नमस्कार मंडळी!
कोकणमेवा सम्पत आला आता आणि जरा सविस्तर लिहायला मोकळा वेळ मिळालाय. आंबे आले की इतके पदार्थ होत असतात ना गोड म्हणू नका की तिखट...जे करू त्यात आंबा! आतापर्यंत बऱ्याच रेसिपीज मी शेअर केल्यात आंब्याच्या अगदी रसगुल्ले, पाकातली पुरी, मोदक सगळ्यात आंबा अगदी चपखल बसतो.
तर आज बरेच दिवस पोस्ट लिहायचा राहून गेलेला प्रकार: आंबा गुलाबजाम!
आमच्याकडे गुलाबजाम म्हटलं की खव्याचेच त्यामुळे कितीही फेमस असले तरी चितळे काही रुचायचे नाहीत पण आता आमरस घालून गुलाबजाम करायचे तर खव्याचे शक्य नाही मग काय गेले चितळ्यांना शरण!
शेवटच्या पेटीत तीनच बिटक्या हापूसच्या दिसत होत्या, माझं जाता येता लक्ष होतं कोण मटकावत नाहीये ना आज त्या तयार झालेल्या दिसल्या आणि चितळ्यांना पाचारण केलं. प्रयोग करताना उगाच एकदम जास्त नको म्हणून एकच 200 ग्रॅम चं पाकिट आणलं. तीन बिटक्यांचा रस काढला आणि कधीही न केलेलं काम केलं रस मिक्सर जार मध्ये फिरवून घेतला.
प्रीमिक्स परातीत घेऊन थोडा थोडा रस मिक्स करत गेले. पाण्याचं प्रमाण पाकिटावर दिलंय तसच साधारण रसाचं घ्यायचं. व्यवस्थित मळून लागला तर तुपाचा हात घेऊन छान मळून घेऊन गोळे करायचे.
चितळे म्हणतात 40 होतात पण मी लहान गोळे करते त्यामुळे माझे 80 झाले.
उगाच चितळ्यांपेक्षा कंजूष म्हणू नका हो..काय आहे घरात सगळ्यांना चव बघता यावी म्हणून आणि वाटीत वाढताना जास्त दिसावेत हाच प्रामाणिक उद्देश. छोटे गोळे आतपर्यंत नीट तळले जातात हाही एक फायदा!
साजूक तुपात मध्यम आचेवर छान तळून घ्यावे.
त्यांच्या प्रमाणात पाक करावा. साखर 600 ग्रॅम दिलीय पाकिटावर. उगाच वेलची बिलची नको चार चमचे आमरस घाला पाकात नि केशराच्या काड्या हव्यातर.. आता तयार पाकात उकळीवर तळलेले गुलाबजाम सोडा आणि दोन मिनिटं उकळी काढा. दोन तास पाकात मुरू द्या.
(रस फिरवलेल्या भांड्यात मगभर दूध नि चमचाभर साखर घालून मिल्कशेक करून घ्या...रत्नागिरी हापूस आहे हो शेवटच्या थेंबापर्यंत वापरायचा!)
आता कसे झालेत हे बघायला स्वतः करून बघावे लागतील हो...घरी येतो म्हणू नका मी थोडेच केलेत...आधीच सांगतेय
टीप: ही चितळ्यांची ऍड नाही आणि त्यासाठी त्यानी मला मानधन सुध्दा दिलेलं नाही.
मीनल सरदेशपांडे
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle