लाल मुळ्याची भाजी
मुळा मुळातच फार आवडत नसल्यामुळे फार आवडीने कधी आणला नाही. इथे मिळणारा पांढरा मुळा खूप उग्र नसल्यामुळे त्याचे निदान पराठे, मुठीया असे प्रकार करून अधून मधून खाल्ला जायचा. लाल मुळा असाच एकदा ट्राय करून बघू म्हणून आणला, पण कधीतरी चव बदल म्हणून किंवा सलाड मध्ये छान रंगसंगती दिसावी म्हणून तेवढ्या पुरताच. एक मैत्रीण आली होती तेव्हा तिने लाल मुळ्याची भाजी केली, ती आवडली म्हणून आता आवर्जून लाल मुळा आणून भाजी केली.
साहित्य -
लाल मुळ्याची एक जुडी पाल्या सकट
एक कांदा
एक लसूण पाकळी (लहान असेल तर दोन)
अर्धी वाटी डाळीचं पीठ / बेसन
फोडणी साठी - तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, धणे पूड, गोडा मसाला
चवीपुरतं मीठ
चिमुटभर साखर
कृती
कांदा बारीक चिरून घ्या, लसूण पण बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या. मुळा स्वच्छ धुवून त्याचा पाला पण बारीक चिरून घ्या. मुळा किसून घ्या किंवा chopper वर एकदम बारीक करून घ्या. हे अगदी लहान आकाराचे मुळे असतात, ते बारीक चिरणे किंवा किसणे हेच एक वेळखाऊ काम आहे फक्त. म्हणून chopper असेल तर काम सोपं होईल.
बेसन आधी नुसतेच थोडे भाजून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.
तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग घालून कांदा घालून परतून घ्या. मग लसूण घालून परता. मग हळद, धणे पूड, तिखट घालून मग चिरलेला मुळ्याचा पाला आणि मुळा घाला. चवीनुसार मीठ, चिमुटभर साखर आणि गोडा मसाला घालून सगळं थोडं शिजू द्या. वाफ आली की डाळीचं पीठ भुरभुरून हलवून घ्या आणि पीठ शिजलं की गॅस बंद करा.
भाजी शिजतानाच पाणी सुटतं थोडं, त्यामुळे अजून पाण्याचा हबका देण्याची गरज पडत नाही, पण अगदी कोरडी वाटली तर ते करू शकता. मुळ्याला जास्त पाणी सुटलं तर बेसन थोडं वाढवू शकता.
भाजी तयार आहे.