रोडट्रिप - ६

पुढे ..
दुसऱ्या दिवशी लवकर जाग आली म्हणून मी बाहेरच्या खोलीत डायनिंग टेबलापाशी बसून डूडल्स काढत होते तर गुंडबाईपण उठून मला शोधत आली. मग मी पुरेसा उजेड केला नव्हता म्हणून तिने तिथले सगळे दिवे सुरु केले.
आठपर्यंत वाट बघून आम्ही दोघीनी ऋ ला उठवलं. आणि मी ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघत होते तिकडे आम्ही निघालो. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट बफे.

कॉल मी भुक्क्कड, पण मला सगळ्या हॉटेल्समधला ब्रेकफास्ट बफे हा प्रकार फार आवडतो. पहिली गोष्ट म्हणजे अल्मोस्ट झोपायच्या किंवा घरातल्या कपड्यात गेलं तरी चालतं, उठून बेसिक आवरून जस्ट खाली उतरलं की ब्रेकफास्ट आपली वाट बघत असतो. आणि ‘हे ऑर्डर करू की ते’ असा डायलेमा नाही - अंडी (स्क्रॅंम्बल्ड किंवा ॲाम्लेट किंवा उकडलेली), ब्रेड, किमान दोन प्रकारचे जॅम, किमान दोन प्रकारचे बटर, ओटमील, हॅश ब्राऊन्स, ग्रॅनोला, सिरीयल्स, पॅनकेक किंवा वाफल्स, ब्रेकफास्ट मफिन्स, ताजी फळं, फळांचे रस, योगर्ट आणि कॉफी असा भरघोस मेनू लागलेला असतो. निवांत बसून हवं ते हवं तितकं खा, कॉफी प्या असा हा प्रकार.
शिवाय बाहेर खाण्याचे नेहमीचे फायदे - स्वतः करायचा, नंतरचं आवरायचा आणि उरलेल्या पदार्थांचं काय करू हा विचार करायचा व्याप नाही.
तर कोणत्याही ट्रीपमध्ये एका तरी हॉटेलमध्ये असा ब्रेकफास्ट बफे पाहिजेच अशी माझी अपेक्षा असते. मध्यंतरी कोविडमूळं हा प्रकार बंद झाला होता पण आता परत सुरु झालाय.

मग मास्क घालून वाढून घेणं आणि लांबचं टेबल पकडून तिथे बसून खाणं झालं. विनिंग डिश - फ्राईड पोटेटोज. गुंडाबाईनेपण ओटमील, चिरिओज, अंडी आणि बटर आनंदानं खाल्लं. शिवाय बफेमधून वाढून आणायच्या प्रत्येक ट्रिपसाठी आई किंवा बाबासोबत जायला मास्क घालून गडी तय्यार.

अंघोळी आटोपून, आवरून निघालो पुढच्या मुक्कामी - लेक ॲरोहेड व्हिलेज. रोडट्रीपचा शेवटचा पल्ला पण बेस्ट वॉज येट टू कम.
वाटेत एक स्टॉप ट्रेडर जोज (जिथून बापलेकीने ताजी फळं- ब्लूबेरीज, अंजीर आणि सँडविचचं साहित्य आणलं; मी गाडीत बसून कालच्या ऑस्ट्रीचचं चित्र काढलं) आणि एका कॉस्टकोमध्ये गॅस (पेट्रोल) भरून पुढे निघालो.

लेक ॲरोहेड - डोंगरमाथ्यावरचं मानवनिर्मित तळं. आधी आम्हाला वाटलेलं की लेकचा आकार ॲरोहेडसारखा आहे पण ते तसं नाहीये. इथून पुढे प्रसिद्ध बिग बेअर लेक आहे. पूर्वी लेक ॲरोहेडचं नाव लिटल बेअर लेक होतं पण लोकांचं कन्फ्युजन व्हायला लागलं म्हणून इथे येताना दिसणाऱ्या एका रॉक फॉर्मेशन वरून ह्या लेकचं नाव ॲरोहेड ठेवलं.

रस्त्याला लागताच थोड्या वेळात घाट लागला. तीव्र चढाचा घाट. त्यामुळे लगेच वर आलो आणि उजव्या बाजूला खाली दरी, दरीवर पसरलेले ढग वगैरे दिसायला लागले. आणखी थोडं वर चढलो आणि दोन्ही बाजूनी सूचिपर्णी वृक्ष दिसायला लागले. मागे झोपलेल्या गुंडाबाईसाठी रेहमानची प्लेलिस्ट लावली होती त्यात योगायोगाने 'ये हंसी वादियां' लागलं. अशा लिरिकल योगायोगाची मला नेहमीच फार गंमत वाटते.
तर अशा प्रकारे समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीवर म्हणजे जवळजवळ १ मैल उंचीवरच्या गावात आम्ही पोचलो.
हे डूड्ल:
018C535E-3681-466F-AD2D-25CC48709409.jpeg

आम्ही पोचलो तेव्हा साधारण दुपारी १ वाजता, इथे तापमान १०१ फॅ होतं. लेकमध्ये एक तास बोटीने फिरायची टूर आम्हाला करायची होती. ५ वाजताच्या टूरची तिकिटं काढून आम्ही रूमवर गेलो.

रूम म्हणजे एक छोटं टुमदार, कौलारू घर होतं. इथे हिवाळ्यात ४ ते ६ फूट बर्फ पडतो त्यामुळे थंड प्रदेशातलं घर असावं तसं. जाण्याचा रस्ता लाल रंगांच्या दगडात बांधलेला होता. डोंगराळ भागाचा व्यवस्थित वापर करून, चढ उतारावर वेगवेगळ्या लेव्हल्सवर अशी घरं (म्हणजे काॅटेजेस्) होती. तीन पायऱ्या चढून छोटंसं पोर्च, तिथे बसायला टेबल्स-खुर्च्या आणि मग स्वयंपाकघरविरहीत दोनमजली घर. खालच्या मजल्यावर सीटिंग रूम, फ्रिज, मायक्रोवेव्ह, फायरप्लेस आणि बाथरूम. बाथरूम म्हणजे एक रूम असावी इतकी मोठी, जिच्यात शॉवर आणि शिवाय एक मोठा गोल आकाराचा व्हर्लपूल टब. वरच्या मजल्यावर उतरत्या छपराची बेडरूम. बेडच्या बाजूला एक छोटी आणि समोर एक मोठी खिडकी. खिडक्यांना जुन्या पद्धतीचे स्कर्टसारखे दिसणारे पडदे.

ते घर बघून आणि आपल्याला इथे दोन दिवस राहायचंय हे समजल्यावर पोचताना रस्त्यात लागलेली प्रचंड भूक विसरल्यासारखं झालं. पण थोड्या वेळापुरतंच.
मग तिघांनी आपापली कामं वाटून घेऊन पटापट सँडविचेस बनवली. मी प्रवासासाठी खास करून आणलेल्या शेंगदाणा चटणीचा मुहूर्तपण फायनली इथेच लागला.

खाऊन झाल्यावर बेडरूममध्ये पडदे ओढून, अंधार करून पडलो ते डायरेक्ट साडेचारला उठलो. मग धावतपळत तलावाकाठी. आमचं हॉटेल तलावाच्या अगदी जवळ होतं तरीही पाचला पाच कमी असताना बोट पकडली. आमच्या बोटीचा कॅप्टन अगदीच मनमिळावू आणि उमदा मनुष्य वाटत होता. म्हणजे, तोंडदेखलं इथे सगळेच हसतात किंवा ग्रीट करतात पण हा मनापासून हसत, बोलत होता. (असं मला वाटलं. )

मग सुरु झाली गाईडेड बोट टूर.
कोणीतरी झाडं कापून हे लेक बनवलं - पण ह्या मुद्द्याकडे माझं जरा दुर्लक्ष झालं. लेक भोवतीची वसाहत - म्हणजे हे खेडं पहिल्यांदा १९२० साली बांधलं आणि १९८० साली सगळ्या इमारती जाळून परत नव्याने बांधलं. तेच हे लेक ॲरोहेड डाउनटाऊन - म्हणजे तलावाकाठची रेस्टॉरंट्स आणि दुकानं. डाउनटाऊन कमी आणि मार्केटप्लेस जास्त.

बाकी पूर्ण ट्रिप म्हणजे लेकमधली सफर आणि काठावरच्या घरांकडे बोट दाखवून ह्या घरात डॉरीस डे राहत होती. ह्या घरात लिबराची रहात होता अशी माहिती होती. त्यापैकी पॅरिस हिल्टनचे पणजोबा आणि हिल्टन हॉटेल्सचे मालक कॉनरॅड हिल्टन ह्यांचं घर, ट्रेडर जोज चा जो - त्याचं घर, डिस्ने कॅसलसारखं बांधलेलं डिस्नेच्या सी ई ओ चं घर एव्हढीच घरं माझ्या लक्षात राहिली आहेत. ह्याशिवाय काही प्रॉपर्टीज जिथे पॅरेण्ट ट्रॅप सिनेमा किंवा डॉक्टर हाऊसचे काही भाग चित्रित झाले आहेत त्या (दुरूनच) दाखवल्या. ह्या घरांच्या किंमती साधारण ६ ते १२ मिलियन्सच्या रेंज मध्ये होत्या.

बाकीची बोरिंग माहिती मजेशीर वाटावी म्हणून हा मनुष्य वाक्यावाक्याला जोक मारत होता.
पायरेट्सचं आवडतं लेटर कोणतं ? आर्रर्रर्र ? नो दे आर लॉयल टू द सी.
मध्येच एका घराबाहेरचं दगडी गरुडाचं स्कल्पचर दाखवून म्हणे - दॅट इज कॅलिफोर्निया इगल, इट इज स्टोन्ड.
वाईन सेलर मधल्या सेलर शब्दावर कोटी.
अजून असे बरेच काही पन्स (जे मी आता विसरले) आणि काही समयोचित विनोद (जे सांगायला मला खूप स्पष्टीकरण द्यावं लागेल) करत हा माणूस तब्बल एक तास सतत बोलत होता. कमाल.
बोटीत टिप जार नव्हता. म्हणून ऋ ने त्याला फ्रेंड्स मधल्या रिचर्ड स्टाईलने शेकहॅण्ड करून टिप दिली.

ती टूर संपवून आम्ही तलावाकाठी जरा वेळ फिरलो. एका कोपऱ्यात आर्टिफिशियल लॉन होतं, गुंडबाई त्यावर पकडापकडी खेळली. तळ्याकाठी बसून सॉफ्टसर्व खाल्लं.

थोड्या वेळाने जरा अंधार पडू लागला, हवा गार झाली तसे वरच्या दुकानांबाहेरच्या रस्त्यांवर फेअरी लाईट्स लागले आणि मस्त मूड झाला. एका वाईनशॉप बाहेर वाईन पीत पीत चित्र काढण्याचा क्लास जमला होता. तो घेणाऱ्या जिप्सी आज्जीबाईशी थोड्या गप्पा मारल्या. मग असंच इकडे तिकडे निरुद्देश फिरून आम्ही आलो परत हॉटेलमध्ये.
आणि नंतरच्या दिवशीही आम्ही ह्याशिवाय काही वेगळं केलं नाही - आमची हॉटेलरूम एन्जॉय करणे, निवांत तलावाकाठी किंवा त्या मार्केटप्लेसमधल्या रस्त्यांवरून भटकणे, कधी तिथे सँडविच किंवा तत्सम काहीतरी खाणे, कधी रूममध्ये ट्रेडर जोजमधली रेडी टू इट करी खाणे, सकाळी उठून हॉटेलच्या रेस्टॉरंटमधली (फुकट) कॉफी घेऊन येणे, ती सॉल्वँगच्या बटर कूकीज सोबत पिणे मग परत मार्केटप्लेसमध्ये गेलो की तिथली भारीतली कॉफी लेककडे बघत पिणे आणि बाकी गप्पा टप्पा.
हे डूड्ल:
E07560DD-9045-400F-9319-1C499A425967.jpeg

मग परत आलो. येतानाच्या प्रवासात काही विशेष घडलं नाही. नाही म्हणायला मी वळून वळून ते ॲरोहेडसारखे दगड किंवा डोंगर दिसतायंत का ते बघत होते पण मला सगळेच डोंगर ॲरोहेडसारखे दिसत होते म्हणून मग नाद सोडला.

घरी येऊन आधी झाडांची हालहवाल बघितली. प्रवासाचा मूड होता तोवर पटकन एक मॅगी खाऊन घेतली आणि मगच आवराआवरी सुरु केली. परतीच्या प्रवासाचं डूडल नाही काढलं.
आमची ट्रिप संपली म्हणून फार काही वाईट नाही वाटलं, उलट 'अनपेक्षितपणे आणि कमी प्लॅनिंगमध्ये चांगली, रिलॅक्सींग आणि लक्षात राहण्यासारखी ट्रिप झाली' असं समाधान वाटत होतं.

इथे दैनंदिनी लिहिण्याच्या निमित्ताने परत एकदा ट्रिपचे दिवस आठवून मजा आली.

एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते. वाचण्याबद्दल, प्रतिसादांबद्दल मंडळ आपले आभारी आहे. :)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle