घटस्थापना माझ्या मनातली

घटस्थापना माझ्या मनातली:
मैत्रिणींनो नवरात्रोत्सव सुरू होतोय, घरोघरी घटस्थापना होईल. अनेक मैत्रिणी आटापिटा करून कुलाचार जपण्याचा प्रयत्न करतील. हे करताना एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो तुम्ही आनंदी तर घर आनंदी त्यामुळे तेवढंच करा जेवढं तुम्हाला मनापासून करावंसं वाटतंय, शारीरिक दृष्ट्या झेपतय!
एखादीची भक्ती तिच्या सुंदर रांगोळीत दिसेल तर एखादीची भक्ती देवीची स्तोत्र पठण करण्यात असेल. एखादीला मनापासून रांधून देवीला तृप्त करण्यात समाधान मिळेल. एखादीला माणसाच्या सेवेत आपली देवी भेटल्याचा आनंद मिळेल. दिवसरात्र माळ हातात घेऊन एका डोळ्याने सुनेने सगळं केलं ना इकडे लक्ष असेल तर ती जपमाळ काय कामाची?
जे कराल ते मनापासून पटतंय म्हणून करा मनावर ओझं देवी देत नाही तिला तुम्ही आनंदी बघायलाच आवडतं. पिढी दर पिढी चालत आलंय ते करावंच लागतं म्हणून ओझं घेऊन करू नका. प्रेमाने सुंदर सजवलेली चार फुलं सुध्दा देवीच्या दरबारी नक्की रुजू होतात.
एक गोष्ट सांगते कोणतीही गोष्ट करताना पुढच्या पिढीने तस्सच केलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका, कदाचित त्या पिढीच्या भक्तीच्या संकल्पना वेगळ्या असतील.
बकरीच्या गोष्टीसारखं एकीने उडी मारली म्हणून दुसरीने मारली असं नको. सजगतेने सण उत्सव साजरे करा.
माझे बाबा मला सांगत असत दोन हस्तक आणि तिसरं मस्तक एकत्र आलं की मनोभावे नमस्कार कर फक्त ते मनापासून वाटू दे. एक मात्र कर अडल्या नडल्याला मदत करताना हात आखडता घेऊ नकोस, माणसातल्या देवाला शोध, त्याची आरास कर, पूजा मांड. तिथे देवी नक्की येईल खात्री बाळग!
पूजा मीही करणारे पण माझ्या मनातल्या देवीची, छान ताज्या फुलांची आरास करून... प्रसन्न देवघरात मला जमेल तशी...कदाचित श्रीसूक्त तोंडपाठ नसेलही पण तरीही घरची गृहलक्ष्मी प्रसन्न असली की तीने घातलेली साद ऐकून माझ्याकडे आनंदाने वास करील माझी अंबाबाई, हो ना?
FB_IMG_1664154707571.jpg

मीनल सरदेशपांडे

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle