खरं तर खूप काही वेगळी कृती नाही, नेहमीचीच पण हे कॉम्बिनेशन फार आवडतं म्हणून शेअर केली.
साहित्य
पाऊण वाटी मूगडाळ
दोन मध्यम आकाराच्या झुकिनी
फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, धणे जिरे पूड, तिखट, गोडा मसाला
गूळ एक लहान चमचा
चवीप्रमाणे मीठ
कोथिंबीर
कृती
मूग डाळ भिजवून ठेवा, साधारण दोन तास तरी भिजायला हवी. वेळेवर चाळणीत निथळून घ्या.
झुकिनी लहान आकारात चौकोनी तुकडे कापून घ्या.
तेल गरम झालं की मोहरी, मोहरी तडतडली की हिंग, हळद घालून मूगडाळ परतून घ्या. मूगडाळ थोडी शिजली की धणे जिरे पूड, तिखट, मीठ घालून मग झुकिनी घाला. दोन्ही शिजू द्या, किंचित गूळ आणि गोडा मसाला घाला आणि एकदा वाफ काढा. वरून कोथिंबीर घाला.
पोळी सोबत छान लागतेच पण नुसती खायला पण मला आवडते. झुकिनी ओव्हन ला ग्रिल करून, दाण्याचे कूट घालून, त्याचे किसून थालीपीठ अशी पण वापरली जाते, पण हा प्रकार जास्त आवडीचा.