आम्ही औरंगाबादकर.

आम्ही औरंगाबादकर...  हो .. हो ... थांबा!  मला माहिती आहे,  लेखाचा विषय दिलेला होता तो , 'मी औरंगाबादकर" असा  होता. पण आमच्या  औरंगाबादला , ' मी ' असे  काही नसते.  सगळे ' आम्ही ' असेच असते. ( आणि हे आम्ही आदरार्थी बहुवचन नाही तर खरेच बहुवचन असते. अनेक नात्या, संबंधा, आठवणींनी मिळून बनलेला मी कसा असणार? आम्हीच असणार!)  त्याच्यामुळे मी लिहिणार आहे, 'आम्ही औरंगाबादकर' ह्या विषयावर!  
 तर सांगायची गोष्ट अशी आम्हा औरंगाबादकरांना  कोणी ' घाटी' म्हटले  तरी आम्ही फारसे लक्ष देत नाही! कारण एकतर आमच्यासाठी 'घाटी' हे आमच्या सरकारी रुग्णालयाचे  नाव आहे आणि घरी सुईणीच्या उपस्थितीत जन्म घेतलेल्या मुलांच्या पिढीनंतरचे  अनेक जण याच इस्पितळात जन्माला आलेले आहेत.  दुसरे   म्हणजे असेल आमची भाषा थोडी वेगळी. पण   प्रमाणभाषा मराठीत ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर आमच्या इथलेच की पैठणजवळच्या आपेगावचे !! शिवाय शेजारच्या जिल्ह्यात अंबेजोगाईला मराठीतले आद्यकवी मुकुंदराज आहेत. फक्त ज्ञानेश्वरच  नव्हेत तर एकनाथ देखील इथलेच आणि रामदासांचे  जन्मगाव जांब  देखील काही फार दूर नाही.  उगीच नाही, मराठवाडा संतांची भूमी म्हणतात ते!!  त्यामुळेच गाढवाला पाणी पाजणारे एकनाथ, कोणी अंगावर थुंकला तर त्याला काही न बोलणारे एकनाथ, आमच्यात मुरलेले असतात. 
आमच्या औरंगाबाद विभागाचा इतिहास आहे  आता जवळपास पंचवीस शतकांचा  आमचे  पैठण, 'प्रतिष्ठान' नावाने प्रसिद्ध होते हे तर सर्वाना माहिती आहेच. पण आता  आमच्या औरंगाबादच्या परिसरात अभ्यासकांना  वेगवेगळ्या शतकातल्या खुणा सापडत आहेत. भरभराटीला आलेल्या सातवाहन काळात परदेशांशी, ग्रीक रोमन व्यापाऱ्यांशी, आमच्या इथला पैठणीचा व्यापार  चालत होता.  प्रतिष्ठान  हे पाटलीपुत्र, अवंती, तक्षशिला इत्यादी राजवटींशी व्यापार  संबंध ठेवून होते.   अनेक राजवटी आल्या आणि  गेल्या.  सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आणि नंतर मुस्लिम राजवटी आल्या आणि गेल्या.  यादवांच्या राजवटीतली भरभराट अजूनही देवगिरीच्या रूपाने आपल्यासमोर आहे. मधल्या काळात भरभराटीला आलेल्या बुद्ध, जैन  पंथीयांनी अजिंठा आणि  वेरूळ मधल्या लेण्यांमध्ये आपली धर्मसूत्रे  कोरून ठेवली आहेत. कळसापासून सुरुवात होऊन पायथ्यापर्यंत कोरीव काम करून उभारले  गेलेले हिंदू लेणे,  कैलास हे  अनेक दृष्टीने एकमेवाद्वितीय असेच आहे.  आजही मूर्ती शास्त्राच्या, इतिहासाच्या, पुरातत्वाच्या, धर्म आणि संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी म्हणूनच आमचे  औरंगाबाद महत्वाचे  आहे. 
 भारतातील पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला आमचा औरंगाबाद जिल्हा! याच्यात काय नाही? अजिंठा, वेरूळच्या लेण्या आहेत, देवगिरीचा किल्ला आहे, बारा ज्योतिर्लिंगामधील  एक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवाजी महाराजांच्या आजोबांनी ज्याचा जीर्णोद्धार केला असे घृष्णेश्वर मंदिर आहे, ' बीबी का मकबरा' आहे, मलिक अंबरने बांधलेली  पाणचक्की आहे.  नाथांचे  पैठण आहे, तिथेच उभारलेले  जायकवाडी धरणआहे, पाणी साठवणारा मोठा नाथसागर तलाव आहे,  त्या सभोवतालची  सुंदर बाग आहे. औरंगाबाद शहरात असलेला हर्सूल  तलाव, हिमायत बाग, औरंगाबाद लेण्या किती म्हणून ठिकाणांची नावे सांगावी!  मग आम्हां  औरंगाबादकरांना आमच्या शहराचा अभिमान नसला तरच नवल!!
अनेक शतकांच्या इतिहासाचा अनुभव असल्यानेच, आम्हाला कुठल्याही कामांची घाई गडबड नसते!! होणारे त्याच्या वेळी होत असते यावर आमचा ठाम विश्वास आहे.  म्हणून आम्ही धावपळ, गडबड करून उगीच कामे उरकून, संपवून  टाकत नाही.    कदाचित म्हणूनच,   हनुमानाला विश्रांती मिळावी म्हणून रामरायाने  आमच्याच इथल्या  भद्रगिरीची निवड केली.  नंतर खुलताबाद असे नामकरण झालेल्या भद्रगिरीचा  झोपलेला हनुमान, माझ्या पाहण्यात तरी एकमेव! एरवी तो हातात गदा घेऊन उभा असलेला वीर मारुती किंवा मग हात जोडलेला दास मारुती. शयनस्थितीतील मारुती आहे का तुमच्या गावात? नाही ना? मग? आहे का नाही आमचे औरंगाबाद भारी?!!!

आमचे  शहर प्रसिद्ध आहे, ते दरवाजांचे शहर म्हणून.  लहान-मोठे, सुस्थितीतले,  मोडकळीला आलेले असे अनेक दरवाजे शहरात आहेत पूर्वी म्हणे  52 होते.  लहान लहान म्हंटला तरी तोही दरवाजा पंधरा फुटांपेक्षा जास्तच उंच  असतो.  मग मोठा केवढा असेल, विचार करा! ते दरवाजे आमच्या इतके सवयीचे होऊन गेलेले आहेत की  त्यातून जाता येता देखील, आमच्या ते लक्षातही येत नाहीत.  पण त्यामुळेच की काय माहिती नाही, आमच्या घरांचे आणि मनाचे दरवाजे नेहमी उघडे असतात! वडिलांचे चुलत चुलत चुलत चुलत भाऊ हे आमच्यासाठी काही लांबचे  नाते नसते! आम्ही इतक्या वेळा चुलत म्हणतच बसत नाही.  तेवढेच नव्हे  तर त्यांची मामे मावस भावंडे, एवढेच काय, आमच्या शेजाऱ्यांचे नातेवाईक आमच्या घरी केव्हाही  येऊ शकतात आणि आम्हीही त्यांच्या घरी!  इतके त्यांच्याशी चांगले संबंध असतात. अर्थात सतत सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून आयुष्य एकसुरी आणि कंटाळवाणे होऊ नये म्हणून आपापसात वाद, भांडणे, अबोले  पण असतात. पण म्हणून काही कोणी कोर्टापर्यंत जात नाही. काळ हे सर्वावरचे औषध आहे ह्यावर आमची ठाम श्रद्धा असते. ह्या भांडणांची झळ शक्यतो माहेरवाशिणींना लागत नाही.  औरंगाबाद मध्ये माहेरपणाला  लेकी  आल्या  आणि  चार दिवस राहणार असतील  तरी त्यांनी  जायलाच हवे  अशी अनेक घरे  असतात आणि गेलो नाही तर ते प्रेमाने रागवतात देखील. अनेक टेकड्या डोंगरांनी वेढलेले  आमचे  शहर आम्हाला सुंदरच वाटते.    टेकड्यांची नावे पण अगदी वेगळी.  मग निपटनिरंजन असेल, गोगाबाबा असेल, सुलीभंजन असेल.  अर्थात इथले सगळेच खास असते. एवढेच काय, इथे आमखास मैदान देखील असते!!
शहरातल्या वेगवेगळ्या भागांची नावे  पुऱ्यामध्ये सांगितली जातात.  मग तो उस्मानपुरा, बेगमपुरा असेल किंवा पदमपुरा, कर्णपुराअसेल. शिवाय गल्ल्याना पण नावे असतात रंगारगल्ली, इत्तर गल्ली अशी. रंगार गल्लीत अजूनही ओढण्या रंगवून मिळतात आणि इत्तर गल्लीच काय तो पूर्ण बाजारच, अत्तराच्या आणि मेंदी, मेंदी तेल, शिकेकाईत घालायच्या गवला कचोऱ्याच्या वासाने दरवळत असतो. शहराचा महत्वाचा भाग असलेली गुलमंडी एकेकाळी फुलांचा बाजार होता. बाजारवरून आठवले, बाजार चित्रपटातील 'करोगे याद तो हर बात याद आयेगी' लिहिणारे बशर नवाज औरंगाबादचेच. सतराव्या शतकात,उर्दू भाषेत पहिल्यांदा काव्य रचना करणारे वली दखनी उर्फ वली औरंगाबादी देखील औरंगाबादचेच. 
मराठीत लिहिणारे आद्य कवी तसेच संत कवी ह्यांची नावे आपण सुरुवातीलाच पहिली. पण सतराव्या शतकात मराठी काव्य रचनेतील, कटाव रचणारे एक महत्वाचे  नाव अमृतराय महाराज ते देखील औरंगाबादचेच. आधुनिक मराठीतील अनेक लेखक, कवी, विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ह्यांची नावे औरंगाबादशी जोडलेली आहेत. त्या सगळ्यांचा उल्लेख करायचा तर तो एक स्वतंत्र ग्रंथच होईल! 
  इतक्या सगळ्या टेकड्या आहेत आजूबाजूला आणि हिल  स्टेशन नाही असे  कसे काय शक्य आहे? आमचा भाग कडक उन्हाळ्याचा म्हणून ओळखला जात असला तरी,  आमच्याकडे हिल स्टेशन देखील आहे, अत्यंत सुंदर आहे, त्याचे  नाव आहे, म्हैसमाळ. महेशमाळ चा अपभ्रंश आहे म्हणतात. माझ्या लहानपणी   तिकडे खूप मोर असायचे, मोरपिसे खाली पडलेली देखील सापडायची. 
माझ्या गावाची नावे तरी किती आणि कितीदा बदलली? अगदी पूर्वी काय नाव  होते माहिती नाही, पण वाचनात आलेला आहे इतिहास तेव्हापासून मलिक अंबरने शहर नव्याने वसवले तेव्हा खडकी, मग त्याच्या मुलाने बदललेले  फतेहपूर, मग औरंगजेबाने बदललेले औरंगाबाद.  ही सगळी नावे बदलली गेली,रुळली देखील आता च किती वर्षे संभाजीनगर नावाची नुसती चर्चाच चालू आहे.  विमानतळाचे नाव  तेवढे आहे  छत्रपती संभाजी महाराज विमानतळ. औरंगाबादची म्हणजे पैठणची  पैठणी किती शतकांपासून प्रसिद्ध आहे ते आपण पाहिलेच. आणखी एक विशेषता म्हणजे हिमरू हे कापड. रेशीम आणि सूत एकत्र करून विणलेले, दोन्ही बाजूनी वापरता येणारे हे कापड साधारण किनखापी सारखे सुंदर दिसते.  त्यापासून तयार करण्यात आलेल्या शाली, चादरी औरंगाबादला तयार होतात आणि विकल्या जातात. 
औरंगाबाद शहरात १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिशांनी २१ जणांना फाशी दिली तो परिसर होता काला चबुतऱ्याचा. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर त्याचे  नाव झाले क्रांती चौक. आता काळा चबुतरा ज्या ठिकाणी होता तिथे स्वातंत्र्य संग्राम स्मारक आणि २०० फूट उंच तिरंगा झेंडा आहे. 
हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतलेले कारावास भोगलेले अनेक स्वातंत्र्यसैनिक औरंगाबादेत होते. 
औरंगाबाद शहराचे ग्राम दैवत आहे संस्थान गणपती आणि सुपारी मारुती. शहरातील मंदिरात शंकराची नागेश्वर, खडकेश्वर अशी  मंदिरे  आहेत, जिथे नवरात्रात मोठी जत्रा असते ते कर्णपुऱ्याचे देवीचे मंदिर आहे. नव्याने वसलेले बस स्टॅन्ड समोरचे गणेश मंदिर आहे शहरात अनेक  दर्गे आणि मशिदी आहेत. गुरुद्वारा आहे. चर्च आहे. 
सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा मराठी आणि त्या खालोखाल उर्दू. . ह्या दोन्ही  भाषांची सरमिसळ झाली आहे  हिंदू मुसलमान सामंजस्य, एकोपा जितका सवयीचा तितकेच वैमनस्य आणि दंगे देखील सवयीचे. अशा वेळी औरंगाबाद एखाद्या धुमसत्या ज्वालामुखीसारखे असते. 
औरंगाबादकर आधी कोपऱ्यावर बसैय्ये बंधूंकडे उसाचा रस पितो मग त्यांच्याकडेच चणे दाणे विकत घेतो. गुलमंडीवर चक्कर करायलाच लागते. काही विशेष घडलेले साजरे करायचे असेल तर डावीकडचे शामलाल  कोल्ड्रिंक्स, जिथे उत्तम आईस्क्रीम मिळायचे फोटो काढायला गुलमंडीवरचा शोभना फोटो स्टुडिओ. सगळ्यांची आयकार्डे आणि हॉल तिकिटे इथेच काढलेला फोटो मिरवणार!. मग पुस्तकांची खरेदी करतो आर. एल दौलताबादकरांकडे. सुपारी मारुतीचे दर्शन  घेऊन, प्रसादाचे खोबऱ्याचे तुकडे खाऊन नारळवाल्याकडे नारळ आणि फुलवाल्याकडे फुले घेतो. मग मागे येऊन परत सरळ वर चौकाच्या रस्त्याने गेले की  इमरती आणि रबडी मिळणारी उत्तम आणि मिलन मिठाई भांडार. वाटेत जाता जाता हैदराबादहून आलेले  नेवाळी, कुंदाचे गजरे, क्वचित कधी जाई, मोगऱ्याचे गजरेही घेतो.मग डावीकडे वळून रंगारी गल्लीच्या अगदी सुरुवातीलाच गायत्री चाट भांडार. तिथल्यासारखी कचोरी आणि मुगवडे जगात कुठेही मिळत नाहीत. पण जर का भांडी घ्यायची असतील तर मग पातुरकरांकडे जायला मात्र उजवीकडे वळायचे. वाटेत लागणार चिमण्यांचे झाड हे एक मोठे झाड होते आणि ह्यावर सतत पक्षी बसून आवाज करीत असत. संध्याकाळी तर खासच आवाज येत असे.  तो आवाज, ती झाकोळून आलेली संध्याकाळ, दुकानात लागायला लागलेले दिवे, बांगड्यांच्या दुकानातल्या चमकणाऱ्या बांगड्या असा तो चौक कायम स्मरणात राहणारच.  
पण भांडी घ्यायची नसतील तर मग सुपारी हनुमानपासून डावीकडे वळून अजिंठा ऑप्टिशियन च्या गल्लीतून सरळ खाली जायचे.   भाजी बाजारात जाऊन भाजी घेऊन  मग जात जात एकदा सरस्वती भुवन परिसरात जाऊन यायचेच. माझे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण ह्याच परिसरात झाले केवळ माझेच नव्हे तर माझे बहीण, भाऊ इतकेच काय वडील पण इथेच शिकले इथल्या एका हॉलला माझ्या पणजीचे नाव होते. नंतर माझी भाचरे पण ह्याच परिसरात शिकली. असा  हा  पिढ्यान पिढ्या परिचयाचा परिसर. औरंगाबादमधील खूप सगळ्या दुकानदारांचे पण असेच.  त्यांच्या एक दोन पिढ्या तरी नक्की परिचयाच्या असतात आणि ते देखील गिऱ्हाईकांशी घरगुती संबंध ठेवून असतात. असे आमचे औरंगाबाद आणि त्या शहराने घडवलेले आम्ही औरंगाबादकर इतक्या मोठ्या आयुष्यातील फक्त पहिली वीस वर्षे मी औरंगाबादेत राहिले. तरी आज ' मी.   कर ' ह्या विषयावर लिहायचे म्हटल्यावर औरंगाबादच आठवले ह्यातच त्या शहराची विशेषता लक्षात येते.  जणू बशर नवाज च्या शब्दांत औरंगाबाद शहर इथे राहून गेलेल्या प्रत्येकाला सांगत असते, "मेरा वादा है कि सारी ज़िंदगी,तुझ से मैं मिलता रहूँगा ख़्वाब में !!  
- पूर्व प्रसिद्धी ऋतुगंध सिंगापूर
    

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle