सुपरमार्केट मध्ये जाऊन नुसत्या वस्तू बघणे, खरेदी करणे हे तसं सोपं होतं, त्यातून डिजिटल युगात बिलाचे आकडे समोर दिसतात, काही खाणाखुणा लागत नाहीत. तिथे वस्तू शोधताना चित्रं असतात बरेचदा, सेक्शन प्रमाणे पदार्थ वर्गीकरण करून मांडलेले असतात त्यामुळे भाषा नवीन असली, अनेक शब्द नवीन असले तरी ते समजणं या इतर गोष्टींमुळे सोपं होतं, नवीन काही शोधायचं असेल तर घरून आधीच इंटरनेटच्या मदतीने शब्द शोधून मग ते बघता यायचं. आता इथे भारतीय पदार्थ मिळतात याचं कौतुक असलं आणि घरी नवीन प्रयोग करण्याचा उत्साह असला, तरी बाहेर खाण्याची हौस पण असतेच.
बाहेर खाण्याबाबत पहिली ओळख झाली ती इथल्या बेकरीजची. जर्मन बेकरी पुण्यात होती ती प्रसिद्ध होतीच, पण माझा तिथे जाण्याचा योग काही आला नव्हता. माझ्या डोळ्यासमोर आपले नेहमीचे स्लाइस ब्रेड, लादीपाव आणि केक, चेरीचे तुकडे असलेले लहान कप केक, खारी, ब्रेड रोल असे प्रकार मिळणारी बेकरी डोळ्यासमोर होती. पण इथे बेकरी हा जर्मन लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी पाच पासून या बेकरीज उघडतात त्या संध्याकाळ पर्यंत असतात, त्यात पन्नास-साठ प्रकारचे ब्रेड असतात आणि कॉफी, शिवाय मग ज्यूस, चहा (आपला भारतीय नाही) ही पेयं सुद्धा, मुख्य कॉफी. ब्रेडचे असंख्य प्रकार, वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेले, त्यात विविध बियांचे व्हेरिएशन, क्रॉसॉ, ब्रेतझेल, अनेक प्रकारचे चीज वापरून केलेले ब्रेड, गोडाचे अनेक प्रकार, चेज केक. म्हणजे अक्षरशः कोपऱ्या कोपऱ्या वर बेकरीज असतात. सुपरमार्केट्स मध्ये एखादा बेकरी सेक्शन असला तरी बाहेर अजून एखादी बेकरी असतेच. मोठे मॉल्स, दुकानं इथे सुद्धा बेकरी असतेच.
काही बेकरीज अगदी लहान की जिथे हे खायला घेऊन फार तर उभं राहायला एक किंवा दोन टेबल, बाकी सगळं टेक अवे म्हणून घेऊन जायचं, तर काही ठिकाणी बसायला पण भरपूर जागा, म्हणजे आपल्याकडे कॅफे असतात तसे निवांत गप्पा मारायला, बराच वेळ बसून कॉफी आणि केक किंवा ब्रेकफास्ट करायला या बेकरीज मध्ये लोक जातात. ब्रेकफास्ट साठी प्रत्येक ठिकाणी वेगवगेळ्या ऑफर्स असतात. सुरुवातीला सुमेध सोबत असायचा आणि त्याच्याशी बोलून मला काय आवडेल ते बघून मी त्या प्रमाणे मी ऑर्डर द्यायचे, सेफ पर्याय म्हणून त्याप्रमाणे निवडत गेले तर बहुतांशी वेळा सगळं आवडलं. पण एकदा खास ब्रेकफास्टला जाऊ असं ठरवून आम्ही गेलो एका बेकरीत, तिथला एक पाव ज्यात काकडी, टोमॅटो, चीज असतं असा एक प्रकार घेतला, त्यासोबत ज्यूस आणि कॉफी. आता हा ब्रेड इतका कडक होता की मला जाता जाईना. त्यात पाणी हवं असेल तर पैसे, स्वतःचं पाणी सोबत घेऊन फिरण्याची तेव्हा सवय नव्हती. तरी तेही विकत घेऊन, एक घास ब्रेड आणि एक घोट पाणी असं करत तो ब्रेड संपवला, त्यानंतर बरेच दिवस मी ते प्रकार घेण्याची हिम्मत केली नाही, हळूहळू चव आणि तो कडक प्रकारही खायला जमू लागले, अगदी कडक आणि मौ याच्या मधले जे प्रकार मिळतात ते या ट्रायल अॅण्ड एरर मधून समजत गेले. यातही बहुतांशी बेकरीजच्या चेनच, मग हळूहळू यात पण ठराविक आवडी निवडी व्हायला लागल्या, म्हणजे या बेकरीतला हा पदार्थ अशा ठराविक आवडी निवडी तयार झाल्या. तरी आपले स्लाइस ब्रेड आणि आत चीज, चटणी, बटाटा, चाट मसाला वाले सँडविच किंवा मग छान गरम गरम टोस्ट सँडविच प्रकार मिळत नाहीत असं वाटतंच. अनेक लोक बेकरी मधून पूर्ण कुटुंबासाठी ब्रेड घेऊन जातात. बरं प्रत्येक प्रकारचं वेगळं नाव, जशी आपली नान, पराठा, पोळी, फुलके यांचे प्रत्येक प्रकाराचं वैशिष्ट्य आहे तसंच हे सुद्धा. सुपर मार्केट मध्ये स्लाइस ब्रेड मिळतात हे नशीब. तरी पाव भाजी साठी लादी पाव मिळत नाहीत असं वाटायचं, मग तेव्हाच तुर्किश दुकानात मिळणारे काही प्रकार सापडले, जे किमान दुधाची तहान ताकावर म्हणत चालू शकत होते.
बाहेर रेस्टॉरंट मध्ये पाणी "फुकट" मिळत नाही हे पण फार त्रासदायक वाटायचं, मग आम्ही उगाच कोला किंवा ज्यूस वगैरे घ्यायचो, कारण किंमत तेवढीच किंबहुना पाणी महाग वाटायचं, वर्षभरातच वाढणाय्रा वजनाने या सवयी आपसूक बदलत गेल्या आणि पाणीच ऑर्डर करायला लागलो. इतर वेळी कुठेही फिरताना आपलं पाणी सोबत घेऊन फिरण्याची एक चांगली सवय मात्र यानिमित्ताने लागली आणि अजूनही आहे. शिवाय अगदीच गरज पडली तर सुपरमार्केट मधून किंवा कुठेही पाणी विकत घेताना साधं म्हणजे गॅस विरहीत पाणी घ्यायला हवं ही सवय पण चुकांमधून लागत गेली. आपण फक्त पाणी सांगून मोकळे होतो किंवा सुपरमार्केट मधून पाण्याची बाटली उचलतो. तहान अनावर होऊन बाटली तोंडाला लावली की चेहरा त्रासिक होतोच. कारण पाणी म्हणजेच वासर (Wasser) असे सांगितले की जर्मनीत मिळते ते कार्बोनेटेड पाणी. जर्मनीत कुठेही आणि कधीही पाणी सांगायचे असेल तर ohne kohlensauer किंवा Stilles सांगायचे/बघून घ्यायचे हे त्यानंतर नेहमीसाठी लक्षात ठेवले जाते.
पहिल्यांदाच भारतीय रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो तेव्हा आम्ही सवयीने भाजी आणि रोटी सांगितली, त्यासोबत भरपूर भात पण मिळाला. हा आम्ही ऑर्डर केला नाही असं सांगितल्यावर, भात असतोच प्रत्येक डिश सोबत असं उत्तर मिळालं. मग लक्षात आलं की हे मेन्यू कार्ड वर लिहिलेलं आहे, पण आम्ही पाहिलं नव्हतं. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि अनेक नवीन अनुभव आले, पण भात हा प्रकार कॉमन होता सगळीकडे. तरी तो छान जिरा राइस सारखा नसतो, नुसता भात असतो. आणि मँगो लस्सी हे इतकं प्रसिद्ध पेय आहे हे पण भारताबाहेर आल्यावरच कळलं. भारतीय रेस्टॉरंट्सची नावं इंडिया, पॅलेस, महाराजा आणि अजून दोन तीन शब्द एवढ्याच ठराविक शब्दांपासून तयार केली जातात हे ही लक्षात आलं. आतलं इंटेरियर आणि मेन्यू सुद्धा कमी-अधिक फरकाने अगदी तेच तेच असतात. भारतीय पदार्थ इतर दुकानात कमी असतात. मोठ्या शहरात आणि आता गेल्या दोन वर्षात यात बदल झाला आहे. आता तर सुपर मार्केट्स मध्ये सुद्धा बरेच भारतीय पदार्थ मिळतात.
याशिवाय सुरुवातीला आवडलेला प्रकार म्हणजे तुर्किश ड्योनर किंवा युफका. जर्मनीत अनेक तुर्किश लोक आहेत आणि प्रत्येक रेल्वे स्टेशन जवळ, गावातल्या मुख्य भागात आणि अगदी लहान सहान खेड्यात सुद्धा तुर्किश खाद्यपदार्थ मिळतील असे लहान जॉइंट्स असतातच. तिथे युफका म्हणजे मोठ्या पोळीत सलाड, चीज, दही असे शाकाहारी आणि यासोबत चिकन किंवा इतर काही मांसाचे प्रकार भरून केलेले रोल, हे आपल्या चवीला सहज जमणारे असतात, त्यामुळे आवडीचे होतात. कोणत्याही गावातल्या मुख्य रस्त्याने जाताना एखादं पिझ्झा शॉप, ड्योनर शॉप, एक बेकरी, एखादं एशियन /चायनीज दुकान हे हमखास दिसतातच. असंच चित्र बहुतांशी ट्रेन स्टेशन्स वर सुद्धा असतं. शनिवार रविवार भटकंती करताना, सकाळी किंवा दुपारी एखादी बेकरी आणि रात्री परत येताना स्टेशन वरून येताना डिनरचा प्रश्न सहज सुटायचा.
याशिवाय मग काही इटालियन, मेक्सिकन अशा रेस्टॉरंट्स मध्येही गेलो, पण बेकरी, तुर्किश आणि भारतीय हे आयतं खायला हवं असेल तर आवडीचे होते.
आणि हो, सुरुवातीला संध्याकाळी पाच वाजताच लोक जेवायला बसलेले दिसले, की कसे एवढ्या लवकर जेवू शकतात असं वाटायचं. आता इंटरमिटंट फास्टिंग सारखे प्रकार प्रसिद्ध होत असताना, इथले अनेक लोक हे करतातच की आधीपासून असं वाटतं. आणि रात्रीचं जेवण लवकर करण्याची सवय आपोआप व्हायला लागते.
कधी कधी 'काय नुसते ब्रेड खातात हे लोक, एक ब्रेड, एक सूप आणि दोन सलामीच्या चकत्या गरम केल्या की झालं यांचं जेवण' असंही वाटतं. पण कॉफी, बियर ते ब्लॅक फॉरेस्ट केक असं वैविध्य, आताच्या पिढीत दिसणारे बदल, लहान मुलांना शाळेत काय मिळतं असे एकेक अनुभव साठत जातात, आणि त्यावर अजून एखादा लेख यावर लिहावाच लागेल असंही जाणवून देतात. जर्मन खाद्यसंस्कृती बद्दल एक मोठा लेख पूर्वी एका मैत्रिणीसोबत लिहिला होता, अजूनही काही इतरांनी लिहिलेले उत्तम लेख वाचले आहेत. या लेखात फक्त सुरुवातीच्या नजरेतून हे सगळं कसं वाटलं याचा आढावा आहे, पुढे मालिकेत याबद्दल अजून सविस्तर माहिती आणि फोटो, नवीन अनुभव आणि आता चवीत, आवडी-निवडीत झालेले बदल याबद्दल नक्कीच लिहायचे आहे. तोपर्यंत ही फक्त तोंडओळख...
क्रमशः