रश्मीने गोष्टीतली पलोमाने केलेली रेसिपी विचारली म्हणून देते आहे, फोटो मागू नये! आत्ता केलेली नाही.
आंध्रमध्ये जेवणाच्या सुरुवातीला appetizers म्हणून वेगवेगळ्या पचडी (चटण्या) खायची पद्धत आहे. ही त्यापैकीच एक. करायला खूप सोपी आणि अगदी दहा मिनिटात होणारी!
प्रकार १ (टिपिकल आंध्रा स्टाईल तिखट आंबट पचडी)
साहित्य:
ताजा खवलेला नारळ - दीड वाटी
चणाडाळ आणि उडीद डाळ - एकेक मोठा चमचा
धने - एक टी स्पून
चिंच - एक बुटुक
सोललेल्या लसूण पाकळ्या - तीन चार
सुक्या लाल मिरच्या - २
हिरवी मिरची - १
फोडणीसाठी -
तेल, मोहरी, जिरे, दोन लाल मिरच्या, भरपूर कढीपत्ता (१० - १२ पाने)
कृती:
१. पॅनमध्ये किंचितसे तेल गरम करुन त्यात डाळी, धने, चिंच आणि मिरच्या याच क्रमाने परतून घ्या.
२. गार झाल्यावर सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता वाटून घ्या. अगदी पावडर नाही करायची.
३. आता त्याच भांड्यात नारळाचा चव, लसूण, थोडं जिरं आणि मीठ घालुन पुन्हा वाटून घ्या. तयार चटणी बोलमध्ये काढा. चटणी घट्टच चांगली लागते त्यामुळे वाटताना गरज असेल तर अगदी दोन टेबलस्पून पाणी घाला, जास्त नको.
४. आता चमचाभर तेल (खोबरेल असल्यास उत्तम) गरम करून त्यात मोहरी, जिरं, दोन लाल मिरच्यांचे चार तुकडे आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. फोडणी चटणीवर ओतून चमच्याने नीट मिसळा.
खोबऱ्याची पचडी तयार! ही पचडी तूपमीठभातात कालवून खूप मस्त लागते. बाकी इडली, डोसा, उत्तप्पा, पोळी, भाकरी कश्याही बरोबर किंवा नॉनव्हेज बरोबर ताटात डावी बाजू म्हणून छानच लागते. फ्रीजमध्ये ठेवून जरा मुरलेली गार पचडीपण छान लागते.
प्रकार २ (तरला दलाल स्टाईल, थोडी सौम्य, थंड पचडी)
साहित्य:
१. ताजा खवलेला नारळ - अर्धी वाटी
२. दही - पाऊण वाटी
३. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - दोन
४. बारीक चिरलेले आले - अर्धा टी स्पून
५. चवीनुसार मीठ
फोडणीसाठी:
चमचाभर खोबरेल तेल, मोहरी, पाच सहा पाने कढीपत्ता.
कृती:
१. पचडीचे सगळे साहित्य एका मोठ्या बोलमध्ये चमच्याने नीट ढवळून मिसळून घ्या. (ग्राइंडर आहे? हो. त्याच्यावर चटणी ग्राईंड केली? हो! अरेss नही करनी थी!! )
२. तेल गरम करून फोडणी करा. गार झाल्यावर फोडणी बोलमधल्या मिक्ष्चरवर ओता आणि ढवळून घ्या.
३. तयार पचडी फ्रीजमध्ये ठेवा. जेवताना गार गार पचडी एन्जॉय करा!