लीलाताई

आज लीलाताईंचा वाढदिवस. गेलेल्या माणसांचा वाढदिवस म्हणतात का? लीलाताईंसमोर 'गेलेल्या' असं कोणाबद्दल म्हटलं असतं तर त्यांनी लगेच 'वारलेल्या' अशी सुधारणा केली असती. मृत्यूचं अवास्तव स्तोम त्यांना आवडायचं नाही. पटायचं नाही. आमच्या आधीच्या एका बॅचची सहल स्मशानात नेऊन त्यांनी बऱ्याच जणांचा रोषही ओढवून घेतला होता. अर्थात, त्यांना न पटणाऱ्या गोष्टी मला पटू शकतात हे विचारस्वातंत्र्यही त्यांनीच रुजवलेलं आहे.
तर लीलाताई माझ्या प्राथमिक शाळेच्या संस्थापिका आणि मुख्याध्यपिका. शिक्षणतज्ज्ञ प्रा. लीला पाटील. आज त्यांचा वाढदिवस असतो/असायचा. म्हणून त्यांची आठवण आली. मागच्या वर्षी त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेला लेख इथे परत प्रकाशित करतेय.

4C2FDD7E-3B68-47DF-ADEB-FC755C84A616.jpeg

*******
लीलाताई गेल्या. निशांतचा मेसेज आला.
लीलाताई.
मी पहिल्यांदा लीलाताईंना भेटले तेव्हा मी पहिलीत होते आणि त्या साधारण ६५-७० वर्षांच्या. (सृजन आनंद शाळा त्यांनी १९८५ साली निवृत्तीनंतर सुरु केली आणि मी १९९४ साली पहिलीत होते त्यावरून हा माझा अंदाज.) पहिला भेटीचा प्रसंग वगैरे आठवत नाही पण आठवतं लीलाताईंचं असणं, त्यांचा वावर आणि त्यांचं बोलणं; शुभ्र पांढऱ्या किंवा तसल्याच फिक्कट रंगांचे, खादीचे सलवार -कुडता घालणाऱ्या, जेमतेम ५ फूट उंचीच्या लीलाताई माझ्या आज्जीपेक्षाही वयाने मोठ्ठ्या होत्या पण त्यांच्याशी वागता-बोलताना त्यांच्या वयाच्या, ज्ञानाच्या आणि कर्तुत्वाच्या मोठेपणाचं दडपण कधीच जाणवलं नाही. आमच्यातल्याच वाटायच्या त्या. क्वचित कधीतरी साडी वगैरे नेसून आल्या की मी बिनधास्त जाऊन त्यांना विचारायचे की आज साडी का नेसली तुम्ही?
"ही माझी सासू आहे " त्या गमतीने म्हणत.
*******
कोणी मला विचारलं की कशा होत्या लीलाताई? तर खंबीर, स्पष्टवक्त्या आणि तत्ववादी. लहान मुलांच्याविषयी प्रचंड प्रेम, त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या आनंदासाठी सतत प्रयत्न करत असत. मला लीलाताईंनी कधी उगाच जवळ घेवून लाड केलेत किंवा किती गोड आहे किंवा कधी लहान म्हणून कौतुक केलंय असं आठवत नाही. पण त्यांनी नेहमीच एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदराने वागवलेलं जाणवतंय.
*******
२री -३रीत असेन. क्रीडा महोत्सव म्हणजे काय, स्पर्धा , जिंकणे-हरणे ह्या गोष्टी समजायला लागल्या होत्या ते वय. लहानपणापासून भातुकली सारखे बैठे खेळ आणि पुस्तकात रमणारी मी, मैदानी खेळांत फक्त खेळांच्या तासापुरती लुडबुड करत असे. खेळाच्या तासाला पण कुठे मैदानावरच्या वाळूतले शंख शोध, कुठे झाडावर सापडलेल्या अळीचं निरीक्षण कर असलेच उद्योग चालंत; अर्थात शाळेच्या तत्वांप्रमाणे माझ्यावर कसली सक्ती पण होत नसे. पण ह्या सगळ्यामुळे क्रीडा महोत्सवात माझी कामगिरी अगदीच नगण्य होती. आणि माझा एक मित्र नीरज सगळ्या स्पर्धा जिंकत होता. तो जिंकतोय आणि मी पहिल्या फेरीतूनच मागे ह्याचा मनाला त्रास होत होता. मैदानावरून शाळेत आले तर समोर लीलाताई दिसल्या, त्यांना बघून मी हमसुन हमसुन रडायला लागले. काय झालं, पडलीस का, लागलंय का अशा प्रश्नांवर मी सांगून टाकलं की नीरज सगळ्या स्पर्धा जिंकतोय आणि मी काहीच नाही म्हणून मला वाईट वाटून रडू येतंय. लीलाताईंनी आधी मला पूर्ण रडू दिलं मग तिथेच एका बाजूला बसून इतकं छान समजावून सांगितलं की प्रत्येकजण कशात न कशात तरी चांगला असतो, नीरज खेळात चांगला आहे, तू दुसर्या कशात तरी चांगली आहेस पण म्हणून वाईट वाटून का घ्यायचं? प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येक जण चांगला आहे. गुलाबाचं झुडूप असतं, नारळाचं झाड उंचच उंच पण दोन्ही आपापल्या जागी चांगलीच आहेत असं काय काय समजावून सांगितलेलं. ते इतकं फिट्ट बसलाय मनात की कधी कोणाची असूया किंवा स्पर्धा अशी वाटलीच नाही. कधी वाटतं माझ्यात competitive spirit च नाही किंवा मी खूप आत्मसंतुष्ट आहे; अर्थात त्यामुळे काही बिघडलंही नाही म्हणा !
*******
हा नक्कीच ४थी मधला प्रसंग - काही कारणाने आई आजारी होती, त्यामुळे रजेवर होती. ज्यांची आई ऑफिसला जाते त्यांनाच आई घरी असण्याचं महत्व कळेल. मलातर आई घरी असेल ते दिवस खूप भारी वाटायचे, पाळणाघरात जाणं टळायचं, रिक्षामामा घ्यायला आले की रिक्षात बसताना आईला टाटा करता यायचं, संध्याकाळी घरी आल्यावर आई वाट बघत बाहेर उभी असायची. तर अशा कारणांमुळे मला आईचं घरी असणं खूपच आवडायचं. अशाच एका दिवशी मी गडबडीत डब्यासोबत सफरचंद घेऊन जायला विसरले. ते सफरचंद टेबलावर तसंच राहिलेलं आईला दिसलं आणि तिला राहवलं नाही म्हणून माझ्या डब्याच्या सुट्टीच्या वेळेस ती सफरचंद घेवून शाळेत आली (जेणेकरून मला डबा खाल्ल्यानंतर सफरचंद खाता येईल ). जनरली पालक सभेला वगैरेच शाळेत येणाऱ्या आईला असं अवेळी आलेलं बघून लीलाताईंनी कारण विचारलं मग त्यानी तिचं पण जरा बौद्धिक घेतलं - नोकरी करणाऱ्या आईच्या मनात असलेला अपराधीपणा काढून टाक, एकुलती एक म्हणून अति लाड किंवा अति लक्ष देवू नको, तिला(सिद्धीला) शेअरिंगची सवय लाव असं काय काय (हे मला आईने नंतर मोठी झाल्यावर सांगितलं ). मी डबा खायच्या आधी हात धुवायला म्हणून बाहेर आले तर मला आई आणि लीलाताई दिसल्या मग लीलाताईंनी मला सांगितलं की हे सफरचंद सगळ्या वर्ग-मित्रांत वाटून खा . मी परत आईकडे वळले -चिरून दे म्हणून त्यावर लीलाताईंनी मला विजयाताईंकडून सुरी घेवून त्यांच्या समोरच छोटे छोटे ३६ तुकडे करायला सांगितले विजयाताईंकडची सुरी मोठ्ठ्या पात्याची होती, मी त्याने चिरणार म्हणून आईचा जीव वर खाली होत होता. मी कुठेही लागून न घेता ते सफरचंद चिरून वर्गात वाटलं. हे सगळं झालं. पण लीलाताईंना माहिती होतं की मी एकुलती असल्याने शेअरिंगची सवय नव्हती, मी आई-बाबांबद्दल खूपच possessive होते, आई माझ्या सगळ्याच गोष्टींची खूप काळजी करायची त्यामुळे मला अप्रत्यक्षरित्या आणि आईला स्पष्टपणे त्यांनी समजावयाचा प्रयत्न केला होता.
*******
एकदा लीलाताई कोणत्यातरी अधिवेशनात / संमेलनाला जाणार होत्या. त्यांना तिथे मुलांनी केलेल्या गोष्टी / मुलांचं लेखन असं काहीतरी दाखवायचं होतं म्हणून मी केलेला एक तक्ता हवा होता. तर तो तक्ता रिक्षातून शाळेत नेताना फाटेल वगैरे म्हणून एके संध्याकाळी मी आणि आई लीलाताईंच्या घरी घेवून गेलो. लीलाताई आणि आई बोलत असताना मला त्यांच्या टेबलावर एका मुलाचा फोटो दिसला.
"हा कोण आहे लीलाताई ?"
"हा माझा मुलगा आहे . "
"कुठंय तो आत्ता ?"
"इथेच आहे. "
"मी शोधू ?"
"हो. "
मग मी त्यांच्या घरात शोधायला लागले. बाहेरच्या खोलीत बापूसाहेब (लीलाताईंचे पती) पुस्तक वाचत बसले होते . आतल्या खोलीत, स्वयंपाक खोलीत, बागेत कुठेच मला तो दादा दिसला नाही.
तोवर रिमझिम पाऊस सुरु झालेला आणि तो वाढायच्या आत घरी पोहोचू म्हणून आई मला घेऊन निघून आली. तरी निघताना लीलाताईंना सांगितलंच.
"दिसला नाही तो दादा मला घरात "
"घरातच आहे ग तो - वर गच्चीत असेल "
ह्यानंतर खूप म्हणजे १०-१२ वर्षांनी लीलाताईंचा एक लेख वाचण्यात आला, हा नेहमीसारखा शाळेबद्दल किंवा शिक्षणपद्धतीबद्दल नसून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलचा होता. त्यांत कळलं की लीलाताईंचा मुलगा तरुणपणी अपघातात गेला होता, त्याच्या अकाली जाण्याचं, नोकरी -व्यावसायिक बांधिलकीमुळे त्याच्याकडे नीटसं लक्ष न देता आल्याचं शल्य आत-आत दाबून टाकून, त्याला सदैव सोबत घेवून जगत होत्या त्या.
*******
आमच्या चौथीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आमच्यासाठी शाळेच्यापण शेवटच्या दिवशी, लीलाताईंसोबत आमचा गप्पांचा तास चालू होता. लीलाताई म्हणाल्या, "शाळेतून जाणार्या प्रत्येकाचं मी एक नाव ठेवते; तुम्ही मला काय म्हणून लक्षात राहाल, माझ्यासाठी तुम्ही कोण आहात असं. तर ते मी तुम्हाला सांगते." असं म्हणून लीलाताई त्यांच्या डायरीतून वाचून दाखवू लागल्या. गणितात हुशार असणाऱ्या देवदत्तचं नाव त्यांनी आर्यभट्ट लिहिलं होतं, नाच करणारी सोनू 'नाचे मयुरी' होती. आम्हाला मजा वाटत होती; आपलं नाव कधी येतंय याची उत्सुकता तर होतीच पण तास संपला आणि काही नावं सांगायची राहिली. वर्गाबाहेर पडणाऱ्या लीलाताईंना दारात गाठून मी विचारलं की माझं नाव काय ठेवलाय ते सांगा ना. त्या म्हणाल्या, 'आता नाही. तू मला संध्याकाळी फोन कर, मी फोनवर सांगते.' संध्याकाळी आठवणीने फोन केला: "लीलाताई मी सिद्धी , माझं काय नाव ठेवलंय सांगा ना." लीलाताई म्हणाल्या, "तुझं नाव मी अमृता ठेवलंय."
" हे कसलं नाव ? किती कॉमन आहे हे नाव. हे का ठेवलं ? मला नको हे नाव. " मी माझी निराशा लपवायची मुळीच काळजी घेतली नाही. आर्यभट्ट वगैरे सारखं वेगळं तर नाहीच. कमीतकमी झाशीची राणी तरी ठेवायचं.
"अगं तू पूर्ण ऐकून तरी घे, अमृता प्रीतम असं नाव ठेवलंय आणि तू अमृता प्रीतमसारखी संवेदनशील आहेस, असं मला वाटतं म्हणून ठेवलंय. अजून थोडी मोठी झालीस की तू अमृता प्रीतमने लिहिलेलं वाचावंस, असं मला वाटतं म्हणूनही मी तुझं नाव ते ठेवलंय." लीलाताईंचं संयत आवाजातलं ते उत्तर अगदी ऐकू येतंय आतासुद्धा मला. संवेदनशील म्हणजे काय हेही कळत नव्हतं. ५वित गेल्यावर, नंतरच्या शाळेत, पहिल्याच तासाला जेव्हा नैतिक मुल्यं शिकवली गेली तेव्हा संवेदनशीलता ह्या नैतिक मूल्याकडे जरा जास्तीच लक्ष दिलेलं आठवतंय.
अजून थोडी मोठी होवून जेव्हा अमृता प्रीतम ह्यांचं साहित्य वाचलं, त्यांच्याबद्दल वाचलं तेव्हा जाणवलं की हे नाव देवून लीलाताईंनी मला किती मोठ्ठ्या उंचीवर नेलं होतं. लीलाताईंना परत फोन करून सांगावसं वाटलं की "मला नको हे नाव, मी ह्या नावाच्या मुळीच लायक नाही".
*******
पुढे बाप-लेकी वाचलं - लीलाताईंचा लेख वाचून आतून किती किती तुटून आलं, ना. सी. फडक्यांचा किती किती राग आला, अपरात्री वडीलांच्या दुसऱ्या घरी जाऊन त्यांना हाका मारणाऱ्या, वडीलांकडून परकेपणाची वागणूक सहन करून तशा दारातूनच माघारी फिरावं लागलेल्या लहान लीलाताईंना एक गच्च मिठी मारावी, 'तू एकटी नाहीस, मी आहे.' असं सांगावं वाटलं. हे सगळं घडून गेलंय, आपण काहीही बदलू शकत नाही ह्याची जाणीव होवून असहाय्य वाटलं, कोणत्या ना कोणत्या प्रकारे लीलाताईंपर्यंत पोहोचावंसं वाटलं, त्यांच्याशी फोनवर तरी बोलू म्हणून हातात घेतलेला रिसिव्हर काय बोलायचं हे न समजल्याने खाली ठेवला.
*******
एकदा मी घरी एकटी असताना लीलाताईंचा फोन आला. अर्थात त्यांना माहिती नसावं की कोणाचा नंबर लागलाय किंवा त्यांच्याकडे फक्त नंबर असेल, नाव नसेल/गहाळ झालं असेल. तर त्यांनी हॅलो म्हटल्यावर विचारलं ,"कोणाला फोन लागलाय?" असे अनोळखी फोन आल्यावर आपली माहिती द्यायची नाही, असं शिकवलं गेल्यामुळे मी विचारलं, 'तुम्ही कोण बोलताय ?' त्या म्हणाल्या, 'फोन कुठे लागलाय ते तरी सांगा.' मी 'तुम्ही फोन केलाय. तुम्ही सांगा.' वर कायम. मग त्यांनी वैतागून फोन ठेवला आणि थोड्यावेळाने मला लिंक लागली - तो आवाज लीलाताईंचा होता. नंतरच्या भेटीत त्यांना ह्या फोनचा संदर्भ द्यायचं राहूनच गेलं.
*******
शाळा सुटली तरी ह्या ना त्या कारणाने लीलाताईंशी भेट होत होती, दहावीच्या निकालानंतर मित्र-मैत्रिणी मिळून शाळेत गेलो होतो तेव्हा, कधी नाटकाला, कधी फिल्म सोसायटीच्या सिनेमांना त्या भेटत. आवर्जून चर्चा करत. अजूनही आमची पिढी काय विचार करते, काय वाचते, कसे निर्णय घेते ह्याबद्दल त्या उत्सुक असत.
लीलाताईंना शेवटचं भेटले तेव्हा मी इंजिनिअर होत होते; मी, निशांत आणि सई आम्ही तिघं त्यांना भेटायला गेलो होतो; ९ ची वेळ ठरली होती पण ९ ला त्यांच्याकडे नरेंद्र दाभोलकर आल्यामुळे त्यांनी फोन करून १०ला यायला सांगितलं. त्याही भेटीत आमच्यात बऱ्याच विषयांवर चर्चा झाल्या. शिक्षण, लग्न, पुढचे प्लॅन वगैरे वगैरे. लीलाताई म्हणाल्या की तुम्ही आंतरजातीय लग्न केलंत तरच मी तुमच्या लग्नाला येईन. माझा मुद्दा होता जर मला आवडणारा, माझ्यासाठी सर्व दृष्टीने योग्य वाटणारा मुलगा मला माझ्या जातीत/धर्मात सापडला असेल तर केवळ आंतरजातीय लग्न करायचं म्हणून मी त्याला का सोडून देऊ ? मग त्या म्हणाल्या की तसं असेल तर लग्न साधेपणाने करून त्या पैशात एखाद्या संस्थेला देणगी वगैरे दे; थोडक्यात आम्ही रूढी-परंपरात न अडकता काहीतरी समाजासाठी उपयुक्त करावं अशी त्यांची इच्छा होती. नंतर २वर्षांनी लग्न केलं तेव्हा मी लीलाताईंना बोलावलंच नाही कारण एक तर मी माझ्याच जातीतल्या मुलाशी लग्न केलं, शिवाय व्यवस्थित साग्रसंगीत, वैदिक पद्धतीने. असो. तर लीलाताई ह्या लीलाताई असतानाची झालेली ही शेवटची भेट.
*******
नंतर त्यांची तब्येत फारच बिघडत गेली. पाच वर्षांपूर्वी ज्यांना भेटले त्या लीलाताई मुळीच वाटत नव्हत्या. त्यांनी मला ओळखलं नाही (ह्याबद्दल आधी बर्याच मित्र मैत्रिणीनी वाॅर्निंग दिली होती.) मी शाळेतले निरनिराळ्या प्रसंगी काढलेले फोटो घेवूनच गेले होते. फोटोतली सिद्धि त्यांना आठवत होती पण दर १० मिनिटांनी त्यांच्या 'तुम्ही कोण?' ह्या प्रश्नाला 'तीच मी आहे' असं सांगणं मला त्रासदायक होत होतं. मुळात त्यांच्या डोळ्यात माझ्याप्रति अनोळखीपणा सहनच होत नव्हता.
जुन्या फोटोत रोहिणीताईंचा फोटो बघून "रोहिणी खूप लहान वयात गेली " म्हणून रडणाऱ्या, थोड्या थोड्या वेळानी "तुम्ही कोण, तुम्ही काय करता" विचारणाऱ्या, मध्येच "तू किती छान दिसतेस, तुझे डोळे किती छान आहेत" म्हणणाऱ्या ह्या लीलाताई नव्हत्याच. लीलाताईंनी कधीच कोणाला बाह्य-रूपासाठी कॉम्प्लिमेंट दिलेली आठवत नाही. म्हणजे "गोरी -गोरी पान , फुलासारखी छान " ऐवजी "हसणारी खेळणारी गाणारी छान " असं गाणं शिकवणाऱ्या लीलाताई , ह्या असूच शकत नाहीत असं वाटत होतं.
पूर्वी जेव्हा जेव्हा लीलाताईंना भेटायला जायचे ते वेळ घेवून. आणि वेळ संपली निघायचं हेही ठरलेलं असे. गप्पा कितीही रंगल्या असल्या तरीसुद्धा. पण ह्या वेळेस जायची वेळ आली तशी लीलाताईंच्या हातातून हात सोडवून घेणं अवघड होत गेलं, "अजून थोडा वेळ थांब ना, परत येशील ना, मी तोपर्यंत असेन ना" म्हणत हळव्या होणार्या लीलाताई माझ्यासाठी सर्वस्वी नव्या होत्या, वेगळ्या होत्या.
कायम खंबीर आणि कणखर अशा पाहिलेल्या, अनुभवलेल्या लीलाताईंचं असं रूप पाहणं माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक ठरलं. तसं नसेलही, पण तुटून गेल्यासारख्या वाटल्या त्या मला. आयुष्यभर घेतलेलं कणखरपणाचं कवच शेवटी शेवटी पेलवेना झालं का त्यांना? का आयुष्यभर सोसलेले घाव असे उफाळून आले?
लीलाताई, तुम्हाला रेस्ट इन पीस तरी कसं म्हणू?

- सिद्धि

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle