जेंव्हा एक ट्रेक करायचा असं ठरलं तेंव्हा माझी अजिबात मनाची तयारी नव्हती. चालू शकेन बरंच पण elevation no way. असा ठाम निर्धार होता. कारण पण होतंच. एखादा छोटा दोन मजल्यांचा स्लोप चढला तरी दम लागायचा. पोटऱ्या भरून यायच्या. जमत नाही हे इतकं ठाम पक्कं होतं मनात गेली काही वर्षं की ट्रॅव्हल करताना अधे मध्ये केलेले छोटे hikes आठवायचे पण नाहीत नंतर. मॅकलोडगंज च्या आसपास केलेले छोटे hikes, Dalhousie जवळचा काला टॉप, श्रीलंकेत सर केलेला सिगिरिया हे सगळं विसरायचे कारण आता अगदी पाय, टाचा पोटऱ्या यांची वाट लागली होती.
पण +१ सतत थोड्या दिवसांनी चल की रुपकुंड करू, चल की बेडनी बुग्याल करू , चल लडाखला जाऊ असा लकडा लावत होता.
मग काश्मीर मधला great lakes of Kashmir नावाचा अवघड ट्रेक त्याला भुरळ घालायला लागला.
सतत च्या ब्रेन वॉशिंग ने एका बेसावध क्षणी मी हो म्हणून बसले.
मग रोज तिथले वीडियो लावणे, गुणगान करणे सुरू झाले. नजारा खिळवून टाकणारा होताच. पण ते अवघड आहे हे समस्त जनता सांगत होती.
एका regular trekker मित्र कपल ला भेटले. त्यांनी सांगितलं की सोपं नाही. Everest base camp करून आलेल्यांना पण जड गेलं बऱ्यापैकी. खूप prep कर. सिंहगड करायला लाग. हे ऐकून धाबं दनाणलं.
माझ्या उत्साही पार्टनर ला सांगितलं की दादा हे काय आपल्याला जमायचं नाय. मग त्याने पण थोडी दया दाखवत, ओके एक शॉर्ट ट्रेक करू मग तीन दिवसांचा असे उपकार केले. मी म्हटलं चला शॉर्ट ट्रेक चालेल.
थोडी फार तर तयारी करू या हेतूने दर वीकेंड ला सुरुवातीला पर्वती ( हसू नका. किंवा हस्लात तरी चालेल. पुढं प्रत्यक्ष पोचल्यावर परिस्थिती नसताना पण आम्ही पर्वती आठवून खूप हसलो होतो) मग कानिफनाथ करत होतो. थोडं फार तरी का होईना म्हणून. तेवढ्यात पण टाचांची हालत बेकार होती. मुळात मला सकाळी उठल्यावर पाय टेकवणं कठीण होतं आधीच. त्यात हे नवीन. आधी पण एका spinal surgeon ने चेक केलं होतं. पण काही उपयोग झाला नव्हता. चालणं पण बंद केलं होतं.
पण रिस्क नको म्हणून ऑर्थोला दाखवलं. त्याने RA profile करून थोडी औषधं आणि व्यायाम सांगितले. तरी stamina आणि मंझिल दोन्हीचा मेळ बसत नव्हता. मी मधून मधून नको नंतर बघू म्हणत होते तरी नवरा मात्र " बघ यावेळी नाही केलं तर पुढं तर प्रत्येक वेळी possibility कमीच होत जाणार. एकदा हिम्मत कर " असं म्हणून मला घोड्यावर बसवायचं प्रयत्न करत होता.
एक दोन वीडियो बघून जाऊ दे आता काय व्हायचं ते होऊ दे असं ठरवलं. पूर्वी कशी माणसं चार धाम करायची ती या मनाच्या तयारीनेच की वेळ आणि काळ आला तर ती पवित्र ठिकाणच्या पायवाटेवरच म्हणून निघत साधारण तोच प्रकार.
थंडी भरपूर आणि हिमालयाच्या कुठल्या तरी altitude वर कॅम्पिंग म्हणून सांगितले होते ते thermals, trekking sticks, torches, jackets, caps, gloves सगळं जमा करत होतो.
थंडीच्या ठिकाणी एक बरं असतं. बॅग मधले सगळे कपडे अंगावर एकाच वेळी घालायचे नो confusion.
आता ट्रेकिंग तीन दिवस म्हटल्यावर आणि जातोच आहोत म्हटल्यावर बाकी चार दिवस सत्कारणी लावायचा प्लॅन केला. गेल्यावर एक दिवस house boat मध्ये राहून मग ट्रेक सुरु होत होता. तिथून परत आल्यावर मग पहलगाम आणि श्रीनगर शेवटी असं ठरलं.आमच्याबरोबर आमचे एक सिनियर फ्रेंड कपल होते.
पहिला दिवस तर मस्त गेला. श्रीनगर ला उतरताच मधे मस्त २९° रणरणतं ऊन जे ओळखीचं होतंच. मग house boat ला पोचून मस्त आराम आणि मग संध्याकाळी बोटीतून दल लेकची फेरी. स्वर्गीय रमणीय अनुभव. एकदम हमी अस्त म्हणणाऱ्या बेगमेचा फील आला. बाकी आमच्या चार जणांच्या ट्रीप व्हॉट्सॲप ग्रुप चे नाव मी ठेवलेले हमी अस्तो*. मी सोडून बाकीच्यांना reference नव्हता तो दिल्यावर त्यावरून खूप जोक्स झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून निवांत निघू असं आमच्या गाईड ने सांगितलं होतं. आधी कल्पना असती तर आम्ही हट्ट करून लौकर निघालो असतो.
तर निघालो आठला. Starting point ला दीड तासात पोचून दहाला ट्रेक सुरु करू असा होरा होता.
ट्रेक सहा तासांचा असेल साधारण असं सांगितलं होतं.
त्यामुळे अगदी चार नाही पण साडेपाच पर्यंत पोचू असा आमचा अंदाज.
पण starting point ला पोचण्याआधीच मध्येच आर्मी ने अडवलं आणि आमच्या गाईड ची कसून तपासणी सुरू केली आणि आम्हाला काश्मिरी माणूस आणि आर्मी यांच्यातलं नातं स्पष्ट कळलं. तरी आर्मी वाल्यांनी तुम्ही लोक इतक्या लांबून अलात म्हणून सोडतो नाहीतर याला आज चांगलं दाखवलं असतं वगैरे डायलॉग मारले. ते गेल्यावर आधी गप्प बसलेल्या गाईड ने पण frustration काढलं.
असो. या सगळ्यात पाऊण तास खर्च होऊन जो ट्रेक आम्ही पावणे दहाला सुरू करू असं वाटलं होतं तो सुरू व्हायला अकरा वाजले. आम्हाला मिळालेला वाटाड्या एकदम ढ फक्त चालायला फास्ट. सुरुवातीला तर accent पण कळत नव्हता त्याचा.
प्रचंड दगड धोंड्यानी भरलेला आणि फक्त चढाचा रस्ता. समस्त शेप आणि साइज चे दगड. एक क्षण चालण्याचे सुख नाही.
त्यातून बऱ्यापैकी वर्दळ. सतत घोडे येतायत चे हाकारे अन शिट्यांच्या खुणा. शिट्टी आली डोंगराच्या बाजूला कडेला थांबायचं हे वाटाड्या ने सांगून ठेवलेलं. त्यामुळे शिट्टी किंवा हाकारे आले की धडपडत डोंगराच्या बाजूला पाय ठेवण्या इतकी जागा शोधण्यात बीपी वाढायचं.
ट्रेक मात्र अतिशय नेत्र सुखद आणि pleasant. त्यांच्या उन्हाळ्यात पण दिवसा एकदम कूल वातावरण. आपल्याकडे हिवाळ्यात पण सकाळी सात वाजता hike करायला गेलो तर घामाच्या धारा लागतात ते आठवत होतो.
खाली नारानाग ची वस्ती आणि पुराणकालीन मंदिर. ठळक चे दूर जास्त छोटे होत गेले. दूरच्या नद्या दिसायला लागल्या , मागची नवी शिखरं दिसायला लागली. फार फार सुरेख नजारा सतत सोबत. पायांचे मात्र तुकडे पडत होते. सतत किमान ४५ अंशांचा चढ.
आमचा स्पीड खूप कमी आहे असं वाटाड्या सारखा म्हणत होता. घोडे घ्या असं त्याचं म्हणणं होतं ज्याला आम्ही नकार देत होतो. माझी मधूनच कुठून या फंदात पडलो अशी चिडचिड होत होती. स्वर्गीय नजारा असला तरी फीलपलीकडे कठीण होता प्रकार. इतका cardio जन्मात केला नाही असं वाटत होतं. भयंकर दमणूक होत होती. पण दुसरा ऑप्शन नव्हताच. वर पोचणे हाच एक. जो पूर्ण मोठा ट्रेक होता KGL नावाचा ( ज्याची छोटी आवृत्ती आम्ही करत होतो) तो बरोबर उलट्या direcrion मध्ये होता आणि तो संपवत आणलेले ट्रेकर्स उतरत होते जेंव्हा आम्ही चढत होतो. तेही खूप दमलेले. आणि किती उरलं आहे हे विचारल्यावर don't ask just trust yourself keep walking इतकं सांगत होते. काही आम्हालाच अजून किती उतरायचं आहे हे विचारत होते. त्यावरून उतरणं पण फार सोपं नाही इतकं लक्षात आलं.
बरंच सामान पोनिज वर लादून आम्ही फक्त डे पॅक कॅरी केले होते.
आमचा चौघांचा प्रायव्हेट ट्रेक असल्याने आमचे पोनीज आमच्या बरोबरच असतील हा आमचा भ्रम पार मोडीत निघाला होता. पहिल्या पंधरा मिनिटात आमचे पोनी आणि cook दिसेनासे झाले होते.
आम्ही पाण्याची एकेक बाटली सोबत घेतली होती. मध्ये झरे लागतात त्यामुळे काही इश्यू नाही असं कळलं होतं. पण आम्ही उशिरा निघाल्याने आणि आमचा स्पीड कमी असल्याने झरे भेटण्या आधी बाटल्या रिकाम्या झाल्या होत्या. रोज किमान तीन लिटर पाणी पिणारी मी आणि आता इतका cardio डोक्यावर ऊन. सतत dehydration चे विचार. दोन बंगलोर ची मुलं आली समोरून त्यांना मॅगी पॉइंट किती लांब हे विचारलं तर त्यांनी नीट माहिती सांगितली. जवळचं पाणीच नाही तर electral दिलं. बाटलीत पण भरून घ्यायला लावलं. मी नको म्हणत होते कारण त्यांना खाली पोचेस्तोवर कुठं झरा लागणार नव्हता. पण ते म्हणाले आमच्या बॅग मध्ये पाणीच आहे mostly सगळं. मग आनंदाने बाटली भरून घेतली. त्यांनी ड्राय fruits ऑफर केले पण ते आमच्याकडे होतेच.
मॅगी पॉइंट बद्दल सांगणे गरजेचे आहे. अर्थात मॅगी मिळते म्हणून मॅगी पॉइंट. चहा पण मिळतो. एकच मॅगी पॉइंट या पूर्ण रस्त्यात. त्याची अनेक कारणांनी वाट बघत होतो.
एकतर त्याच्या आसपास झरे सुरू होत होते. तिथं चहा पाणी आणि मॅगी मिळत होतं. तिथं बसून ब्रेक मिळत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर आमच्या पहिल्या बेसला किंवा कॅम्प साईट ला म्हणजे तृणखोल ला पोचण्याचा रस्ता mostly सपाट किंवा उतरणीचा होता. चढ almost नव्हताच.
फार फार वाट पाहायला लावून अखेर पाच वाजता मॅगी पॉइंट आला. म्हणजे एक दगडांनी बांधलेली shack. त्यात एक बाबाजी आणि त्याचा मुलगा. त्यांनी पटापट चहा दिला. मध्ये जेवलो होतो सो भूक नव्हती आणि इच्छा तर नाहीच.
थोडे रिलॅक्स झालो आणि निघालो. तिथं असताना छान कोवळं उन होतं. हलका पाऊस सुरू झाला होता.
आमचा वाटाड्या आता अजून किती वेळ याचं उत्तर मला एक तास तुम्हाला दोन अशा प्रकारे द्यायचा.
तो सतत आज काही खरं नाही लौकर चला नाहीतर रात्र होईल असं म्हणत होता. जे खरंच होणार असं दिसत होतं.
ट्रेक ची सुरुवात..
रस्ता
खाली दिसणारं नारानाग चे पुराणकालीन मंदिर
रस्ता
दगडांची नदी
Note :
*हमी अस्तो म्हणजे पश्तू मध्ये "इथंच आहे".
हा एका शेराचा भाग आहे. तो असा.
गर फिरदौस बार रू ए जमिं अस्त |
हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त |
जर जमिनीवर स्वर्ग कुठं अस्तित्वात असेल तर तो इथंच आहे इथंच आहे इथंच आहे.
जेंव्हा मुघल सम्राट जहांगीर पहिल्यांदा काश्मीरला आला तेंव्हा त्याच्या राणीने हे म्हटलं होतं असं पूर्वी वाचलं होतं. पण आता मी जे references पाहिले त्यात सांगतात की स्वतः जहांगीर च असं म्हणाला आणि ते अमीर खुसरो ने डॉक्युमेंट केलं.