माझ्या पणजेसासूबाई वाई, महाबळेश्वर, सातारा भागातल्या.
त्या काळे पोलीस करायच्या. तिथं काळ्या घेवड्याला पोलीस म्हणतात. म्हणजे आज काय केलंय? तर बाबा पोलीस...विचित्र वाटतं ना? पण मला नाही वाटत..... सवयीमुळे. :)
तर...ही उसळ त्यांनी फोडणीस घातली की असा सुगंध दरवळायचा की क्या कहने....पदार्थाला चव आणण्यासाठी आलं लसूण पेस्ट, धने जिरे आमचूर पावडर, कांदा टाॅमॅटो चं वाटण लागतंच ही अंधश्रद्धा आहे हे एक चमचाभर उसळ खाल्ली की लक्षात येई.
तर...
काळे घेवडे रात्री गार पाण्यात भिजवायचे.
सकाळी कुकरला अगदी मऊ मेणासारखे शिजवायचे. पालथ्या डावानं जरा घोटायचे. थोडे आख्खे, थोडे ठेचलेले म्हणजे मिळून येते
झालं...मोठ्ठं काम झालं.
कढीपत्त्याची पानं हातावर चुरून घ्यायची.
फोडणी - लोखंडाच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात
गोडं तेल...तापलं की मोहोरी, तडतडली की हिंग हळद, कढीपत्ता,
बास्स.....
मग काळे पोलीस फोडणीस घालायचे (इथूनच तो सुगंध दरवळायला लागायचा...)
गूळ (उसळीला गोडसर चव यायला हवी इतपत) .+ मीठ, सुकं खोबरं किसून मग भाजलेलं, हातावर चुरून घालायचं. कोथिंबीर
आणि मग लोखंडी पळीत अजून एक फोडणी करायची. त्यात ठेचलेला लसूण घालून तपकिरी रंगावर कुरकुरीत करायचा. मग गॅस बंद आणि त्या गरम तेलात लाल तिखट आणि घरचा गोडा मसाला घालून ही फोडणी उसळीवर घालायची. मग झाकण ठेऊन द्यायचं आणि बारीक गॅसवर उकळायची.
आत्ता लिहीतानाही ती चव आठवतीये आणि जाणवते आहे मला. भाताशी किंवा ज्वारीच्या भाकरीशी किंवा वाटीत घेऊन चमच्यानं खाणं म्हणजे स्वर्गसुखच.
पोलीस हे राजम्याचं मराठी भावंडं. तशीच छान क्रीमी क्रीमी चव लागते ह्याची. पण मस्त ठसकेबाज चव असते.
हे शिजले नाहीत तर वाईट लागते उसळ. लाकडासारखे लागतात मग. पहिल्याच फटक्यात भरपूर शिजवायचे. परत नंतर शिजवायचं म्हटलं की दडदडीत होतात.
तयार उसळीची चव घेतली ना चमच्यातून कि पहिल्यांदा पुढे येते ती गोड चव. अरेच्चा, हे प्रकरण गोड का लागतंय? असा मनात विचार येतोय तोच चव जाणवते ती खोबरं, गोडा मसाला, कढीपत्ता आणि लसणीच्या फोडणीची चव घेऊन आलेल्या काळ्या घेवड्याच्या स्मूथ ग्रेव्हीची.
करून बघा, खावून बघा. दुवा द्याल.