कोरोना आला पाहुणा:
मंडळी किती लपवलं होतं आमचं घर त्याच्यापासून वर्षभर! नजर पडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत होतो घरातले सगळे मेम्बर्स!! तरीही त्याचं लक्ष गेलं कसं काय ते महत्त्वाचं नाही पण गेलं हे खरं...हळूच शिरकाव करत त्याने एकेकावर आपला अंमल दाखवायला सुरुवात केली. एक दोन दिवस ताप हळूहळू करत सगळ्या चौदा जणांवर आपला प्रभाव दाखवू लागला.
वेगळं राहणं एवढया माणसात अशक्य होतं. आधी जेष्ठ मंडळींना टेस्ट करून ऍडमिट केलं. त्यानंतर ज्यांना जास्त त्रास होतोय अशा मंडळींच्या टेस्ट करून गरजेप्रमाणे इथे, कोल्हापूर असे उपचार सुरू झाले. दोन दिवस आम्ही दोघी जावा अस्वस्थ होतो....घरात असलेल्या पैकी कोणाची टेस्ट आधी करावी, कोणासाठी थांबावं सगळा संभ्रम होता...निर्णय चुकणं धोक्याचं होतं.
चार चार जणांचे गट केले, अर्धे सकाळी अर्धे संध्याकाळी टेस्ट करून आलो, नशिबाने फार प्रभाव नव्हता त्यामुळे नऊ जण घरीच उपचार घेत घरी राहिलो. ऍडमिट मंडळींची आणि घरी डब्यांची व्यवस्था लावली. हळूहळू सगळं मार्गी लागत होतं.
या सगळ्यात मित्र मंडळी बेड मिळण्यापासून डबे पोहोचवण्या पर्यंत सगळी मदत करत होते. कोरोना वॉरियर्स म्हणून काम करणारे वेळच्या वेळी आजी आजोबांना वस्तू पोचवत होते. कधीही उशीर नाही की कंटाळा नाही. नाश्ता चहा देणारे वेळेत देत होते. आज डबा मिळणार नाही म्हणताच एक मैत्रीण देवी सारखी उभी राहिली आणि डबा घरपोच झाला. अधल्या मधल्या खाण्याची जबाबदारी घेत बहिणीने खूप सारा खाऊ पाठवला. घरात मुलं असल्याने सगळं लागत होतंच!
सगळे हळूहळू सुधारणा होऊन घरी परतले. पुन्हा न मोजता येणाऱ्या आनंदात घर भरलं..सगळ्यांच्या मदतीने आणि विश्वासाच्या साथीने सगळे सुखरूप आहोत, अजून सावरतोय..उभे राहतोय!!
यात सगळ्या प्रकारची मदत करणाऱ्या, आस्थेने चौकशी करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार!!
अजूनही वेळ लागेल लढतो आहोत एकजुटीने...सगळ्यांच्या सदिच्छा महत्त्वाच्या आहेतच!!!
मीनल सरदेशपांडे
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle