पॉईंट लोमा: सॅन डियागोच्या टकमक टोकाची ओळख- भाग १

पॉईंट लोमा म्हणजे सॅन डियागोच्या समुद्रात घुसलेल्या सुळक्याला मी आमचं टकमक टोक म्हणते. कारण, मी इथे बसून दिसणारा नजारा कितीही वेळ टक लावून बघू शकते आणि पूर्वीच्या काळी खरंचच येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवायला ह्या जागेचा उपयोग केला जात असे. पूर्वी इथे एक लाईट हाऊस होतं. सध्या ही जागा कॅब्रियो नॅशनल मॉन्युमेंट म्हणून डेव्हलप केली आहे.
ठिकाणाचा अंदाज येण्यासाठी हा एक मॅपचा स्क्रीनशॉट: 
1

सॅन डियागो डाऊनटाऊनपासून अवघ्या दहा-पंधरा मैलांवर असणारं कॅब्रियो नॅशनल मॉन्युमेंट आठवड्याचे सातही दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत उघडं असतं. आत जाण्यासाठी एका खाजगी वाहनासाठी वीस डॉलर फी आहे. सायकलिस्ट, चालत येणारे, प्रवासी गाड्या ह्यांच्यासाठी वेगवेगळे दर आहेत. एकदा हा पास काढला की पुढचे सात दिवस वापरता येतो.  जमिनीच्या समुद्रात घुसलेल्या टोकावर आपण जात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी निळा समुद्र दिसत राहतो. 

आणि दिसत राहतात हिरव्यागार गवतात ओळीने मांडलेले शुभ्र पांढरे दगड. ही आहे अमेरिकन फेडरल मिलिटरी सेमेटरी. सन अठराशे ब्याऐंशी साली स्थापन केलेल्या ह्या दफनभूमीत अमेरिकेसाठी लढताना, युद्धात कामी आलेले सैनिक आणि त्यांचे जवळचे कुटुंबीय चिरशांती घेत आहेत. 
2

इथे काटेकोर स्वच्छता आणि गांभीर्य राखलं आहे. क्वचित कधीतरी एखादं कुटुंब आपल्या जिवलगाचा दगड शोधून तिथे फुलं वाहायला आलेलं दिसतं, पण एकंदरीत परिसराच्या सौन्दर्यामुळे असेल, अशा जागांवर दाटून येणारी भीती किंवा खिन्नता इथे मुळीच जाणवत नाही.

तर पुढे जाऊन गाडी पार्क केल्यावर 'हे बघू की ते बघू' होत असलं तरी आम्ही नियमाप्रमाणे आधी व्हिजिटर सेंटरला भेट देतो. तिथे ठिकाणाची आणि त्या दिवसाचे कार्यक्रम, गाईडेड टूर्स वगैरे स्पेसिफिक माहिती वगैरे मिळाली की त्यानुसार प्लॅनिंग करता येतं. व्हिझिटर सेंटरमधून बाहेर सॅन डियागो डाऊनटाऊन, कोरोनाडो ब्रिज आणि पॅसिफिक महासागराचा जो व्ह्यू दिसतो ती भव्यता फोटोत कॅप्चर करणं निव्वळ अशक्य आहे. तरीही हा एक फोटोः
3
व्हिजिटर सेंटरमध्ये आलोच आहोत तर इथे असणाऱ्या एक-दोन गोष्टी सांगते आणि मग पुढे जाऊ.  
4

जुनियर रेंजर: अमेरिकेतल्या बाकीच्या नॅशनल पार्कप्रमाणे इथेसुद्धा 'जुनिअर रेंजर' प्रोग्रॅम आहे. म्हणजे काय? तर व्हिजिटर सेंटरमध्ये लहान मुलांच्या वयोगटानुसार त्यांना त्या नॅशनल पार्क्सही संबंधित असं एक ऍक्टिव्हिटी बुक मिळतं. आम्हाला आमच्या एजग्रुपसाठी सगळीकडे स्कॅवेन्जर हन्ट्स मिळालेत आजवर. मग ह्या ठिकाणी असणाऱ्या इमारती, विशिष्ठ वनस्पती, प्राणी, पक्षी असे शोधून , दिसतील तसे त्यांना खुणा करायच्या. ते झाल्यावर कधी कधी काही प्रश्न असतात, त्यांची उत्तरं (चित्र काढून) लिहिल्यावर, 'नॅशनल पार्क आणि एकंदरीतच निसर्गाची राखण करेन. झाडं-फुलं तोडणार नाही, खारींना खाऊ घालणार नाही' वगैरे शपथ घेतल्यानंतर खरा पार्क रेंजर, छोट्या मुलांना ज्युनिअर रेंजरचा एक छोटा बॅज लावतो. मला स्कॅवेन्जर हन्ट्स तर आवडतातच शिवाय हे आयते एज्युकेशनल प्रोग्रॅम्स आणि त्या निमित्ताने आमच्या टिंगूमास्टरचं सजग आणि सतर्कपणे बघणं, जबाबदारी शिकणं, जबाबदारीने वागणं  ह्यासाठी ज्युनिअर रेंजर बुकलेट्स खूपच आवडतात. 

पेनी इंप्रिंट्सः हाही प्रकार अमेरिकेबाहेरच्यांना नवीन असेल. प्रसिद्ध ठिकाणी अशी मशिन्स असतात. ह्यात एकावन्न किंवा एकशेएक सेन्ट्स टाकले की राउंड फिगर मशीन मध्ये जाते आणि आपण टाकलेल्या पेनीवर (उपलब्ध पर्यायांतून) आपल्याला हवं ते चित्र छापून मिळतं. ठिकठिकाणचे रेफ्रिजरेटर मॅग्नेटस गोळा करतो तसं ह्या ठिकठिकाणची इंप्रिंट्स असणाऱ्या पेनी गोळा करण्याचा (कमी खर्चिक) उद्योग. शिवाय ते हॅण्डल गोल गोल फिरवून आपण स्वकष्टाने चित्र छापतो असं वाटून मंडळी अजूनच खुश होतात.
5

आता मुख्य विषयाकडे वळते. 
कॅब्रियो मॉन्युमेंट:
कॅब्रियो मॉन्युमेंट म्हणजे समुद्राच्या पार्श्वभूमीवर एका खलाशाचा उंचच उंच पुतळा, एक म्युझियम आणि एक छोटंसं थिएटर आहे. गाडी पार्क करून बाहेर येताना समोरच हा पुतळा दिसतो. मूळ चौदा फुटी पुतळा 'अल्वारो डी ब्री' नावाच्या पोर्तुगीज मुर्तीकाराने १९३९ साली बनवला होता पण कालांतराने त्याची झीज झाली. मग १९८८ साली मूळ पुतळ्याची प्रतिकृती पोर्तुगीजमध्ये बनवली गेली आणि पोर्तुगीज नेव्हीच्या मदतीने इथे आणली गेली.
6

खरा कॅब्रियो जर काही चमत्कार होऊन भूतकाळातून आला तर त्याला हा पुतळा स्वतःचा म्हणून ओळखू येईलच असं नाही. कारण गंमत अशी आहे की, हा पुतळा पूर्णपणे कल्पनाधारित आहे!

कोण होता कॅब्रियो?
इथून पुढे कॅब्रियोची गोष्ट सांगताना संदर्भ येईल तसे म्युझिअममधले फोटो देईन. Juan Rodriguez Cabrillo (उच्चार: ह्वान रॉड्रिग्ज कॅब्रियो)च्या मूळ देशाबद्दल मतांतर आहे. काही इतिहासकार त्याचा जन्म स्पेनमध्ये झाला असं म्हणतात तर काही पोर्तुगालमध्ये. त्याच्या लहानपणाबद्दल काही माहिती नसली तरी तो साधारण इ स १५२० च्या आधी कधीतरी त्याकाळी न्यू वर्ल्ड/ न्यू स्पेन नावाने प्रचलित असणाऱ्या मेक्सिकोमध्ये आला. तो conquistador होता. त्याकाळी आफ्रिका, अमेरिका, एशिया खंडात (नवीन जगातल्या) नवनवीन जागा शोधून, जिंकून तिथे स्थायिक होणाऱ्या सरदारांना conquistador म्हटलं जात असे. सन १४९२ मध्ये कोलंबसने अमेरिकेचा शोध लावल्यानंतर, पुढे पन्नास वर्षं असे अनेक स्पॅनिश conquistador मोहिमा काढून नवनवीन प्रदेशांत गेले.

मेक्सिकोचे मूळ निवासी ऍझटेक्स, त्यांच्यासोबत झालेल्या लढाईत तो स्पेनकडून लढला होता अशीही एक नोंद इतिहासात सापडते. पुढे वेगवेगळ्या समुद्री मोहिमांत सामील होऊन कालांतराने तो ग्वाटेमालामध्ये स्थायिक झाला. त्याकाळी स्पॅनिश राज्यकर्त्यांची आपल्याकडच्या वतनदारीसारखीच पद्धत होती. त्याअंतर्गत कॅब्रियोला शेतजमीनी, खाणी भेट मिळाल्या आणि त्या परिसरातल्या मूळनिवासी माणसांना मजूर म्हणून वापरण्याची परवानगीसुद्धा मिळाली. ह्या मजुरांच्या जोरावरच कॅब्रियोची शेती, खाण आणि सागरी मोहिमा सुरु होत्या. सन १५३० पर्यंत कॅब्रियो एक श्रीमंत वतनदार म्हणून ग्वाटेमालामधल्या सँटियागो इथे स्थायिक झाला होता. इतकंच नव्हे तर त्याने एका नेटिव्ह (मूळ निवासी) स्त्रीशी लग्न करून, त्यांना मुलंसुद्धा झाली होती. पण तेव्हाच्या कायद्यानुसार ह्या मुलांना कॅब्रियोचे वारस म्हणून मान्यता नव्हती (कारण जमीनदार सगळे गोरेच असावेत. ) म्हणून कायदेशीर वारस जन्माला घालण्यासाठी सन १५३२ मध्ये एक स्पेनची वारी करून कॅब्रियो स्पॅनिश (गोऱ्या) मुलीसोबत लग्न करून आला. 

आता ही सगळी माहिती वाचून ह्या मनुष्याचं भव्य स्मारक सॅन डीयागोमध्ये का? असा प्रश्न पडतो ना? मलासुद्धा. मग मॉन्युमेंट बनवण्यासाठी असं काय केलं कॅब्रियोने? तर, पुढे बघू. शेती, सोन्याची खाण आणि समुद्री व्यापारी असलेला कॅब्रियो श्रीमंत, नावाजलेलं प्रस्थ होता. ग्वाटेमालाचा गव्हर्नर अल्वाराडोशी त्याची चांगली मैत्री होती. ह्या गव्हर्नर अल्वाराडोच्याच इच्छेनुसार (आदेशानुसार ?) कॅब्रियोने एकूण तेरा जहाजांचा काफिला बनवून घेतला. त्यापैकी सॅन साल्वाडोर, व्हिक्टोरिया आणि सॅन मिग्वेल अशा तीन जहाजांत साधारण २५० माणसांचा काफिला घेऊन २७ जून १५४२ रोजी कॅब्रियो एका समुद्री मोहिमेवर निघाला. ह्या मोहिमेचा मुख्य उद्देश आशिया खंडात किंवा त्याकाळी स्पाईस आयलँड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडोनेशियात जाण्याचा मार्ग शोधणे हा होता. अर्थातच प्रशांत महासागराच्या भव्यतेची काहीही कल्पना कॅब्रियो किंवा त्याच्या सहप्रवाशांना नव्हती.

सॅन साल्वाडोर हे त्याचं प्रमुख जहाज. सुमारे ८० फूट लांब आणि २२ फूट रुंद अशा ह्या जहाजावर एका वेळी शंभर माणसं मावत. ह्या शंभराची विभागणी अशी होती : चार ऑफिसर्स, तीस खलाशी, तीन साहायक, पंचवीस सैनिक, एक धर्मगुरू आणि बाकीचे मजूर. 
सॅन साल्वाडोरची प्रतिकृती:
7

२७ जून १५४२ला निघालेला कॅब्रियोचा काफिला, साधारण शंभर दिवस समुद्री प्रवास करून २८ सप्टेंबरला सध्याच्या सॅन डियागो बे मध्ये पोचला. कॅब्रियोने तेव्हा ह्या जागेचं नाव सॅन मिग्वेल असं ठेवलं. (पुढे साधारण साठ वर्षांनंतर आलेल्या दुसऱ्या एका स्पॅनिश एक्सप्लोररने हे नाव बदलून सध्याचं सॅन डियागो हे नाव ठेवलं.)  संध्याकाळी खाण्या-पिण्याची व्यवस्था करायला गेलेल्या कॅब्रियोच्या काही सैनिकांवर इथल्या मूळ रहिवाश्यांनी हल्ला केला होता. पण काही दिवसांतच त्यांना भेटवस्तू वगैरे देऊन आणि खाणाखुणांच्या भाषेत संवाद साधून स्पॅनिश एक्सप्लोरर्स त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यात यशस्वी झाले. 

सॅन डियागोच्या पुढे हा काफिला कुठपर्यंत गेला ते माहिती नाही. कदाचित पॉईंट रेयेसच्या जवळपास पोचले असावेत पण वाईट, वादळी हवामानामुळे उत्तरेला फार पुढे जात आलं नाही. कॅब्रियोने सध्या चॅनल आयलँड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटांवर हिवाळा काढू असं ठरवलं होतं पण त्या हिवाळ्यातच सन १५४३ च्या जानेवारी महिन्यात कॅब्रियोचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं कारण नक्की माहिती नाही. एक नोंद असं सांगते की १५४२च्या ख्रिसमस ईव्हला तो एका बेटावर पडला आणि त्याचा पाय मोडला. दुसरी एक नोंद त्याच्या हाताला दुखापत झाल्याचं सांगते.  १९०१ साली एका नवख्या आर्किओलॉजिस्टला 'जे आर' असं लिहिलेला एक दगड सॅन्टा रोझा आयलंडवर मिळाला. हा दगड कॅब्रियोच्या कबरीवर लावलेला दगड असेल असा एक मतप्रवाह होता. परंतु त्याकाळी मोहिमेत असताना मेलेल्या स्पॅनिश सैनिक किंवा खलाशांना समुद्रात जलसमाधी देण्याची पद्धत होती त्यामुळं नक्की खरं काय ते काही कळत नाही. 
म्युझियममध्ये असलेली त्या दगडाची प्रतिकृती:
8

कॅब्रियोच्या मृत्यूनंतर दुसऱ्या एका खलाशाच्या नेतृत्वाखाली ही जहाजं मायदेशी परतली. एकंदरीत काही खजिना, संपत्ती हाती न लागल्याने, इंडोनेशिया आणि आशियाचा मार्ग न सापडल्याने ही मोहीम अयशस्वी मानली गेली. 
(ही सगळी माहिती मला म्युझियममध्ये लावलेले बोर्ड वाचून आणि तिथल्याच थिएटरमध्ये कॅब्रियोच्या आयुष्यावर आधारित लघुपट बघून समजली.) 

म्युझियम: ह्याशिवाय म्युझियममध्ये त्याकाळचे पोशाख, हत्यारं, शेतकामाची अवजारं, निरनिराळ्या खलाशांचा समुद्रीमार्ग दाखवणारे नकाशे, जहाजावर वापरण्यात येणारी नेव्हिगेशन टूल्स वगैरे आहेत.
10

हा एका जहाजाचा क्रॉस-सेक्शन. खाली जहाजावरच्या वेगवेगळ्या खोल्यांची, वस्तूंची माहिती आहे आणि माहितीसमोरचं बटन दाबलं की क्रॉस-सेक्शन मध्ये ती खोली/वस्तू जिथे असेल तिथला लाईट लागतो. 
11   

आणि ही वेगवेगळी साधनं /उपकरणं :
12

ह्या म्युझियमच्या शेजारीच एक पिटुकलं थिएटर आहे, जिथे सतत  २०-२५ मिनिटांचे छोटे छोटे माहितीपर लघुपट सुरु असतात. ग्रे व्हेलचा जीवन प्रवास, कॅब्रियोचं आयुष्य, हे मॉन्युमेंट कसं बनलं वगैरे विषयांवर ह्या फिल्म्स असतात. 

खरं सांगायचं तर, केवळ खडतर समुद्रप्रवास करून सॅन डियागो बंदरावर आलेला पहिला युरोपियन मनुष्य इतकंच कॅब्रियोचं कर्तृत्व. अज्ञात, अनोळखी भागात समुद्रमोहीम काढण्यासाठी लागणारं धाडस आणि नेतृत्वगुण होते त्याच्याकडे, पण एकंदर माहितीवरून तो, इतर लोभी आणि अन्यायकारी वसाहतवाद्यांपैकीच एक वाटतो. अर्थात सगळीकडे त्याच्याबद्दल तटस्थपणेच माहिती सांगितली जाते. म्युझियम, पुस्तकं, लघुपट कुठेच त्याचा उदोउदो केला जात नाही किंवा धिक्कारही केला जात नाही. हे असं घडलं (असावं). इतकंच. त्यामुळं कॅब्रियो मॉन्युमेंट ज्या प्रकारे डेव्हलप केलंय आणि राखलंय त्याने प्रभावित झालो तरी कॅब्रियोचा पुतळा किंवा त्याच्या जहाजाची प्रतिकृती बघून भारावल्यासारखं वगैरे कधीच होत नाही.असो. 
12

तर आमच्या टकमक टोकाची सफर कॅब्रियो मॉन्युमेंटपाशी संपत नाही. इथून पुढे एका छोट्याश्या चढावर चालत गेलं की दिसतं ओल्ड पॉईंट लोमा लाईट हाऊस. त्याबद्दलही सांगण्यासारखं खूप आहे. ते पुढच्या भागात.

-सिद्धि.   

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle