'हमिंगबर्ड, एsss हमिंगबर्ड... ' 

आमच्या बागेत बरेच पाहुणे येऊन जाऊन असतात - काही नकोशे, भीतीदायक किंवा उपद्रवी सरडे, उंदीर असे तर काही आवडीचे जसे की, फुलपाखरं, तांदूळ टिपणाऱ्या चिमण्या, पिटुकले रंगीत अनामिक पक्षी आणि आमचा लाडका हमिंगबर्ड. हमिंगबर्ड- फुलपाखरांच्याच आकाराचा पिटुकला पक्षी- त्याचे पंख इतके वेगात फिरत असतात की त्यामुळे हम आवाज येतो म्हणून त्याला हमिंगबर्ड म्हणतात. तर, आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या पक्ष्यांत हमिंगबर्डस् चा वावर जाणवण्याइतका जास्त असतो. लहान बाळाच्या मुठीएवढ्या आकाराचे हे पक्षी झूप-झूप इकडून तिकडे फिरत असतात. आमची गुंडाबाई बोलायला लागल्यापासून  'हमीनबल्ड, एsss हमीनबल्ड' अशी साद घालते आहे. असे हे आमचे काऊ-चिऊ सारखे मित्र. 

दोनेक महिन्यांपूर्वी असाच एक हमिंगबर्ड सारखा आमच्या संत्र्याच्या झाडाभोवती घुटमळताना दिसायला लागला. (मी संत्र्यांची सालं तिथंच झाडाच्या पायथ्याशी पुरत असते - सोपं कंपोस्ट. तेव्हा कधी कधी आळस करून पुरेसा खोल खड्डा केला नाही तर ती सालं वर येतात आणि मग त्यांवर चिलटं येतात.) तर अशी चिलटं खायला येत असेल, झाडाखालच्या कुंडीत साठलेलं पाणी प्यायला येत असेल असे वेगवेगळे तर्क लावून झाल्यावर, 'कदाचित ह्याने इथं जवळपास घर केलं असेल' ह्या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. 

लवकरच, त्याचं ते एका भातुकलीतल्या छोट्या कढईच्या आकाराचं फांद्यांच्या बेचक्यात केलेलं घरटंही  दिसलं आणि मग काही दिवसांनी त्या घरट्यात हा आमचा मित्र आपली लांबलचक चोच आकाशात खुपसून बसलेला दिसू लागला.
8A26328C-36DA-4103-BB49-D9FDE56A2704.jpeg

सकाळी उठून खाऊ आणायला जायचा बहुधा - तेव्हा एकदा दुरूनच टाचा उंचावून, फोन तिरका वगैरे करून त्या वाळलेल्या गवताच्या काड्यांपासून बनवलेल्या छोट्या कढईत काय आहे ते बघण्याचा प्रयत्न केला. टिक-टॅकच्या गोळ्यांच्या आकाराची दोन पांढरी अंडी दिसली. 
C81F47A2-9AB4-4166-8395-7E2D2A2358D4.jpeg

ती बघून अचानक आम्हाला आमची जबाबदारी वाढल्यासारखी वाटली. मग आम्ही शक्यतो त्या बाजूला जायचं नाही, बागेत दंगा करायचा नाही, हळू आवाजात बोलायचं असं सुरु केलं.  खरंतर, घरात एक लहान आणि एक मोठी अशा दोन वटवट-सावित्र्या असताना ते पाळलं जाणं जरा अवघडच होत होतं. पण हळूहळू आमच्या लक्षात आलं की आमचा हा मित्र - आमच्या वावराने, बोलण्याने अजिबातच विचलित होत नव्हता. आम्ही बागेत जेवण, गप्पा, रंगपंचमी, पळापळी, उकराउकरी काहीही करत असलो तरी हा शांतपणे साधना केल्यासारखा आकाशाकडे नजर (आणि चोच) लावून बसलेला. ह्यामागचं कारण त्याची एकाग्रता की त्याने आमच्यावर टाकलेला विश्वास - माहिती नाही.  मला मात्र तेव्हा, त्याने आमचा कुटुंब म्हणून स्वीकार केलाय असंच वाटलेलं. 

मग तर आमची जबाबदारी अजूनच वाढली. ज्या संत्र्याच्या झाडावर हे घरटं होतं, ते झाड अगदी अनंतहस्ते फळं देणारं आहे. सीझनमध्ये आठवड्याला पन्नास ते शंभर फळं नक्कीच. (अजिबात अतिशयोक्ती नाही. माझ्या इंस्टाग्रामवर पुरावे आहेत.) तर आता दर आठवड्याला अलगद, मित्राला, त्याच्या घराला अजिबात तोशीस होणार नाही अशा पद्धतीने संत्री उतरवणे, हवामानाचा अंदाज घेऊन, घरटं ज्या फळांच्या कक्षेत येतंय असं वाटतं ती फळं, (वाऱ्याने पडण्याआधीच) वरचेवर तोडणे अशा कसरती सुरु झाल्या. शिवाय क्वचित जे बागेचे, झाडाचे फोटो-व्हिडीओ काढते, इंस्टाग्रामवर लावते- त्यांत मित्र आणि त्याचं घरटं येणार नाही असा प्रयत्न करायला लागले. (बिग बॅड वर्ल्ड पासून त्याला जपण्याचा वेडेपणा.)

एके दिवशी रात्रीतून सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडला. एरवी असा अंथरुणात गुरफटण्याच्या वेळी आलेला पाऊस मी एन्जॉय करत असते, तशी ह्यावेळेस मनापासून आनंद घेऊ शकले नाही. मित्राची, त्याच्या घराची काळजी वाटली. पण करणार काय? थंडीच्या दिवसांत नाजूक झाडं घरात आणते, तसं काही करण्याचा पर्याय इथे अजिबातच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी घाईने जाऊन बघितलं तर मित्र, घरटं आणि अंडी - सगळे सुखरूप होते. हुश्श झालं. 

थोडं नीट बघितल्यावर आम्हाला मित्राची हुशारी समजली. घरट्यासाठी जागा निवडताना त्याने आतल्या बाजूला, पानांच्या आड, सहज न दिसेलंशी जागा शोधली होतीच, शिवाय त्या फांदीच्या वरच्या बाजूला असलेल्या पानांमुळे एकप्रकारचं नैसर्गिक छप्पर आणि अडोसाही साधला होता. आणि घरट्याची फांदी - तिचा डिग्री ऑफ फ्रीडम इतका कमी की - कितीही वारा आला तरी ती अगदी हलकी बाउंस झाल्यासारखी हिंदकळायची. त्याहून जास्त नाही. किती हुशार तो पिटुकला मेंदू! मागं कसं मित्राने आमच्यावर विश्वास दाखवला - तसा आता आमचा मित्रावर- त्याच्या क्षमतेवर विश्वास बसला. 
5CD0BE40-B3FF-40CA-8DEB-D12A7553A5D0.jpeg

त्यानंतरचे काही दिवस आमच्या बोलण्यात मित्राचे उल्लेख रोजचे झाले,
"मित्र काय म्हणतोय?"
"काही नाही बसलाय ध्यान करत" किंवा "खाऊ शोधायला गेलाय वाटतं." असं काही. 
एवढंच काय, तर मला स्वप्नातसुद्धा 'बागेत मधमाशीच्या आकाराची  हमिंगबर्डची छोटी पिल्लं भिरभिरतायंत' असं दिसायला लागलं. 

पण, 
दोन दिवस सकाळ - दुपार - संध्याकाळी मित्र घरट्यात दिसला नाही. आमची नेमकी चुकामुक होत होती का? मग एक दिवस मुद्दाम ठरवून पाळत ठेवल्यासारखी त्याच्या घरट्यावर लक्ष ठेवून राहिले. तर दिसलाच नाही तो. घरटं आपलं तसंच. मग हळूच (परत लांबून कॅमेरा तिरका, झूम वगैरे करून) घरट्यात डोकावले तर एकच अंडं केविलवण्यासारखं एकटं पडलेलं. 
87DACCF4-9B6B-4668-84C0-394A18E65812.jpeg
दुसरं कुठं गेलं? आणि ह्या अंड्याला एकट्याला सोडून का गेला आमचा मित्र?

गूगल केल्यावर बरीच कारणं मिळाली - कधी कधी खाऊ-पिऊ आणायला गेलेल्या आईला काहीतरी अपघात होतो, कधी-कधी अंडी व्हायेबल नसतात - मग अशा वेळी (ठराविक काळाने जर पिल्लं बाहेर आली नाहीत तर) पक्षी स्वतःच मूव्ह ऑन करतात वगैरे. 

ठीक आहे म्हणजे, निसर्ग-नियम वगैरे सगळं मान्य आहे. पण तरीही मला ह्या गोष्टीचा सुखी, सकारात्मक आणि गोड शेवट हवा होता. त्यामुळं कालपासून फार रुखरुख लागून राहिलीये. बागेत ऐकू येणारा इतर पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांनां आलेला मोहोर, नवी पालवी - कशानेच मन डायव्हर्ट होत नाहीये. मित्र कुठे गेला? एका अंड्याचं काय झालं? आता दुसरं बिचारं असंच एकटं राहणार का? त्याला पावसाचा त्रास झाला की उंदीर-सरड्यांचा? त्याची प्रायव्हसी जपण्याच्या नादात आमचं जास्तच दुर्लक्ष झालं का? की त्याला आमचाच त्रास झाला? मित्राला हवी ती सुरक्षितता द्यायला आम्ही कुठे कमी पडलो, चुकलो की काय?  

थोडे दिवस आता नुसते प्रश्न आणि प्रश्न. 

'हमिंगबर्ड, एsss हमिंगबर्ड... ' 
माझ्या मनातली हाक माझ्या मनातच विरते.

-सिद्धि. 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle