अर्धा किलो भेंडी (दोन माणसांना पाव किलोही पुरेल )
तीन कांदे
दहा बारा लसूण पाकळ्या
एक इंच आलं
एक मोठा टोमॅटो
तीन चार हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
तेल
जिरे
1 टेस्पू चिली फ्लेक्स (नसतील तर लाल तिखट चालेल)
हळद
धने पावडर
गरम मसाला पावडर
मीठ
कृती:
१. एका कांद्याचे सहा भाग करून त्याच्या एकेक पाकळ्या सोडवून घ्या, धुवून पुसलेल्या भेंडीचे लहान तिरके काप (अगदी पातळ नको) चिरून घ्या. आता एका पॅनमध्ये मोठा चमचाभर तेल गरम करून त्यात हा कांदा परता, जरा शिजू लागला की त्यातच भेंडी घालून मऊ होईपर्यंत मोठ्या फ्लेमवर परता.
२. दोन कांदे उभे चिरुन ठेवा. लसणीच्या पाकळ्या उभ्या चिरा आणि एक इंच आलं ज्युलियन करून घ्या. हिरव्या मिरच्या उभ्या चिरून दोन तुकडे करा. टोमॅटो जाडसर उभा चिरा.
३. आता दुसऱ्या पॅनमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करा, त्यात जिरं घालून त्यात चिरलेले लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कांदा घालून परता. कांदा थोडा मऊ झाला की जाडसर उभा चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो शिजत आला की मीठ, चिली फ्लेक्स, हळद, धने पावडर आणि गरम मसाला (हे सगळं चवीनुसार) घालून नीट ढवळत रहा.
४. पाच दहा मिनिटात सगळं बऱ्यापैकी शिजल्यावर (अति खिमा व्हायला नको) त्यात आधी शॅलो फ्राय केलेला कांदा आणि भेंडी घालून ढवळा. भेंडीला सगळीकडे मसाला नीट लागू द्या. भेंडी आपल्याला हवी तितकी शिजली की त्यात चिरलेली कोथिंबीर मिसळा आणि ढवळून गॅस बंद करा.
नोट: मी कधीतरी यूट्यूबवर बघून ही केली होती पण घरी सगळ्यांना प्रचंड आवडली. मग आता नेहमी करते. जरा बाहेरच्यासारखी चमचमीत होते पण एखाद्या दिवशी बेत करायला हरकत नाही. :) पोळी, पराठा, नान कशाही बरोबर खाऊ शकता.