सोन्याची खाण 

आम्ही गेली ५ वर्षं सॅन डीआगोमध्ये राहतोय (आणि फिरतोय आणि लोकांना फिरवतोय). तरीही काही गोष्टी बघायच्या राहूनच गेल्यात. त्यापैकी एक म्हणजे  ही सोन्याची खाण. गेल्या शनिवारी दुपारी टळटळीत उन्हांत फारसं काही करण्यासारखं नव्हतं म्हणून जवळच्या  जुलिअन गावात गेलो. आमच्या घरापासून एका तासावर असलेलं हे छोटंसं टुरिस्ट खेडंगाव तसं आम्हाला नवीन नाही. याआधी बरेचदा इथल्या कुयामाका तलावावर फिरायला, अँपल पाय खायला , डिसेंबर महिन्यातला (आम्हाला आमच्या गावात  कधीच न दिसणारा) स्नो बघायला किंवा असंच कंटाळा घालवण्यासाठी इथल्या रस्त्यावर, दुकानांतून वगैरे फिरायला आम्ही इथे येऊन गेलोय. इथली सोन्याची खाण मात्र काही कारणाने दुर्लक्षितच राहिली होती. 
तर त्या दिवशी फायनली  खाणीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर घातली गाडी. एकेरी, मातीच्या रस्त्याच्या शेवटी पार्किंगची जागा आणि एक ऑफिस दिसलं.
1.

तिथे निवांत सिगरेट ओढत बसलेल्या म्हाताऱ्याने आम्हाला टूर गाईडकडे पाठवलं. एका खाणीतून आत जाऊन दुसऱ्या खाणीतून बाहेर पडायचं, दगडांची पूड करणाऱ्या प्रचंड मशीनची माहिती आणि मातीतून सोनं वेगळं करायचा डेमो – ह्याला पॅनिंग म्हणत होते. असं साधारण त्या टूरचं स्वरूप होतं . आणि हो, तुम्ही पॅन केलेलं सोनं स्वतः कडे ठेवायला परवानगी नाही – हे विशेषकरून सांगितलं .

पॅनिंग – सोनंमिश्रित माती आणि पाणी एका पसरट तव्यात घेऊन गोल गोल अशाप्रकारे फिरवायची की पाणी आणि माती/ वाळू बाहेर फेकली जाईल आणि खाली सोन्याचे कण उरतील.तिथल्या पॅनिंग स्टेशनवर वाळू + पाणी + सोन्याचे कण असा सेटअप आणि प्लास्टिकची पसरट भांडी ठेवली होती. अर्थात ऐकायला सोपं असलं तरी बऱ्यापैकी चिकाटीचं काम आहे. खूप वेळ पॅनिंग करूनही फोटोत दिसण्याएवढंपण सोनं मला काढता आलं नाही:
2.

आमच्या गाईडने सांगितल्याप्रमाणे: ह्या खाणीची गोष्ट सुरु होते १८६९-७० च्या काळात, जेव्हा कोलमन नावाच्या गुराख्याला इथल्या झऱ्यात सोन्यासारखे चमकणारे कण सापडले. मग कोलमनने काय केलं ? तर गावात जाऊन दिसेल त्याला सोन्याबद्दल सांगितलं. आणि नुसतं सांगितलं नाही तर वाढवून, चढवून सांगितलं.  मग कर्णोपकर्णी बातमी पोचून बरेच लोक सोन्याच्या शोधात इथे येते झाले. त्या काळात सुरु झालेल्या खाणी लवकरच बंद पडल्या पण तेव्हा आलेले लोक परत गेले नाहीत. सफरचंद आणि बार्ली ची शेती करत इथेच राहिले. 

एखाद्या जुन्या, सायकल दुरुस्त करणाऱ्याच्या खोपट्याच्या दरवाजासारखा दिसणारा खाणीचा मुख्य दरवाजा. रोज सकाळी खाणीत कामाला जाताना  खाणकामगार आपापले बिल्ले दारात अडकवून जात आणि परत जाताना घेऊन जात. कोणत्याही वेळी ह्या बोर्डावर बघून आतमध्ये कोण-कोण आणि किती लोक आहेत हे सुपरवायझरला लगेच कळत असे.  
3.

खाणीच्या आत जाणारा पूर्ण रस्ता रुळांचा आहे. आत फोडलेले दगड बाहेर काढण्यासाठी एक प्रकारची ट्रॉली  ह्या रुळांवरून आत-बाहेर करत असे. सध्या आतमध्ये विजेचे (मंद) दिवे जरी लावले असले तरी त्याकाळी कामगार मेणबत्तीच्या प्रकाशात काम करत. एकटं-दुकटं काम करत असताना अचानक मेणबत्ती विझली तर किती मिट्ट काळोख होतो ह्याचं प्रात्यक्षिक आम्हाला दाखवण्यात आलं. ( मला थोड्या प्रमाणात बंदिस्त जागांची भीती असल्याने ते एक मिनिट अगदी अंगावर आलं ). पण मग विझलीच जर मेणबत्ती किंवा पूर्ण जळून गेली तर अंधारात बाहेर कसं येणार? ह्यावरचा उपाय म्हणजे खाणकामगार जमिनीचा उतार शोधून उताराच्या दिशेने चालत राहत आणि दरवाजापर्यंत पोहोचत.  उताराच्या दिशेने दरवाजा का? ह्याचं कारणसुद्धा पटणेबल आहे. खाणीच्या आतमध्ये खोदलेल्या जड दगडांनी भरलेली ट्रॉली बाहेरच्या दिशेने ढकलताना कमीत कमी कष्ट व्हावेत असा हेतू ह्यामागे होता. आत आणताना अर्थातच ट्रॉली रिकामी व तुलनेने हलकी असल्याने, चढावर ढकलण्याचे कष्ट फार नव्हते. 
4

ज्या काळात ७० सेंटात निवांत भागत असे, त्याकाळात हे खाणकामगार दिवसाला १. ५ ते २ डॉलर कमवत. अर्थात ते ज्याप्रकारच्या धोकादायक परिस्थितीत काम करत ते बघून त्यांचा पगार अगदी रास्त होता असं वाटतं. खाणकामगारांचं मुख्य काम म्हणजे छिन्नी हातोड्याने दगड फोडायचे आणि त्या ट्रॉलीत रचून बाहेर पाठवायचे. पण वर सांगितल्याप्रमाणे हे मेणबत्तीच्या प्रकाशात करावं लागत असे. एक जण छिन्नी पकडणार आणि दुसरा वरून (जोरात) हातोडा मारणार. परत आणि मिणमिणता प्रकाश असल्यामुळे छिन्नी पकडणाऱ्याला अगदी टोकाजवळ छिन्नी पकडावी लागायची कारण दुसऱ्याला ती नीट दिसली पाहिजे ना. अजून एक काम म्हणजे, सुरुंग लावून दगड फोडणे आणि रस्ता तयार करणे. सुरुंग लावण्याचं काम शक्यतो रात्री होत असे, म्हणजे सकाळी कामगार कामाला येईपर्यंत धूर, विषारी वायू बऱ्यापैकी निघून गेलेले असत आणि सुरुंगामुळे फुटलेले दगड कामगारांना बाहेर वाहून नेता येत. सुरुंग लावणारा तिथेच एका बिळासारख्या कपारीत बसून किती सुरुंग फुटले, लावलेले सगळे स्फोट झाले की नाही हे मोजत बसायचा. हे काम विशेष कौशल्याचं आणि धोक्याचंही असल्याने अर्थातच सुरुंग लावणारा माणूस सरासरी खाणकामगारांपेक्षा जास्त कमाई करत असे.

ह्या २ खाणीत मिळून एकूण ११ मजले आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं . जमिनीपासून ५ खाली आणि ५ वर . खालच्या मजल्यावर कामगार आणि दगडांची वाहतूक करण्यासाठी एक मोट्ठी बादली दोरीच्या साहाय्याने खाली- वर पाठवली -ओढली जात असे. तिथेच एक मोट्ठी घंटा आणि मॉर्स -कोड सारखी एक विशेष संदेश- यंत्रणा सुद्धा पाहायला मिळाली.
4

मध्येच एका जिन्याने आम्हाला वरच्या मजल्यावर नेलं . तो जिना, जिन्यापेक्षा शिडीच्या जास्त जवळ जाणारा होता. वर जाऊन अजून थोडी उपकरणं, अजून थोड्या आडोशाच्या जागा वगैरे पाहून दुसऱ्या खाणीतून बाहेर पडलो. ह्या दोन खाणी सुरुवातीला एकमेकांना जोडलेल्या नव्हत्या. दोन्ही बाजूच्या खाणकामगारांनी अंधारात, आवाजांचा अंदाज घेत घेत खोदकाम करून त्या जोडल्या. ह्या दुसऱ्या खाणीपासून पहिल्या खाणीत गेलो तो दरवाजा साधारण ५०० पावलांवर होता. 
5

खाणीतून काढलेल्या दगडांचा मग एका मशीनमध्ये भुगा केला जात असे. हे मशीन रोज ५ टन दगडांचा भुगा करत असे, आणि तो भुगा म्हणजेच सोने मिश्रित माती/ वाळू. ह्या मातीतून सोने वेगळे करण्यासाठी वर सांगितलेले पाँनिंग करत.  प्रति दिवशी जर १ औन्स  सोनं काढता आलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेतून नफा होत असे.  अर्थातच नफ्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे कालांतराने ह्या खाणी बंद पडल्या.
6

पगार चांगला मिळत असला तरी बाकी सर्वच बाबतीत खाणकामगारांच आयुष्य तसं त्रासाचं होतं. अंधाऱ्या, कुबट, बंदिस्त जागेत काम, अपघात, इजा होण्याच्या शक्यता जास्त, आतल्या धुळीमुळे दीर्घकाळाचे आजार होण्याचं प्रमाण जास्त. मी बऱ्याचदा गमतीत माझ्या लॅबला “विंडोलेस डंजन ” म्हणत असते. आता खरोखरीचे विंडोलेस डंजन बघितल्यावर कदाचित पुढचे काही दिवस तरी मला माझी लॅब आवडायला लागेल!

-सिद्धि

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle