खिचडीच्या धाग्यावरून गाडी आज्जीकडे वळली आणी सर्वांनाच आपापली आज्जी आठवून, अनेकांची मने भरून आली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन तिच्या आठवणींसकट तिची अजून एक सोप्पी आणि पटकन होणारी व वरचेवर केली जाणारी पा. कृ.
दही-पोहे
साहित्य -
जाडे पोहे वाटीभर
सायीसुद्धा ( सायीसकट) दूध वाटीभर
घट्ट विरजलेलं गोड दही - १-२ वाट्या
२ मोठे चमचे सायीचे गोड दही.
१ मिरची (पोपटी रंगाची तिखट "नसते" ती) , कोथिंबीर
किसलेलं आलं चमचाभर
मिठ, साखर
तूप, जिरं, हिंग
जिथं जिथं दूध लिहिलंय तिथं तिथं म्हशीचे फुल फॅट दूध. तूप लिहिलंय तिथं घरी कढवलेलं तूप. आमच्या घरचे सर्व जे.ना पथ्यविरहीत जेवायचे व बाकीच्यांनीही फालतूची डायेटं वगैरे करू नये अशी त्यांची कळकळीची विनंती असे.
एरवी दुभत्याच्या कपाटाभोवती वेटोळं घालून बसलेल्या आज्ज्या पणज्या नातवंडांसाठी हा पदार्थ करताना मोकळ्या हातानं व मोठ्या डावानं सायीचं दही घालताना बघणं हा एक आनंदानुभव असतो.
हिंग - बाजारातून खडा-हिंग विकत आणायचा, खलबत्यात घालून कुटायचा. हिंग कुटून झाला की त्याच खलबत्यात जवसाची किंवा कारळ्याची चटणी कुटायची. (म्हणजे हिंगाचा मस्त वास चटणीलाही येतो.)
खलबत्यात कुटलेल्या हिंगाची चव बाजारी हिंग पावडरीला येत नाही, आणि आपल्या स्वैपाकात कांदा लसूण कमी असल्याने हिंगाचा वास जरा चांगला "लागला" तरच चव येते. इति आसाबा.
कृती -
थोडं जिरं, मिठ व मिरची पोळपाटावर खरंगटून घेणे. आलं किसून घेणे.
निवडलेले व चाळलेले पोहे पसरट पातेल्यात घेऊन मग त्यावर वाटीभर दूध घालून हातानेच एकत्र करायचं. हे पोहे भिजलेल्या पोह्यांसारखे दिसतात. ५ मिनिटांनी हळूवार हातानं त्याला साखर, मिठ,आलं, जिरं, मिरचीचे वाटण व सायीचं दही २ चमचे चोळून ठेवायचं. ( हे काम फार निगुतीनेच करावं. धबड-धबड केलं की पोहे मोडतात) अगदीच कोरडं वाटलं तर त्यात अजून थोडंसंसंच दूध शिंपायचं. नंतर "लोखंडी" कढईत/ किंवा पळीत फोडणी करायची (तशी खमंग चव तुम्च्या त्या निर्लेप का फिर्लेपला नाही मिळत.). तुपात जिरं, मिरचीचं पोट फोडून केलेले मोठे तुकडे व हिंग घालून ती फोडणी पोह्यांवर ओतायची. खमंगफोडणी "अश्शी" बसली ना पदार्थाला, की मग कोणत्याही पदार्थाची चव "खुलते". मग हातानेच पोहे परत एकत्र करून घ्यायचे आणि मग अगदी वाढायच्या वेळेस उरलेलं दही घालून सारखं करून वाढायचं. दही गोडच हवं. वरून लागलं तर परत थोडं दूध घालून जरास्सं सरबरीत केलं तरी चालतं. फार पात्तळ नको पण. सगळ्या पोह्यात एकदम दही नाही घालायचं, लागतील तसं थोडं थोडं करून खायला द्यायचे. पोह्यांची ताटली भरली की एकच कोथिंबीरीचं पान वर ठेवायचं म्हणजे खाताना कोथिंबीर तोंडात येत नाही. ह्या पोह्यांची चव गोडसरच असते. तिखट खाणार्यांना ह्याच्यावर लसणीचं तिखट घालून द्यायचं आणि तिखट न खाणार्यांना मिरचीचे तुकडे बाहेर काढून मग द्यायचं.
काही अवांतर सूचना - आ.साबांच्या नातवंडांच्या सूचना-ग्रंथातून.
१. ह्यात हळद नसते.
२. कोथिंबीरीचा एक किलवर फक्त डेकोरेशनसाठी.
३. ह्यात कढिपत्ता पण नाही, कुटाची मिरची नाही. कोणतीही पानं, फुलं ह्यात ढकलायची नाहीत. बरोब्बर जमलं तर कोणत्याही अधीकच्या चवीची आवश्यकता नाही.
४. डाळींबाचे दाणे/ द्राक्षं अजिबात घालायची नाहीत. घातली तर चालतील का असं विचारायचंही नाही.
५. पोहे व जिरं नीट निवडून घेतलं नसेल तर कचकच येणारच.
६. काकडी, गाजर, कच्चा कांदा, ढो. मिरची घालायची नाही. आरोग्यासाठी खायचे असतील तर नुसते पोहे खा , दूध प्या व कोशिंबीर खा. ह्या पोह्यात फॅट कटींग चालणार नाही. दुधावरच्या सायीसाठी केला जाणारा हा पदार्थ आहे त्यामुळे सायीचे दही घ्यावंच लागेल.
७. हा गोडसर चवीचा पदार्थ आहे.