काही वर्षांपूर्वी कोथरुडात 'लवंगी मिरची कोल्हापूरची' नावाचं फर्मास नॉनव्हेज रेस्टॉरंट होतं. आमचं नेहमीचं गो टू आणि तिथली निलगिरी चिकन थाळी माझी सगळ्यात आवडती होती. अर्थात सगळ्या सुंदर, आवडत्या जागा बंद पडतात तसंच हेही बंद पडलं.
तर लवंगी मिर्चीच्या आठवणीत हे निलगिरी चिकन. घरी एकदा केलं आणि ते खूपच चविष्ट झालं म्हणून आता नेहमी केलं जातं.
साहित्य:
अर्धा किलो चिकन (करी कट विथ बोन)
मॅरिनेशनसाठी चमचाभर दही, हळद, मीठ
एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट
एक लहान जुडी कोथिंबीर
दोन काड्या पुदिना
तीन हिरव्या तिखट मिरच्या
दोन मोठे कांदे
दोन चक्रीफुलं
दोन वेलदोडे सोललेले
एक तमालपत्र
दोन तीन लवंगा
धने पावडर, गरम मसाला
अर्धी वाटी किसून भाजलेले खोबरे
घरचं साजूक तूप
कृती:
१. सगळ्यात आधी चिकन धुवून दही, हळद, मिठाने मॅरीनेट करून अर्धा तास बाजूला ठेऊन द्या.
२. कांदा उभा चिरून जराश्या तेलावर भाजून घ्या. चिरलेली कोथिंबीर, पुदिना, मिरच्या आणि भाजलेला कांदा मिक्सरला लावून बारीक वाटण करून घ्या.नंतर त्याच भांड्यात भाजलेला नारळाचा चव मिक्सरला लावून घ्या.
३. आता कढईत चार चमचे तूप घालून गरम झाल्यावर त्यात खडे मसाले घालून परता. साजूक तुपामुळे मसाल्यांचा भारी फ्लेवर येतो. आता आलं लसूण पेस्ट घाला. अर्धा वाटी नारळ घालून परता. मग हिरवं वाटण घाला. त्यात दोन चमचे गरम मसाला, धने पावडर वगैरे घालून पाच सात मिनिटे नीट परता.
४. आता त्यात चिकन घालून नीट हलवा. करी पातळ हवी तेवढं गरम पाणी घाला आणि झाकण ठेवून पंधरा मिनिटे शिजवा. (मी आधीच कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून चिकन शिजवून घेते. कुकरची पद्धत- कुकरमध्ये जरासं तेल घालून अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि एक लवंग, तमालपत्र परतून घ्या, त्यात चिकन घालून परता मग त्यात भांडभर गरम पाणी घालून झाकण लावून दोन शिट्ट्या. मग चिकन, रस्सा सगळं मुख्य कढईत ओतायचं.) मीठ घालून पुन्हा एकदा सगळं नीट मिक्स करा.
अतिशय सुंदर, चविष्ट निलगिरी चिकन तयार! पोळी, पराठा, आंबेमोहर भात कशाहीबरोबर तुटून पडा.
फोटो घाईत एवढा चांगला नाही आला, पण चव उत्तम होती.