आख्ख्या कांद्याची आमटी
हा आमच्या पणजीबाईंचा अजून एक खास पदार्थ.
बाजारातून नेहमीच्या आणलेल्या कांद्यातलेच लहान लहान कांदे वेगळे काढायचे. ते सोलून मग भरल्या वांग्याला देतो तशा "अधिक" चिन्हाप्रमाणे दोन चिरा द्यायच्या आणि जरास्सं मीठ चोळायचं.
फोडणीत गोडं तेल घालायचं. रिफाईंड नाही. ( शेंगदाण्याचं असतं ते फिल्टर्ड तेल) तेल तापलं की त्यात मोहोरी, थोड्या मेथ्या, घरी कुटलेला हिंग, हळद, कढीपत्ता, आणि मग त्यात आठदहा लहान लहान कांदे घालायचे आणि झाकण घालून फोडणीतच कांदे शिजवून घ्यायचे. पाचएक मिनिटात कांदे शिजले की त्यात घरचा गोडा मसाला, लाल तिखट, चिंचेचा कोळ आणि गूळ घालायचा आणि परत एकदा झाकण घालून थोडं शिजवून घ्यायचं. डावानं, उलथन्यानं उगीचच परतायचं नाही. कांदे आख्खेच रहायला हवेत. मग छान शिजलेलं तुरीचं वरण चांगलं घोटून त्यात थोडं पाणी घालून सारखं करून ते फोडणीत घालायचं. चांगली उकळी आली की खडेमीठ, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं. मस्त आमटी तयार होते. सौम्य चवीची, जराशी गोडसरच असते ही आमटी. आंबेमोहोर किंवा इंद्रायणीच्या वाफाळत्या भाताबरोबर खाताना मानवजन्माचं सार्थक होतं. बरोबर लोणचं, पापड, कोशिंबीर काहीही लागत नाही.
मला हे असले पदार्थ खाताना सरोगेट eater मिळावा असं कायम वाटतं. :)
(गोडं तेल, घरचं तिखट, हळद, मसाला, हिंग ह्यानं "चव" चांगली येते. नक्की फरक पडतो. खडेमिठ बेतानं घालायचं कारण ते जास्त खारट असतं. )