तर जराशा जड अंतःकरणानेच आमच्या युरोपियन गेटअवेचा निरोप घेऊन तिथून जवळ असणाऱ्या ऑस्ट्रीचलँड मध्ये गेलो. फार काही ग्लॅमरस प्रकार नव्हता- कुंपणाच्या पलीकडे ऑस्ट्रीच आणि एमू ( हो. ऑस्ट्रिच वेगळे आणि एमू वेगळे. मी इतके दिवस एकच समजत होते. इथे कळलं की वेगळे असतात. पण आता प्लिज कोणी मला त्यांतला फरक विचारू नका. माझ्या मेंदूत असल्या गोष्टींसाठी जागा नसते. ) तर हां, एका कुंपणाच्या पलीकडे ऑस्ट्रीच आणि एमू आणि कुंपणाच्या अलीकडे माणसं. त्यांनी आपापल्या हद्दीत उभं राहून एकमेकांना बघायचं. माणसं छोट्या नॉनस्टिक तव्यासारख्या भांड्यांतून ऑस्ट्रिचना देण्यासाठी खाऊपण विकत घेऊ शकतात. इतकी इंटिमसी आम्हाला झेपत नसल्याने आम्ही फक्त आत जाण्याचं तिकीट घेतलं आणि दहा मिनिटं त्या उंच मानेच्या पक्ष्यांना बघून झाल्यावर परत गाडीत बसून पुढे निघालो.
रस्त्याला लागताच गुंडाबाई झोपली. मग मी ड्रायव्हरसीटवर आले. आता आम्हाला मुक्कामी एल ए जवळच्या अर्काडिया (की अर्केडिया ?) नावाच्या गावात पोचायचं होतं. इथे आमचा फक्त रेस्ट स्टॉप होता कारण आम्हाला एका दिवसात शक्यतो दोन तासांच्यावर प्रवास नको होता. अर्थात, हे आयडियल प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरलं तर रोडट्रिपची मजा ती काय ? पण त्याबद्दल पुढे.
तर आमची गाडी परत फेमस वनोवन हायवेला लागली. ह्यावेळेस दक्षिण दिशेला जात होतो त्यामुळे लगेचच गाडीच्या पलीकडे, उजव्या बाजूला समुद्र. मी गाडी चालवत असल्याने शेजारी बसलेल्या ऋ ला फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी भरपूर बुली करून घेतलं. त्याचंपण असं व्हायचं ना की फोन काढला की समुद्र लपायचा आणि फोन बाजूला ठेवून दिला की समुद्र आलाच वर. अशी मजा मजा.
ह्या हायवेवर आम्हाला एक जुन्या गाण्यांचं रेडिओ स्टेशन मिळालं. त्यावर आम्ही लहान असतानाची गाणी लागत होती. अगदी समर ऑफ सिक्स्टीनाईन वगैरे. मग आम्ही दोघं जरावेळ आपापले बेस्ट डेज ऑफ लाईफ आठवत गप्प बसलो.
मग थोड्याच वेळात मागून आमची पिपाणी वाजली - म्हणजे गुंडाबाई उठून, आई शेजारी नाही म्हणून रडायला लागली. मग तिच्याशी गप्पा मारत पुढे निघालो आणि रस्त्यात चांगलंच ट्राफिक लागलं.
आतापर्यंत गाडी चालवताना जी मजा येत होती त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली. तसंही मी गाडी घेऊन दोनेक तास होत आलेले त्यामुळं माझी दमणूक आणि ट्रॅफिकचं इरिटेशन ह्यांचा माझ्या ड्रायव्हिंगवर परिणाम होणार असं दिसताच आम्ही एक एक्झिट घेऊन ड्रायव्हर बदलला. (नवरा असण्याचे १०१ फायदे असं पुस्तक कुणी पुढं मागं लिहिणार असाल तर हा एक फायदा लक्षात ठेवण्यासारखा आहे).
मग सुरु झाला आमच्या रोडट्रीपचा सगळ्यात रटाळ भाग. एल ए ट्राफिक.
आधी आमचं ठरलं होतं की येता जाता कधीतरी रस्त्यात राजधानी नावाच्या गुजराती रेस्टॉरंटात एक जेवण करायचं. आजच्या प्रवासात ते अगदीच लांब पडत होतं म्हणून रस्त्यात लागणाऱ्या एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटात जाऊ असं ठरलं. मी तर त्या भयाण ट्रॅफिकमध्ये अडकलो असताना फिल्टर कॉफीची वगैरे स्वप्नंसुद्धा बघितली.
ट्रॅफिकमध्ये इंच इंच लढवून तिथे पोचलो, गाडीतून बाहेर उतरलो आणि चटका बसला. बाहेर तापमान होतं ९७ फॅ. शिवाय कोविडमुळे रेस्टारंटमध्ये आत बसून जेवायला परवानगी नाही. ऊन इतकं होतं की दोन मिनिट स्थिर उभे राहिलो तर वितळून गेलो असतो. मग तिथे जवळच एक चिपोटले दिसलं. गुंडबाईला तिथला किड्स मेनू आवडतो. तर ऍटलीस्ट एसीत तरी बसून खाता येईल म्हणून तिथे गेलो. तिथे मी गुंडाबाईला सेटल करेपर्यंत ऑर्डर द्यायला गेलेला ऋ च्या पेशन्सची परीक्षा झाली. गोष्टी संपलेल्या असणे, रिप्लेसमेंट आयटम्स नसणे, स्टाफ हेल्पफुल, पोलाईट नसणे, अस्वच्छता आणि ज्या एसीसाठी आम्ही आलो तो एसी बंद असणे अशी बरीच कारणं होती. तो आधी प्रचंड वैतागला आणि मग प्रचंड चिडला.
मग त्याने विकत घेतलेली ऑर्डर तिथेच सोडून आणि त्यातून फक्त गुंडाबाईसाठी पॅक्ड अँपल ज्यूस घेऊन आमची वरात आली परत चेन्नई टिफिन्सच्या दारात. तिथे टू-गो ऑर्डर करून ते हॉटेल मध्ये जाऊन खाऊ असं ठरलं. ( आता ही अक्कल आम्हाला चिपोटलेमध्ये जाण्याआधी का नाही आली? आय ब्लेम द एल ए ट्रॅफिक अँड हीट .)
असो. तर अडीच तासाच्या प्रवासाला साडेचार तास घेऊन एकदाचे आम्ही मुक्कामी, एम्बसी सुट्स नावाच्या हॉटेलमध्ये पोचलो. रिसेप्शनमधून आत गेल्यावर एक मोठा चौक आणि चौकाच्या चारही बाजूला सहा मजले रूम्सच रूम्स. हे स्ट्रक्चर बघून मला माझ्या इंजिनियरिंग काळातल्या हॉस्टेलचीच आठवण आली.
ह्या रूमचं वैशिष्टय म्हणजे दिवे. सीटिंग एरिया, किचन-डायनिंग एरिया आणि बेडरूम मिळून किमान पंधरा दिवे असतील. गुंडाबाईने थोडा वेळ ते ओळीने उघड-बंद करून स्वतःचं मनोरंजन करून घेतलं.
मग फ्रेश होऊन, जेवून, खाऊन, लोळत, एकमेकांच्या फोनमधले फोटो बघत आम्ही झोपलो.
हा जरी फक्त रेस्ट स्टॉप असला तरीसुद्धा इथल्या एका गोष्टीची मी बऱ्यापैकी आतुरतेनं वाट बघत होते. त्याबद्दल पुढच्या भागात सांगते.
हे आजच्या प्रवासाचं डूडल :