढण्यात येतील.
मायबोलीवर पूर्वप्रकाशीत.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle