आम्ही आनंदे नाचू गाऊ

'आनंद' या वेळचा विषय. आपला आनंद कशात आहे ते लिहायचं. आपल्या कलाकॄती, आनंदी आठवण असं काहीही. वाचूनच मस्त वाटलं आणि माझा आनंद कशात आहे हा प्रश्न स्वतःला विचारला. उत्तरं एकाहून अधिक येणार याची खात्री होतीच म्हणून चक्क पेन-पेपर घेऊन लिस्ट करायलाच घेतली.

मला आनंदी करणार्‍या गोष्टी:- Party
१). अ
२). ब
३). क

एक-एक मिनिट, या वर लिहीलेल्या अ, ब, क या तिन्ही गोष्टी इतक्या तत्परतेने आठवल्यात म्हणजे याच मला सर्वाधिक आनंद देणार्‍या असणार. पण मग त्या दिवशी..... मला चांगलंच आठवतंय की त्या दिवशी या तिन्ही गोष्टी घडल्या/पाहिल्या असूनही मी आनंदले नव्हते. का बरं असं?.... आठवलं. त्या दिवशी ऑफिसात बराच ताण होता मनावर. अचानक प्राईझ ड्रॉप करावी लागल्यामुळे सारे प्रचंड तणावाखाली होते. त्यामुळे कदाचित माझ्या आवडीच्या अ, ब,क कडे दुर्लक्ष झालं असावं किंवा लक्ष जाऊनही त्यांच्या असण्याने होणारा नेहमीसारखा आनंद झाला नसावा.

मग याचा अर्थ काय? जर आपले मन आनंदी असेल तर आणि तरच आपण आनंदी असू शकतो का? आणि हे जर खरं असेल तर मन आनंदी कशामुळे रहातं? जर त्यात काहीही तणावाचे प्रसंग, वादावादीचे प्रसंग, थोडक्यात अप्रिय असे काहीही साठवले नसेल तरच.

याचाच अर्थ आपला आनंद हा आपल्याच मनावर अवलंबून आहे, म्हणजे आपल्याच हातात आहे, नाही का? आपण ठरवलं तर आपण कधीही, केव्हाही, कुठेही आनंदी राहू शकतो मात्र आपल्याला जर आपल्या दु:खद कोषातून बाहेरच नसेल यायचं तर आनंद निर्माण करणार्‍या सतराशे साठ गोष्टी समोर आणून ठेवल्या तरी व्यर्थ !

हे जर का मला पक्कं ठाऊक आहे, तर मग आपण सतत आनंदी रहाण्याचा प्रयत्न का करु नये? आपल्यालाही एखादं प्रसन्न व्यक्तिमत्वाचं, हसतमुख माणूस अवतीभवती पाहून बरं वाटतं. त्या माणसाच्या नुसत्या असण्याने आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळते. मग आपणही कुणासाठी तरी असं व्यक्तिमत्व का बनू नये?

मला असं मुळीच म्हणायचं नाहीये की आपण व्यक्त होऊ नये, आपलं दु:ख दाबून ठेवावं, मुळीच नाही. आपल्या प्रेमाच्या माणसाकडे, मैत्रिणींकडे होऊयात ना व्यक्त. पण एकदा ते सारं बोलून झालं, त्या दु:खावेगाचा निचरा झाला की पुन्हा त्यातच न गुरफटता त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न तर करु शकतोच ना. मला हेही मान्य आहे की काही सल हे कायमचे टोचतच रहातात, ती भळभळणारी जखम घेऊनच जीवन कंठावं लागतं कैक जणांना. तरीही त्यावर फुंकर घालण्याचे मार्ग शोधता येतीलच ना? आणि कसं आहे ना, माणसाचा सहजस्वभाव आहे हा की सुखाचे आनंददायी क्षण लगेच विसरले जातात आणि दु:ख मात्र कायम पाठराखण करत रहातं. याला कुणीच अपवाद नाही. अगदी साधं दैनंदिन जीवनातलं उदाहरण घ्यायचं तर सकाळी घाईच्या वेळी उशीर झाला असतांना, ट्रेन चुकणारच याची खात्री असतांना ती ट्रेनही लेटच असते आणि आपण चढताच सुरु होते त्या क्षणाचा आनंद अगदी जग जिंकल्याचा. पण दिवसभरातल्या अनेकानेक घडामोडींत आपण कधीच स्मॄतीपटलावरून दूर भिरकावून दिला असतो हा क्षण आणि आठवत रहातो ते दुसरीचं तिसरीशी झालेलं भांडण, त्याचा गदारोळ आणि आपले मनःस्वास्थ्य बिघडवून घेतो.

त्यापेक्षा अगदी एक काम न चुकता रोज रात्री करायचं. जसं दुसर्‍या दिवशीच्या घर - ऑफिसातल्या कामांची लिस्ट आपण मनात घोकत रहातो तशीच अजुन एक लिस्ट बनवायची आपल्या मनाशीच 'आज दिवसभर घडलेल्या आनंदी क्षणांची'. म्हणतात ना 'Count your blessings' ते हेच. यात अगदी लहानसे आनंदी क्षणही वेचायला विसरायचं नाही हं. अगदी पहिला म्हणजे सकाळी गजर होताच जाग येणं - कारण कित्येकांच्या वाट्याला हा आनंदही येत नाही.

आज नक्की करुन पहाच ही लिस्ट. आय अ‍ॅम शुअर ही लिस्ट खचितच मोठी असेल दिवसभरातल्या अप्रिय घटनांहून आणि मग त्याच आनंदी क्षणांना कवटाळत निद्राधीन व्हा. उद्या उठाल ना तेव्हा इतकं फ्रेश वाटत असेल की रोजच्या चाकोरीबद्ध रुटीनमध्येही तुम्ही म्हणाल "आम्ही आनंदे नाचू गाऊ"

मैत्रिणींनो, करणार ना मग रोज अशी लिस्ट? पाहिजे तर या धाग्याच्या प्रतिसादात आपण अशी लिस्ट पोस्ट करत जाऊयात. कशी वाटते कल्पना? :)

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle