गाडी चालवत लांबच लांब अंतर जाताना बरोबर सोबत असेल तर मजा येते. बस, ट्रेन व इतर कुठल्या सार्वजनिक वाहनांनी जाण्यापेक्षा कुणा ओळखीच्याच्या गाडीतून प्रवास करायला मिळाला तर प्रवासाचा शीण कमी होतो.
एकूणात कदाचित इंधन कमी जळते, कदाचित दोन्ही लोकांचा थोडाथोडा खर्च वाचतो वगैरे.. हे सर्व कारपूलचे फायदे सर्वांना माहितीच आहेत.
आपल्या मैत्रिणी बऱ्याचदा प्रवास करत असतात. तर हा धागा सर्व प्रवासी मैत्रिणींच्या कारपूल साठी.
तुम्ही गाडी काढून एकटीने प्रवास करताय तर किंवा कुठे प्रवासाला अचानक निघाल्या आहात आणि जाण्याचे साधन शोधताय तर इथे लिहा. तुमची वेळ आणि तारीख आणि ठिकाण जुळत असेल तर इथली मैत्रीण तुमच्याशी संपर्क साधेल. मग होउदे जोडीने प्रवास
इथे लिहिताना किमान काही तपशील तुम्हाला लिहावे लागतीलच. त्यांची यादी अशी
1. लिफ्ट देणार की लिफ्ट हवीये?
2. कुठून निघणार, कुठे जायचे आहे?
3. तारीख व वेळ
4. गाडीत किती सामान चालू शकेल(लिफ्ट देणाऱ्यांसाठी) किंवा तुमच्याकडे किती सामान असेल (लिफ्ट हवी असणाऱ्यांसाठी)?
5. इंधन, टोल यात शेअर करण्याची अपेक्षा/ तयारी आहे का?
6. लिफ्ट देणारी किती व्यक्तींना बरोबर नेऊ शकते?
7. मैत्रीणीबरोबर मैत्रीणबाह्य कुटुंबीय असल्यास चालणार आहे का? स्पेसिफाय करा. (उदा. मैत्रिणीची मुलगी वा मुलगा बरोबर असल्यास चालेल परंतु बाकी कोणी नको वगैरे)
अजून सुचलेल्या मुद्द्यांची भर घालत जाऊच.
हा धागा जितका उपयोगाचा आहे तितकाच न्यूसन्स होऊ शकतो. त्यामुळे सर्वच जणींनी थोडे सावध वागणे गरजेचे आहे.
मैत्रीणवर हा धागा आहे म्हणजे या कारपूल दरम्यान होणाऱ्या मतभेदांची जबाबदारी मैत्रीण अडमीनवर टाकायची नाहीये. जे काही तपशील ठरवले जाणार ते दोन व्यक्तींच्यात ठरतील किंवा ठरणार नाहीत. पण त्याची जबाबदारी मैत्रीण अडमिनची नसेल.
ही सोय केवळ मैत्रीण सदस्यांपुरती आणि लिफ्ट देणारीला चालणार असेल तर मैत्रीणच्या जवळच्या कुटुंबियांपुरती आहे. इथे कुणी कारपूलिंग साठी कॉल दिल्यास ती माहिती आपल्या वर्तुळात सर्क्युलेट करून सोबत मिळवून देणे वगैरे करू नका. हे मैत्रीणवरचे, मैत्रीणपुरतेच राहूद्या.
बाहेर कुणाला सांगायची गरज वाटल्यास जिने कॉल दिलाय तिच्या परवानगीशिवाय सांगू नका. तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी लिफ्ट देणारी कम्फर्टेबल असेलच असे नाही.
बाकी सर्व सूज्ञ आहातच!!
हॅप्पी रोड ट्रिप!!