आटपाट नगर होतं. त्यात एक सपा नावाची बाई होती. ती बरं आणि तिचं काम बरं; तिचा दिवस कधी सुरू होई अन् कधी संपे याचा पत्ताच लागत नसे. छंद बिंद काय ते जोपासायला तिला सवडच नसे.
अशातच एक घटना घडली. त्या गावात एका महामारीमुळे एकदा लॉक डाऊन लागला. आणि सपाला अचानक वेळच वेळ मिळाला. मग या वेळात ती उगाच आंतरजालावर भटकायला लागली. भटकता भटकता तिला एक फोटो दिसला. एक ब्लाऊज ज्याच्या पाठीवर कठपुतळ्यांचं भरतकाम होतं. हे बघून सपा वेडीच झाली.. लगेच ते कार्टमधे टाकायचा तिला मोह झाला. पण पण!! त्याची किंमत बघून तिला चक्कर आली.. तीन हजार.. बाब्बो!! एवढ्याची तर साडी घेताना सपा तीन हजार वेळा विचार करायची. अन् तीन हजाराचं ब्लाऊज??!! तिने तिचा मोह मारून टाकला.
'खाली दिमाग शैतान का घर' अशी हिंदीत एक म्हण आहे. ती अत्यंत खरी आहे. ते ब्लाऊज त्या रिकामटेकड्या सपा ला स्वस्थ बसू देईना. पण तिचा कंजूसपणा आणि तिचाच मोह तलवार घेऊन लढू लागले. शेवटी तिनी दोघात समेट घडवून आणली. कशी म्हणून विचारताय? सांगते ना.. पेक्षा दाखवतेच.
सपानी ठरवलं की आपणच असं भरतकाम करायचं. पण तिनी शेवटचं भरतकाम शाळेत केलं होतं क्राफ्ट पिरेडमधे! म्हणून आधी आपल्याला जमतय का नाही ते बघून मगच खरा प्रोजेक्ट हाती घ्यावा असं तिने पक्कं ठरवलं.
या रफ प्रोजेक्टचं चित्र कागदावर काढून एका कापडावर कार्बन पेपरने ट्रेस करून त्यावर भरतकामाला सुरुवात केली.
अशाप्रकारे हे करून झाल्यावर हे आपल्याला जमू शकेल असा आत्मविश्वास तिला आला. मग तिच्याकडे पडून असलेल्या अनेक ब्लाऊज पीसेस पैकी एक
टेलरला भेटून ब्लाऊजचं कटिंग करून घेतलं. आणि पाठीवर परत पूर्वीसारखं चित्र काढलं. आधीच्या सरावामुळे चित्र बरं आलं यावेळी.
ध्यास घेऊन सकाळ दुपार संध्याकाळ वेळ मिळेल तेंव्हा ती भरतकाम करू लागली. हिरवे गुलाबी केशरी रेशमी धागे तिला खूप आनंद देत होते.
आणि एक धागा सुखाचा एक धागा दुःखाचा जोडत जोडत चित्र तयार झालंही!! टेलर कडून ते शिऊन आणलं. आणि सपा ते मिरवायला मोकळी!