तवा पुलाव

घरी कधी एकटी असेन तेव्हा वन पॉट मील म्हणून मी वेगवेगळे राईस करत असते. या वेळी तवा पुलाव केला. आमच्या ऑफिसजवळ कॉफी स्टॉप म्हणून एक पाभा, पुलाव, कोल्ड कॉफी वगैरे मिळणारी टपरी आहे, तिथला तवा पुलाव आम्ही कधीतरी ऑर्डर करतो. सिंबी पब्लिकचं फेवरीट ठिकाण आहे. मोठ्या ठिकाणी खाल्ल्यापेक्षा तिथली चव छान असते. म्हणून तिथला पुलाव आठवून ही रेसिपी केली.

पुलाव साहित्य: (एका माणसासाठी)

१. चमचाभर तूप/तेल, लवंग, दालचिनी, तमालपत्र
२. प्रत्येकी एक मोठा (उकडलेला बटाटा, कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, घरात असल्यास फ्लॉवरचे चार तुरे आणि फरसबी, फारच लाड असेल तर पनीरचे तुपावर चौकोनी भाजलेले तुकडे, नसले तरी बिघडत नाही. कोथिंबीर.)
३. एक मोठा चमचा आलं लसूण ठेचा (ताजा करा, पेस्ट नको)
४. बासमती किंवा दिल्ली राईस - पाऊण वाटी
५. तेल, लाल तिखट, पावभाजी मसाला, मीठ

रायता साहित्य:

एकेक कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, दही, मीठ, साखर.

कृती:
१. आधी तांदूळ धुवून कमीत कमी अर्धातास पाण्यात भिजवून ठेवा. मग कूकरमधे चमचाभर तूप/तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात एक लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि चमचाभर मीठ घालून त्यात धुतलेले तांदूळ घाला. त्यात एक बोटभर वर राहील इतकं पाणी घाला. एक शिट्टी व्हायच्या जस्ट आधी कुकर बंद करा. लगेच कुकर उघडून त्यात गार पाणी ओता आणि सगळा भात चाळणीत ओतून घ्या. भात मोकळा, बोटचेपा शिजायला हवा, एकवेळ कमी शिजला तरी चालेल पण जास्त नको.

२. कांदा, सिमला मिरची, टोमॅटो वगैरे भाज्या चौकोनी चिरून घ्या. उकडलेल्या बटाट्याचे तुकडे करा. कोथिंबीर चिरून ठेवा.

३. कढईत चार चमचे तेल गरम करा. त्यात आलं लसूण ठेचा घाला, जरा परतून कांदा घाला, तो मऊ झाला की बाकीच्या भाज्या घालून परता. टोमॅटो घाला, त्याच्यावर थोडं मीठ घाला म्हणजे तो लवकर गळेल. शेवटी बटाटा घाला. आता परतताना भाज्या जरा मिळून आल्या की लाल मिरची पावडर, पाभा मसाला आणि थोडं मीठ घालून नीट मिसळून घ्या. आवडत असल्यास थोडं फेटलेले दही घाला. भाज्यांना मसाल्याचं कोटिंग व्हायला हवं. मग त्यात भात घालून हलक्या हाताने मिसळा.

४. पूर्णवेळ ढवळत एक वाफ काढा आणि गॅस बंद करा. वरून थोडं अमुल बटर घालून झाकण ठेवा. हवं असल्यास वरून चीज किसून घालता येईल.

५. रायत्याचं सगळं साहित्य अगदी बारीक चिरून घ्या. एका मोठ्या बोलमध्ये वाटीभर दही त्यात थोडं दूध घालून पातळ फेटून घ्या मग बाकी चिरलेल्या भाज्या त्यात ओता. दोन चमचे साखर, आवडत असेल तर चिमुटभर चाट मसाला आणि मीठ घालून नीट ढवळा.

ही तशी हेतेढकल रेसिपी आहे त्यामुळे माझ्या फारच आवडीची आहे! माझ्यासाठी वर दिलेल्या प्रमाणात दोन वेळा जेवण होतं. एन्जॉय!!

फोटो अगदी जेवताना आठवलं म्हणून तसाच हातातला चमचा खाली ठेवून काढलाय, नो फिल्टर्स!

img_20230423_195419.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle